डॉ. दाभोलकरांच्या विचारांचे हिंदीत प्रकाशन

अंनिवा -

राजकमल’ प्रकाशनद्वारे पाच ग्रंथांचे भाषांतर

शास्त्रज्ञांमधील अंधश्रद्धा अधिक घातक : रघुनंदन

कोविड काळात समजात सर्वाधिक भयगंड पसरला असताना डॉ. दाभोलकरांनी मांडलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार सर्वांत गरजेचा असल्याचे मत प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि जनविज्ञान चळवळीचे प्रणेते डी. रघुनंदन यांनी मांडले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकांच्या हिंदी अनुवादाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात ते बोलत होते. राजकमल प्रकाशनाच्या वतीने डॉ. दाभोलकरांच्या विचार ग्रंथांचे हिंदी अनुवाद प्रसिद्ध करर्‍यात आले आहेत. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी यासाठी संपादक म्हणून, तर चंदा सोनकर यांनी समन्वय संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली.

पारंपरिक ज्ञानाच्या नावाखाली कोविडच्या आजारावर जनतेची लुबाडणूक सुरू असताना डॉ. दाभोलकरांनी दिलेला वैज्ञानिक विचारांचा मंत्र सर्वांत गरजेचा असल्याचे मत डी. रघुनंदन यांनी यावेळी मांडले. ‘ज्याचा पुरावा आहे, त्यावर विश्वास ठेवा,’ हा दाभोलकरांचा मंत्र समाजात रुजण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आधुनिक विज्ञानाच्या आधारे अवकाश यानाचे प्रक्षेपण करणार्‍या शास्त्रज्ञांमधील अंधश्रद्धाळू वर्तनावर त्यांनी खरमरीत टीका केली. दाभोलकरांचे विचार हिंदीतून प्रकाशित करून ‘राजकमल’ प्रकाशनने अत्यंत मोलाचे सामाजिक-राजकीय तसेच जोखमीची भूमिका निभावल्याचे मत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी यावेळी मांडले. आपण स्वत: वैफल्यातून अंधश्रद्धांच्या बळी पडल्याचा अनुभव या पुस्तकांच्या संपादन समन्वयक चंदा सोनकर यांनी यावेळी मांडला. विवेकवादी विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत यासाठी दाभोलकर तळमळीने प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यानीं सुरू केलेल्या चळवळीत हिंदी भाषेतील या पुस्तकांचे मोलाचे सहकार्य राहील, असा आशावाद डॉ. हमीद दाभोलकर यांनी यावेळी व्यक्त केला. या संचापैकी ‘मन मन की बात’ या पुस्तकासाठी त्यांनी सहलेखनाचे काम केले आहेत. राजकमल प्रकाशनाचे अध्यक्ष अशोक महेश्वरी यांनी या पुस्तकांच्या अनुवादामागील भूमिका मांडली. अंधश्रद्धेविरोधात दाभोलकरांनी सुरू केलेल्या लढ्यात प्रकाशन संस्था म्हणून आपण सोबत असल्याचे ते म्हणाले. याआधी राजकमलद्वारे प्रकाशित ‘अंधविश्वास निर्मूलन – आचार, विचार और सिद्धांत,’ ‘आये विवेकशील बने,’ ‘विवेकवादी नरेंद्र दाभोलकर’ या पुस्तकांची माहितीही त्यांनी दिली. आज प्रकाशितसह एकूण 11 पुस्तकांच्या निमित्ताने आपण देशातील प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक विवेकवादी चळवळीच्या सोबत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. इतिहासकार अशोककुमार पांडे यांनी या प्रकाशन परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.