भारतात चेटकीण समजून २,५०० महिलांच्या हत्या

उज्ज्वला देशपांडे -

‘द हिंदू’च्या फ्रंटलाईन या पाक्षिकात वितस्ता कौल, वेदान्त लखेरा द्वयीचा अभ्यासपूर्ण लेख दिनांक १३ डिसेंबर, २०२४ रोजी प्रकाशित झाला. ‘२०२५ च्या उंबरठ्यावर, भारतात आजही स्त्रियांना चेटकीण ठरविले जाते, त्यांना विष्ठा खायला भाग पाडले जाते आणि त्यांची हत्या केली जाते’ असे त्या लेखाचे शीर्षक आहे. माझ्या या लेखाच्या शेवटी वाचकांसाठी त्याची लिंक दिली आहे.

भारतात चेटकीण म्हणून ठरविल्या गेलेल्या महिलांची अवस्था अत्यंत भयंकर आहे. त्यांना जमावाकडून ठेचले जाते, कधी चिरडून टाकले जाते, डोक्यावरील केस जबरदस्तीने काढले जातात, लैंगिक अत्याचार केला जातो, विष्ठा खायला लावली जाते आणि नग्न केले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली, तरीही चेटकीण शिकारी (witch haunting) सारख्या स्त्रीविरोधी प्रथा आजही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत, मात्र हे वास्तव अदृश्यच राहते. हे वास्तव फक्त त्या वेळी समोर येते जेव्हा त्या महिलांचा मृत्यू होतो. परंतु ज्या महिलांचा मृत्यू होत नाही, त्या जगण्यासही विवश होतात‡वेगळया ठेवल्या जातात, समाजाकडून अपमानित होतात आणि त्यांचे सन्मानाने जगणे संपते, असे दिल्लीत कार्यरत निरंतर ट्रस्ट या स्त्रीवादी संशोधन व वकिली संस्थेच्या दीप्ता भोग यांनी सांगितले.

निरंतर ट्रस्टने २०२३-२४ मध्ये बिहारमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, चेटकीण प्रथा प्रतिबंधक कायदा (१९९९) लागू होऊन २५ वर्षे झाली असली, तरीही ही प्रथा आजही सुरू आहे. किमान ७५,००० महिलांना बिहारमधील प्रत्येक गावात किमान दोन किंवा त्याहून अधिक महिलांना‡ चेटकीण ठरविले जाण्याची आणि त्यानंतर होणार्‍या हिंसाचाराची भीती सतत भेडसावत असते, असे भोग यांनी फ्रंटलाइनला सांगितले.

राष्ट्रीय गुन्हे नोंदवही प्राधिकरणाच्या (NCRB – National Crime Records Bureau) माहितीनुसार, २००० सालापासून चेटकीण ठरविल्या गेलेल्या २,५०० हून अधिक महिलांची हत्या झाली आहे. या गुन्ह्यांची सातत्याने होणारी पुनरावृत्ती ही खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक विचारसरणी आणि शासनाच्या उदासीनतेचे प्रतीक आहे.

बिहार सर्वेक्षणानुसार, ११४ गावांतील १४५ महिलांशी झालेल्या चर्चेनंतर असे आढळले की, चेटकीण ठरवून झालेल्या हिंसाचाराच्या बळी गेलेल्या ७५% महिला ४६ ते ६६ वयोगटातील होत्या, त्यापैकी ९७ % महिला दलित, मागासवर्गीय किंवा अत्यंत मागासवर्गीय जातींमधील होत्या. त्यातील बहुतांश महिला भूमिहीन कुटुंबांमधून होत्या. धकादायक बाब म्हणजे उच्चवर्णीय महिलांना कधीच लक्ष्य केले जात नाही. कोणीही त्यांना चेटकीण ठरविण्याचे धाडस करत नाही, असे भोग यांनी सांगितले.

सर्वेक्षणात असेही आढळले की, ७३ % महिलांनी कधीच शाळेचे तोंड पाहिले नव्हते आणि ६६% कडे कोणताही नियमित रोजगार नव्हता. आर्थिक दुर्बलता आणि शिक्षणाच्या अभावामुळे या महिला सहज लक्ष्य बनतात. अधिक चिंताजनक बाब म्हणजे, फक्त ३१% पीडित महिलांनीच आपला गुन्हा पोलीस किंवा पंचायतींकडे नोंदविला आणि त्यापैकी ६२% ना कोणताही न्याय मिळाला नाही. शिवाय, सर्वेक्षणातील ८५% गावच्या नेत्यांना १९९९ च्या कायद्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती.

