विनायक होगाडे -


धीरेंद्र झा हे आघाडीचे शोध–पत्रकार, लेखक आहेत. त्यांनी नुकतंच ‘असेटिक गेम्स–साधूज्, आखाडाज् अँड द मेकिंग ऑफ द हिंदू व्होट’ हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. यात त्यांनी साधूविश्वाचा शोध घेऊन अनेक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रात कुंभमेळा भरत असला तरीही वाचकांसाठी हे साधूविश्व लांबून गूढ–गहन भासतं. हे आखाडे आणि नागा साधू कुठून आले, कसे आले, त्यांच्या प्रथा–परंपरा काय आहेत, त्यांच्यातील गुन्हेगारी आणि शिरलेल्या राजकारणाचा शोध या व इतर विषयांवर मुलाखतीतून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे…
संवादक : विनायक होगाडे
आखाडा म्हणजे काय आणि ते कसे चालतात?
आखाडा म्हणजे एक पारंपरिक संघटना म्हणता येईल. इतिहासात वेगवेगळ्या टप्प्यांवर यांची निर्मिती झाल्याचं पाहायला मिळतं. मुख्यत: मध्ययुगीन कालखंडात यांची निर्मिती दिसून येते. मात्र, हे आखाडे खूप वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा दावा करतात. वास्तव असं आहे की, हे मध्ययुगीन कालखंडातच निर्माण झाले आहेत. यात तीन प्रकारचे आखाडे आहेत – एक शैव आखाडा, दुसरा वैष्णव आखाडा आणि तिसरा शिख आखाडा. यातील शैव आखाडा सर्वांत जुना आहे. हे आखाडे सुरुवातीला वेगवेगळ्या राजांसाठी, सत्ताधीशांसाठी एक सहाय्यकारी शक्ती म्हणून काम करायचे.
सहाय्यकारी शक्ती म्हणजे?
…म्हणजे प्रत्येक सत्ताधीशाची स्वतंत्र फौज असतेच; आणि असायची. मात्र युद्धाच्या वेळी गरज भासल्यास अधिकचे सैन्य म्हणून हे आखाड्यातले लोक त्यांना मदत करायचे. थोडक्यात, गरज भासल्यास अधिकची कुमक म्हणून ही सहाय्यकारी शक्ती होती. म्हणूनच तुम्ही आखाड्यांची सगळी यंत्रणा नीटपणे पाहाल, तर ती तुम्हाला एखाद्या सैन्याच्या यंत्रणेसारखी दिसून येईल; म्हणजे थोडक्यात, त्यांचा एक प्रमुख आहे, त्याखाली त्यांचे सरदार, परत त्याखाली त्यांच्या अधिकाराखाली येणारे गट अशी श्रेणीबद्ध उतरंड आहे. त्यांच्यात लढण्याची परंपरा होती. हे कुस्तीदेखील खेळायचे. त्यावरूनच ‘आखाडा’ हे नाव रूढ झालं. आता ते किती कुस्ती खेळतात, हे माहीत नाही; पण नाव तसंच राहिलं आहे.
या आखाड्यांमध्ये काय–काय फरक आहेत?
