अरुण पुंजाजी कडू-पाटील -
प्रा. एन. डी. सर आपल्यातून गेले. आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि आता एन. डी. सर. ‘अंनिस’च्या दृष्टीने कधीही न भरून येणारी ही हानी. कोणीही व्यक्ती ही काळाच्या पडद्याआड जाणे, ही तशी नैसर्गिक बाब; मात्र जी व्यक्ती सार्वजनिक जीवनात असते, ती जाणे म्हणजे ज्या-ज्या संस्थांशी ती व्यक्ती संबंधित असते; किंबहुना नेतृत्वस्थानी असते, त्या-त्या संस्था निश्चितच पोरक्या होत असतात. इतर अनेक संस्थांबरोबरच आज डॉक्टरांच्यानंतर सरांचे जाणे म्हणजे ‘अंनिस’च्या दृष्टीने हे पोरकेपण जास्तच अधोरेखित होते आहे; आणि म्हणूनच ‘अंनिस’च्या पुढच्या पिढीवरची जबाबदारीही तितकीच अधोरेखित होते आहे.
सर प्रखर पुरोगामी, कृतिशील विचारवंत होते. आचार आणि विचारांमध्ये थोडीशीही फट त्यांनी आपल्या कृतीमध्ये पडू दिली नाही. त्यामुळे खोट्याला खोटे म्हणण्याचे धाडस त्यांच्या ठायी होते. जीवनात अनेक प्रसंगी तडजोड स्वीकारण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले. आपला मंत्रिपदाचा कालावधी संपल्यानंतर स्वतःची व्यक्तिगत बॅग घेऊन मंत्र्याचा बंगला सोडणारे फक्त सरच असू शकतात. त्यांच्या ‘त्या’ कालावधीत त्यांनी कारभार सुद्धा त्यांच्याच पद्धतीने केला; त्यात तडजोड कधी केली नाही. खरे तर हे मंत्रिमंडळ उे-रश्रश्रळींळेप सरकार होते. सर्व पक्षांचे असूनही स्वतःच्या पुरोगामी आणि डाव्या विचारांना त्यांनी कधीच मुरड घातली नाही. या कालावधीत त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे खर्या अर्थाने प्रतिनिधित्व केले.
सरांनी रयत शिक्षण संस्थेमध्येे अनेक वर्षे मॅनेजिंग कौन्सिलचे चेअरमन म्हणून एकहाती नेतृत्व केले. रयत शिक्षण संस्थेचा हा कालावधी केवळ सरांच्या नैतिक अधिष्ठानावर पार पडला. सरांचीही नैतिकता कारभारात असल्यामुळे त्यांचा धाक कारभारात आपोआपच होता. सरांच्या चेअरमनपदाच्या कालावधीत ज्येष्ठ नेते शरद पवार संस्थेचे अध्यक्ष होते. पवारांच्या मोठेपणाचा परिणाम त्यांनी संस्थेच्या कारभारावर होऊ दिला नाही. उलट त्यांचे नेहमी सांगणे की, राजकीय शिफारशी असतील तर त्यांचा ‘रयत’मध्ये कधीही शिरकाव होऊ द्यायचा नाही. मग त्या शिफारशी पवारांच्या का असेनात. येथे सर पवारांचा उल्लेख एकेरी नावाने करायचे. तो उल्लेख त्यांच्याच तोंडी शोभू जाणे.