NCRB च्या ‘क्राइम इन इंडिया रिपोर्ट २०२२’मध्ये हे वास्तव स्पष्टपणे दिसून येते. या अहवालानुसार, त्या वर्षातच भारतभरात जवळपास ८५ लोकांची चेटकीण ठरवून हत्या करण्यात आली. मागील दहा वर्षांत, २०१२ ते २०२२ दरम्यान, चेटकीण शिकारीशी संबंधित हिंसाचारात १,१८४ महिलांनी प्राण गमावले. या घटनांमध्ये सर्वाधिक पीडित झारखंडमधून (२२.६%), ओडिशामधून (१६.१%), मध्य प्रदेशमधून (१५.१%) आणि छत्तीसगडमधून (१३.१%) होते.

२०२५ च्या उंबरठ्यावर, भारतात आजही महिलांना चेटकीण ठरवले जाते, विष्ठा खायला लावली जाते आणि त्यांची हत्या केली जाते.

माहिती दर्शविते की ७५,००० हून अधिक महिला बहुसंख्य मागासवर्गीय‡गावागावांत ‘चेटकीण’ म्हणून हिंसाचार आणि बहिष्कृततेचा सामना करीत आहेत, तर प्रशासन डोळेझाक करीत आहे.

सहा राज्यांत बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, राजस्थान आणि आसाम‡ चेटकीण प्रथा आणि संबंधित गुन्ह्यांविरोधात कायदे आहेत, तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अंधश्रद्धा आणि काळ्या जादूटोणा विरोधात कायदे आहेत.

साक्षरता प्रमाणात अग्रेसर असणार्‍या केरळमधील घटना आणि प्रस्तावित कायदा : २०२२ मध्ये केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यात चेटकीण शिकारीशी संबंधित दोन हत्या झाल्यानंतर, सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) नवीन राज्य कायदा आणण्याची मागणी केली होती; मात्र त्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही.

आपल्या सगळ्यांचा आवडता माही-महेंद्रसिंग धोनीच्या राज्यातील घटना – झारखंडच्या मांडार गावातील एका हृदयद्रावक घटनेचा उल्लेख करताना जैस्वाल यांनी सांगितले, चेटकीण असल्याच्या संशयावरून पाच महिलांची हत्या करण्यात आली. त्यातील एका महिलेचा मुलगा देशसेवेसाठी सीमा सुरक्षा दलात कार्यरत होता, मात्र त्याची आई चेटकीण ठरवून ठार मारण्यात आली. पुढे तपास केल्यावर असे आढळले की त्या महिला गावातील मद्यपानाविरोधात जनजागृती करीत होत्या आणि लोकांना जागरूक करीत होत्या. त्यांचा आवाज दडपण्यासाठीच त्यांना चेटकीण ठरवून ठार मारण्यात आले. सर्वेक्षणानुसार, चेटकीण ठरवल्या जाणार्‍या महिलांविरोधातील गुन्हे केवळ अंधश्रद्धेमुळे होत नाहीत, त्यामागे अनेक कारणे असतात. त्यातील काही कारणे :

१) आर्थिक स्वार्थ आणि ‘स्वावलंबी’ महिलांची भीती ही महत्त्वाची कारणे असतात. सर्वेक्षणात असे आढळले की, अशा आरोपांमागील सर्वांत मोठे कारण म्हणजे महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढणे (४२ % प्रकरणे).

२) स्वतंत्र आणि नेतृत्वगुण असलेल्या महिलांचा धोका. समाजात ठरविलेल्या पारंपरिक लैंगिक भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या, outspoken, ठाम भूमिका घेणार्‍या किंवा नेतृत्व करणार्‍या महिलांना लक्ष केले जाते. निरंतर ट्रस्टच्या सर्वेक्षणानुसार, चेटकीण ठरविल्या गेलेल्या महिलांपैकी ५६% महिला काही ना काही नेतृत्वाच्या भूमिकेत होत्या.

३) आरोप जवळच्या व्यक्तीकडूनच : बहुतांश प्रकरणांमध्ये सुरुवातीचे आरोप पीडितेच्या जवळच्या लोकांकडूनच होतात. सर्वेक्षणानुसार, ४८ % आरोप सासरच्या नातेवाइकांकडून, ४४ % आरोप वेगळ्या जात किंवा धर्माच्या शेजार्‍यांकडून आणि ७ % आरोप स्वतःच्या जाती-धर्माच्या लोकांकडून केले जातात, इ.

पुढील काळात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वाढणारा प्रभाव चेटकीण शिकारी आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रभावी भूमिका कशी बजावू शकतो? समाजात चांगला बदल घडवून आणण्यास AI ची मदत घेऊयात.