शैव आखाड्यांचं जे आक्रमण व्हायचं, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून मुख्यत: वैष्णव आखाड्यांची स्थापना झाल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी हे लोकसुद्धा संघटित व्हायला लागले. खासकरून मुघल सत्तेच्या पाडावानंतर उत्तर-मध्य भारतात अनेक छोटी-छोटी राज्ये होती. त्या काळात हे आखाडे खूप सामर्थ्यवान झाले. शैव आखाडे सात आहेत. या शैव आखाड्यातील साधूंना ‘दसानमी’ किंवा ‘संन्यासी’ म्हटलं जातं. वैष्णवांमध्ये एक स्वतंत्र असा ‘रामानंदी’ पंथ आहे; ज्यामध्ये मुख्यत: तीन आखाडे आहेत. त्यानंतर आणखी छोटे-छोटे आखाडे येतातच. मात्र हे मुख्य तीन आहेत. यातील साधूंना ‘वैरागी’ म्हटलं जातं आणि तीन शिखांशी निगडित हे आखाडे आहेत. जेव्हा ब्रिटिशांचं राज्य स्थापन झालं, तेव्हा भारतातील संस्थानिकांमध्ये आपापसांत लढण्यासाठीचं कारण व अधिकारच नष्ट झाला, तेव्हा खर्या अर्थानं आखाड्यांचं उपयोगितामूल्यच नष्ट झालं आणि पर्यायाने त्यांचा आश्रय समाप्त झाला. कारण जेव्हा इथल्या राजे-रजवाड्यांमध्ये युद्धं व्हायची, तेव्हा हे त्यात सहभागी व्हायचे; अगदी मराठ्यांच्या सैन्यापासून ते ‘पानिपत’च्या लढ्यामध्ये देखील हे सहभागी झाले होते. मात्र, अफगाण सैन्यासोबत ते होते.
अफगाण सैन्यासोबत ते कसे काय गेले?
तेव्हा अफगाण नवाब होता. त्यानं त्यांच्याकडे पाहिलं, तेव्हा हे नग्न लोक पाहून त्यानं एकदम मान वळवली. कोण आहेत हे लोक, असं विचारल्यावर त्याला सांगण्यात आलं की, हा आपल्या फौजेचाच भाग आहे. खरं तर ते अवधच्या राजासोबत होते आणि अवध पठाणांसोबत गेले. त्यामुळे ते अफगाणांच्या सैन्याचा भाग बनले. अर्थातच हे सगळं पैशांसाठी होतं; म्हणजे ज्याने अधिक पैसे दिले, त्याच्या बाजूने ते लढायला जायचे. यात अध्यात्माचा काही भाग नव्हता.
लढणारे हे साधू नंतर इतके सुखासीन कसे काय झाले?
ब्रिटिशांच्या सत्तास्थापनेनंतर यांचं उपयोगितामूल्यच नष्ट होऊन त्यांच्या पोटापाण्याची भ्रांत निर्माण झाली, तेव्हा हे एके जागी स्थायिक होण्याच्या प्रयत्नात स्थिर मालमत्तेकडे वळायला लागले. इथूनच कुंभमेळ्याची संकल्पना सुरू व्हायला लागते. याआधी ते धार्मिक कारणांसाठी जमायचे. मात्र खर्या अर्थाने नियमित अंतराने अमुक एका ठिकाणी जमण्याची; म्हणजे कुंभमेळ्याची संकल्पना सुरू होते ती इथूनच!
हे आखाडे आपापसांत देखील भांडतात, तर हे वाद कशावरून होतात?
त्यांचं उपयोगितामूल्य नष्ट झालं, तेव्हा ते भक्तांच्या दानावरच, दान यायचं त्यावरच निर्भर झाले. थोडक्यात, यांच्या उत्पन्नाचा स्रोतच बंद झाल्याने यांच्या रचनेत आणि कामामध्येच बदल झाले. त्यानंतर धार्मिक कारणांसाठी मिळालेल्या दान-दक्षिणेच्या वाट्यासाठी हे आखाडे आपापसांतच लढू लागले. ही लढाई काहीवेळा खूपच हिंसक व्हायची. कुंभमेळ्यातील शाहीस्नानामध्ये कोण आधी जाईल, यावरूनही हे लोक भांडण करू लागले. त्यानंतर मग हळूहळू या आखाड्यांमध्ये कुंभमेळ्यातील क्रम या विषयावर सामंजस्याच्या बैठका होऊ लागल्या. अशा प्रक्रियेतूनच आखाडा परिषदेची निर्मिती झाली. थोडक्यात, कुंभमेळ्यांच्या नियोजनासाठी ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’ची निर्मिती झाल्याचं पाहायला मिळतं. 13 आखाडे या परिषदेचे सदस्य आहेत. कुंभमेळ्यात आखाड्यांना स्नानासाठी वेळ ठरवून दिलेली असते. जो साधू ज्या-ज्या आखाड्याशी निगडित आहे, तो साधू त्या वेळेत जाऊन स्नान करतो. आखाडा परिषद या सगळ्याच्या नियोजनासाठी तयार झाली.
