-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ मित्र, हितचिंतक, व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते, लेखक, कलावंत डॉ. अनिल अवचट यांचे वयाच्या 77 व्या वर्षी पुणे येथे 27 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झालेल्या अनिल अवचट यांनी वैद्यकीय व्यवसायात न पडता सामाजिक चळवळीत उडी घेतली. डॉ. कुमार सप्तर्षी व डॉ. अरुण लिमये यांच्याबरोबर युवक क्रांती दलात सहभाग घेऊव त्यांनी धडाडीने विविध आंदोलनांत सहभाग घेतला.
आपल्या लेखनाची सुरुवात त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकातून सामाजिक प्रश्नांवर आधारित ‘वेध’ या सदरातून केली. पुढे त्यांनी ‘मनोहर’, ‘माणूस’, ‘पुरोगामी सत्यशोधक’ या मासिकांतून बुवाबाजीसारख्या विविध सामाजिक प्रश्नांवर भरपूर लेखन केले. “अनिल अवचट यांचे ‘मनोहर’मधील लेखन वाचल्यावर मला वाटू लागले, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला वाहून घ्यावे आणि त्यानंतरच मी इतर सर्व सोडून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करू लागलो,” असे डॉ. दाभोलकरांनी म्हटले आहे.
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्याचा दौरा करून तेथील विदारक परिस्थितीतील बारीक-सारीक तपशील टिपून त्यांचे वर्णन करीत लिहिलेल्या ‘पूर्णिया’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकाने मराठी साहित्यात खास अनिल अवचटांची ‘रिपोर्ताज’ची शैली कायम केली. त्यानंतर याच शैलीत देवदासी, विडी कामगार, सफाई कामगार, भटके, हमाल, व्यसनाधीन अशा समाजातील वंचितांवर लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकांनी समाजाला अंतर्मुख व्हावयास लावले.
पु. ल., सुनीताबाई देशपांडे यांच्या देणगीतून आणि अनिल अवचट यांच्या पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्या पुढाकारातून ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’ची उभारणी करण्यात आली. डॉ. अनिता अवचट यांच्या निधनानंतर ‘मुक्तांगण’ची संपूर्ण जबाबदारी घेत व्यसनमुक्तीच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्या कामासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर त्यांना फाय फौंडेशन, महाराष्ट्र फौंडेशन या मानाच्या पुरस्कारांबरोबर साहित्य आकादमीचा बाल साहित्य पुरस्कार, असे अनेक साहित्यिक पुरस्कारही मिळाले आहेत.
या सर्व कामांबरोबरच त्यांनी आपल्यातला कलावंत सतत जागता ठेवत ‘ओरिगामी’, लाकडातील शिल्प, कोरीवकाम, फोटोग्राफी, चित्रकला या कला आयुष्यभर जोपासल्या. अशा या भटकणे, लिहिणे, भेटीगाठी यातून मानवी जीवन थेटपणे अनुभवणार्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ हितचिंतकास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ भावपूर्ण आदरांजली अर्पण करीत आहे.