देवाचे अस्तित्व आणि येशूचे चमत्कार सिद्ध करण्यासाठीचे (अ) वैज्ञानिक समर्थन

नायजिल जे. शॉनेसी -

७ मे २०२२ रोजी पुणे कॅम्प भागातील नेहरू हॉल येथे ‘बायबल : वास्तविक तरंग – बायबलने हे जग कसं बदललं’ या परिसंवादाचं आयोजन ‘साक्षी अपॉलोजेटिक्स आणि दर्शना संघा’तर्फे करण्यात आलं होतं. या परिसंवादात ख्रिस्तोफर सिंग, आशिष जॉन, आशर जॉन, नरेंद्र साहू, चंद्रकांत वाकणकर आदींची भाषणं झाली. या वक्त्यांनी केलेली अनेक विधानं ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि तार्किकदृष्ट्या खोटी होती. काही सत्य तथ्यांची मांडणी झाली जरूर; मात्र त्याच्या आधारे वक्त्यांनी काढलेले निष्कर्ष हास्यास्पद, अपमानजनक, चुकीचे आणि अतार्किक होते. सेमिनारच्या विषयांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होता. ख्रिश्चन धर्म आणि बायबलने भारत देश कसा बदलला, बायबलमुळे ब्रिटनच्या अँग्लिकन आणि प्रोटेस्टंट पंथांच्या मिशनर्‍यांनी हिंदू समाजात कशा सामाजिक सुधारणा केल्या, बायबलमुळे कशी सतीप्रथा बंदी झाली, त्यांनी हिंदू समाजात जातिभेदाबाबत कशा सुधारणा केल्या, बायबलमधली समानता, बायबल आणि प्रोटेस्टंट पाद्य्रांचा गुलामगिरीला विरोध, रिफॉमेशनमुळे लोकशाही कशी निर्माण झाली, लोकशाही ही एक प्रोटेस्टंट कल्पना आहे. कारण प्रोटेस्टंट पंथाच्या उदयानंतर आणि विस्तारानंतर अनेक देशांत लोकशाही व्यवस्था सुरू झाली होती; देव आणि येशूचे चमत्कार किती प्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी तार्किक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि मान्य केले आहेत?… यासारखे विषय या परिसंवादात मांडले गेले.

लोकांना आधीच माहीत असलेल्या काही ऐतिहासिक सत्यांचा उल्लेख वक्त्यांनी केला. पण परिसंवादात बोलल्या गेलेल्या इतर खर्‍याखोट्या गोष्टींचा तो अगदी थोडा भाग होता. मात्र या तथ्यांवरून त्यांनी काढलेले निष्कर्ष आणि दावे हास्यास्पद, अतार्किक, पूर्णपणे खोटे, निंदनीय आणि विचित्र होते.

ख्रिश्चन अपॉलोजेटिक्स (१) म्हणजे देवाचं अस्तित्व आणि येशूचं पुनरुत्थान (मृत्यूनंतर येशूचे पुन्हा जिवंत होणे) यासारख्या ख्रिश्चन धार्मिक सिद्धांतांचे समर्थन करण्यासाठी तर्काधारित मुद्दे मांडून युक्तिवाद करण्याचा प्रयत्न. ही ख्रिस्ती भाविकांच्या धर्मशास्त्राची एक शाखा आहे, वेळोवेळी उद्भवलेल्या आक्षेपांविरुद्ध जी ख्रिश्चन धर्माचं रक्षण करू पाहते. आजवर केलेले हे युक्तिवाद खोटे, मूर्ख, विकृत, खुळचट, अतार्किक, निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचं गेल्या कित्येक वर्षांत सिद्ध झालं आहे; मात्र आजकाल स्वतःला ‘डेटा सायंटिस्ट’ आणि इतिहासकार म्हणवणारे बरेचजण (त्यांच्यापैकी काही कदाचित डेटा सायंटिस्ट अथवा इतिहासकार असतीलही) या कथित धर्मरक्षणासाठी पुढं येतात; परंतु ते त्यांच्या मूर्ख सिद्धांतांना सिद्ध करण्यासाठी काहीही ठोस पुरावे देत नाहीत. मात्र अनेक महान गणितज्ज्ञ, इतिहासकार, सांख्यिकीशास्त्रज्ञांनी (२) देवाचं अस्तित्व आणि येशूचे चमत्कार मान्य केलं असल्याचं ते आवर्जून सांगतात. ते त्यांच्या देवत्वाच्या सिद्धांतांना बादरायण संबंध लावून सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यासाठी, अशा धर्मशास्त्रज्ञांची पुस्ती जोडतात, ज्यांचे सिद्धांत चुकीचे आणि अविश्वसनीय असल्याचं आधीच सिद्ध झालेलं असतं.