१) डेटा विश्लेषण आणि ट्रेंड ओळखणे : AI मोठ्या प्रमाणावरील डेटा आणि गुन्हेगारी अहवालांचे विश्लेषण करून चेटकीण शिकारीच्या घटनांचे पद्धती ओळखू शकतो.

२) AI आधारित पूर्वानुमान मॉडेल्सद्वारे संभाव्य गुन्ह्यांची वेळेत ओळख होऊन प्रशासनाला तत्काळ हस्तक्षेप करता येईल.

३) जनजागृती आणि शिक्षणासाठी प्रभावी संवाद : AI आधारित चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल साहाय्यक ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या मातृभाषेत चेटकीण शिकारीविरोधात माहिती देऊ शकतात.

४) AI द्वारे मल्टीमीडिया मोहीम, अ‍ॅनिमेशन, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स आणि शैक्षणिक सत्रे तयार करून लोकांमध्ये जागृती निर्माण करता येईल.

५) सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अंधश्रद्धेविरोधातील संदेश प्रभावीपणे पसरवण्यासाठी AI चा उपयोग करता येईल.

६) AI आधारित हेल्पलाइन आणि अ‍ॅप्स महिलांना त्वरित मदत मिळवून देऊ शकतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पीडित महिलांचे स्थान ट्रॅक करून पोलिसांना तत्काळ सूचित करता येईल.

७) AI द्वारा सुरक्षित SOS सिस्टमद्वारे चेटकीण शिकारीच्या धोक्यात सापडलेल्या महिलांना थेट पोलिस आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधता येईल.

८) AI सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरवल्या जाणार्‍या अफवा, अंधश्रद्धा आणि भ्रामक माहितीचा वेगाने शोध घेऊ शकते.

९) अंधश्रद्धा पसरवणार्‍यांवर लक्ष ठेवणे : AI आधारित फेशियल रेकग्निशन आणि बायोमेट्रिक डेटाद्वारे भोंदू वैद्य आणि अंधश्रद्धा पसरविणार्‍या व्यक्तींचे नेटवर्क ट्रॅक करता येईल.

१०) AI आधारित व्हर्च्युअल ट्रेनिंग प्लॅटफॉर्मद्वारे पोलीस आणि न्यायव्यवस्थेला चेटकीण शिकारीविरोधी कायद्यांविषयी जागरूक आणि संवेदनशील बनविता येईल.

११) सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांचा विचार करून AI भविष्यातील धोका ओळखण्यास मदत करू शकतो.

निष्कर्ष :

AI चा प्रभावी वापर केल्यास चेटकीण शिकारीशी संबंधित हिंसा रोखणे, अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करणे आणि पीडित महिलांचे संरक्षण आणि पुनर्वसन अधिक सुसंगत आणि वेगवान होऊ शकते. वितस्ता कौल, वेदान्त लखेरा यांनी लेखात शासनाचे अपयश मांडले आहे, परंतु शासन, सामाजिक भान असलेले AI तंत्रज्ञ यांच्या पाठिंब्यावरच ही समस्या सोडविण्यात यश येऊ शकेल. सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांचे कष्ट आणि योगदान तर निःसंशय आहे.

मला माहितीय की AI चा वापर ही खूप अवघड, अशक्यप्राय गोष्ट वाटू शकते आणि ती तशी काही प्रमाणात आहे सुद्धा. परंतु भविष्यातील जग किंवा समाज या AI ने नकी बदलणार आहे. मग आपण का नाही अशा AI चा उपयोग आपल्यासाठी सबलीकरणाचे आयुध म्हणून करायचा? अंधश्रद्धेविरोधात लढणार्‍यांनी आणि त्याचे बळी असणार्‍यांनी हे लवकर लक्षात घेतलेले बरे. नाहीतरी अंधश्रद्धा पसरविणारे नवनवीन तंत्रज्ञानाला हाताशी धरतातच. ते जर असे नवीन तंत्रज्ञान शिकून घेऊन वापरू शकतात तर आपल्याला का नाही जमणार? नकीच जमेल, आपण सगळे मिळून नकीच जमवून आणू. तुम्हीपण चांगले उपाय सुचवा, वरील उपायांमध्ये काही बदल करावेसे वाटत असतील तर सांगा. तुम्ही जर प्रत्यक्ष या प्रश्नावर काम करत असाल तर हे सुचविलेले उपाय किती प्रॅक्टिकल आहेत हे पण लक्षात आणून द्या.

संदर्भ : https://frontline.thehindu.com/society/witches-black-magic-women-rural-india-nirantar-trust-survey-ncrb-lynching-social-ostracism/article68981115.ece

उज्ज्वला देशपांडे

Ujjwala.de@gmail.com


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]