वीरा द विनर!

अनिल चव्हाण -

ईरा, वीरा, स्वरा मागे राहिल्या. पण आदी मात्र पळत- पळत पुढे आला. पाठीचे दप्तर काढत त्याने आजीला माहिती दिली “आई! अगं वीराला विनर सर्टिफिकेट मिळालं! बाई म्हणाल्या, ‘वीरा द विनर!” आजीला आई म्हणणे त्याला आणि आजीला दोघांनाही बरे वाटे.

एवढ्यात त्याचे लक्ष दाराच्या कडेला ठेवलेल्या मोठ्या पिशवीकडे गेले “आई! हे काय आहे?”

“त्या गुंड्याभाऊंनी आणलेल्या पिशव्या आहेत.”

“त्यामध्ये रांगोळी आहे!” गुंड्याभाऊंनी माहिती दिली. ते गुरुजींच्या बरोबर खुर्चीत बसले होते. गुरुजींनी आपले धोतर सावरले, काळी टोपी सरळ केली आणि बोलणार तोच वीरा, स्वरा आणि ईरा घरात प्रवेशल्या.

“वीरा आता ‘वीरा द विनर’ झाली आहे! बरं का आई,” माहिती द्यायची प्रत्येकीला घाई लागली होती.

“मी आधीच सांगितलेय!” आदी म्हणाला.

“होय! होय रे!! पण का दिलं हे प्रमाणपत्र?”

“तिला गुण जास्त मिळालेत!”

“थांबा मी सांगते,” ईरा म्हणाली.

“शाळेतील कार्यक्रमात भाग घेणार्‍या प्रत्येकाला एक गुण मिळतो.”

“कसले कार्यक्रम होतात?” गुरुजींचा प्रश्न.

“वर्षभर आमच्याकडे निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वादविवाद अशा स्पर्धा होतात.” ईराने माहिती दिली.

“आणि अशा सगळ्या स्पर्धात वीरादीदी भाग घेते!” स्वरा म्हणाली.

“पण ती जिंकते किती ते सांग ना?” आदीचा वाकडा सवाल. पुढे त्याने माहिती दिली.

“धावण्याच्या स्पर्धेत तिचा दुसरा क्रमांक आला. तिथे दोन स्पर्धक होते. लांब उडीत पाचवा क्रमांक आला. तिथे पाच स्पर्धक होते.”

“हो. पण सहभागाचे गुण मिळतातच. त्यामुळे तिला खूप गुण मिळाले.” ईरा म्हणाली.

“अच्छा म्हणजे अशी ही विनर.”

“असू देत! अभिनंदन वीरा! आपण आता दारात रांगोळी काढूया,” गुंड्याभाऊ म्हणाला.

“एवढेच नाही काही, ती सर्वांना मदत करते; सर्वांना सांभाळून घेते; आणि खिलाडू वृत्तीची आहे’! असेही बाई म्हणाल्या. त्याचेही गुण मिळाले आहेत.” ईराने भर घातली.

“हो. पण आता आपण रांगोळी काढूया ना!” गुरुजींनी मुद्दा पुढे दामटला!

“पण आज कशाबद्दल रांगोळी?”

“अरे रांगोळी काढणे आपली संस्कृती आहे!” गुंड्याभाऊ

“शिवाय त्यामुळे वाईट शक्ती दूर राहतात!” गुरुजी म्हणाले.

“आपल्या भोवती अनेक दुष्ट शक्ती असतात. त्यांना अटकाव करण्यासाठी रांगोळी घालावी!”

“परवाच महिला विज्ञान परिषदेत प्रमुख वक्त्याने याची माहिती दिली आहे!” गुंड्याभाऊ

“गुरुजी वाईट शक्ती कुठे असतात हो?” आदी म्हणाला.

“त्या ना? वातावरणात असतात! सर्वत्र भरलेल्या असतात.” गुंड्याभाऊ.

“दुष्ट शक्ती म्हणजे वाईट शक्ती! …. त्या आपल्या प्रगतीत अडथळा आणतात, रोगराई निर्माण करतात, संकटे आणतात, कामे होऊ देत नाहीत.” गुरुजींनी माहिती दिली.

“रोगराई तर रोगजंतूंनी होते ना, त्याचा या वाईट शक्तीशी काय संबंध?” वीराने शंका विचारली. पण गुरुजी आपल्या नादात होते! ते पुढे सांगत राहिले.

“आणि चांगल्या शक्तींना सुष्ट शक्ती म्हणतात! चांगल्या शक्ती आपल्याला मदत करतात, आपल्या कामात सहकार्य करतात, आपल्याला निरोगी ठेवतात बरं का!”

“गुरुजी, पण ओळखणार कसं?” स्वरा म्हणाली.

“ते ओळखता येते! ज्याची आध्यात्मिक पॉवर वाढली आहे त्याला हे सर्व समजते!” गुंड्याभाऊ.

