ज्ञानदीप लावू जगी…

नरेंद्र लांजेवार - 9422180451

संतशिरोमणी नामदेव महाराज यांच्याशी मुक्त संवाद

नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥

अशी प्रतिज्ञा करीत संपूर्ण मानवजातीला बुद्धिवादी – विवेकी सहज समजणारा सोपा भक्तिमार्ग दाखविणार्‍या संत नामदेवांना सर्वप्रथम माझा साष्टांग नमस्कार!

“नामदेवा, तू सुरू केलेल्या वारीला माझा पणजोबा, आजोबा, माझा बाप न चुकता यायचा…विठूचे दर्शन घेऊन तुझ्या समाधिस्थळी नतमस्तक व्हायचा… यावर्षी कोरोनामुळे ही संधी आमची हुकली तरी घरी बसूनच विविध वाहिन्यांवर तुझी वारी आम्ही ‘लाईव्ह’ बघणार आहोत.

‘आंतरभारती’चं स्वप्न प्रत्यक्षात उभा करणारा प्रथम पुरुष म्हणून तू आम्हाला वंदनीय आहेस. संत ज्ञानेश्वरांच्या सोबत भागवत धर्म मंदिराची पायाभरणी करणारा तू निष्ठावंत सेवक. भक्तिमार्गाचा तसा तू थोर प्रचारक. भागवत धर्माची पताका उत्तर हिंदुस्थानात अगदी थेट पंजाबपर्यंत फडकविण्याचे तुझे कार्य म्हणजे निर्गुण भक्तिविचारांच्या प्रसाराचे, अखिल मानवजातीच्या कल्याणाचे आदर्शवत असे अनोखी कार्य आहे. तुझ्या भारतभ्रमणामुळे देशभरातील जाती-जातीच्या भिंती चाळविण्यात आल्या. वैदिक संस्कृतीला विरोध करून स्पृश्य-अस्पृश्य भेद। हा अमंगल॥ ही देशभर शिकवण दिली गेली. संस्कृत ही संवादभाषा नाकारून बोलीभाषा-लोकभाषा, लोकसंस्कृतीला प्राधान्य दिले म्हणून नामदेवा, तू सर्व संतांमध्ये आम्हाला जवळचा वाटतोस.

संत नामदेवा, साने गुरुजींनी ‘आंतरभारती’चं स्वप्न पाहिलं होतं, तसंच स्वप्न प्रत्यक्षात तू उतरवून दाखविलं. अरुणाचल प्रदेश, चिदंबर, विष्णुकांची, रामेश्वर, सेतूबंद हरिहरेश्वर, कन्याकुमारी ते थेट पंजाबपर्यंत तू भागवत धर्माची पताका समतेच्या लढ्यासाठी घेऊन गेलास. तू स्वतः अभंग, चरित्र, गवळणी, विराण्या, भारुडे, आरती अशा सर्व प्रकारचे लेखन केले. भक्तिविचारांच्या प्रचारार्थ हिंदी पदेही लिहिली. महाराष्ट्रासह उत्तर भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे योगदान दिले. विठुनामाचा गजर करीत निर्गुण भक्तिपरंपरेला वैभव प्राप्त करून दिले. मराठी संतकवींच्या परंपरेत भावनाशील कवीचे स्थान त्यामुळे तुला प्राप्त झाले. भारूड हा आगळा-वेगळा रचनाप्रकार आम्हाला दिला.

माय-बापा नामदेवा, अनिष्ट रुढी आणि परंपरा यांना तू आयुष्यभर विरोध दर्शविला. संपूर्ण भारतातील तत्कालीन संतांची एक मोट बांधून भक्तिमार्ग हा सर्वसामान्यांसाठी खुला केला.