मात्र त्यांच्यात त्या काळी तरी खरी भक्ती होती का?
त्या काळात भक्ती होती की नाही, हे सांगणं अवघड आहे. त्या काळी देखील साधू बनणं, हे उदरनिर्वाहासाठीचंच एक साधन होतं. समाजात महत्त्व प्राप्त व्हावं, या प्रतिष्ठेतून हे होतं. त्या काळच्या समाजात तुम्ही काही कारणास्तव जुळवून घेऊ शकत नसाल, तरीदेखील साधू बनण्याने अडचणी सुटत आहेत, या कारणांमुळे देखील लोक याकडे वळायचे. त्यामुळे कुणीतरी याकडे वळतोय, म्हणजे तो भक्तीतूनच आणि भक्तीसाठीच वळतोय, असं नाही. सगळ्या साधूंच्या आताच्या अवस्थेबाबत बोलायचं झालं तर पैसा, सत्ता आणि पद या गोष्टींसाठीच त्यांच्यामध्ये जीवघेणी स्पर्धा दिसून येते. या स्पर्धेमध्ये हिंदुत्ववाद्यांनी एक महत्त्वाची आणि परिणामकारक भूमिका बजावल्याचं दिसून येतं.
तुम्ही या साधूविश्वाचा उलगडा करणारं पुस्तक लिहिलंय. या पुस्तकात तुम्ही साधूविश्वात शिरलेल्या राजकारणाचा उल्लेख केलाय, त्याबद्दल थोडक्यात सांगा.
1925 साली हिंदुत्ववाद्यांचे खर्या अर्थानं संघटित प्रयत्न सुरू झाले. त्यांना आढळलं की, या साधूविश्वात आपल्या हितसंबंधांच्या वाढीसाठी आवश्यक प्रमाणात साधू आहेत आणि मग त्यांचा वापर करवून घेण्यासाठी त्यांच्यात शिरकाव आणि हस्तक्षेपाची प्रक्रिया हिंदुत्ववाद्यांनी सुरू केली. 1980 नंतर हे प्रयत्न अधिक तीव्र झाले. राममंदिराच्या मोहिमेवेळी या साधूंचा वापर करण्यासाठी हिंदुत्ववादी प्रयत्नशील झाले. त्यासाठी त्यांनी एका ‘संत समिती’ची देखील स्थापना केली. ही समिती या साधूंच्या आपल्या राजकीय उपयोगासाठी कसा वापर करता येईल, यासाठी प्रयत्नशील झाली. मी जवळपास दहा वर्षे या विश्वात संचार करत होतो. हिंदुत्ववाद्यांनी हिंदू मतांसाठी साधूंच्या राजकीय वापराकरिता त्यांच्यावर टाकलेल्या प्रभावामुळे साधूविश्वावर कसा नकारात्मक परिणाम झाला आहे, हा माझ्या पुस्तकाचा शोधविषय होता. थोडक्यात, सत्ता आणि पैशांच्या मोहापायी शिरलेली गुन्हेगारी आणि राजकारणामुळे आलेलं ‘असाधुत्व’ म्हणजेच ‘णपारज्ञळपस ेष डरवर्हीी’ असा विषय आहे.
हे आखाडे आणि यांची संपत्ती नेमकी कुठे-कुठे आहे?
वैष्णव आखाड्यांची जी मुख्य ठिकाणे आहेत, त्यामध्ये अयोध्या, मथुरा, वृंदावन आहे. वृंदावनमध्ये देखील हे आखाडे आहेत. हरिद्वार, अलाहाबाद, वाराणसीमध्ये शैव आखाडे आहेत.
महाराष्ट्रामध्ये मठ असतात, त्यांचा एक मुख्य बाबा असतो आणि मग
त्याचे चेले असतात.
या आखाड्यांचं काम कसं असतं?