७ मे २०२२ रोजी पुणे कॅम्प भागातील नेहरू हॉल येथे ‘बायबल: वास्तविक तरंग – बायबलने हे जग कसं बदललं’ या परिसंवादाचं आयोजन ‘साक्षी अपॉलोजेटिक्स आणि दर्शना संघा’तर्फे करण्यात आलं होतं. या परिसंवादात ख्रिस्तोफर सिंग, आशिष जॉन, आशर जॉन, नरेंद्र साहू, चंद्रकांत वाकणकर आदींची भाषणं झाली. या वक्त्यांनी केलेली अनेक विधानं ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि तार्किकदृष्ट्या खोटी होती. काही सत्य तथ्यांची मांडणी झाली जरूर; मात्र त्याच्या आधारे वक्त्यांनी काढलेले निष्कर्ष हास्यास्पद, अपमानजनक, चुकीचे आणि अतार्किक होते. सेमिनारच्या विषयांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होता. ख्रिश्चन धर्म आणि बायबलने भारत देश कसा बदलला, बायबलमुळे ब्रिटनच्या अँग्लिकन आणि प्रोटेस्टंट पंथांच्या मिशनर्‍यांनी हिंदू समाजात कशा सामाजिक सुधारणा केल्या, बायबलमुळे कशी सतीप्रथा बंदी झाली, त्यांनी हिंदू समाजात जातिभेदाबाबत कशा सुधारणा केल्या, बायबलमधली समानता, बायबल आणि प्रोटेस्टंट पाद्य्रांचा गुलामगिरीला विरोध, रिफॉमेशनमुळे (३) लोकशाही कशी निर्माण झाली, लोकशाही ही एक प्रोटेस्टंट कल्पना आहे. कारण प्रोटेस्टंट पंथाच्या उदयानंतर आणि विस्तारानंतर अनेक देशांत लोकशाही व्यवस्था सुरू झाली होती; देव आणि येशूचे चमत्कार किती प्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी तार्किक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि मान्य केले आहेत? यासारखे विषय या परिसंवादात मांडले गेले.

लोकांना आधीच माहीत असलेल्या काही ऐतिहासिक सत्यांचा उल्लेख वक्त्यांनी केला. पण परिसंवादात बोलल्या गेलेल्या इतर खर्‍याखोट्या गोष्टींचा तो अगदी थोडा भाग होता. मात्र या तथ्यांवरून त्यांनी काढलेले निष्कर्ष आणि दावे हास्यास्पद, अतार्किक, पूर्णपणे खोटे, निंदनीय आणि विचित्र होते.

वक्त्यांनी खोटंच सांगितलं की ब्लेझ पास्कल, आयझॅक न्यूटन, थॉमस बेयस, एफ. एन. डेव्हिड, अब्राहम डी मोइव्र यांसारख्या अनेक महान गणितज्ज्ञ, इतिहासकार आणि सांख्यिकीशास्त्रज्ञांनी देवाचं अस्तित्व आणि येशूचे चमत्कार सिद्ध केले आहेत! वक्त्यांनी त्यांच्या देवत्वाच्या सिद्धांतांना छद्मपद्धतीने सिद्ध करण्यासाठी सी. एस. लुईस आणि फ्रान्सिस कॉलिन्स यांसारख्या धर्मशास्त्रज्ञांचाही संदर्भ दिला, ज्यांचे सिद्धांत चुकीचे आणि अविश्वसनीय असल्याचं आधीच सिद्ध झालं आहे.

नास्तिकता सोडून पुन्हा ख्रिश्चन धर्मात आलेल्या सी. एस. लुईस आणि फ्रान्सिस कॉलिन्स यांच्या दोन उदाहरणांवर वक्त्यांनी भाष्य केलं. परंतु कोणी व्यक्ती नास्तिकता सोडून आस्तिकता स्वीकारत असेल तर यातून आस्तिकतेचा कोणताच दावा सिद्ध होत नाही, त्याचप्रमाणे कोणी आस्तिक व्यक्ती नास्तिकामध्ये रुपांतरित झाली असेल म्हणून नास्तिकता सिद्ध होत नाही.

