अभिजीत कांबळे -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र न्यूज पोर्टल’ या वेबपोर्टलचा लोकार्पण सोहळा शनिवार दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘महाराष्ट्र अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते सुकुमार मंडपे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे उपस्थित होते. अभिजित कांबळे गेली २३ वर्षे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून केलेले त्यांचे संपूर्ण भाषण आम्ही अंनिवाच्या वाचकांसाठी देत आहोत.
‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र न्यूज पोर्टल’च्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मला बोलावले त्याबद्दल म. अंनिस, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, राहुल थोरात, राजीव देशपांडे या सर्वांचे आभार मानतो.
मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “मी इथे येणं महत्त्वाचे आहे, पण मी पुरोगामी वर्तुळाचा भाग असल्याने अशा प्रकारच्या कार्यक्रमाला हजर असणं, आपल्या बाजूने काही गोष्टी शेअर करणं हे मला माझं कर्तव्यच आहे असे वाटते.
आजचा दिवस हा केवळ अंनिससाठी नाही तर संपूर्ण विवेकवादी चळवळीसाठी एका नव्या पर्वाचा आरंभ करणारा दिवस आहे असं मला वाटतं. ३५ वर्षांहून अधिक काळ अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र प्रसिद्ध होतं आहे. आज ते इंटरनेटवरी वेबसाइटच्या रूपाने येत आहे, त्या वेळेस ते केवळ तांत्रिक पाऊल ठरत नाही. तर तो चळवळीच्या नव्या झोनमधील प्रवेश ठरतो असं मला वाटतं.
इथे आलेली सर्व मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाशी सहमत असलेली या चळवळीत काम करणारी व समविचारी विवेकी मंडळी आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज कधी नव्हे ती आज अधिक आहे, याच्याशी आपण सहमत असणार याबद्दल मला बिलकूल शंका नाही. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे महत्त्व आजच्या काळात कसं आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काय करायला पाहिजे हे न सांगता आज मी ज्या मुद्यावर बोलणार आहे, त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे आणि आपण ती कशा कशा प्रकारे पार पाडू शकतो, या अनुषंगाने बोलणार आहे. या वेबसाईटच्या उदघाटनाच्या निमित्ताने एक ‘ब्रेन स्टॉर्मिंग’ आपण करू शकतो. माझा स्वतःचा अनुभव, बीबीसी मराठीचा संपादक आणि डिजिटलमध्ये काम करत असल्यामुळे आपण तंत्रज्ञानाचा नेमका वापर कसा केला पाहिजे, आपली भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर कसा करू शकतो, हे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
आपण पाहतो, आपल्या देशात शिक्षणाचे प्रमाण वाढलंय, पण वैज्ञानिक दृष्टिकोन अजूनही विकसित झालेला दिसत नाही. त्यांची दोन कारणे आहेत. एक, आपल्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी. दोन, रूढीवादी परंपरा, संस्कृती. पहिले जे शिक्षणाचे कारण आहे, त्यातील दोष असा आहे की, आपल्याला ‘तंत्र’ शिकवलं जात आहे, पण आपल्याला ‘तर्क’ शिकवला जात नाही. आपल्याला संगणक शिकवला जात आहे, मात्र प्रश्न विचारण्याची बंदी आहे, ते विचारण्याचे कुतूहल कमी आहे. भारताचा आयटी सेक्टरमध्ये जो दबदबा आहे, तो तयार असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये काम करणारा आहे. नवीन सॉफ्टवेअर, नवीन तंत्रज्ञानावरती आपले अपेक्षित असं काम युरोप-अमेरिकेच्या तुलनेने कमी आहे. याचं कारण, आपल्या शिक्षण व्यवस्थेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे, संशोधनाचा अभाव हे आहे. त्यामुळे असं होतं की, ‘आयटी’मध्ये काम करणारा तरुण महागडा लॅपटॉप खरेदी करताना शुभ मुहूर्त बघतो.
