विटाळाचे चार दिवस आणि माझा ‘सत्याचा प्रयोग’

कल्याणी गाडगीळ -

तेव्हा मी नववीत होते. साल होते 1961.

मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आईच्या माहेरी; म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ, संगमनेर व अकोला या ठिकाणी दोन-तीन महिन्यांसाठी जात असू. कोतुळला आईचे चुलते; म्हणजे आमचे काका-आजोबा व काकू-आजी; तसेच आमचा धाकटा केशवमामा, मंगलामामी आणि त्यांची तीन मुले राहत असत. संगमनेरला मधला; म्हणजे विष्णूमामा, प्रमिलामामी व त्यांची चार मुले राहत. अकोल्याला श्री. अकोलकर यांच्या घरामध्ये नृसिंहाचे मंदिर होते. त्याची व्यवस्था पाहायला त्यांच्यापैकी कोणीच तिथे नसल्याने त्यांनी माझे मोठे मामा; म्हणजे वसंतमामा, ज्यांना आम्ही ‘भाऊमामा’ म्हणायचो ते व त्यांची बायको इंदिरा मामी यांना तिथे ठेवले होते. भाऊमामाला सहा मुली होत्या. सर्वांची लग्ने झालेली होती व मामाचा मुलगा नोकरीनिमित्त पुण्यात राहत होता. त्यामुळे या वयस्कर पती-पत्नीला देवळाची जबाबदारी घेऊन सर्व व्यवस्था पाहणे अगदी सहज शक्य झाले होते; शिवाय भाऊमामा चांगल्यापैकी देवभक्त होता.

भाऊमामा व मामी राहत, ते घर म्हणजे पुढे नृसिंहाचे मंदिर, मागे स्वयंपाकघर, झोपायची खोली, त्या मागे छोटेसे अंगण, त्यात भलेमोठे व खोल आड, पलिकडे मोठा पाटीचा संडास अशी सोय होती.

त्या वर्षी जेव्हा आईने सुट्टीत या गावी येण्याचा बेत आखला, तेव्हा मी त्याचा मनापासूनचा निषेध व्यक्त केला. त्याचे मुख्य कारण म्हणजे तेव्हा मी नुकतीच वयात आले होते व मला पाळी येणे सुरू झाले होते. या खेडेगावात पाळीच्या वेळी चार दिवस बाजूला बसण्याची पूर्वापार प्रथा होती. मला त्याची खूपच लाज वाटे; शिवाय इतके दिवस ज्यांच्या बरोबर हुंदडले, ते मामेभाऊ मग चिडवीत असत. इतर मामेबहिणी बाजूला बसल्या की, ते मुद्दाम कपड्यांचे बोळे करून त्यांच्या अंगावर फेकत. मग त्या बहिणींना ते कपडे घेऊन नदीवर जाऊन ते धुऊन आणायला लागत. मी आईला सांगितले, “काय वाट्टेल ते झाले तरी मी बाजूला बसणार नाही. हे तुला मान्य असेल तरच मी गावी तुमच्याबरोबर येईन.” आईने ते मान्य केले व मी गावी गेले.

भाऊमामाकडे पोचलो. दोन दिवसांनी अपेक्षेनुसार माझी पाळी सुरू झाली. आईला मी लगेच सांगितले व पुन्हा एकदा बाजूला न बसण्याविषयी; तसेच त्याविषयी मामा-मामीशी काहीही न बोलण्याचे वचन तिच्याकडून घेतले.

मामाचा सर्व दिवस आधी देवपूजा, नंतर आरती, मग नैवेद्य, नंतर येणार्‍या भक्तजनांस प्रसाद देणे यात जाई. संध्याकाळी मंदिरात पुन्हा आरती असे. त्यासाठीही काही ठराविक लोक नित्य नेमाने येत. याखेरीज मामाला पत्रिका पाहण्याचाही नाद होता. त्यामुळे आसपासचे लोक कोणाकोणाला घेऊन पत्रिका दाखवायलाही येत असत.

मामीचा सर्व दिवस सर्व घराची झाडलोट, पूजेची तयारी, विहिरीतून पाणी काढून घंगाळी, हांडे भरून ठेवणे, स्वयंपाक, वाढणे, धुणी-भांडी यातच जाई.