‘रयत’मध्येे सरांनी फार मोठा धोरणात्मक निर्णय घेतला. ही बाब सर्वज्ञात आहे की, रयत शिक्षण संस्थेचा सोळा जिल्ह्यांतील सहाशेवर शाखा, चार लाखांवर विद्यार्थी, अठरा हजारांपेक्षा जास्त सेवक वर्ग असा मोठा पसारा आहे. कर्मवीर अण्णांच्यापासूनच संस्थेचा कारभार सातार्यातूनच चालत आला आहे. संस्थेची पाच विभागीय कार्यालये आहेत; पण त्यांची मर्यादा फक्त सल्लागार एवढीच होती. या विभागांतर्गत काम करणार्या कार्यकर्त्यांचे जे मंडळ आहे त्याचे नावच मुळी ‘सल्लागार मंडळ’ असेच आहे. त्याचे अध्यक्ष म्हणजे सल्लागार मंडळाचे अध्यक्ष. सरांनी ‘रयत’च्या कारभाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि या विभागीय सल्लागार मंडळांना कारभारात पूर्णपणे स्वायत्तता दिली. हा निर्णय संस्थेच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारा ठरला. ‘रयत’शी आधीपासूनच जोडलेला तळातील कार्यकर्ता संस्थेच्या कारभारात थेटपणे प्रत्यक्ष सहभागी झाला. या विकेंद्रीकरणाला अजूनही काही मर्यादा असल्या तरी त्या संस्थेच्या लिखित घटनेशी बांधील आहे. या घटनेसंदर्भातही सरांचे ठाम मत होते की, घटनेत ढवळाढवळ सहन केली जाणार नाही, याची सर्वांनीच दक्षता घेतली पाहिजे.
‘रयत’च्या संदर्भातील सरांच्याबाबतीत माझ्या आठवणी कारभाराच्या दृष्टीने सदैव आठवणीत राहतील, अशाच आहेत. त्यातूनच मला कितीतरी शिकावयास मिळाले. राजकीय हस्तक्षेप न जुमानता ‘रयत’चा कारभार झाला पाहिजे, हा सरांचा अलिखित आदेशच आम्हास होता आणि त्याचे पालन आमच्याकडून करून घ्यायचे. आता मी हे सहजपणे लिहितो आहे; पण माझे वडील, थोर स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार कॉ. पी. बी. कडू-पाटील की, ज्यांनी ‘रयत’च्या उत्तर विभागाचे अध्यक्षपद, संस्थेचे उपाध्यक्षपद व अहमदनगर ‘अंनिस’चे अध्यक्षपद या माध्यमातून एन. डी. सरांसोबत अनेक वर्षे काम केले. त्यानंतर ही जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर माझ्या उत्तर विभागीय अध्यक्षपदाच्या तेवीस वर्षांच्या कालावधीत माझे (ज्येष्ठ) सहकारी होते. (माजी मंत्री) सहकारातील दिग्गज शंकरराव काळे, शंकररावजी कोल्हे, स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ विधिज्ञ, इंडियन लॉ सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष रावसाहेब शिंदे व इतर ही सर्व दिग्गज मंडळी माझ्या दोन्ही बाजूस बसलेली आणि मी विभागीय स्तरावरील बैठका चालवितो, म्हणजे माझी अवस्था काय आणि कशी असेल, याची कल्पना करून बघावी. मात्र सरांच्या पाठबळावर मी कारभार करू शकलो, हे त्यातील गमक म्हणावे लागेल.
‘रयत’च्या कारभारातील विकेंद्रीकरणाचा मी जाणीवपूर्वक उल्लेख केला. या संदर्भातील एक आठवण पुरेशी ठरेल अशी आहे – सातार्याची संस्थेची बैठक संपवून मी एस. टी.ने परतीच्या प्रवासाला लागलो होतो. नुकतेच मोबाईल फोन वापरात आले होते. सातारा सोडून बरेचसे पुढे आल्यानंतर सरांचा फोन आला आणि ‘मी कोठे आहे आणि परत येऊ शकतो काय,’ म्हणून सरांनी विचारणा केली. ‘मी एस. टी.मधून प्रवास करतो आहे; पण परत यायचेच असेल तर पुढच्या स्टॉपवर उतरून माघारी येतो,’ म्हणून सांगितले. सरांनी सांगितले, ‘असू देत येण्याची गरज नाही.’ तरीही उत्सुकता म्हणून विचारणा केली तर सरांनी सांगितले की, ‘मी एका शाखाप्रमुखाची बदली केली, त्याविरोधात शिष्टमंडळ आले आहे.’ सरांनी फक्त एवढेच सांगितले तरीसुद्धा मी त्यांना त्या बदलीमागची सर्व कारणे विषद केली. सांगितले, ‘या बदलीमागे माझे व्यक्तिगत मत काही नाही किंवा तो प्रतिष्ठेचाही विषय नाही. तुमचे मत असेल तर बदली स्थगित केली तरी चालेल.’ मात्र सरांनी मला लगेच सांगितले, ‘मी तुझ्या कारभारात ढवळाढवळ करणार नाही. तू केले ते योग्यच केले असणार, याची मला खात्री आहे.’ आणि ती बदली कायम राहिली. आज निवृत्तीनंतरही ते शाखाप्रमुख माझे चांगले मित्र आहेत आणि दूर पंढरपूरकडे मूळ गावी असूनही आमची ‘फोन मैत्री’ टिकून आहे. 9 मे च्या कर्मवीर पुण्यतिथीला भेटी चालूच आहेत.
