सतत चुका सुधारत जाते ते विज्ञान

डॉ. शंतनु अभ्यंकर -

नीट आणि नीटस उत्तरे शोधायची युक्ती म्हणजे विज्ञान. त्या युक्तीबद्दल आपण शिकणार आहोत.

या युक्तीचा शोध अमुक एक माणसाला अमुक एके दिवशी लागला, असं नाही हं. अनेक लोकं, अनेक वर्षं, ही युक्ती वापरून काय-काय विचार करत होते, आसपासचा शोध घेत होते. हळूहळू अशा पद्धतीने विचार केल्यास लवकर उत्तर मिळतं, हे कळलं, उत्तराचा पडताळा पाहता येतो, हे लक्षात आलं. अशा पद्धतीने विचार केल्यास बिनचूक उत्तर मिळतं, हे कळलं आणि यदाकदाचित उत्तर चुकलं तर ते दुरुस्त करायची एक भन्नाट सोय या पद्धतीत होती.

आता हेच बघा ना, अणुची रचना तुम्हाला आता शाळेत शिकवतात. पण हा अणु कसा बनलेला आहे, याबद्दलचे शास्त्रज्ञांचे अंदाज, आडाखे आणि गणिते हळूहळू बदलत गेलेली दिसतात, हळूहळू सुधारत गेलेली दिसतात. एकोणिसाव्या शतकाअखेरीस जे. जे. थॉमसन् या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी सुचवलेलं अणुचं मॉडेल हे योग्य समजलं जात होतं. आता हे बाद ठरलं आहे. थॉमसन् यांचाच विद्यार्थी अर्नेस्ट रदरफर्ड यांनी गुरुजींचं मॉडेल बाद ठरवत नवंच मॉडेल मांडलं. थॉमसन् यांच्या मॉडेलमधील बर्‍याच त्रुटी त्यांच्या या शिष्योत्तमानं दूर केल्या. रदरफर्ड यांनी अणुची रचना ही मधोमध केंद्र आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन अशी कल्पिली. आपल्या सूर्यमालेसारखंच हे. प्रचंड मोठ्ठा सूर्य आणि त्याच्या भोवती आपापल्या कक्षेत फिरणारे, सूर्याच्या मानानं कस्पटासमान असे ग्रह. पण ‘कक्षा’ म्हणजे चित्रात दाखवतात, तशी काहीतरी गोल रेघ आहे आणि त्यानुसार हे इलेक्ट्रॉन फिरत असतात, असा तुमचा समज असेल, तर तो मात्र गैर आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे पृथ्वी, मंगळ वगैरे ग्रहांसारखी एखादी वजनदार वस्तू नाही, हे लक्षात घेऊन रदरफर्ड यांचा शिष्य नील्स भोर यांनी गुरुवर्य रदरफर्ड यांच्या मॉडेलमध्ये आणखी सुधारणा केल्या. सध्याची आपली अणुकल्पना ही अशी रदरफर्ड-भोर यांनी मांडलेली कल्पना आहे.

असे बदल विज्ञानात नेहमीचेच. गॅलिलिओचा तो प्रसिद्ध प्रयोग तुम्हाला माहीत आहेच. उंचावरून सोडलेली जड अथवा हलकी वस्तू एकाच वेळी जमिनीवर पडते, हे त्यानं दाखवून दिलं. पुढे न्यूटनने, वस्तूंच्या हालचाली आणि ग्रहांच्या हालचाली एकाच नियमानं चालतात, हे दाखवून दिलं. आइनस्टाइननं, न्यूटनचे हे नियम काही परिस्थितीत लागू पडत नाहीत, असं दाखवून दिलं. उदाहरणार्थ अणुच्या अंतरंगातील सूक्ष्म कण न्यूटनच्या गणितानुसार चालत नाहीत.

पूर्वी बरीच वर्षं माणसाला दोन बाजूला दोन मूत्रपिंड (Kidney) असतात आणि त्यामुळे आपला तोल सांभाळला जातो, असं समजलं जात होतं. मग तोल सांभाळण्याचा मूत्रपिंडांशी काही संबंध नाही, हे लक्षात आलं. मूत्रपिंडं लघवी तयार करतात, हे लक्षात आलं. आता तर ती ‘हीमोपॉएटिन’ हे रक्त तयार करण्यास आवश्यक संप्रेरक तयार करतात, हेही लक्षात आलं आहे.

‘विज्ञान’ नावाची युक्ती अशी चुका सुधारत-सुधारत पुढे जाते. त्यामुळे खूपच फायदा होतो. जंगलात भटकताना समजा आपण वाट चुकलो तर ती चूक सुधारण्याची संधी हवीच की. समजा आपली दिशा चुकली असेल, तर ती बदलायला हवी. समजा आपण नकाशा चुकीचा वाचला असेल, तर तो नीट वाचायला हवा. समजा नेलेला नकाशाच चुकीचा असेल तर तो भिरकावून देत आपली आपण वाट शोधायला हवी. विज्ञानाचा प्रवास असा चुका ओळखून, त्या दुरुस्त करत, सुधारत-सुधारत होतो.

जगाची रीत समजावून सांगणार्‍या कथा, परिकथा, पुराणकथा यांच्यासाठी या पद्धतीत अशी सोय नाही.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]