डॉ. हमीद दाभोलकर -

कर्मचार्यांच्या कामाचे तास वाढवण्याची चर्चा गेल्या काही महिन्यात परत परत होत आहे. आधी नारायण मूर्ती यांनी आठवड्याचे कामाचे तास सत्तर करावे असे विधान केले होते. गेल्या आठवड्यात एल अँड टी चे अध्यक्ष एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्याचे कामाचे तास हे नव्वद करण्याविषयी विधान केले आहे. खेदाची गोष्ट अशी की, काही महिन्यांच्या पूर्वी अॅना सेबास्टियन पेरायिल या २६ वर्षांच्या मुलीचा अतिकामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आणि त्या विषयी झालेली चर्चा हे धुरीण विसरून गेले आहेत. या निमिताने जी चर्चा घडत आहे त्याचा कानोसा घेतला तर आपल्या असे लक्षात येईल की, ही सगळी चर्चा ही मोठ्या मोठ्या कार्पोरेट समूहांच्या प्रमुखांच्या कडून केली जात आहे. त्याला पुढे देशप्रेमाचा मुलामा दिला जातो आहे. याच्याही पुढे जाऊन तरुण विजय यांच्यासारखे भाजपचे राज्यसभेचे खासदार असलेली व्यक्ती याचा संबंध हा धर्मशास्त्रातील शिकवणीशीदेखील लावत आहेत. पुढे जाऊन ते म्हणतातकी, “सुट्टी घेणे ही ब्रिटिशांच्या कडून आपल्याला मिळालेली विरासत आहे! थोडाही विवेक शाबूत असलेल्या व्यक्तीला हास्यस्पद वाटाव्या अशा या चर्चा परत परत घडतात तेव्हा दोनच शक्यता समोर दिसतात ते म्हणजे समाज म्हणून आपण झपाट्याने सार्वजनिक तारतम्य गमावत चाललो आहोत किंवा ते आपण गमवावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.
समाजातील बहुतांश वर्ग हा एक तर सतत कामात गुंतून राहील आणि विविध गोष्टींनी त्याला असे गोंधळून टाकले जाईल की, त्याला स्वत:च्या हिताचादेखील नीट विचार करता येणार नाही असा वर्ग समाजात निर्माण होतो तेव्हा ज्यांना विविध मार्गाने राज्यसत्ता, धर्मसत्ता आणि पुढे जाऊन अर्थसत्ता राबवायची आहे त्यांच्या साठी हे खूप सोईचे आहे. थोडा जरी विचार केला तरी हे आपल्याला सहज समजून येऊ शकते की, काही धनदांडग्या लोकांना अमर्याद नफेखोरी करता यावी यापेक्षा काहीही वेगळे उद्देश या मागे नाही.
देश, धर्म, कंपनी यांचे हित जसे महत्त्वाचे आहे तसेच त्यासाठी काम करणार्या व्यक्तीचे हित देखील महत्त्वाचे आहे. मानवी मनाला जसे काम हे आनंदी राहण्यासाठी आवश्यक आहे तसेच पुरेशी विश्रांती हीदेखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे हे आता अनेक शास्त्रीय अभ्यासांच्या मधून पुढे आले आहे. खरे तर काम आणि बाकीचे आयुष्य यांचे संतुलन ही संकल्पना आता मोठ्या प्रमाणात पुढे येऊ लागली आहे. जर कर्मचार्यांच्या जीवनात- आयुष्यात काम आणि बाकीचे आयुष्य यांचे संतुलन जर चांगले असेल तर त्यांची उत्पादकता वाढते असेदेखील अनेक अभ्यासांच्या मध्ये दिसून आले आहे. कर्मचार्यांनी या विषयी सजग असणे आवश्यक आहे. आपल्या कंपनीच्या व्यवस्थापनाशी या विषयी संवाद करणे आवश्यक आहे. या पलीकडे जाऊन सततची स्पर्धा, दुसर्याशी तुलना करत राहणे, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून सतत यशाच्या मागे धावत राहण्याचा प्रयत्न करणारी समाजाची मानसिकता या मधून एक अत्यंत घातक आणि जीवघेणी व्यवस्था आपण निर्माण करत आहोत. या चक्रात अडकलेले असंख्य लोक आपल्याला रोज दिसतात म्हणून या विषयी आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन बघायला सुरुवात करणे आवश्यक आहे.
हे सगळे खरे असले तर, व्यक्ती म्हणून आपल्यालादेखील कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामाला योग्य प्रकारे नकार देण्याचे कौशल्य शिकणे आवश्यक आहे. शेवटी जर कंपनी आपल्या आरोग्याचा विचार करत नसली तर आपण तरी कंपनीच्या यशाचा किती विचार करावा हा प्रश्न मनात येणे अजिबात चुकीची गोष्ट नाही. या सगळ्या पलीकडे जर आपले भावनिक स्वास्थ्य अतिरिक्त कामाने बिघडते आहे, असे लक्षात येत असेल तर मानसिक आरोग्यतज्ज्ञाचा सल्ला घेण्यात कमीपणा समजू नये. आपले प्राधान्यक्रम तपासून त्यात बदल करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.