इथेही तसंच असतं. मात्र, आखाड्यांचं एक मुख्य ठिकाण असतं. बाकी लोक ठिकठिकाणी विखुरलेले असतात. जसं की, तुम्ही अयोध्येत गेलात हनुमानगढी हे मुख्य ठिकाण आहे. तिथे सहाशे साधू राहतात. त्यांचा एक प्रमुख असतो. त्यामध्ये परत विभाग असतात. हे सगळे आखाडे धर्मादाय आयुक्तालयामध्ये नोंदणीकृत असतात. याबाबत हे आखाडे दक्ष आहेत.
‘सॅक्रीड गेम्स’ असं यांच्यातील सत्ताकरणाचं वर्णन करण्यात आलंय. हे सगळं काय सत्ताकरण आहे?
मठ असतो, त्याचा महंत असतो, त्याचे अनेक चेले असतात. मात्र, त्यांच्यामध्ये एक सुप्त स्पर्धा पण असते की, ‘पुढचा महंत मी होणार.’ जो मठाधीश असतो, त्याची स्वत:ची एक इच्छा असू शकते. त्या इच्छेनुसार एखादा शिष्य पुढचा मठाधीश होऊ शकतो. त्यामुळे ही असुरक्षिततेची भावना या शिष्यांमध्ये असते. या असुरक्षिततेतूनच बरेच गुन्हे घडताना पाहायला मिळतात. याबाबतची एक केस स्टडी मी अयोध्येतील केली होती. 1980 च्या दशकात हिंदुत्ववाद्यांनी रामजन्मभूमीचं आंदोलन सुरू केलं, तेव्हा अयोध्येतील साधूंचा त्यांना फारसा पाठिंबा नव्हता आणि साधूंच्या पाठिंब्याशिवाय अयोध्येतील राममंदिराचं प्रकरण पुढे नेता येणार नव्हतं, तेव्हा साधूंचा पाठिंबा मिळवण्यासाठी जे महत्त्वाकांक्षी चेले होते, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा पाठिंबा देण्यास हिंदुत्ववाद्यांनी सुरुवात केली. यातून त्यांची हिंमत वाढत गेली. पुढे हे शिष्य मठांवर महंत म्हणून येनकेन प्रकारेण ताबा मिळवायला लागले. त्यामुळे अनेक वेळा खुनाच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. अयोध्या न्यायालयात सर्वांत जास्त खटले हे साधूशी निगडित हिंसेच्या घटनांशी आहेत.
नुकताच झालेला महंत नरेंद्र गिरींचा मृत्यू देखील वादग्रस्त ठरला आहे. त्यात देखील शिष्यांवर आरोप झालेले दिसून येतात, यात कितपत तथ्य आहे?
खरंय. अयोध्येमध्ये सर्वांत जास्त खटले हे चेला-गुरूंमधले याप्रकारचे आणि यासंदर्भातील वादाचेच आहेत. अनेक केसेसमध्ये असं दिसून येतं की, गुरू इतका असुरक्षित होतो की, रात्री भीतीने तो आपल्याच मंदिरात झोपत नाही. या भीतीने की रात्री कुणी गळा दाबला तर…? यासंदर्भात एक अशी कविता देखील अयोध्येतील लोककथेमध्ये आहे. ती अशी की –
चरण दबा के संत बने है, गर्दन दबा महंत;
परंपरा सब भूल गये है, भूल गये है ग्रंथ;
दे दो इनको भी कुछ ग्यान, धरा पर एक बार तुम फिर आओ, है राम…
याप्रकारे राजकारण घुसल्यामुळेच महंत पदासाठीची सत्तास्पर्धा अगदी जीवघेणी बनली आहे. त्यातून गुन्ह्यांचं प्रमाण अत्यंत वाढलं आहे. विशेष म्हणजे गुरूवर चेल्याने आक्रमण, हल्ले करण्याचं हे प्रमाण 1980 नंतर लक्षणीयरित्या वाढलंय; म्हणजेच राममंदिराची चळवळ तीव्र झाल्यानंतर!