वक्ते म्हणाले की, सी. एस. लुईस नास्तिक होता. नंतर एकतिसाव्या वर्षी पुन्हा आस्तिक बनला आणि बायबलमधील तथ्यं तार्किकदृष्ट्या सत्य आहेत, याची त्याला खात्री पटली. सी. एस. लुईस यांचं उदाहरण देताना वक्त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे नास्तिक व्यक्ती ख्रिस्ती धर्मात परत आली आणि बायबलमधील तथ्यं तार्किकदृष्ट्या सत्य असल्याचा दावा देखील त्यातून केला. तथापि, वस्तुस्थिती अशी आहे की सी. एस. लुईसच्या ख्रिश्चन अपॉलोजेटिक्स आणि इतर युक्तिवादांवर वेळोवेळी टीका करण्यात आली आहे. जॉन बेव्हर्स लुईस या तत्त्वज्ञाने सी. एस. लुईसच्या युक्तिवादांना शब्दशः हलगर्जीपणाचं आणि धर्मशास्त्रीयदृष्ट्या अविश्वसनीय; तसेच तार्किकदृष्ट्या अयोग्य आणि विनाकारण स्वतःची गोची करून घेण्याचं उदाहरण, असं वर्णन केलं आहे. ख्रिश्चन अपॉलोजेटिक्स साहित्यात लुईसचे युक्तिवाद मोठ्या प्रमाणावर पुन्हा-पुन्हा छापले गेले असले तरी जगभरातील धर्मशास्त्रज्ञ आणि बायबलच्या अभ्यासकांनी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केलं आहे. अनेक बायबलतज्ज्ञांनी यासंबंधी लुईसवर टीका केली आहे. ज्यामध्ये ‘अँग्लिकन न्यू टेस्टामेंट’ पंथाचे विद्वान एन. टी. राईट म्हणतात की, ज्यू लोकांबद्दल येशूने जे सांगितले होते, त्याचा चुकीचा अर्थ लुईस यांनी लावला आहे. या अर्थातून अनर्थ देखील होऊ शकतो. लुईसच्या युक्तिवादाला कोणताही ऐतिहासिक आधार नाही, त्यामुळे कोणी त्याच्या ‘गॉस्पेल’ वाचनाबद्दल प्रश्न विचारला असता असा प्रश्न धोकादायकपणे लुईसवर उलटतो.

नास्तिकतेतून पुन्हा ख्रिस्ती धर्म स्वीकारणार्‍या फ्रान्सिस कॉलिन्सचं उदाहरण देताना वक्ते म्हणाले की, कॉलिन्स हे वैद्यकीय डॉक्टर, ‘अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’चे संचालक; तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे वैद्यकीय सल्लागार देखील आहेत. त्यांनी सांगितले की, कॉलिन्स यांनी ‘द लँग्वेज ऑफ गॉड’ हे पुस्तक लिहिलं आहे आणि आज ते जगातील सर्वोच्च वैज्ञानिक आहेत. कोणाच्या मोठेपणाचा आपल्या फायद्यासाठी वापर करायची वक्त्यांची ही धूर्त खेळी होती. कॉलिन्स यांचे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’चे संचालक असणे, त्यांनी नास्तिकतेचा त्याग करून ख्रिस्ती धर्मात परत येणे किंवा ‘द लँग्वेज ऑफ गॉड’ हे पुस्तक लिहिणे यातून देवाचं अस्तित्व किंवा कोणताही सिद्धांत सिद्ध होत नाही. तसेच कॉलिन्स यांना जगातील सर्वोच्च शास्त्रज्ञ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे वैद्यकीय सल्लागार म्हणून संबोधणं ही देखील वक्त्यांची मोठी चूक होती.

वक्त्यांनी विन्स्टन चर्चिलबद्दलचा एक किस्साही चुकीचा सांगितला, जेव्हा तो प्रत्यक्षात लॉयड जॉर्जबद्दल होता. आणि तसंही हा किस्सा परिसंवादाच्या विषयाशी पूर्णपणे असंबंधित होता.

संख्याशास्त्रज्ञ फ्लोरेन्स एन. डेव्हिड यांचा या चर्चासत्रात उल्लेख होणं, हे देखील आश्चर्यकारक आहे. तिच्या सिद्धांतांनी चर्चासत्रातील कोणत्याही मुद्द्याचे कधीच समर्थन केलेलं नाही. ती धर्मशास्त्रज्ञ नव्हती किंवा तिने कोणत्याही आस्तिक सिद्धांताचं समर्थन कधी केलं नाही. तिच्या ‘गेम्स’, ‘गॉड्स अँड गॅम्बलिंग’ या पुस्तकांचा देखील धर्मशास्त्राशी काहीही संबंध नव्हता.

वक्त्यांनी खोटा दावा केला की, गणितज्ज्ञ अब्राहम डी. मोइव्र यांनी देवाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ‘सेंट्रल लिमिट’ प्रमेयाचा वापर केला आहे. त्यांनी डे मोइव्रेंच्या संदर्भात डेव्हिड ह्यूमचा देखील चुकीचा उल्लेख केला. डी मोइव्र यांनी त्यांच्या गणितीय प्रमेयात कधीही देवाच्या अस्तित्वाची चर्चा केली नाही आणि डेव्हिड ह्यूम यांचे नास्तिकत्व तर जगजाहीर आहे.

वक्त्यांनी दावा केला की येशूचं पुनरुत्थान सिद्ध करण्यासाठी ‘बायेस प्रमेय’ अजूनही विद्यापीठांमध्ये वापरले जाते; तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाने हे प्रमेय प्रकाशित देखील केले आहे. ही विधानं खोटी आणि दिशाभूल करणारी आहेत. या भागाचा देवाचं अस्तित्व सिद्ध करण्याशी काहीही संबंध नाही. ‘येशूचं पुनरुत्थान सिद्ध करण्यासाठी प्रमेय वापरलं,’ हा भाग खोटा आहे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने हे प्रमेय प्रकाशित देखील केले, हे देखील येशूचं पुनरुत्थान सिद्ध करण्याचा विश्वासार्ह पुरावा ठरू शकत नाही.