खरे तर ‘रयत’मध्ये विभागीय अध्यक्ष झालो, त्यावेळी मी इतर सर्वांपेक्षा खूपच कनिष्ठ कार्यकर्ता. आधी सांगितल्याप्रमाणे मा. काळे, कोल्हे, रावसाहेब शिंदे तर होतेच; त्यात सातार्यात आप्पासाहेब पाटील, तत्कालीन मंत्री पतंगराव कदम, नामदेवराव जगताप, दि. बा. पाटील वगैरे दिग्गजांबरोबरीने बैठकीत असायचो. त्यामुळे मी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. माझे गप्प बसणे सरांना मान्य नसायचे. कधी ते माझ्याकडे निर्देश करून ‘अरुण, तुझे काय म्हणणे आहे,’ म्हणून मला बोलण्यास भाग पाडायचे. एकदा सहज गप्पांच्या ओघात त्यांना मी बैठकीत न बोलण्याचे कारण माझे कनिष्ठत्व आणि सर्वांचे ज्येेष्ठत्व सांगितल्यानंतर सरांनी निक्षून सांगितले, ‘तू कारभारात सहभाग घेतलाच पाहिजे. ज्येष्ठ-कनिष्ठ असे काही मनात ठेवायचे नसते.’ सरांच्या अशा कितीतरी खासगी आणि इतर बैठकांमधून मी शिकतच गेलो. यात सरांचे विनयशील ज्येष्ठत्वच माझ्या कामी आले. सरांच्या मार्गदर्शनाखालीच मला ‘रयत’च्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. या पदावर काम करताना सरांच्या विचारसरणीचा मला निश्चितच फायदा झाला.
सर नेहमी म्हणायचे, ‘रयत’ हा माझा श्वास आहे.’ आणि खरोखरच सर अखेरपर्यंत ‘रयत’मय होते. ‘रयत’मधील बैठकांमध्ये सर सहजपणे एखाद्या विषयावर विस्तृतपणे बोलायचे. हे त्यांचे बोलणे आम्हा कार्यकर्त्यांना बौद्धिकच असायचे. महात्मा फुलेंचे शैक्षणिक विचार, लॉर्ड मेकॉलेंचे शिक्षणविषयक धोरणावरील त्यांचे उद्बोधन नेहमीच श्रवणीय असायचे.
सरांसारखे महनीय व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी समाजाला दशकानुदशके वाट पाहावी लागते, तेव्हा अशी मोजकीच व्यक्तिमत्त्वे घडत असतात. आज संपूर्ण देश एका संधिकालातून प्रवास करीत आहे. हा प्रवास कधी प्रतिगामी अंध:काराकडे जाईल, अशी साधार भीती वाटू लागली आहे. संसदीय मार्गाने; पण मागच्या दाराने हुबेहूब जर्मनीच्या त्या कालखंडाची आठवण यावी, एवढी भयावह स्थिती आज देशाची होऊ पाहते आहे. राजकीय हतबलता काय असते, हे देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा मध्य-पूर्वेसारखी राजकीय व सामाजिक परिस्थिती येऊ पाहते आहे. धार्मिक उन्माद असणार्यांना जे साथ देत आहेत, त्यांना याचे भान नाही, याची खंत वाटण्याच्या पलिकडे आपण चाललो आहोत. अशा या संधिकालात सरांचे जाणे अतीव दुख:कारक आणि क्लेशकारक ठरत आहे.
एन. डी. सर एक पुरोगामी, कृतिशील विचारवंत, त्यांना अखेरचा लाल सलाम!
– अरुण पुंजाजी कडू पाटील
उपाध्यक्ष – रयत शिक्षण संस्था
अध्यक्ष – अहमदनगर जिल्हा अंनिस