सुशिक्षित अज्ञान हे साध्या अज्ञानापेक्षा जास्त धोकादायक आहे असं मला वाटतं. म्हणून ही वेबसाइट त्यासाठी पण महत्त्वाची आहे. कारण, असे जे तंत्रस्नेही लोक आहेत, जे सुशिक्षित मानले जातात अशा वर्गापर्यंत वेबसाईट पोहोचून, वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, विज्ञानाचा वापर करणं वेगळं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणं वेगळं आहे. विज्ञान प्रगत होतं, राहील, नवं नवं तंत्रज्ञान येत राहील. कारण त्याची उपयुक्तता आपल्याला दिसते. पण ‘असे का’ हे न विचारण्याच्या शिकवणुकीमुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आपल्याला दिसतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत नाही, याचे दुसरे कारण आपल्या पारंपरिक दृष्टिकोनात आहे. खरं पाहायला गेलो तर आपल्याकडे हा प्रश्न पडायला नको होता. कारण आपल्याकडे ‘का’ हा प्रश्न विचारणारा प्रवाह नेहमीच राहिलेला आहे. त्यामध्ये गौतम बुद्ध, भगवान महावीर, आपल्या महाराष्ट्रात व देशभरात भक्ती चळवळीत झालेले संत, आपल्याकडे १९ व्या शतकात सामाजिक सुधारणेच्या चळवळीतील अग्रणी लोक यांनी प्रस्थापित विचारांना ‘का’ हा प्रश्न विचारण्याची धमक दाखवली होती. अमर्त्य सेन यांनी Argumentative Indian हे पुस्तक लिहिलं त्यात त्यांनी हे मांडलं आहे. पण वाईट हे आहे की, आपल्याकडे हा एक समांतर प्रवाहच राहिलेला आहे. हे आपल्याला नीटपणे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हाच आपल्याला आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रश्नाचा उलगडा होऊ शकतो. हा प्रवाह alternative/ पर्यायी प्रवाह राहिला, पण हा प्रवाह मुख्य प्रवाह म्हणून खूप कमी काळासाठी राहू शकला. त्यानंतर लगेच ह्या मुख्य प्रवाहात प्रतिक्रांती होऊन पुन्हा एकदा प्रश्न न विचारण्याची संस्कृती वरचढ झाली म्हणून आपल्याकडे त्या तुलनेने हा प्रवाह सर्वव्यापी होऊ शकला नाही. पण हा प्रवाह आपल्याकडे होता याचे भान ठेवणे आणि लोकांना त्याची जाणीव करून देणं हे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आणि रुजवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विज्ञानाचे नियम शिकवले जातात, पण ते जगण्यात कसे आणायचे हे शिकवले जात नाही. एखादी व्यक्ती अत्याधुनिक स्मार्ट फोनवर ज्योतिष बघत असेल किंवा हे मेसेज सोशल मीडियावरून दहा जणांना पाठवा नाहीतर वाईट होईल असे मेसेजेस फॉरवर्ड करते, त्या व्यतीकडे तंत्रज्ञान आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, हे आपल्याला समजावून सांगावे लागेल. हे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला माहीत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणार्या व्यतींना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणे सुलभ असते, पण तंत्रज्ञानाचा आपण किती प्रभावी वापर करतो त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हे इथे बोलत असताना मला अगत्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आठवण येत आहे. डॉ. दाभोलकर यांचा तंत्रज्ञानाच्या बाबतीतील दृष्टिकोन अत्यंत प्रोग्रेसिव्ह होता. विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला जी भूमिका पुढे न्यायची आहे त्यासाठी केला पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. एक उदाहरण देतो. साधारण २००० च्या सुरवातीला न्यूज चॅनेल्स यायला सुरुवात झाली. त्यानंतर मराठी न्यूज चॅनेल्स आली. २००५ ते २००७ या काळात मी ई टीव्हीचे पुण्यामध्ये रिपोर्टिंग करत होतो. त्या वेळी डॉ. दाभोलकर यांचा व्हिडिओ बाईट घेण्याचा योग यायचा. डॉ. दाभोलकर कॅमेर्याबद्दल इतके