वक्ते म्हणाले की, येशूची कबर रिकामी होती. यावर इतिहासकार आणि नास्तिक देखील सहमत आहेत; पण ते उघडपणे मान्य करत नाहीत. मात्र हा मुद्दादेखील काहीही सिद्ध करत नाही. येशूची कबर रिकामी होती, यावर जरी सर्व इतिहासकार आणि नास्तिक सहमत झाले, तरीही कबर लुटली जाण्याची एक ज्वलंत शक्यता आहेच की! एखाद्याचा मृतदेह नाहीसा होणं म्हणजे त्याचं पुनरुत्थान कसं काय ठरेल? आणि जर ऐतिहासिकरित्या येशूचं अस्तित्वच सिद्ध होऊ शकत नसेल, तर तुम्ही त्याच्या थडग्यात नसण्याचा मुद्दा कसा काय पुढं करू शकता? याशिवाय मोकळ्या थडग्याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की, त्याला तिथं कधी ठेवलंच गेलं नाही.

वक्त्यांनी स्वतः डेटा-शास्त्रज्ञ आणि इतिहासकार असल्याचा दावा केला. तसेच त्यांनी असा दावा केला की, अनेक गणितज्ज्ञ, वैज्ञानिक आणि सांख्यिकीशास्त्रज्ञांनी देवाचं अस्तित्व सिद्ध केलं आहे आणि असं सिद्ध करणार्‍यांपैकी काहींची नावं आणि सिद्धांत देखील वक्त्यांनी सांगितले. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही गटांमधील बुद्धिजीवी मान्य करतात की, देवाचं अस्तित्व सिद्ध करता येऊ शकत नाही. फरक एवढाच आहे की, एका गटाचे लोक तरीही देवावर आणि चमत्कारांवर विश्वास ठेवतात, आणि एका गटाचे नाही.

वक्त्यांनी संदर्भ देताना संख्याशास्त्रातील ‘डिसिजन थियरी’, पास्कलचा ‘वेजर युक्तिवाद’, ‘फ्रिक्वेंटिस्ट स्टॅटिस्टिक्स’चं (४) बेयसचे प्रमेय, बेयसियन संभाव्यता, बेयसियन सांख्यिकी, डेटा-विज्ञान आदींसारख्या अनेक दर्जेदार आणि अत्याधुनिक गणितीय संज्ञांचा उल्लेख केला. त्यांनी अशा संभाव्यता सिद्धांतांना इथं अशा दाव्यांसाठी निरर्थकपणे उद्धृत केलं आहे, जे दावे अतार्किकपणे देवाला आणि त्याच्या चमत्कारांना ओढून-ताणून सिद्ध करू पाहतात. या ओढून-ताणून आणलेल्या निष्कर्षांचा वापर करून वक्ते असा दावा करतात की, देव अस्तित्वात आहे आणि चमत्कार खरंच घडतात!

मी (मूळ इंग्रजी लेखक) स्वतः एक ख्रिश्चन आहे, तरीही मी कबूल करतो की, देव आणि चमत्कार सिद्ध होऊ शकत नाहीत आणि मी चमत्कार घडण्याबद्दल साशंक आहे. मी खोट्या युक्तिवादांचा निषेध करतो आणि जरी ते माझ्या विश्वासाच्या बाजूने असले, तरीही मी त्यांना विरोध करतो. देवासाठी खोटं बोलणं हे अधिक खोटेपणाचंच आहे आणि देवाच्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी चुकीचे युक्तिवाद करणं, ही एक विकृती आहे.

देवाचे अस्तित्व आणि विश्वासाची आवश्यकता छद्म पद्धतीने सिद्ध करण्यासाठी वक्त्यांनी पास्कलच्या ‘वेजर युक्तिवादा’चा उल्लेख केला आहे. गणितज्ज्ञ आणि धर्मशास्त्रज्ञ ब्लेझ पास्कल यांनी तर्कनिष्ठ व्यक्ती कशी असावी, यासाठी हा युक्तिवाद केला होता. वक्त्यांनी या युक्तिवादाचा आधार घेऊन सांगितलं की, जर देव अस्तित्वात नसेल, तर भक्तीपोटी केलेल्या त्यागामुळे अशा व्यक्तीचं केवळ मर्यादित नुकसान होईल (काही सुख, विलास इ.); मात्र जर देव अस्तित्वात असेल तर त्याला अमर्याद लाभ (शाश्वत स्वर्ग) मिळतील आणि पुढचं अपरिमित नुकसान टाळता येईल. (शाश्वत नरक) म्हणूनच देवावर विश्वास ठेवणं कधीही उत्तम; मात्र हे पूर्ण चुकीचं आहे! जर देव नाहीच, हे सिद्ध झालं तर आस्तिक आणि नास्तिक दोघांचंही विशेष नफा-नुकसान होणार नाही; केवळ आस्तिकांचा वेळ आणि पैसा वाया गेलेला असेल. परंतु जर देव खरंच अस्तित्वात असेल तर तो विवेकी, तर्कनिष्ठ असेल, जो कारण नसताना विश्वास ठेवणार्‍या आस्तिक लोकांचा तिरस्कार करेल; आणि कदाचित त्यांना लोभी ठरवून त्यांची रवानगी नरकात करेल आणि नास्तिकांना स्वर्गात घेऊन जाईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, पास्कलचा युक्तिवाद ऐकूनही कोणीही दुसर्‍याला कोणत्या एका देवावर विश्वास ठेवण्यास भाग पाडू शकत नाही. उदाहरणार्थ, ओडिन हा एकच खरा देव आहे, यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न काही क्षण करून पाहा!