या निमित्ताने महंत नरेंद्र गिरी यांच्या वेगळेपणाची नोंद घ्यायला हवी. नरेंद्र गिरी विश्व हिंदू परिषदेशी संबंधित नव्हते. त्यांनी लबाड किंवा भोंदू शंकराचार्यांविरोधात मोहीम उघडली होती. तसेच त्यांनी प्रज्ञा सिंग, आसाराम बापू आणि राधे माँविरोधात मोहीम सुद्धा उघडली होती.
काही हिंदुत्ववादी प्रचारक नंतर साधू बनले, असा दावा तुम्ही पुस्तकात केला आहे. हे जाणीवपूर्वक केलं गेलं असं तुम्हाला वाटतं?
काही बाबतीत मी म्हणेन की, हे ठरवून करण्यात आलं. मात्र, काहीजण नाईलाजानेही जातात. ज्यांच्याकडे घर नाही, कमाईचे साधन नाही, ज्यानं आयुष्यभर पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केलंय, अशा लोकांसाठी उतारवयात साधू बनणं हाच सोपा मार्ग राहतो, असेही लोक यात येतात.
साधू कुंभमध्ये एवढ्या प्रमाणावर येतात कुठून आणि जातात कुठे? ते खरंच नंतर हिमालयात जातात का? कुंभमेळ्यात काही लोकांना पैसे देऊन आणलं जातं, असाही दावा तुम्ही केलाय, हे कशावरून?
हो, हे खरंय! मी हरिद्वारमध्ये फिरत होतो. मलाही हा प्रश्न पडायचा की, एवढ्या मोठ्या संख्येने हे नागा साधू येतात कुठून आणि जातात कुठे? कुंभमेळा नसताना हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील साधू जातात कुठे? अनेक ठिकाणांहून मला असं ऐकायला मिळायला लागलं की, आखाड्यांमध्ये एक सुप्त स्पर्धा असते की, ‘पाहा, आमचा आखाडा किती मोठा आहे…’ त्यामुळे बाहेरचेही लोक आणले जातात, असं मला कळालं. काही भिकारी असतील तर त्यांना पैसे देऊन आखाड्यांची संख्या वाढवण्यासाठी बोलावलं जातं. जे अशा पद्धतीने पैशांसाठी कुंभमेळ्यात नागा साधू म्हणून येतात, त्यांना सुद्धा मी भेटलो. त्यांना प्रत्येक स्नानासाठी 500 रुपये दिले जायचे. राहण्यासाठी घर नसलेल्या आणि भीक मागून जगणार्यांसाठी ही चांगली संधी असते.
नागा साधू बनण्यासाठी ‘टांग तोडे’ नावाची एक प्रथा अवलंबली जाते, ती नेमकी काय आहे?
हो. साधू बनण्यासाठी ‘टांग तोडे’ नावाची प्रथा आहे. यामध्ये ज्याला साधुत्वाची दीक्षा घ्यायची आहे, त्याचं लिंग तोडलं जातं आणि निकामी केलं जात; जेणेकरून ते कधीच ताठू नये. दीक्षा देताना पाचजण असतात – एक मंत्रगुरू, विभूतीगुरू, लंगोटीगुरू, रुद्राक्षमाळा गुरू आणि जानवे गुरू – जे दीक्षा घेणार्याला हे सगळं प्रथेनुसार देतात आणि नवं नाव देखील. याबाबतची अधिक माहिती सांगताना एक साधू मला म्हणाला की, माझं लिंग खेचल्यावर मी जवळपास बेशुद्धच झालो. नंतर मी काही तासांनी शुद्धीत आल्यावर पुढची प्रथा पार पडली. मात्र मला आधी जर हा त्रास माहिती असता तर कदाचित मी हे करायलाच धजावलो नसतो. मात्र, लिंग खेचल्यावर काही सुचायचंच बंद होतं. मला एक कळालं की, कुंभमेळ्यामध्ये ज्या साधूचं लिंग ताठलेलं असेल तो खरा साधू नाहीये, हे ओळखायचं आणि मला असे अनेक साधू दिसून आले, ज्यांचं लिंग ताठलेलं होतं.