परफेक्ट असायचे की, आम्हाला त्यांना सांगावे लागायचे नाही तुमचा लूक कुठे ठेवायचा आहे. बाईट किती वेळेचा द्यायचा आहे. तुमचा आवाज कसा असला पाहिजे. फ्रेम कशी असली पाहिजे. म्हणजे, त्यांनी हे इतके पटकन आत्मसात केलं होतं. मी पाहिलं आहे की, चळवळीतील अनेकांना याबद्दल सांगावे लागायचे की, इतके बोला, आवाज असा हवा वगैरे. टीव्ही हे नवं माध्यम आहे. त्याचे बारकावे शिकून घेतले पाहिजेत, हे डॉ. दाभोलकर यांनी ओळखले होते. त्यांचा हा दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीत होता. त्या वेळेपासून ते तंत्रज्ञानाचा पुरस्कार करत आलेले आहेत.
अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बुवा जर विज्ञानाने दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या मनात भीती निर्माण करू शकतात. तर आपण विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण का करू शकत नाही? अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र न्यूज पोर्टलचे उद्घाटन करत असताना या मुद्यावर अधिक लक्ष दिले पाहिजे. विज्ञानाचा अत्यंत व्यापक प्रमाणावर दुरुपयोग करून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली जात आहे, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढू दिला जात नाही. आपण वैज्ञानिक संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा ह्या अवैज्ञानिक गोष्टींना विरोध करण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे केला पाहिजे, ही आपल्या समोरची जबाबदारी आहे. आजच्या काळात कधी नव्हे इतक्या जोमाने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जोमाने करण्याची गरज आहे.
साधारण ३० वर्षांपूर्वी आपल्याला वाटत होतं, या ठिकाणी उपस्थित असलेली देशपांडे सर, मंडपे सर या ज्येष्ठ मंडळींनी काम सुरू केलं, त्या वेळेस त्यांना वाटलं असेल की, समाज सुशिक्षित होतं चालला आहे, त्यामुळे २०-३० वर्षांनंतर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम एवढ्या जोमाने करण्याची गरज पडणार नाही. पण उलटे झालेले आपल्याला दिसत आहे. म्हणजे शिक्षणाचा प्रसार ज्या वेगाने झालाय त्या वेगाने आपल्याकडे अंधश्रद्धेचा प्रसार झालेला आहे. फक्त त्याचा फॉर्म बदललेला दिसत आहे. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की, या सगळ्या तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे तो प्रतिगामी शती पटकन करतात. तुलनेने आपण करायला काही वेळेला उशीर करतो. या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचा आपण फार विचार करतो, त्यामुळे उशीर होतो.

तुम्ही पाहिले असेल, खूप न्यूज चॅनेल्स भारतामध्ये यायला लागले, तेव्हा त्यावर सगळ्यात पहिले शोज भविष्य सांगणार्या व्यतींचे यायला लागले. सकाळी अनेक लोकांची प्रवचने सुरू झाली. व्हॉटस्अप सुरू झालं त्याचा वापर अशा अशा प्रकारचे मेसेज दहा जणांना पाठवा असे प्रकार सुरू झाले. याच स्मार्ट फोनमध्ये भविष्याचे अॅप्स वगैरे गोष्टी पटकन पाहायला मिळाल्या. बुवाबाजी करणार्या मंडळींनी टीव्हीचा सर्वाधिक वापर कोट्यवधी माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी केला. आपण पुरोगामी चळवळीत काम करणारी मंडळी आहोत, ती या बाबतीत तुलनेने कमी पडली. ही बुवाबाजी करणारी मंडळी धंदेवाईक नजरेने याकडे पाहात असल्याने त्यांना ते करणं सोपं गेलं. आपल्यामध्ये अनेक जण आहेत त्यांना तंत्रज्ञानाची उत्तम जाण आहे. पण आपण तंत्रज्ञानाचा तत्काल व प्रभावी वापर करायला कमी पडतो. त्यामुळे आपण अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र न्यूज पोर्टलचे उद्घाटन करत आहोत ते मला महत्त्वाचे वाटते.