‘ब्रिटिश शासनामुळे नाही, तर ख्रिश्चन धर्म आणि बायबलमुळे हिंदू समाजात बदल झाला आहे,’ असं वक्त्यांंनी ठासून सांगितलं, जे खोटं आणि अतिशय हास्यास्पद आहे. बायबलने भारताचा कायापालट केला. केवळ बायबलमुळेच आज सर्व जातींचे भारतीय लोक एकत्र येऊन जेवू शकतात. तसेच इंग्रजांना भारतातील जातिभेदाच्या कुप्रथेची चिंता नव्हती आणि सतीप्रथेचीही नव्हती; प्रोटेस्टंट मिशनर्‍यांनी या दोन्ही प्रथांविरुद्ध लढायला मदत केली, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. हे दोन्ही दावे खोटे आहेत. ब्रिटिशांना जातिवादाची चिंता नव्हती का? होय, त्यांना नव्हती. मात्र या प्रथेविरुद्ध लढायला कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट मिशनरी हे दोन्हीही गट नव्हते. ख्रिश्चन धर्माने कोणत्याही प्रकारे जातिभेदावर प्रभाव टाकला नाही. तसेच कोणत्याही धर्मप्रचारकाने जातिभेद कमी करण्यासाठी लढा दिला नाही किंवा मदत केली नाही. जातिभेद कमी होण्यास ब्रिटिश राजवटीची अप्रत्यक्षपणे मदत झाली. ब्रिटिश कायदे जाती-आधारित भेदांना परवानगी देत नसल्यामुळे वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास भाग पाडलं गेलं. लोकांना कापूस गिरण्या आणि कारखान्यांच्या मुख्य केंद्रांशी जोडण्याच्या उद्देशानं बनवलेल्या रेल्वे नेटवर्कचं उदाहरण आपल्यासमोर आहे. इथं सर्व जातींच्या लोकांना एकत्र बसणं, प्रवास करणं आणि खाणं भाग पाडलं गेलं होतं.

वक्त्यांनी ‘ख्रिश्चन धर्मात जातिभेद नाही’, असे गौरवोद्गार काढले. पण बोलावलेल्या वक्त्यांंमध्ये किमान दोन वक्ते केरळचे होते. परिसंवादानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांच्या असं निदर्शनास आणून देण्यात आलं की, ते केरळचे असल्याने केरळमध्ये विविध जातींसाठी स्वतंत्र चर्च आहेत, हे तरी त्यांना माहीत असावं.

देवाने आदमला निर्माण करताना स्वतःप्रमाणेच सक्षम केल्याचं उदाहरण वक्त्यांंनी बायबलमधील समानता याबाबत बोलताना मूर्खपणाने दिलं! परंतु बायबलची ही मूळ संकल्पना देवाचे निवडलेले लोक असण्याच्या यहुदी कल्पनेवर आधारित आहे.

रिफॉमेशन (आणि म्हणून प्रोटेस्टंट पंथ) लोकशाही स्थापन व्हायला कारणीभूत ठरल्या, हे वक्त्यांचं म्हणणं देखील चुकीचं आहे. कदाचित ‘रिफॉमेशन’वाद्यांच्या बंडखोर सवयीमुळे लोकशाहीला खतपाणी मिळालं असेल; परंतु त्यांचे बंड कॅथलिक चर्चच्या प्रथांविरुद्ध होते आणि त्यामुळे स्वतः प्रोटेस्टंट पंथामध्ये देखील अधिक बंडखोरी झाली. या रिफॉमेशननंतर मुद्रित झालेल्या बायबलमुळे शिक्षणाला सुरुवात झाली, हा वक्त्यांंचा युक्तिवादही चुकीचा आहे. बायबल किंवा इतर कोणतंही धार्मिक पुस्तक हे शिक्षणाचा स्रोत किंवा साधन असू शकत नाही. बायबल किंवा इतर कोणत्याही धार्मिक पुस्तकातून कसलंही वैज्ञानिक किंवा शैक्षणिक ज्ञान आलेलं नाही.

