सुजाता म्हेत्रे - 9421130829
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (जि. कोल्हापूर), जिल्हा परिषदेचा माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक दृष्टिकोन ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. या प्रशिक्षणासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार यांनी मान्यता दिली आणि ही प्रशिक्षण शिबिरे प्रत्येक शनिवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत घ्यावीत, असे सूचित केले. त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी विजय ओतारी आणि पाथरे मॅडम यांनी दिलेल्या सहकार्यातून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक शनिवारी दोन तास वेळ देण्यात आली होती. यामध्ये चार तालुके एकावेळी येतील, असे नियोजन करण्यात आले. त्यामुळे तालुक्यांचे तीन गट झाले. एका गटासाठी दोन शनिवार याप्रमाणे सहा बॅचमधून हे प्रशिक्षण होईल, असे नियोजन करण्यात आले. एका शनिवारी एक टप्पा – त्यामध्ये 1. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि 2. मन आणि मनाचे आजार; तर दुसर्या शनिवारी 3. ओळख जादूटोणाविरोधी कायद्याची 4. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विविध शालेय उपक्रम हे दोन विषय घेतले जातील, असे नियोजन करण्यात आले.
प्रशिक्षणासंबंधी नियोजन करत असताना राज्य पातळीवरील उत्तमोत्तम वक्त्यांना यामध्ये सहभागी करून घेण्याची एक संधी सध्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आम्हाला मिळू शकत होती. त्यामुळे जिल्हा कार्यवाह विनायक चव्हाण, जिल्हा प्रधान सचिव दिलीप कांबळे, सीमा पाटील, करंबळकर गुरुजी आणि राज्य पदाधिकारी सुनील स्वामी, कृष्णात कोरे, सुजाता म्हेत्रे, प्रकाश भोईटे या सर्वांच्या विचाराने तसा प्रयत्न करावा, हे निश्चित झाले. विषयानुसार त्या-त्या विषयांशी संबंधित राज्य कार्यवाह, सहकार्यवाह किंवा त्या विषयावर प्रभुत्व असणार्या लोकांना विचारले असता सर्वांनीच अगदी पहिल्या वेळीच कुठल्याही वेळी आपण सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले आणि नियोजन करणार्यांचा उत्साह वाढविला.
माध्यमिक शिक्षक प्रशिक्षणे दि.29 ऑगस्टला दोन गट, त्यानंतर तेच दोन गट दि. 5 सप्टेंबर रोजी; तर पुढच्या दोन गटांसाठी (चार तालुके आणि कोल्हापूर शहर) दि. 12 सप्टेंबर आणि दि. 19 सप्टेंबर असे घेतले गेले.
दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाने ही प्रशिक्षणे घेण्यासाठी तयारी दर्शवली. प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे, उपशिक्षणाधिकारी कासार, विस्ताराधिकारी जयश्री जाधव, डी. सी. कुंभार, जे. टी. पाटील, एम. आय.सुतार या सर्वांच्या सहकार्याने आणि कुंभार साहेबांच्या विशेष प्रयत्नाने या प्रशिक्षणाचेही नियोजन करण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची एकूण संख्या 1974 इतकी आहे. ही संख्या पाहता हे नियोजन करणे आव्हानात्मक होते. ‘कोवीड-19’च्या कोल्हापूरमधील वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषदेमध्ये बाहेरील लोकांना प्रवेश बंद केलेला होता. अशा परीस्थितीमध्ये नियोजनासाठी तिथे प्रत्यक्ष हजर राहणे शक्य नव्हते. पण कुंभारसाहेबांनी सतत फोनवरून चर्चा करून हे नियोजन पूर्ण केले.
शाळांची संख्या मोठी असल्याने दोन तालुक्यांचा एक गट तयार करण्यात आला. असे सहा गट तयार झाले. याचे नियोजन सोमवार, दि. 14 सप्टेंबर ते गुरुवार दि. 17 सप्टेंबर असे करण्यात आले. दररोज सकाळी 11 ते 2 एक गट आणि दुपारी 2.30 ते 5.30 दुसरा गट असे नियोजन करण्यात आले.
माध्यमिक शिक्षक प्रशिक्षणामध्ये 450 शिक्षक सहभागी झाले, तर प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणामध्ये 1252 शिक्षकांपर्यंत आपल्याला पोेचता आले.
प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष नियोजनात राज्य प्रशिक्षण विभाग कार्यवाह सुनील स्वामी, राज्य सरचिटणीस कृष्णात कोरे, राज्य वार्तापत्र सहकार्यवाह प्रकाश भोईटे, जिल्हा कार्यवाह प्रमोद म्हेत्रे यांनी मोलाचे योगदान दिले. सोशल मीडियासाठी प्रत्यक्ष हजर राहून सर्व कार्यक्रम हाताळणे, त्यावर लक्ष ठेवून असणे, आलेल्या अडचणी निवारणे हे अत्यंत किचकट आणि जिकिरीचे काम कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया कार्यवाह हर्षल जाधव, युवा कार्यवाह राजवैभव शोभा रामचंद्र, कोरोची शाखा युवा कार्यवाह सौरभ पवार यांनी उत्कृष्टपणे पार पाडले. राज्य सोशल मीडिया कार्यवाह अवधूत कांबळे यांनी वेळोवेळी सहकार्य केले. ‘वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प’ विभागाचे कार्यवाह प्रकाश घादगिने, सहकार्यवाह किरण जाधव, सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे, राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
– सुजाता म्हेत्रे (सहकार्यवाह, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प, महा. अंनिस)