आजच्या युगात माहिती आणि अफवा साधारण त्याच वेगाने पसरते. म्हणून आपल्याला आजच्या युगात डिजिटल मिडियाचा एक मोठे शस्त्र म्हणून वापर करायचा आहे. या डिजिटल माध्यमाचा सर्वांत मोठा फायदा आपल्याला इको चेंबर्सच्या बाहेर पडायला होईल. आता पण सर्वसाधारणतः एकाच पेजवर आहोत. अंधश्रद्धा निर्मूलनाची किती गरज आहे हे तुम्हाला मी सांगणे परत तुम्ही मला तेच सांगणं. हे एकमेकांना तेच तेच सांगणं आहे. ज्या वेळेस आपण डिजिटल मिडियाचा वापर करू त्या वेळेस आपण इको चेंबर्सच्या बाहेर जाणार आहोत. त्यामुळे ही वेबसाईट एका वेगळ्या झोनमध्ये घेऊन जाणारी आहे. ज्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल माहिती नाहीये किंवा ज्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती नाहीये, जी माणसे कुंपणावर आहेत, या सगळ्या मंडळींपर्यंत आपण जाऊ शकतो. त्यांना अंधश्रद्धांच्या आहारी जाण्यापासून वाचवू शकतो. आपल्या वर्तुळाच्या खूप पलीकडे जाण्यासाठी ही वेबसाईट मदत करू शकते. आपण ज्या वर्तुळात वावरतो तिथे हजारो लोक असतील तर ह्या डिजिटल माध्यमातून आपण लाखो लोकांपर्यंत जाणार आहोत.
आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र छापील स्वरूपात येत असताना, त्याचे वर्गणीदार आपलीच समविचारी मंडळी असतील. त्यामुळे आपल्यामध्ये विचार पसरणे, आपली वैचारिक मशागत होणे ह्या बाबी होत होत्या आणि त्या महत्त्वाच्याच होत्या. मला असं वाटतं की, आपण एक पाऊल पुढे टाकत असताना, ज्या वेळेस आपण वेबसाईट म्हणून जातोय त्या वेळेस अगदीच कोरी पाटी असलेली जी मंडळी आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. मग आपण त्या कोर्या पाटीवर पुरोगामी विचार लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे डिजिटल माध्यम प्रभावी ठरू शकते. सोशल मीडियासुद्धा यासाठी महत्वाचा आहे. मी डॉ. हमीद यांच्याशी बोलत असताना हेच म्हटले की, आपण वेबसाईट सुरू करत आहोत, पण हीच वेबसाईट लोकांपर्यंत पोहोचवणे पुन्हा आव्हानात्मक असतं. व्हॉटस्अॅप व इतर माध्यमांतून या वेबसाईटवर प्रकाशित होणारे लेख, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवाल, त्या वेळेसच ते वाचतील. आपण फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांचा वापर करून पुरोगामी विचार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न प्रभावीपणे केला पाहिजे.