मात्र, जो चांगल्या पद्धतीने संभोग करू शकतो, पुरुष म्हणून अधिक ताकदवान असतो, असं म्हणतात; मग इथं याच्या उलट कसं काय?
हिंदू धर्मात कोणतीही गोष्ट अशी ठरलेली नाहीये. इथं प्रत्येक बाबतीत विविधता आहे. त्यातलाच हा प्रकार आहे. आपल्या इंद्रियांना किती वशमध्ये केलंय, हे सिद्ध करण्यासाठीची ही प्रथा आहे. ही प्रथा शैव साधूंमध्ये आहे; वैष्णवांमध्ये नाही. थोडक्यात, सगळी मोहमाया त्याग केल्याचं दाखवण्याचा हा प्रकार आहे. जगाशी असलेली नाळ तोडून ते आपलं नाव देखील टाकून नवी ओळख धारण करतात, म्हणूनच नागा साधूंचा मृतदेह जाळला जात नाही. तो एकतर गाडला जातो किंवा जलसमाधी दिली जाते.
आखाड्यांमध्ये जातिप्रथा आहे का?
या साधूंचं मूळ अध्यात्म नव्हतं, तर लढणं होतं; त्यामुळं खालच्या जातीतले लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, जातिप्रथा आहे ती वेगळ्या पद्धतीने. उदाहरणार्थ, हनुमानगढीमध्ये एक मंदिर आहे. त्याच्या व्यवस्थापनामधील जबाबदारी ठराविक काळासाठी क्रमाक्रमाने वाटून दिली जाते. यामध्ये पुजार्याची जागा एखाद्या ‘खालच्या जाती’च्या साधूला मिळाली तर पैशांचा व्यवहार आणि हिशेब करण्याचा अधिकार त्याला असेल. मात्र देवाची पूजा करण्यासाठी एखाद्या ब्राह्मणाला अथवा उच्च जातीच्या साधूला बोलावले जाईल. त्याच्या क्रमाप्रमाणे तो जबाबदारी सांभाळेल; मात्र पूजा वगैरे करण्यासाठी तो उच्च जातीलाच घेईल. त्याचप्रमाणे दीक्षा देण्याच्या प्रक्रियेमध्ये दीक्षा फक्त ब्राह्मणच देऊ शकतो, म्हणूनच जेवढे काही ‘आचार्य महामंडलेश्वर’ आहेत, हे ब्राह्मणच आहेत. तेच दीक्षा देतात.
महिलांचं स्थान कसं आहे? आखाड्यांच्या निर्णयप्रक्रियेत त्या असतात की नसतात?
महिलांसाठी ‘माईवाडा’ नावाचं व्यासपीठ आहे. महिला देखील साधू बनतात, त्यांनाही दीक्षा दिली जाते. मात्र, या आखाड्यांच्या सार्या प्रक्रियेत त्यांचं फारसं स्थान नाहीये. मला कुठेच महिलांचं महत्त्वपूर्ण स्थान दिसून आलं नाही.
किन्नरांचं काय स्थान आहे?
किन्नर स्वतंत्र आखाड्याच्या मागणीसाठी सतत प्रयत्नशील होतात, बंड करतात. मात्र त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. अशा प्रकारचे वाद सतत होत असतातच.
ड्रग्ज संबंधित प्रकरणे सध्या बरीच वादग्रस्त होत आहेत. हे साधू देखील मोठ्या प्रमाणावर गांजाचं सेवन करतात. यांच्यावर कारवाई का बरी होत नसेल?