आम्ही तिथे असताना मामी व आई यांचा सतत संवाद चाले. त्यात मुख्य विषय हा त्या देवळाचा व नृसिंह या देवाच्या कडक सोवळ्याचाच असे. मामी म्हणे, “बरं का लीला वन्स, (हे माझ्या आईचे माहेरचे नाव) हा देव म्हणजे फार-फार कडक आहे. याचे सोवळे फार म्हणजे फारच कडकपणे पाळावे लागतात. जरा कुठे विटाळ झाला आहे, असे घडले तर विटाळ करणार्‍या व्यक्तीला विषारी विंचू किंवा नाग येऊन दंश करून जातो. त्यामुळे मी तर येता-जाता हात-पाय धुवत असते. विहिरीचे पाणी काढून हांडे, बादल्या भरत असते. कोणाही परक्या माणसांना घरात येऊ देत नाही. हे सुद्धा मंदिराच्या गाभार्‍यात कोणालाच कधीच येऊ देत नाहीत.”

आई हे सगळे मुकाटपणे ऐकून घेत होती; पण तिने मला दिलेल्या वचनानुसार मामीला माझ्या पाळीविषयी मात्र काही सांगितले नाही.

दिवस गडबडीत गेला. कोणाची येणी-जाणी, बाजारात एक चक्कर मारणे, यात वेळ कसा निघून गेला ते कळले नाही. रात्रीची जेवणे झाली. झोपायची वेळ झाली. मी आईशेजारीच झोपायचे पक्के केले होते; शिवाय तसे ते घर लहानच असल्यामुळे सर्वांनी एकाच खोलीत, खाली सतरंज्या घालून व प्रत्येकी एक गोधडी पांघरायला घेऊन झोपायची सोय झाली. मामाकडे वीज नव्हती. त्यामुळे मंदिरात मोठी समई, स्वयंपाकघरात भिंतीवर लावून ठेवलेली चिमणी व तीन-चार कंदील घरात जागोजागी ठेवलेले होते. कुठूनही कुठेही जायचे तर कंदिलाशिवाय जाणे अशक्य होते.

त्यातून रात्रीच्यावेळी बाथरूमला लागली तर…! मला ‘त्या’ कल्पनेनेच अंगावर शहारा आला. तो पाटीचा संडास अगदी भयानक होता. कारण ‘त्या’ गावात पाटी उचलायला माणसेच नव्हती. मागच्या अंगणातील खोल आडासारखेच खोल आड या संडासात पाटी म्हणून होते. दिवसासुद्धा तिथे जायची मला भीती वाटत होती. चुकून जर पाय घसरला व त्या खोल आडात पडले तर…! एक तर तिथली घाण आणि आड चढून वर येण्याची काही सोय दिसत नव्हती. रात्रीची तर या पाटीच्या संडासात जाण्याची बातच नको.

यातल्या कोणत्याच भानगडी नकोत म्हणून मी जेवणही बेतानेच केले. रात्री कंदील बारीक करून झोपले. मी एकीकडे आईचा हात हातात घेतला होता. काहीतरी चांगले आठवण्याचा प्रयत्न करीत होते. देवावर माझी मुळीच श्रद्धा नव्हती व काडीचाही विश्वासही नव्हता. पण समजा जर देव खरोखर असेल तर…! त्यातून नृसिंह म्हणजे दिसायलाही भयानकच मूर्ती आणि मामी सांगते ते खरे असेल तर मला विंचू किंवा नाग चावणार! मी जाम घाबरले होते. पण दुसरीकडे मनात विचार येत होते की, ही पाळी मला निसर्गत:च आलेली आहे; म्हणजे असेलच जर देव तर त्यानेच ही निर्माण केलेली असणार. माझ्या वयाच्या बहुतेक मुलींना ती येते, हे ऐकलेच होते व एव्हाना माहीतही झाले होते. मग त्यावेळी कोणाला स्पर्श केला तर त्याबद्दल शिक्षा का? ते सुद्धा विंचू किंवा नागदंशाची? आणि त्या विंचवाला किंवा नागाला तरी कसे कळते की हा विटाळ अमुक एका व्यक्तीनेच पसरविला आहे म्हणून? त्या व्यक्तीला शोधून चावणे म्हणजे चांगले अवघड कामच त्यांनाही लावून दिलेले होते. असे विचार आले की जरा बरे वाटत होते. पण जरा कुठे आई हलली किंवा शेजारी झोपलेली बहीण हलली, तिने झोपेत लाथ मारली किंवा कोणी घोरले, झोपेत काहीतरी बरळले तरी मी भीतीने पुन्हा घेरली जात होते.

एरव्ही मी झोपले म्हणजे मेल्यात जमा. सकाळी सुद्धा मला उठवायला आईला खूप आरडाओरडा करावा लागे; पण ‘त्या’ दिवशी मात्र माझी झोप अगदीच अडून बसलेली! रात्रभर विंचू व नाग येतोय की काय याचीच धास्ती. चुकून पाच मिनिटांसाठी डोळा लागे तर पुन्हा विंचू, नाग व कडक अशी नृसिंहाची भयावह मूर्ती डोळ्यांसमोर येणारच. होता-होता कधी तरी माझा डोळा लागला, किती वेळासाठी ठाऊक नाही आणि पहाटे-पहाटे जाग आली ती रस्त्यावरील एका गटाराशेजारी असलेल्या कोंबड्याने अगदी जोरात बांग दिल्याने.