सोशल मीडियामुळे वैज्ञानिक व विचारवंत थेट जनतेपर्यंत संवाद साधू शकतात हा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही पाहिले असेल, डॉ. दाभोलकर यांच्या जुन्या मुलाखतीतील रील्स व्हायरल झालेल्या दिसतात. श्रीराम लागू यांचे देवाबद्दलचे विचार व्हायरल झालेले दिसतात. हे सर्व सोशल मीडियामुळे घडते आणि या गोष्टी ज्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र न वाचणार्या तरुण वर्गापर्यंत पोहोचतात. मी बीबीसी मराठीत काम करण्यापूर्वी प्रिंट मीडियामध्येही काम केलेले आहे. ज्या पद्धतीने डिजिटलची वाढ गेल्या काही वर्षांत होतं आहे, त्या पद्धतीने वाचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. जास्त तरुण वर्ग मोबाईलवरच वाचतो. त्यामुळे आपल्याला स्ट्रॅट्रेजिकल दृष्टीने याचा विचार करावा लागेल. मी बीबीसी मराठीवर महाराष्ट्राची गोष्ट नावाने सिरिज करत आहे. त्यात आ. ह. साळुंखे, जयसिंगराव पवार, बाबा आढाव यांच्या मुलाखती घेतल्या. ज्यांनी यांची पुस्तके वाचलेली नाहीयेत, त्या मोठ्या वर्गापर्यंत मी यांचा विचार पोहोचण्यासाठी मदत केली. आपण या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक अशा मंडळींच्या भूमिका मोठ्या वर्गांपर्यंत नेऊ शकतो.
आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार वेबसाईटवरती आणणार आहोत. त्यात अत्यंत महत्त्वाचा मजकूर असणार आहे. तो मजकूर फक्त टेक्स्टच्या स्वरूपात न आणता व्हिडिओच्या स्वरूपात कसा आणू शकतो याचाही विचार आपण केला पाहिजे. कारण, आज वाचण्याच्या प्रमाणापेक्षा पाहण्याचे प्रमाण आहे. आम्ही जेव्हा टेक्स्ट बातमी करतो आणि व्हिडिओ बातमी करतो याचे लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण यात खूप फरक आहे. दिवसेंदिवस व्हिडिओ पाहण्याकडे लोकांचा कल वाढत चाललेला आहे. त्यामुळे यू ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखे प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचे ठरतील. यात करण्यासारखे खूप आहे. म्हणजे, मी मघाशी म्हंटले तसं डॉ. दाभोलकर यांचे वेगवेगळ्या मुलाखतीतील व्हिडिओे असतील किंवा मंडपे सर बुवाबाजीचा पर्दाफाश करणारे प्रात्यक्षिकं करून दाखवतात, त्याच प्रात्यक्षिकाचा दीड-दोन मिनिटांचा व्हिडिओ केला तर तो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हे करण्यासाठी खूप वाव आहे. अंधश्रद्धांचा प्रसार करणारे लाखो व्हिडिओ आपल्याला दिसतात, पण त्याला काऊंटर करणारे व्हिडिओ आपल्याला दिसत नाहीत म्हणून याची गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती इतके वर्षं काम करत आहे, तिची तज्ज्ञता यासाठी फार उपयोगाची ठरेल.
डिजिटल माध्यमे ही माध्यमांचे लोकशाहीकरण करतात. लोक तुमच्याशी थेट संपर्क साधू शकतात. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीला न्यूज चॅनेल काढणे सोपे नाही, पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती फेसबुक पेज काढू शकते, इन्स्टाग्राम अकाऊंट काढू शकते, यू ट्यूब अकाऊंट काढू शकते. म्हणून डिजिटल मीडिया आपल्यासाठी एक वरदान आहे. डिजिटल मिडियातून नेटवर्किंग होईल, आपण ज्या ज्या समविचारी मंडळींपर्यंत पोहोचू शकलो नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होईल. आज इथे उपस्थित मंडळी वेगवेगळ्या शहरात आहे, मात्र आपण इथे भेटू शकत आहोत हे तंत्रज्ञानामुळेच शक्य आहे.