साधूंकडे असणार्या गांजाबाबत कसलीही कारवाई होत नाही, असाच माझा अनुभव आहे. 2013 च्या अलाहाबाद कुंभमध्ये एका साधूच्या जीपमधून मी जात होतो. एके ठिकाणी पोलिसांचं चेकिंग सुरू होतं आणि त्या साधूच्या जीपमध्ये भरपूर गांजा होता. मी घाबरून त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणाला की, ‘चिंता करू नका, ही नेहमीचीच तपासणी आहे. गांजा तर आमच्यासाठी अन्नपदार्थासारखा आहे. त्यामुळे ते आमच्याकडून गांजा हिरावून घेऊ शकत नाहीत.’ पोलिसांनीही तपासणीवेळी गांजा पाहिला. तो आजूबाजूला सारून इतर काही आक्षेपार्ह आहे का, हे त्यांनी पाहिलं. थोडक्यात, पोलिसांसाठी त्यावेळी गांजा आक्षेपार्ह नव्हता, असंच मला दिसून आलं.
काही साधू अघोरीपणा करताना दिसून येतात, याबद्दल काय सांगाल?
काही जण अघोरीपणा करताना दिसून येतात. उदाहरणार्थ ते एके ठिकाणी एका पायावर उभं राहणं, लिंगाला विट बांधणं वगैरे गोष्टी करतात. मात्र, ते सगळं नाटक असतं. कुंभमेळ्यात लोक आलेले असतात. त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लोक अशा प्रकारच्या कृती करत असतात. स्वत:भोवतीचं गूढ वाढवायचा प्रयत्न करतात. मात्र त्यांच्याकडे गूढ-गहन असं काहीही नसतं.
रामजन्मभूमी आंदोलन संपल्यावर हिंदुत्वकरण झालेले साधू कोणत्या मार्गाने गेले?
राम मंदिर बनण्याची सुरुवात झाल्यानंतर त्यांच्यासाठी पूर्वी जे एक ‘मिशन’ होतं ते आता संपलं आहे. आता संघ परिवाराने विश्व हिंदू परिषदेला बाजूला केलं आहे. त्यामुळे ‘विहिंप’शी संबंधित साधू सुद्धा बाजूला फेकले गेले आहेत. ते सर्व साधू कदाचित आता नवीन आंदोलनाच्या प्रतीक्षेत असतील.
आता या साधूंच्या दुनियेत काय नवे बदल झालेत? खरंच कोणत्या तरी भक्तीचा लवलेश शिल्लक राहिलाय का?
या साधूंमध्ये आता मागासवर्गीय आणि वंचित समाजातील लोकांचा मोठा भरणा आहे. या साधूंच्या दुनियेत नक्की किती गुन्हेगार शिरकाव करतात, याचा काहीच निश्चित असा लेखाजोखा नाही. देशातील इतर भागात गुन्हे केलेले कितीतरी गुन्हेगार नंतर दाढी वाढवून या गर्दीत जमा होतात. शिक्षेपासून वाचण्याचा आणि रोजीरोटी भागवण्याचा हाच एक चांगला मार्ग त्यांच्यापुढे शिल्लक राहतो; आणि असे खूप सारे खटले आहेत. बिहारमधील डॉन कामदेव सिंगचं प्रकरण प्रसिद्ध आहे. त्याचा खून केल्यानंतर सर्व आरोपी अयोध्येला येऊन साधू बनले. लोकशाहीसाठी हा मोठा धोका आहे.
या साधूंच्या अशा काळ्या कृत्यांबाबत बोलणारे काही संघटनात्मक काम उत्तर भारतात कुठे सुरू आहे का?
नाही. अशा प्रकारचं कसलंच काम मला तिकडं दिसून आलं नाही. खरं तर याची गरज आहे. नागा साधूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र, हा प्रश्न मुख्य नाही. आधी जे साधू होते ते ग्रामीण भागातून आलेले होते. त्यांच्या गरजा तशा फारशा नव्हत्या. त्यांनी जे काही कमावलं आणि जमा केलं ते आताचे साधू उपभोगत आहेत. आता जे नवे चेले आलेत, त्यांच्या गरजा वाढल्या आहेत. या मोठ्या संपत्तीचे ते हक्कदार बनलेत. ते सुरक्षारक्षक देखील घेऊन फिरतात. थोडक्यात, यंत्रणा तीच राहिली; मात्र त्यातील आशय बदलतोय, अधिक सुखासीन होतोय. ज्याप्रकारची गरिबी या देशात आहे, ती पाहता याप्रकारचे साधू निर्माण होत राहणं साहजिकच आहे; यासाठी नव्हे की अध्यात्माचा विकास करायचा, तर प्रतिष्ठेने आणि सोप्या पद्धतीने रोजीरोटी मिळवण्याचा हा एक सोपा पर्याय आहे.