भारतातील लोकशाहीवर मिशनरी मंडळी किंवा ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पडलेला नाही. इथंही इंग्रजांनी अप्रत्यक्षपणे तसं केलं आहे. भारतातील सर्व राज्यं जिंकून एकत्र केली आणि त्यामुळं पुढं लोकशाही तत्त्वांवर स्वतंत्र भारताची निर्मिती झाली.

वक्ते म्हणाले की, मिशनरी मंडळी ‘सोशल रिफॉर्म’ म्हणजेच समाज सुधारण्यासाठी दुर्गम ठिकाणी जात होते, हे चूक आहे. इतर कोणत्याही धर्मप्रसारकाप्रमाणे मिशनरींचा अजेंडा हा धर्माचा प्रसार करणे, हाच होता. वक्त्यांंनी असा दावाही केला की, मिशनरी पैसा कमावण्यासाठी नव्हे, तर भारताचा कायापालट करण्यासाठी आले आहेत. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, ते इथं निव्वळ धर्माचा प्रसार करण्यासाठी आले होते.

विल्यम केरीच्या रुपाने एक मिशनरी सतीप्रथेला विरोध करण्यास प्रवृत्त झाला. परंतु त्यामागे त्याच्या सदसद्विवेक बुद्धीची प्रेरणा होती. बायबलमधील कोणत्याही तत्त्वाऐवजी किंवा ख्रिश्चन धर्माच्या कोणत्याही प्रभावाऐवजी त्याचं वैयक्तिक चारित्र्य आणि एखाद्या वाईट घटनेविरुद्ध न्याय मिळवण्याची त्याची अंतःप्रेरणा यामुळे त्याला प्रेरणा मिळाली असावी.

वक्त्यांनी, ‘ख्रिश्चन धर्मात; धर्मांतर म्हणजे व्यक्तीच्या आयुष्याचा विकास,’ असा संदेश दिला. हा संदेश देखील चुकीचा आहे. एखादी व्यक्ती आपला कोणताही धर्म सोडून नास्तिकता स्वीकारून देखील आपलं आयुष्य घडवू शकते. नास्तिकता हे केवळ उदाहरण म्हणून घेतलं आहे, व्यक्तीच्या वैयक्तिक विकासाचा आणि धर्माचा काही संबंध नाही.

वक्त्यांपैकी, चंद्रकांत वाकणकर यांनी चर्चासत्रातील सर्वांत मोठी घोडचूक केली. ते म्हणाले, “१८५७ च्या उठावानंतर इंग्रजांना जाणीव झाली की, धार्मिक गैरसमजामुळे हा उठाव झाला. मिशनरी सतीप्रथेबद्दल सामाजिक सुधारणा करतील, म्हणून त्यांनी नव्या मिशनरींना भारतात येण्यास विरोध केला.” पण वक्त्याला हे ठाऊक नाही की, भारतात येणार्‍या धर्मप्रचारकांना १८४० च्या आधीपासून विरोध होत होता; तर उठाव १८५७ मध्ये झाला होता.

‘विल्यम केरी यांना ब्रिटिश सरकार आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामुळे भारत सोडावा लागला,’ असं चुकीचं आणि दिशाभूल करणारं वक्तव्य वक्त्यांंनी केलं. वस्तुस्थिती अशी आहे की, नॉन-बॅप्टिस्ट मिशनर्‍यांच्या विरोधामुळे त्याला तेथून जावं लागलं आणि त्याने भारत सोडला नाही, तर फक्त ब्रिटिश अमलातील प्रदेश सोडला आणि त्याच गावात एका डॅनिश वस्तीत तो गेला होता!

वक्ते म्हणाले की, ‘ब्रिटिश सरकार आणि ईस्ट इंडिया कंपनीला फक्त नफ्यात रस होता आणि मिशनरींनी भारतात येऊन येशूबद्दल शिकवावे, अशी त्यांची इच्छा नव्हती.’ कारण मिशनरी त्यांच्या सुधारणांमुळे हिंदू लोकांना नाराज करू शकतात, हा दावा देखील खोटा आहे. होय, ब्रिटिश सरकार आणि कंपनीला केवळ नफ्यातच रस होता. पण भारतात मिशनरी नको असण्याचं कारण सुद्धा नफ्याच्या अजेंड्यावर आधारित होतं. या मिशनर्‍यांवर भरपूर निधी खर्च करणं आवश्यक होतं. मात्र ब्रिटिश सरकार आणि कंपनीच्या दृष्टीने हा अनावश्यक खर्च होता. वैयक्तिक स्वातंत्र्याची लोकशाही मूल्यं ही प्रामुख्यानं बायबलमधील ख्रिश्चन मूल्यं आहेत, असं चुकीचं विधान वक्त्यांनी केलं; मग बायबलमध्ये परवानगी असलेल्या गुलामगिरीचं काय करायचं? आणि प्रोटेस्टंट पंथाच्या अमेरिकेत अगदी १८६५ पर्यंत गुलामगिरी होतीच ना? हे देखील वक्त्यांंना प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये निदर्शनास आणून दिलं गेलं होतं.

