शुभम सोळसकार -

कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था या धार्मिक संघटनांनी आपल्या प्रयोगशाळा समजून शिक्षकांवर दबाव आणण्याची व्यूहरचना आखत ठरवून कटकारस्थाने रचली जात आहेत. अशा आशयाचा अहवाल शांतीसाठी स्त्री संघर्ष (Women protest for peace) या संस्थेने तयार केला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे हा अहवाल सुपूर्त केला आहे.
राजर्षी शाहू छत्रपती यांच्या कोल्हापूर भूमीला धार्मिक तेढ व त्यावरून तणावाच्या घटना तशा क्वचितच अनुभवायला मिळतात. परंतु धार्मिक ध्रुवीकरण आपल्या सोयीच्या पक्षाला फायदेशीर ठरत आहे हे पाहून कोल्हापुरात धार्मिक संघटनांनी आपला मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे वळविल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना धार्मिक विषयांवरून भडकवून ज्ञान देणार्या शिक्षकांना लक्ष्य केले जात आहे. पूर्वनियोजनातून शिक्षकांना वेठीला धरून, शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनावर दबाब आणून शैक्षणिक वातावरण बिघडवले जात आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था या धार्मिक संघटनांनी आपल्या प्रयोगशाळा समजून शिक्षकांवर दबाव आणण्याची व्यूहरचना आखत ठरवून कटकारस्थाने रचली जात आहेत. अशा आशयाचा अहवाल शांतीसाठी स्त्री संघर्ष (Women protest for peace) या संस्थेने तयार केला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे हा अहवाल सुपूर्त केला आहे.
हा अहवाल कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या प्रत्यक्ष पाहणीच्या व घटनांच्या आधारे तयार केला आहे. जून ते ऑगस्ट २०२३ मधील या घटना शैक्षणिक संस्थांचे धार्मिकीकरण करण्याचा घाट कसा रचला जात आहे याचे वास्तव मांडणारा आहे. यामध्ये कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, दत्ताजीराव कदम महाविद्यालय इचलकरंजी, सेवेंथ डे एडवेंटिस्ट स्कूल कोल्हापूर, छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर, पंडित नेहरू विद्यालय कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण कॉलेज पाचवड सातारा, चंद्राबाई शांतप्पा शेंदुरे कॉलेज हुपरी, कोल्हापूर या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. कोल्हापुरातील दंगलींची घटना ताजी असतानाच वातावरणात आणखी तणाव निर्माण करण्याचे काम शैक्षणिक संस्थांमध्ये होत आहे.
हे प्रकार थांबवून शिक्षण संस्थांमध्ये संविधानाला अनुसरूनच प्रत्येकाचे वर्तन असावे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावी, तसेच शैक्षणिक क्षेत्रात घडणार्या चिंताजनक घटनांमध्ये हस्तक्षेप व कारवाई करावी, अशी मागणी शांतीसाठी स्त्री संघर्ष या मंचने गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली. यावेळी महिलांनी गळ्यात फलक अडकवून मूक निदर्शने केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले. यात म्हटले आहे, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षक संघटनांची एकत्र बैठक घेऊन सखोल चर्चा घडवून आणावी व मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत. शिक्षण क्षेत्रात काम करणार्या अनेक स्त्रियांना धार्मिक संघटनांच्या दबावाच्या राजकारणाला बळी पडावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांना लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘शांतीसाठी स्त्री संघर्ष’ या मंचतर्फे एक सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे.
सत्यशोधन समितीचा धक्कादायक अहवाल
कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत आठ जूनला ‘मूल्य शिक्षण’ या विषयावर एका प्राध्यापिकेला सत्र घेण्यास सांगितले. लैगिंक भेदभाव या विषयावर चर्चा सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी अल्पसंख्यांक समाजाबाबत अपमानास्पद वक्तव्ये केली. त्यावर त्या प्राध्यापिकेने त्यांचे मुद्दे खोडून काढले. ही चर्चा होत असताना काही विद्यार्थ्यांनी त्याचे व्हिडिओ काढले, मोजकाच व सोयीचा भाग सोशल मीडियावर प्रसारित केला. या आधारावर काही धार्मिक संघटनांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. कारवाई न केल्यास परीक्षा होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. यावर कॉलेज प्रशासनाने प्राध्यापिकेला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. अशीच काहीशी घटना विवेकानंद एज्युकेशन सोसायटीमध्ये घडली. मुस्लिम विद्यार्थिनींच्या हिजाबला विरोध करीत जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. इचलकरंजीत याचाच पुढचा अंक पाहायला मिळाला. २२ जुलैला भगवा गमछा टाकून दोन विद्यार्थी दत्ताजीराव कदम महाविद्यालय आले. सुरक्षा कर्मचार्यांनी त्यांचे गमछे जप्त केले. या विरोधात हिजाबला परवानगी दिली जाते तर आम्हाला का नाही, असे म्हणून मोठ्या संख्येने जमाव जमवून निदर्शने केली.
यानंतर चार ऑगस्टला सेवेंथ डे एडवेंटिस्ट शाळेत परीक्षेच्या दरम्यान एका विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेवर जय श्री राम लिहिले. परीक्षक असणार्या शिक्षिकेने त्यावर आक्षेप घेत तो मजकूर खोडण्यास सांगितला, मात्र तसे न करता त्या विद्यार्थ्याने बाकीच्या मुलांना देखील तसे अनुकरण करण्यास सांगितले. यानंतर वादंग झाल्यानंतर चाळीस पन्नास जणांचे टोळके आधीच शाळेबाहेर तयारीत होते. त्यांनी आत प्रवेश करीत घोषणा देण्यास सुरुवात केली आणि शिक्षिकेला माफी मागण्यास सांगितले. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन शिक्षकांनी हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
अशा अनेक प्रकारच्या घटना सर्रास घडताना दिसत आहेत. प्रत्येक घटना ही नियोजित कटाचा भाग असल्याचे दिसून येते. पाचवडमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजात नऊ ऑगस्टच्या क्रांतिदिनी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात व्याख्यात्यांनी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाचा संदर्भ दिला. त्यावर आक्षेप घेत काही विद्यार्थ्यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला म्हणून माफी मागण्यास सांगितले. माफी मागण्यास नकार देताच तिथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हुपरीमधील कॉलेजात अॅड. प्रकाश आंबेडकर यांची पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाला धार्मिक संघटनांच्या रोषास सामोरे जावे लागले. त्याच्या बदलीची मागणी करण्यात आली.
अशा घटनांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन यांची निष्पक्ष चौकशी करावी, त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या अहवालात करण्यात आली आहे. हा अतिशय गंभीर परिस्थिती दर्शविणारा अहवाल तयार करण्यात अनेकांची मदत झाली आहे. यामध्ये मेघा पानसरे, श्रमिक फाउंडेशनच्या तनुजा शिपुरकर, मीना सेशु, जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना पाटील, हेमा देसाई, अलका देवळापूरकर, आनंदी महिला जागृती संस्थेच्या जयश्री कांबळे यांसह इतर अन्य संस्थांचा समावेश आहे.
– शुभम सोळसकार
(साभार – बाईमाणूस वेब पोर्टल)