धीरेंद्र झा यांची शोधपत्रकारितेतून तयार झालेली ग्रंथसंपदा

1) Ayodhya : The Dark Night या 2012 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात 22 डिसेंबर, 1949 रोजी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद परिसरात रामाची मूर्ती कशी ठेवली गेली आणि यामागचे कुटिल षड्यंत्र काय होते, यावर प्रकाश टाकणारे संशोधन आले आहे. यासाठी कृष्णा झा आणि धीरेंद्र झा या लेखकांनी अनेक मूलभूत स्वरुपाच्या प्राथमिक पुराव्यावर प्रकाश टाकणार्या अशा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. ‘छुपा अजेंडा’ असलेल्या या कटासाठी केल्या गेलेल्या पडद्यागच्या कारवाया या पुस्तकात उघड केल्या आहेत. हिंदू महासभा; तसेच हिंदू परंपरांबाबत गर्व असलेल्या संस्थांचा यामध्ये असलेला संबंध या लेखकांनी पद्धतशीररित्या स्थापित केला आहे.
2) Shadow Armies : Fringe Organizations and Foot Soldiers of Hindutva या 2017 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात धीरेंद्र झा यांनी संघ परिवाराच्या हिंसक हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी झटणार्या संघटनांना केंद्रस्थानी ठेवून द्वेषमूलक सत्ताकारणाची पोलखोल करणारी मांडणी केली आहे. या पुस्तकात भारतीय जनता पक्षाचा लोकसभेतील 2 जागा ते पूर्ण बहुमतातील सत्ता येण्यापर्यंतच्या प्रवासात राबवला गेलेला द्वेषयुक्त आणि मूलतत्त्ववादी राजकारणाचा अजेंडा राबवणार्या संघ परिवारातील संघटनांचा समाचार घेण्यात आलेला आहे. या पुस्तकात अभ्यास करण्यात आलेल्या संघटनांमध्ये श्रीराम सेने, हिंदू ऐक्य वाहिनी, सनातन संस्था, हिंदू ऐक्य वेदी, बजरंग दल, अभिनव भारत यांचा समावेश आहे.
3) Ascetic Games : Sadhus, Akharas and the Making of the Hindu Vote या 2019 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात धीरेंद्र झा यांनी जवळपास दहा वर्षे केलेल्या सखोल संशोधनाच्या आधारे साधूंच्या गुप्त विश्वाचा धांडोळा घेतला आहे. साधूंच्या अंतरंगात हिंदुत्वाचे राजकारण पेरणार्या कुटिल कारस्थानाचा ते शोध आणि वेध घेतात. साधूंचे आध्यात्मिक जग हे अधिकाधिक स्वरुपात मूलतत्त्ववादी-असहिष्णु अशा राजकीय विचारधारेने कसे बाधित केले गेले आणि उत्तर भारतातील साधूंचे आखाडे हे रामजन्मभूमीचे आंदोलन पुढे रेटण्यासाठी कसे वापरले गेले, याचा वस्तुनिष्ठ विश्लेषणासह त्यांनी आढावा घेतला आहे. साधूंचे आध्यात्मिक जग आर्थिक संपत्तीच्या हव्यासाने, अंतर्गत सत्तासंघर्षाच्या स्पर्धेने कसे ग्रासले आणि ते पुढे एकमेकांवर कुरघोडी करणार्या राजकारणाचे मैदान कसे बनले, याबद्दल शोधपत्रकारितेच्या सहाय्याने झा यांनी विस्तृत मांडणी केली आहे.
मुलाखत सहाय्य : राहुल माने आणि राहुल थोरात