जय श्रीराम लागू!

डॉ. प्रदीप पाटील -

अभिनेता कधी देवा-धर्माच्या संवेदनशील विषयावर बोलणे टाळतो. बुवा, महाराज आणि धर्मस्थळे या ठिकाणी फेर्‍या मारून स्वतःला दैववादी घोषित करणारे अभिनेते पोत्याने सापडतील; पण या अविवेकास ठोकरून देण्याचे धैर्य जाहीरपणे दाखवून दिले, ते डॉ. श्रीराम लागू यांनी.

अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात कृतिशीलपणे करणारा या देशातला नायक आहे, डॉ. अब्राहम कोवूर. त्यांची दोन पुस्तके Begone Godmen आणि Gods, Demons and Spirits यांनी धर्माच्या सोंगाड्यांचे आणि दलालांचे अक्षरशः वस्त्रहरण केले आहे. यापैकी एका पुस्तकाचे मराठीत भाषांतर आले होते आणि त्या पुस्तकाला डॉ. श्रीराम लागू यांनी प्रस्तावना लिहिली होती. ती ‘महाराष्ट्र टाईम्स’ ने प्रकाशित केली होती आणि मथळा होता… ‘परमेश्वराला रिटायर करा.’ त्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. शिव्या जास्त आणि ओव्या कमी, अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यावर महाराष्ट्र राज्यभर हाच विषय घेऊन डॉ. लागू आणि डॉ. दाभोलकर यांच्या जाहीर संवादाचा विवेक जागर कार्यक्रम घेतला. सांगलीत भावे नाट्यगृहात ‘परमेश्वराला रिटायर करा’ म्हणणारे डॉ. लागू आणि परमेश्वर व धर्माबाबत आम्ही तटस्थ आहोत, अशी भूमिका घेणारे डॉ. दाभोलकर यांच्या ‘वाद-संवाद’ स्वरुपाची मुलाखत मी घेतली. तुफान गर्दी होती. धर्माची गरज ही खाजगी गोष्ट असून देवाला रिटायर केलेच पाहिजे, असे डॉ. लागू यांनी म्हटल्यावर अनेक प्रेक्षकांना डॉ. लागूंचे हे रूप अस्वस्थ करणारे होते. त्याच रात्री त्यांना मुंबईला सिनेमाच्या शूटिंगसाठी जायचे असल्याने मी, डॉ. दाभोलकर, उज्ज्वला परांजपे, डॉ. भरमगुडे त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेलो. फलाटावर आमच्या चर्चा सुरू होतात न होतात तोच 15-20 जणांचे एक टोळके ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत आले. कुठे आहे तो हरामी लागू, असे म्हणत, आम्ही उभे होतो तिथे आले. आम्हाला त्यांनी घेरले. एक भगवा टिळा लावलेला ओरडला… ‘हा बघ, देवाला रिटायर करणारा लागू xxxx (शिवी), देवामुळे तू पैदा झाला ना? आमच्या देवाला नावं ठेवतोस, काय समजतोस स्वतःला?’ मी सुन्न झालो. एकदम घाणेरड्या शिव्यांचा भडिमार ‘जय भवानी’वाल्यांनी सुरू केला. मी डॉ. लागूंकडे पाहिलं. ते शांत होते. भीतीचा लवलेश देखील नव्हता. ते सारे भडकावले गेलेले तरुण हिंदुत्ववादी म्हणवणारे, अश्लील शिव्यांची लाखोली वाहत अंगावर आले. प्रसंग बाका होता.

मी म्हणालो, ‘तुम्हाला काय हवे आहे?’

त्यांनी मला धमकावले, ‘आमचा बुध्दिभेद करू नकोस.’

डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘तुमच्या काही शंका असतील तर आपण वेटिंग रूममध्ये बसून चर्चा करूया..’ तसा एक भगवा हिंदुत्ववादी ओरडला,

‘ए xxxx, चर्चा गेली गाढवाच्या xxxx.’