ट्रेंडिंग विषयावर आपण काम करू शकतो. उदा. ग्रहण काळात अनेक अवैज्ञानिक गोष्टी शेअर केल्या जातात तेव्हा आपण तातडीने हस्तक्षेप करू शकतो. डिजिटल Emergency Response यासाठी आपण ही वेबसाइट डेव्हलप करू शकतो. छद्मविज्ञानाचा भांडाफोड करणारे, वैज्ञानिक विश्लेषण करणारे व्हिडिओ आपण बनवू शकतो. आजची पिढी पर्यावरण रक्षण, ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलत आहे, मात्र त्याच वेळेस ती सण, उत्सव साजरे करत असताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आहे. त्याच्यात एक दुटप्पीपणा दिसतो आहे. मग ह्या पिढीला या सगळ्याची जाणीव करून देण्यासाठी ह्या वेबसाईट, सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे.
आपल्या जीवनात कुटुंब, शिक्षण, समाजव्यवस्था यांची भूमिका निर्याणक आहे. या तीन घटकांमधून एकतर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतो किंवा अंधश्रद्धा रुजल्या जातात. त्यामुळे या तीन घटकांवर काम करण्यासाठी डिजिटल माध्यमाची रणनीती आपण आखली पाहिजे. आम्ही नंदिनी जाधव यांच्यावर सहा-सात वर्षांपूर्वी व्हिडिओ केला होता, तो त्या वेळेस खूप चालला होता. अजूनही समाजात जट प्रथा चालते हे बर्याच जणांना माहीत नसते, आपण ती गोष्ट व्यवस्थितपणे मांडतो तेव्हा खूप लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे या वेबसाईटवरचा मजकूर लोकांना रटाळवाणा वाटेल असा न करता अगदी फ्रेश, तरुणांना अपील होईल असा लिहिला जाईल, या महत्त्वाच्या भागावर कटाक्षाने लक्ष ठेवावे लागेल. राहुल थोरातांसारखा व्यक्ती सोशल मिडियावर लिहीत असतो. त्यांचे सोशल मिडियाचे लिसनिंग, कानोसा चांगला आहे, त्याचा निश्चित फायदा होईल.
आज आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने लॉजिक, वैज्ञानिक दृष्टिकोन शेअर करण्यालायक बनवत आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोन विशिष्ट वर्गातील संकल्पना न राहात ती एक जिवंत सामाजिक चळवळ बनली पाहिजे. त्याच्या सिरिज केल्या पाहिजेत. ही वेबसाईट एक माहितीचा साठा न बनता एक विवेकाचे व्यासपीठ बनले पाहिजे. या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र न्यूज पोर्टल’च्या माध्यमातून आपण डॉ. दाभोलकर यांच्या विवेकाच्या मशालीला अधिक प्रज्वलित करू शकतो.
अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी
शब्दांकन – सौरभ बागडे, पुणे
संपर्क : ७८२१९ ५७१४७
- अंनिवा न्यूज पोर्टल
- आपली पुस्तके तसेच आपले वार्तापत्र यातून आपण समविचारी लोकांपर्यंत पोहोचतो. इतर सर्व साधारण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्या वर्तुळाबाहेर पोहोचण्यासाठी डिजिटल पोर्टल हे प्रभावी माध्यम आहे.
- डिजिटल माध्यमातून थेट संवाद होऊ शकतो. उलट सुलट संवाद होणे ही लोकशाही-प्रक्रिया आहे.
- अंधश्रद्धेशी निगडित मानसिक विकारसंबंधी आणि ग्रहण वा ग्रहगोलाविषयी गैरसमजुती यावर तात्काळ प्रतिसाद देणे शक्य व्हावे.
- अंधश्रद्धा पसरविणारे हजारो व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तेव्हा आपल्या डिजिटल पोर्टलवर अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्हिडिओ असणे फार गरजेचे आहे.
- मुलाखतींचे पॉडकास्ट आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची चळवळ उभी करणे या डिजिटल पोर्टलद्वारे शक्य होईल.
