अंनिसची चमत्कार आव्हान यात्रा आणि अभियान

अंनिवा -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म’ या आपल्या ग्रंथाच्या तृतीय खंडाच्या चौथ्या भागात ‘दैवी चमत्कारावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म’ अशी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. दैवी चमत्कृतीचे खंडन करण्यामागे त्यांचे तीन उद्देश होते – माणसाला बुद्धिवादी बनविणे, त्याला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे आणि ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात, त्यांचे उगमस्थान नष्ट करणे. ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बुवाबाजी व चमत्कारविरोधाच्या वैचारिक पायाची अतिशय मूलभूत भूमिका आहे. त्यामुळेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित 14 एप्रिल 1991 ते 14 एप्रिल 1992 या कालावधीत ‘बुवाबाजीवर हल्लाबोल’ ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविली होती. बुवाबाजी व त्यामुळे होणारे शोषण, याला विरोध करावयाची वैचारिक भूमिका लोकांपर्यंत घेऊन जाणे, बुवाबाजीशी प्रत्यक्ष संघर्ष करणे, या मोहिमेच्या उद्देशाबरोबरच बाबा-बुवा जे चमत्कार करतात, ते लोकांना दाखवणे व शिकवणे, हाही या मोहिमेचा उद्देश होता. त्या अनुषंगाने या कालावधीत या मोहिमेद्वारा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंधश्रद्धांविरोधातील व्यापक मांडणीचा आधार घेत राज्यभर शेकडो कार्यक्रम करत बुवाबाजी व त्यांच्या चमत्काराविरोधातील ‘अंनिस’ची भूमिका लोकांपर्यंत नेली होती.

‘चमत्कार घडवा, यात्रा आडवा, पाच लाख मिळवा’ असे घोषवाक्य घेऊन सत्य शोधण्याचा संवाद महाराष्ट्रातील जनमानसाबरोबर करण्याच्या उद्देशाने 1995 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यातील पंधरा जिल्ह्यांतून ‘सत्यशोध यात्रा’ काढली होती. महाराष्ट्रातील बुवा-बाबा- महाराजांनी आपल्या अंगी असलेल्या ‘अलौकिक’ सामर्थ्याचा दावा करावा व तो सिद्ध करावा, असे खुले आव्हान देत ‘सत्यशोध यात्रे’चा जाहीरनामा प्रसिद्ध करत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, दैववादाला विरोध करून प्रयत्नवादाचा पाठपुरावा व महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा नीतिमान विचार पोचवत ही यात्रा फिरली. ज्या-ज्या जिल्ह्यात यात्रा गेली, त्या-त्या जिल्ह्यातील सर्व बुवा, मांत्रिक, ज्योतिष यांना आव्हान देऊनसुद्धा एकानेही हे आव्हान स्वीकारले नाही.

दुसरी ‘राज्यव्यापी बुवाबाजी संघर्ष व चमत्कार सत्यशोधन आवाहन अभियान यात्रा’ 10 ते 22 डिसेंबर 2002 आणि 12 ते 23 जानेवारी 2003 अशी दोन टप्प्यांत काढण्यात आली. ‘चमत्कार घडवा, यात्रा आडवा, अकरा लाख रुपये मिळवा’ असे घोषवाक्य लिहिलेल्या प्रकाशयानातून अभियानाची यात्रा निघाली होती. प्रखर प्रबोधन याबरोबरच या अभियानाचा दुसरा महत्त्वाचा उद्देश होता – शिक्षण संस्था, प्रसार माध्यमे व राजकीय नेतृत्व या घटकांनी बुवाबाजी व चमत्कार याबाबतीत स्पष्ट व विधायक संघर्षाची भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्याचा! या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. एकाही बुवा, बाबाने आव्हान स्वीकारले नाही; पण स्वत:ला धर्मरक्षक म्हणणार्‍या संघटनांनी मिरज, सोलापूर, डोंबिवली व मुंबई येथे यात्रेला अयशस्वी विरोध केला. या यात्रेचा समारोप 31 जानेवारी 2003 ला इचलकरंजी येथे महाराष्ट्रव्यापी ‘निर्धार परिषदे’ने झाला.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]