वक्ते अनेक संभाव्यता-सिद्धांताबद्दल बोलले आणि त्या सिद्धांताद्वारे देवाचं अस्तित्व आणि चमत्कार घडत असल्याचं छद्म पद्धतीने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक गणितज्ज्ञांचा उल्लेख केला, ज्यांनी असं सिद्ध केलं असल्याचा दावा केला. अशा अनेक बाबी, विश्वास सिद्ध झाले आहेत, हे दर्शविण्यासाठी त्यांनी सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि पाद्री असलेल्या थॉमस बेयसचा उल्लेख केला.

बर्ट्रांड रसेल यांनी १९२९ मध्ये संभाव्यता ही आधुनिक विज्ञानातील सर्वांत महत्त्वाची संकल्पना आहे, असं म्हटल्याबद्दल वक्त्यांनी जाणीवपूर्वक चुकीचा उल्लेख केला. परंतु रसेलने खरोखर जे म्हटलं ते असं होतं – ‘संभाव्यता ही आधुनिक विज्ञानातील सर्वांत महत्त्वाची संकल्पना आहे.’ विशेषत: याचा अर्थ काय आहे, याची कोणालाही थोडीशी कल्पना नाही. (५) दोन्ही वाक्यांचे अर्थ विरुद्धार्थी आहेत. पहिलं वाक्य रसेल संभाव्यता-सिद्धांतांचे समर्थन करते, असा विचार करण्यास आपली दिशाभूल करतं. दुसरं वाक्य स्पष्ट करतं की, तो स्वतःच त्यातील विसंगती अधोरेखित करत आहे. इथं वक्त्यांंनी जाणूनबुजून एक महत्त्वाची गोष्ट दडपली : बर्ट्रांड रसेल हा नास्तिक होता!

वक्ते मूर्खपणे म्हणाले की, फक्त माणसंच प्रेम करू शकतात; कुत्री आणि इतर प्राणी खरं प्रेम करू शकत नाहीत. दैवी प्रेमाचा संबंध केवळ मानवाशी जोडताना इतर कोणताही प्राणी खरं प्रेम करण्यास सक्षम असतो, ही बाब त्यांना नाकारायची होती. मात्र सर्व प्राणी प्रेम करण्यास सक्षम असतात आणि ऊबदार रक्ताचे प्राणी, सस्तन प्राणी (ज्यामध्ये मानवाचा समावेश आहे) आणि पक्ष्यांना देखील मैत्री आणि सामाजिक बंधनाची तळमळ असते, ही वस्तुस्थिती आज सर्वमान्य आणि सर्वज्ञात आहे.

वक्त्यांनी मूर्खपणानं आणखी एक दावा केला होता की, ‘जर मिशनरी नसते, तर आंबेडकरांना शाळेत जाऊ दिलं नसतं किंवा इंग्रजी शिकू दिलं नसतं.’ हे विधान देखील अतिशय चुकीचं आणि हास्यास्पद आहे. एका हिंदू शिक्षकाने आंबेडकरांना वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आणि त्यांच्या पुढच्या शिक्षणाला बडोद्याच्या महाराजांनी मदत केली होती. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, ही बाब खरी असली, तरी त्यामुळे वक्त्यांच्या दाव्याला कोणत्याही प्रकारे पुष्टी मिळत नाही किंवा ही बाब त्या दाव्यांची पाठराखण देखील करत नाही. नेहरूंबाबतही असाच दावा करण्यात आला होता, जो देखील खोटा आहे.

‘चार्ल्स ग्रँट आणि विल्यम विल्बरफोर्स हे दोन धर्मसमर्थक राजकारणी नसते, तर फुले, आंबेडकर किंवा नेहरू घडले नसते. ग्रँट आणि विल्बरफोर्स यांनी ब्रिटिश भारतात प्रोटेस्टंट मिशनर्‍यांचा मार्ग मोकळा केला,’ असा आणखी एक चुकीचा दावा वक्त्यांनी केला. एकतर, मिशनरी कार्य आणि भारतीय समाजसुधारकांचा उदय यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. तसेच जर इंग्रजी भाषा जाणणार्‍या या तीन व्यक्ती उदयास आल्या नसत्या, तर कदाचित इंग्रजी भाषा न जाणणारे इतर कोणीतरी उदयास आले असते. कारण तत्त्व असं आहे की, प्रत्येक संकटातून कोणीतरी क्रांतिकारी व्यक्ती उदयास येत असते.