“अध्यात्माची पातळी वाढली असेल, तर दुष्ट शक्ती कोणती आणि सुष्ट शक्ती कोणती? सहज ओळखता येते.”

“आध्यात्मिक शक्ती वाढण्यासाठी काय करायचं?”

“गुरूला शरण जायचं! मनोभावे सेवा करायची! गुरूला दक्षिणा द्यायची! नामस्मरण करायचे!”

“म्हणजे! यात तुमची वर्तणुक चांगली आहे की वाईट? तुम्ही दक्षिणा देताना पैसे कुठून आणले? तुम्ही कष्ट करून खाता की फुकट चरता? याचा काही संबंध नाही! हे असले कसले अध्यात्म?” आईने शंका काढली.

“मला मेलीला काय कळतेय? आमच्या माहितीचे संत तुकाराम सर्वांत मोठे आध्यात्मिक पुरुष! त्यांनी असं काही सांगितलेलं नाही. ते म्हणतात, तुम्ही रंजल्या-गांंजल्यांना मदत करा, म्हणजे तुम्ही साधू व्हाल! आणि तुम्हीच देव व्हाल!!”

“गुरूची सेवा करा. गुरूला दक्षिणा द्या! असलं अध्यात्म काही उपयोग नाही बरं!” ईरा म्हणाली.

“ठीक आहे गुरुजी! पण समजा सुष्ट आणि दुष्ट शक्ती आल्या आणि आपण दारात रांगोळी घातली असेल, तर त्या दोन्ही परत जाणार ना? दुष्ट शक्तींना अडवताना सुष्ट शक्ती पण जातील हो!” आदी म्हणाला.

“असे होईल खरे! त्यासाठी रांगोळीचे वेगवेगळे आकार काढायचे! आकृत्या काढायच्या! त्या आकृत्यांमुळे दुष्ट शक्ती अडवल्या जातात! आणि सुष्ट शक्ती ……..!”

“पण गुरुजी हे तपासलं कसं? ते कोणी तपासले? की कुणाच्या तरी मनात आले, तो असं काहीतरी सांगतोय?”

“मुळात सुष्ट आणि दुष्ट शक्ती आहे! हे खरं कशावरून? विज्ञान म्हणते…….”

“विज्ञान काय म्हणते? विज्ञान परिषदेतच हे सांगितले आहे! महिला विज्ञान परिषदेतही चर्चा झालेली आहे!”

“हे पाहा गुरुजी, विज्ञान परिषदेत सांगितलं म्हणजे, ते सगळं खरं असेल, असं नाही. गौतम बुद्ध म्हणतात – कोणी मोठ्या माणसाने सांगितले म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट खूप जणांनी सांगितली म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. अगदी मी सांगितले आहे, असं कोण म्हणालं, तरी त्यावर विश्वास ठेवू नका! तुम्ही स्वतःचे डोके वापरा! स्वतः विचार करा!!”

“अत्त दीप भवः तेव्हा या विज्ञान परिषदेत सांगितले असेल आणि ते चूक असेल तर त्याला चूक म्हणण्याचे धाडस आपण दाखवले पाहिजे!”

“जगात सुष्ट शक्ती आणि दुष्ट शक्ती विज्ञानाने सिद्ध झाले आहेत का?”

“याचे उत्तर नाही असे आहे.”

“प्रयोगाने सिद्ध झालेल्या गोष्टीवरच विश्वास ठेवावा असे विज्ञान म्हणते!”

पोरांची चर्चा सुरू राहिली!

“सुष्ट आणि दुष्ट शक्तींचे प्रयोग कोणी केले आहेत? कुठे केले आहेत? किती लाख लोकांच्या वर हे प्रयोग झाले?”

“काही नाही! कुठल्या तरी बुवाला वाटले; तो बोलला, म्हणून त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विज्ञान नव्हे!”

“मला मेलीला काय कळतेय? पण प्रयोगाने सिद्ध झाले नसेल तर सुष्ट आणि दुष्ट शक्ती असतात, असे म्हणता येणार नाही. हे फक्त लोकांना फसवण्यासाठी काढलेली कल्पना आहे, असे नाही का म्हणता येणार भाऊजी?” खूप वेळ शांत बसलेली काऊ आता बोलली.

“पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर अशा रांगोळ्या काढाव्यात,” आदीने शेरा मारला.

“तुम्ही दुष्ट शक्तींची अशी चेष्टा करू नका! चला! गुंड्याभाऊ हे विज्ञानाचे विद्यार्थी आपलं काही ऐकणार नाहीत.”

“गुंड्याकाका आम्ही ऐकू! पण ते रांगोळी काढायचे ऐकू! तुमच्या काल्पनिक दृष्ट शक्तींची भीती आम्हाला घालू नका.” वीरा म्हणाली.

“हुर्रेऽऽऽ चला रांगोळी काढायला वीरा द विनर झालेली आहे!” एका सुरात सगळे ओरडले.

अनिल चव्हाण

लेखक संपर्क ः ९७६४१४७४८३


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]