राजीव देशपांडे -

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असल्याचे भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आलेले आहे. पण प्रत्यक्षात मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार, प्रसार आणि अंगीकार करण्याच्या विरोधातच सरकारी पातळीवर आणि स्वायत्त म्हणवल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्थातूनही व्यवहार होताना दिसत आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याची आणि कृतीची गेल्या नऊ वर्षातील कितीतरी उदाहरणे देता येतील. पण आता या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधी व्यवहारांची झळ शालेय व माध्यमिक स्तरावरील सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासक्रमाबरोबरच विज्ञानाच्या अभ्यासक्रमालाही बसू लागली आहे. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत, मूलद्रव्यांची आवर्तसारिणी सारख्या मूलभूत संकल्पनांबरोबर अपारंपरिक ऊर्जास्तोत्र, जलसंवर्धन, हवा प्रदूषण, जीवाश्म इंधने या विषयानाही देशातील कोट्यावधी मुलांचा अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)ने अभ्यासक्रमाचे तर्कसंगतीकरण (करीक्युलम राशलायझेशन एक्झरसाइज) या गोंडस नावाखाली पालकांशी, शिक्षणतज्ञाशी कोणताही विचारविनिमय न करता कोविड काळात मुलांवर पडलेला भार कमी करणे, एकाच विषयाची पुनरुक्ती टाळणे, अभ्यासक्रमातील कठिणता कमी करणे ही कारणे देत अभ्यासक्रमातून वगळले आहे. परंतु या विषयांना वगळण्यासाठी ही कारणे कितपत तर्कसंगत आहेत आणि संघ परिवारप्रणित विशिष्ट श्रद्धा विद्यार्थी दशेतच मनात रुजविण्याचे राजकारण त्यामागे किती आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
तर्कनिष्ठ विचारसरणी विकसित करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन पायाभूत असतो. विज्ञानातील महत्वाच्या सिद्धांतांचे आकलन शालेय पातळीवर कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय होणे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास अत्यंत आवश्यक आहे. अशा सिद्धांतांच्याबाबतच जर द्विधा मानसिकता निर्माण झाली तर त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या महत्वाकडे दुर्लक्ष होते व विज्ञानवादी चिकित्सक वृत्ती मारली जाते. हेच आजच्या सत्ताधाऱ्यांना हवे आहे. त्यामुळेच गेली नऊ वर्षे सातत्याने विज्ञान विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आजच्या सत्ताधाऱ्याकडून होत आहे. त्यामुळेच एनसीईआरटीच्या या निर्णयाला शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, देशभरातील विवेकवादी संघटना यांनी विरोध केलेला आहे. ब्रेक थ्रू सायन्स सोसायटी यांनी अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा सिद्धांत वगळण्याच्या विरोधात केलेल्या आवाहनाला १८०० शास्त्रज्ञ, विज्ञान शिक्षक यांनी पाठिंबा दिलेला आहे. उत्क्रांतीची प्रक्रिया समजून घेणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून कळीचे आहे आणि विद्यार्थ्यांना या ज्ञानापासून वंचित ठेवणे हे शिक्षणाची कुचेष्टा व विद्यार्थ्यांची फसवणूक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. जगप्रसिद्ध विज्ञान शोधपत्रिका ‘नेचर’ने या संदर्भात जूनच्या अंकात अग्रलेख लिहून उत्क्रांतीसारखे मूलभूत सिद्धांत वगळण्याच्या एनसीईआरटीच्या कृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नुकतेच एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांच्या तज्ञ सल्लागार मंडळातील ३५ सल्लागारांनी आपली नावे सल्लागार समितीतून वगळावी अशी विनंती एनसीईआरटीला केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चला उत्क्रांती समजून घेऊया प्रबोधन अभियान सुरू केले आहे. त्या अभियानाची सुरुवात डॉ. हमीद दाभोलकर यांच्या “उत्क्रांती देव, धर्म आणि अंधश्रद्धा निर्मूलन” या व्याख्यानाने झाली. महाराष्ट्रातील अनेक शाखानी एनसीईआरटीला उत्क्रांतीचा सिद्धांत वगळल्याचा निषेध करणारी व हा सिद्धांत पुनः अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी करणारी पोस्ट कार्डे पाठविली आहेत. हे अभियान आणखी तीव्र व व्यापक करत अभ्यासक्रमातून वगळलेले सिद्धांत पुनः अभ्यासक्रमात समाविष्ट करायला एनसीईआरटीला भाग पाडण्याचे आव्हान आज सर्वच विवेकी विज्ञानवादयापुढे आहे.