संतशिरोमणी नामदेवा, तुझा जन्म 26 ऑक्टोबर 1270 ला आणि 3 जुलै 1350 ला पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी तू देह ठेवला. या तीन जुलैला तुझ्या मृत्यूला 670 वर्षेहोत आहेत, तरी तुझे अभंग, तुझे भारूड आणि तू सुरू केलेली वारी अखंड सुरू आहे. खरं तर तुझं पूर्ण नाव नामदेव दामाजीशेट रेडेकर आणि आईचे नाव गुणाई. कपडे शिवण्याचा तुमचा व्यवसाय; आणि तसंही शिंपी समाजाला वेद, उपनिषद आणि संस्कृत शिक्षणाची सोय नव्हती. पण भक्तिमार्गामध्ये संस्कृत जर आडवी येत असेल, तर ती आमची भाषा नाही. आमची भाषा लोकभाषा, म्हणून लोकभाषेमध्ये भक्तिमार्ग आपण आणलात. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे आपले जन्मस्थळ. ऐंशी वर्षांच्या आयुष्यामध्ये तुम्ही व तुमची पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई, तुमची मुलं नारा, विठा, गोंदा, महादा हे चार पुत्र. तुमची मुलगी लिंबाई असा सर्व परिवार हा विठ्ठलभक्तीमध्ये रंगून गेला. तुमच्या सर्व कुटुंबीयांच्या नावाने अभंगरचना आहेत. तुम्ही आयुष्यात 2500 पेक्षा जास्त अभंग लिहिले आहेत. तुमचे हिंदी भाषेत 125 आणि पंजाबी गुरुमुखी भाषेमध्ये 62 अभंग प्रसिद्ध आहेत.

नामदेव कीर्तन करी। पुढे देव नाचे पांडुरंग॥

अशी योग्यता तुमच्या अभंगवाणीने प्राप्त केली.

नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥

हे तुमच्या आयुष्यात खरं सूत्र होतं. हे सूत्र अनेकांना कळलं नाही. समाजाला सज्ञान करण्यासाठी तुम्ही वैदिक संस्कृतीतून समाजाला बाहेर काढलेत, पुरोहितशाही नाकारली. पाप-पुण्य आणि मोक्षाच्या संकल्पना नाकारल्यात. त्यावेळेस समाजातील तत्कालीन लोकांनी तुम्हाला किती ‘ट्रोल’ केले असेल, हे आम्ही आजही समजून घेऊ शकतो. आज जर आम्ही राज्यकर्त्यांना काही प्रश्न विचारले तर आम्ही सुद्धा देशद्रोही ठरतो.

ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर पन्नास वर्षे भागवत धर्माचा प्रचार तुम्ही स्वतः केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचं अवघड कार्य केलं. त्यामुळेच महाराष्ट्रधर्म येथे रूजू शकला. शीख समाजात तुम्हाला प्रचंड मान प्राप्त झाला आहे. ‘आंतरभारती’चे तुम्ही खरे प्रवर्तक ठरल्याने पंजाबमधील घुमानसह देशभर तुमची देखणी मंदिरं बांधली गेली आहेत. ही मंदिरं तुझ्या जातीच्या लोकांनी नव्हे, तर खर्‍या समतावादी वारकर्‍यांनी बांधली आहेत.

नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥

या पवित्र भावनेने तुम्ही कार्य करीत राहिलात. मराठीमध्ये अभंगरचना आणि भारुडाची निर्मिती सर्वप्रथम तुम्ही केली आणि काही संतांनी आणि संप्रदायांनी हा तुमचा काव्यप्रकार पुढे हाताळला. ‘भारुड’ या लोकसाहित्य प्रकाराला उच्च अशा शिखरावर आरूढ करण्याचे काम तुम्ही स्वतः केले.