वक्त्यांनी असं प्रतिपादन केलं की, ‘बायबलमध्ये सूर्य आणि चंद्र हे देव आहेत, असं नाही, तर देवाने त्यांना निर्माण केलं आहे, असं म्हटलं आहे.’ मात्र हे सांगत असताना त्यांनी या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केलं की ‘पृथ्वी गोल आहे,’ असं बायबलमध्ये म्हटलेलं नाही किंवा बायबलमध्ये सौरमाला किंवा आकाशगंगेचं वर्णन केलेलं नाही. खरं तर, पृथ्वी सपाट आहे, तिला चार कोपरे आहेत, ती या विश्वाचे केंद्र असून सूर्य, चंद्र आणि तारे तिच्याभोवती फिरत आहेत, असंच बायबलमध्ये स्पष्टपणे सूचित करण्यात आलं आहे.

वक्त्यांनी अविचारीपणे पुढं सांगितलं की, अनेक व्यवसाय, ब्रँड ज्यूंच्या मालकीचे आहेत किंवा ज्यूंनी सुरू केलेले आहेत (बायबल चांगले उद्योजक घडवते, हे सिद्ध करण्यासाठी). मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, ज्यू मंडळी पहिल्यापासून व्यवसायात अग्रेसर होती/आहेत. कारण रोमन, नंतर युरोपियन आणि इतरांनी सुरू केलेल्या त्यांच्या छळामुळे हजारो वर्षांत त्यांना इतरत्र पळ काढावा लागला. त्यामुळे हा समाज जगभर पसरला आणि त्यामुळे सिंधी समाजाप्रमाणे ज्यू देखील व्यापारात आघाडीवर आहेत.

त्यांनी खोटं सांगितलं की, केरळ ‘ब्रेस्ट-कायदा’ ब्रिटिशांमुळे नाही तर मिशनरींमुळे रद्द झाला होता. ही कुप्रथा संपवण्यासाठी मिशनरींनी पन्नास वर्षेलढा दिला. (त्रावणकोरमध्ये काही तथाकथित खालच्या जातीच्या स्त्रियांना सवर्णांच्या उपस्थितीत त्यांचा कमरेवरचा शरीराचा भाग उघडा ठेवणं अथवा अतिरिक्त कर देणं सक्तीचं होतं). मिशनरींमुळे याबाबत सुधारणा झाली, हे विधान खोटं आहे. कारण मद्रासच्या ब्रिटिश गव्हर्नरच्या दबावाखाली त्रावणकोरच्या राजाने काही नियम बदलले होते. कदाचित केवळ या जातीतून धर्मांतरित झालेल्या नवख्रिश्चन मंडळींच्या बाबत या प्रथांच्या निर्मूलनाचं समर्थन या मिशनर्‍यांनी केलं असेल.

मी पुन्हा सांगतो, मी स्वतः एक ख्रिश्चन आहे, तरीही मी कबूल करतो की देव आणि चमत्कार सिद्ध होऊ शकत नाहीत आणि मी चमत्कार घडण्याबद्दल साशंक आहे. जरी ते माझ्या विश्वासाच्या बाजूने असले, तरीही मी अशा खोट्या युक्तिवादांचा निषेध आणि विरोध करतो. देवासाठी खोटं बोलणं हे अधिक खोटेपणाचंच आहे; आणि देवाच्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी चुकीचे युक्तिवाद करणं, ही विकृती आहे.

चिकित्सक वृत्ती हा एक सद्गुण आहे. खरं तर, बुद्धिमान व्यक्तींनी त्यांच्या अनुभवांची पुन्हा-पुन्हा चिकित्सा केली पाहिजे, सत्याच्या कसोटीवर ते टिकतात का, हे पुन्हा एकदा तपासले पाहिजे. एखादा दैवी वाटणारा अनुभव हा भास असू शकतो, हे आपण आपल्यालाच अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगायचं की त्याची जबाबदारी एखाद्या परग्रहवासीयावर टाकायची, हा प्रश्न प्रगल्भ व्यक्तींना पडायला नको का? अशा प्रश्नात काही चूक आहे काय? अजिबात नाही. आस्तिकांनी त्यांच्या स्वत:च्या खाजगी, व्यक्तिनिष्ठ अनुभवांची चिकित्सा केलीच पाहिजे.

मराठी अनुवाद : डॉ. नितीन हांडे

संदर्भः

१. अपॉलोजेटिक्स (Apologetics): तत्त्व-समर्थन

२. सांख्यिकीशास्त्रज्ञ: Statistician

३. द रिफॉर्मेशन (The Reformation) = ही सोळाव्या शतकात युरोपमध्ये कॅथलिक चर्च विरुद्ध चाललेली मोठी चळवळ होती, ज्यातून प्रोटेस्टंट पंथाचा उदय झाला.

४. Reference:https://infidels.org/kiosk/article/whats-wrong-with-bayes-theorem/

५. बर्ट्रांड रसेल, १९२९, व्याख्यान (बेल १९४५ , पृ. क्र. ५८७)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]