अवतीभवती गर्दी झाली. तसा एक ‘धर्मवीर’ ओरडला, ए xxxx लागू, चल ‘जय श्रीराम’ म्हण.’ मी लागूंकडे पाहिले. ते काय म्हणतील? ते असे म्हणतील का? असे अनेक प्रश्न डोक्यात आले आणि डॉ. लागूंनी मुठी आवळून वर हात केला, आणि नारा लगावला…

जय श्रीराम लागू!’

त्या धैर्यानं माझे अंग शहारले. काय घडेल आता? एका दृढनिश्चयाचा तो परिपाठ होता. डॉ. लागूंचे एक वेगळेच रूप मी पाहत होतो. अभिनेता, संवेदनशील लेखक, विचारवंत; आणि आता हा समोर दिसणारा निर्भीड कार्यकर्ता. समाजातील अंधश्रद्धा आणि शोषक परंपरा यांच्याशी झुंज देणार्‍या डॉ. लागूंनी त्यावेळी मला एक आश्वासक धडा शिकवला. मी त्याही प्रसंगात हरखून गेलो. वाटले, हीच ती खरी लढाई. सामाजिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध ज्या जोतिबा फुलेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सार्‍यांनी संंघर्ष केला, त्याची साखळी गुंफण्याचे कार्य डॉ. लागू करीत होते. चिडलेले ‘धर्मवीर’ हातघाईवर आले, हाणामारी होण्याची लक्षणे दिसू लागली. एकाने डॉ. लागूंना धक्काबुक्की सुरू केली. नेमके त्याचवेळी दिवंगत मंत्री आर. आर. पाटील (आबा) मुंबईला अधिवेशनास जाण्यासाठी आले होते. पोलीस ताफा होता. डॉ. लागूंना धक्काबुक्की सुरू झाल्याचं त्यांना समजताच ते स्वतः आले. त्यांना पाहून ‘धर्मवीर’ पांगले. मात्र जाताना, ‘जय भवानी – जय शिवाजी’चे ओरडणे चालूच होते. त्याच वेळी डॉ. लागू मला म्हणाले, ‘प्रदीप, धर्मांधांना आयुष्यात कधीही भीक घालायची नाही, हे लक्षात ठेव. समाजसुधारणा ही रोज विस्तवावर चालून करावी लागते.’

धर्मराष्ट्र स्थापनेने पछाडलेल्यांच्या या कृत्याने अनेक गोष्टी त्यावेळीच स्पष्ट केल्या, हे मला लक्षात आले. सुमारे 25 वर्षांपूर्वीच धर्मगुंडांची ही गुंडगिरी डॉ. लागूंनी व आम्ही अनुभवणे म्हणजे विचारवंतांच्या खूनसत्राची नांदी होती. याचा अर्थ टप्प्याटप्प्याने विवेकी विचारधारा नष्ट करणे म्हणजे धर्मांध राजकारणासाठी एका मोठ्या कटकारस्थानाचा भाग बनला.

डॉ. लागू यांच्या हस्ते ‘भ्रामक वास्तुशास्त्र’ या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात झाले, तेव्हाही ते म्हणाले होते की,जीवनाच्या व्यावहारिक अंगात दैववाद शिरला. त्यामुळे आलेला वैचारिक लुळेपणा अविवेकास जन्म देतो. सामाजिक विषमता, पिळवणूक, शोषण यांचा पाया याच अविवेकातून जन्माला आलेल्या अंधश्रद्धा होत. विचारांची स्पष्टता हा डॉ. लागूंचा सर्वांत मोठा गुण. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या याही पैलूंचा खूप मोठा फायदा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीस झाला. त्यांचे जाणे म्हणजे विवेकवादी चळवळीने एका झुंजार कार्यकर्त्यास मुकणे होय. ‘त्यांनी मला काय दिले?’ त्यांच्याच कवितेतील एक ओळ आठवतेय….

मी हजारोंच्या जीवनात आणि…

स्मरणातही वाटला गेलो आहे

होय, तुम्ही आम्हा सर्व विवेकवाद्यांत आहात!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]