तुम्ही जोशी, वासुदेव, पिंगा, शकुनी, कोल्हाटी, माळी, मांड, जोगी, जागल्या यांसारख्या लोकभूमिकांचे माध्यम वापरले. त्या लोकभूमिकांबरोबर शिमगा, होळी, गोंधळ, फुगडी यांसारखे खेळ आणि विंचू, सर्प, गाय, पाखरू यांसारखे पशु-पक्षी भारुडात उपयोगात आणले. जोहार, आशीर्वाद पत्र, चोपदार यासारखे दरबारी विषय आणि रहाट-बाजार, सासुरवास यांसारखे संसारी विषयही तुम्ही या भारुडामध्ये सामग्री म्हणून वापरले. त्याचबरोबर महालक्ष्मी, आंबा, कान्होबा यांसारख्या देवीभूमिका लेखनात हाताळल्यात. विविध लोकसाहित्याच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर तुम्ही सातत्याने प्रहार करून खर्‍या श्रद्धा, भक्तीचा उपदेश त्याद्वारे केला. भागवत धर्मातील सदाचार, सर्वांभूती भगवंतभाव आणि विवेकाची शिकवण देणारे नाथांचे प्रत्येक भारूड हे जीवनातील जनसामान्यांचे खरे अनुभवविश्व भारुडाच्या माध्यमातून वैशिष्टपूर्ण रीतीने तुम्ही मांडून सामाजिक विवेकाला बळकटी दिली. समाजाची लोकभाषा वापरून लोकांना कळेल असेच भावज्ञान तुमच्या साहित्यातून जनतेपर्यंत प्रबोधनाच्या स्वरुपात मांडणी गेली. काही जाणकार अभ्यासक म्हणतात की तुम्ही जवळपास दीडशे विषयांवर साडेतीनशेपेक्षा जास्त भारुडे लिहिली आहेत. यातील विविध विषयांची विविधता आणि भारुडांतून मांडलेले तत्त्वचिंतन लक्षात येतात. तुझ्या भारुडाचे वर्गीकरण फार मोठ्या प्रमाणावर होते.

संतांची खरी शिकवण समाजाला कळावी म्हणून

कर जोडूनी विनवितो तुम्हा। तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा॥

नको गुंतू विषय कामात तुम्ही।

आठवा मधुसुधना।

हेचि माझी विनवणी जोडूनी दोन्ही।

एका जनार्दनी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा॥

अशा पद्धतीने तुम्ही वासुदेवाच्या रुपाने भक्तीचे दान या संपूर्ण समाजाला मागून जीवनमुक्तीचा मार्ग म्हणजे अज्ञातावर मात करणे होय, हीच शिकवण देत आलात. हे सांगण्यासाठी तुम्ही ‘ज्ञानदीप लावू जगी’ हा ध्यास घेतला. आज सातशे वर्षांपूर्वी तुमचा हा ध्यास सर्वशिक्षा अभियानातून आम्ही ज्ञानदीप लावू इच्छित होतो. पण तो विवेकवादी ज्ञानदीप असेलच, असे नव्हे; आम्ही आता ज्ञानदीप लावण्याच्या नादात ज्योतिषविद्या शास्त्रसुद्धा विद्यापीठांमध्ये शिकवू लागलो आहोत. तुम्ही ज्या विषयावर प्रहार केला, ते विषय आता विद्यापीठांमध्ये शिकविले जात आहेत. तुमच्या काळातील संत आता कुठेच दिसत नाहीत. आता ‘कार्पोरेट कल्चर’चे बाबा आणि बुवांचे, साध्वींचे पीक आले आहे. या बाबा-बुवांचे तत्त्वज्ञान ऐकून कदाचित विठ्ठलसुद्धा नाराज होईल. हे जरी खरं असलं तरी तुमच्यानंतर असा प्रबोधन करणारा संत गाडगेबाबांशिवाय दुसरा झाला नाही, हीसुद्धा खंत आमच्या मनी आहे. तुझ्या विचारांचा वसा आणि वारसा गाडगेबाबांनी पुढे चालवला आणि गाडगेबाबांचा प्रबोधनाच्या विचारांचा वसा आम्ही विवेकवादी विचारांची काही माणसं चालवीत आहोत. म्हणून तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. आपल्या मार्गदर्शकाला, वैचारिक गुरूला त्याच्या पुण्यतिथीदिवशी स्मरण करणे, हा आमचा संस्कार आहे. म्हणूनच तुझ्या 670 व्या पुण्यतिथीला भावपूर्ण अभिवादन…!

तुझ्या लोकसाहित्याचा चाहता.”


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]