मी हुश्श केले. कोंबड्याने बांग दिली म्हणजे आता रात्र सरली होती आणि आतापर्यंत तरी कोणी विंचू किंवा नाग येऊन मला चावलेला नव्हता किंवा नृसिंहही जवळ येऊन मला काही करून गेलेला नव्हता.

मग माझ्या बंडखोर मनाने देव वगैरे काही नसतोच आणि विंचू किंवा नागाला ही विटाळाची भानगड कळणे शक्य तरी आहे का? ही केवळ एक अंधश्रद्धा आहे आणि हे सगळे सांगणारी माझी मामी आहे नंबर एकची अशिक्षित आणि अडाणी. तिचा असल्या गोष्टींवर विश्वास बसणारच… या विचारांनी जोर धरला. आईने उठवायच्या आत मी कधी नव्हे ते उठून, दात घासून, केसांवर कंगवा फिरवून सर्वांच्या उठण्याची वाट पाहत बसले.

मामीने केलेला चहा त्यावेळी मला फारच चविष्ट लागला; शिवाय आईचाही. मामीने जे काही सांगितले त्यावर विश्वास नसेल, असेही मला वाटले. नाहीतर या विटाळ कालविण्याच्या माझ्या मोहिमेत ती इतक्या सहजी सामील झाली नसती किंवा तिचे मुलीवरचे प्रेम व मुलीच्या भावना समजावून घेण्याची शक्ती खूपच जास्त असणार. पण मी मात्र खूष होते.

जसजसा दिवस वर येऊ लागला तसतसा माझा विंचू, नाग, विटाळ यांवरचा अविश्वास वाढत चालला; इतका की मी शेवटी अंघोळ करून, कपडे बदलून नृसिंहाच्या आरतीलाही गेले. मला काही झाले नाही. मग संध्याकाळच्या आरतीलाही मी गेले. मामा नेमका उदबत्त्या मंदिराच्या गाभार्‍यात न्यायला विसरला होता. मामीने त्या माझ्या हातात दिल्यावर मी चक्क नृसिंहाच्या मूर्तीजवळ थेट गाभार्‍यातही गेले व हळूच त्या मूर्तीलाही मी सर्वांच्या नकळत स्पर्शही केला.

‘त्या’ रात्री मी निवांत होते. नेहमीप्रमाणे गाढ झोपून गेले. माझा धीर खूपच वाढलेला होता व विंचू, नाग, कडक नृसिंह, विटाळ हे सगळे एकदम झूठ आहे, याची खात्री झाली होती. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गाढ झोपून गेले.

असे ‘ते’ विटाळाचे चार दिवस निघून गेले. मी घरात, मंदिरात; अगदी मंदिराच्या गाभार्‍यातही विटाळ कालविण्यात यशस्वी झाले होते व विंचू किंवा नाग यांना त्याचा पत्ता लागलेला नव्हता – असा लागत नसतोच, यावर माझा पूर्ण विश्वास बसला; शिवाय नृसिंह महाशयही मला काही करू शकले नव्हते.

या ‘सत्याच्या प्रयोगा’त मी सुरुवातीला टरकले होते, हे निश्चित! पण त्यामुळेच माझ्या शास्त्रीय विचारांवर अवलंबून राहणे, विटाळ, भूत इत्यादी अशास्त्रीय व अंधश्रद्धा असलेल्या विचारांपासून पूर्णतः दूर राहणे, शास्त्रीय तत्त्वानुसार एखादी क्रिया व तिचे परिणाम शोधून पाहणे, या विचारांवर व जीवनशैलीवर पूर्णपणे विश्वास बसला. पुढच्या आयुष्यात मी त्यासंबंधानेसुद्धा अनेक प्रयोग केले.

याशिवाय मानवाच्या; विशेषतः स्त्रीच्या आयुष्यातील पाळी हे शास्त्रीय सत्य घरातील मोठ्या माणसांनी मुलींना नीट समजावून द्यायलाच हवे किंवा मुलींच्या शाळेत या विषयावर ठराविक इयत्तेतील मुलींसाठी खास एक-दोन पाठ घेतले गेलेच पाहिजेत, या विचारांनीही माझ्या मनात ठाण मांडले. पुढे-मागे मला मुलगी झाली तर तिला हे आपण नक्की नीट, वेळीच समजावून सांगायचे, हा निश्चय मी केला व अमलातही आणला. अशा तर्‍हेने मी केलेला माझा सत्याचा पहिला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला होता.

kalyani1804@gmail.com


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]