बाळूमामांचा अवतार ते अवतार संपलेला गुन्हेगार

निशा भोसले -

लोकांच्या अज्ञानाचा व अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत आणि बाळूमामांवर बर्‍याच लोकांची श्रद्धा आहे, ही गोष्ट हेरून मनोहर भोसले यांनी उंदरगाव (ता. करमाळा) येथे बाळूमामांचे मंदिर व आश्रम बांधला आणि स्वत:ला बाळूमामाचा अवतार घोषित करून लोकांना फसवू लागला. राजकीय पुढार्‍यांसोबतचे फोटो सतत टाकून आपला दबदबा वाढवला आणि बघता-बघता एक आश्रम अनेक गुन्ह्यांचे ठिकाण बनले. अनेक ठिकाणांहून शेजारील कर्नाटकसारख्या राज्यातून येणार्‍या भक्तांची संख्या वाढली. दर अमावस्येला 800 ते 1000 गाड्या येऊ लागल्या. ही गोष्ट गावातील काही लोकांना खटकू लागली. काही लोकांनी याची बुवाबाजी संपवली पाहिजे, हा विचार करून आश्रमाची माहिती माध्यमांना पुरवली आणि ‘आश्रम’ ही सीरिज पेपरला येऊ लागली.

29 ऑगस्ट रोजी पेपरला बातमी आली आणि त्याच दिवशी सोलापूर शाखेकडे रवींद्र म्हेत्रे यांची लेखी तक्रारही आली.

आम्ही करमाळ्यातील काही संबंधित व्यक्तींशी संपर्क केला आणि आणखी कोणी तक्रारदार समोर येतात का, याची चाचपणी केली. 2 सप्टेंबरला आम्ही सोलापूर व बार्शी टीमचे निशा भोसले, अशोक कदम, विनायक माळी, अंजली नानल, यशवंत फडतरे, केदारीनाथ सुरवसे, लता ढेरे गावातील सरपंच आणि इतर गावकर्‍यांशी चर्चा केली. सेवेसाठी सहा महिने आश्रमात राहिलेला धनंजय कांबळे या युवकाला भेटून त्याच्याकडून आश्रमाची व मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामाची आणि तो करीत असलेल्या बुवाबाजीची लेखी माहिती घेतली. यानंतर संबंधित आश्रमाला आम्ही भेट दिली; पण त्याला कुलूप होते. ‘लॉकडाऊनमुळे’ बंद आहे असा बोर्ड लावला होता.

त्यानंतर बारामतीचा रवींद्र म्हेत्रेही तेथे आला होता. आम्ही त्याच्या प्रकरणाची पूर्ण लेखी माहिती घेतली. तो धीट मुलगा आहे, म्हणून आपल्या पत्नीला फरक पडला नाही. माझे पैसे परत द्या, असे आश्रमात जाऊन म्हणू लागल्याने मनोहर मामांनी, त्यांच्या माणसांनी त्याला मारहाण केली. पण पोलीस स्टेशनमध्ये मनोहर मामांविषयीची तक्रार न घेता उलट त्याच्यावर खंडणी मागितली आणि जातिवाचक शिवीगाळ केली म्हणून गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्याच्या फसवणुकीची एफआयआर करमाळा पोलिसांनी घेतली नाही. तेव्हा आम्ही त्याला सांगितले की, ‘दुसरी एखादी व्यक्ती सांग, जिला मनोहर मामाने फसवले आहे.’ तेव्हा त्याने शशिकांत खरात याला फोन करून, ‘तू आता लगेच तक्रार लिहून पाठव. ही ‘अंनिस’ची माणसं आहेत. ती आता आपल्या सोबत आहेत,’ म्हणून सांगितले. खरातने लगेच लेखी तक्रार आमच्याकडे पाठवली. पण तो गुन्हा बारामतीत (कारण उंदरगावच्या आधी याचा आश्रम बारामतीत होता.) घडला असल्याने ती तक्रार आम्ही ‘मध्यवर्ती’कडे पाठवली. पुणे शाखेतील नंदिनी, मिलिंद हे कार्यकर्तेपुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना भेटले आणि शशिकांत खरातची एफआयआर बारामतीमध्ये 8 सप्टेंबरला दाखल झाली. लगेच 9 सप्टेंबरला सातारा, कोरेगाव येथील महिला पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण समोर प्रत्यक्ष हजर होऊन तिने फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार मनोहर भोसले आणि त्याचे दोन साथीदार यांच्याविरुद्ध दिली.

पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी 0 नंबरला एफआयआर दाखल करून करमाळा पोलीस स्टेशनला वर्ग केली. अशा प्रकारे मनोहर भोसलेच्या भोवतीचा फास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शाखा, बार्शी शाखा व पुणे शाखा यांनी चांगलाच आवळला.

दरम्यान मनोहर भोसले पळाला होता. 10 सप्टेंबरला बारामती, पुणे पोलिसांनी त्याला साताराजवळील सालपे गावच्या फॉर्म हाऊसवर पकडला आणि त्याला अटक झाली. बारामती कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यानंतर करमाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तिथेही कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली.

पण त्याला कोठडीची हवा मानवली नाही. छातीत दुखत आहे. हा हुकमी एक्का वापरून तो हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहे. काल रात्री 11 वाजता सोलापूर सिव्हिलमध्ये त्याला भरती केले आहे. लोकांचं भविष्य सांगणारा आणि बाभळीचा पाला देऊन हजारो रुपये कमवणारा स्वत:ला मात्र आधुनिक उपचार हवे आहेत. पाहू यात पुढे काय होते…

सध्या तरी 15 दिवसांतच ‘अंनिस’, प्रिंट मीडिया आणि पोलीस यांच्यामुळे याचा अवतार संपविला आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]