-
‘तो तुझ्याकडे हात जोडून येईल, तुला तुझी जमीन परत मिळवून देतो,’ असे सांगून ६५ हजार रुपयांची मागणी करून ६० हजार घेणार्या भोंदूबाबाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी फकिराप्पा ऊर्फ विनायक जनाप्पा शास्त्री-शिंदे (वय ६४ रा. मूळ शहापूर, कर्नाटक) याला अटक केली; तर त्याचा मुलगा प्रसाद शिंदे आणि घर कामगारालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. कोल्हापूर येथील शिवाजी पार्क परिसरातील फ्रेंडस् कॉलनीतील एका भाड्याने घेतलेल्या बंगल्यात त्याचे हे कृत्य उघडकीस आणल्याचे पोलिसांनी सांगितले. बुवाबाजी, जादूटोणा नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले.
अंनिसच्या कार्यकर्त्या गीता हसूरकर आणि सीमा पाटील यांनी सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी एक तरुण व्यवसायात बरकत येण्यासाठी फ्रेंड्स कॉलनीतील विनायक शास्त्री या भोंदूबाबाकडे गेला होता. तेव्हा शास्त्रीने उपाय करण्यासाठी साठ हजार रुपये मागितले होते. मात्र त्याच्याकडे तितके पैसे नसल्याने त्याने सात हजार रुपये दिले; मात्र त्यानंतरही व्यवसायात बरकत आली नाही. त्यामुळे त्याची फसवणूक झाल्याची तक्रार त्याने केली होती. त्याला फिर्याद देण्यासाठी सांगितल्यावर त्याने नकार दिला. त्यामुळे ही वस्तुस्थिती पाहण्यासाठी आम्ही भोंदूबाबाकडे खोटी नावे सांगून गेलो. तेथे कोविड काळात माझ्या दिरांकडून पैसे घेतले आहेत. त्या वेळी त्यांनी जमीन ताब्यात घेतली आहे. आता त्यांचे पैसे दिल्यानंतरही ते जमीन परत देत नाहीत. ती जमीन मिळावी, असे खोटे कारण सांगितले. तेव्हा भोंदूबाबाने उपाय करण्यासाठी ६५ हजार रुपयांची मागणी केली. भोंदूबाबाला पुन्हा संपर्क साधून पैसे कमी करण्यासाठी सांगितले. तेव्हा त्याने ६० हजार रुपये घेतल्यावर उपाय करण्याचे मान्य केले. जमीन परत मिळवून देतो, तो तुझ्याकडे हात जोडून येईल, अघोरी क्रिया करू या, असेही सांगितले. त्यानंतर ही माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिली. त्यांनी पोलिसांना सोबत घेण्यास सांगितले. हे पैसे घेऊन पुढे स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी किरण गवळी, बाळू माळी यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह पोलिसांचे सहकार्य लाभले.
असे झाले स्टिंग ऑपरेशन
‘ठरल्याप्रमाणे पैसे देण्यासाठी हसूरकर आणि पाटील जाताना शाहूपुरी पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल सोबत दिल्या होत्या. तेथे गेल्यानंतर भोंदूबाबाने साठ हजार रुपये घेतले. त्यानंतर गळ्यात बांधायला ताईत दिला. तो गळ्यात अकरा दिवस बांधण्यासाठी सांगितला. एक चंबूसारखी वस्तू देऊन ती शेतात पुरायला सांगितली. पूजा केलेले मंतरलेले यंत्र दिले आणि देवाच्या पाठीमागे ठेवण्यास सांगितले. अंगार्याची पुडी दिली. ती चिमूटभर खा आणि कपाळालाही लावा, त्यामुळे तुमचे टेन्शन कमी होईल. यातून तुम्ही मुक्त व्हाल, असेही सांगितले. तसेच आमची छायाचित्रेही मागितली होती. मात्र आम्ही दिली नाहीत.’ असेही सीमा पाटील आणि गीता हसूरकर यांनी सांगितले.
प्रसिद्ध ज्योतिषीचा फलक
भोंदूबाबा कर्नाटकातील असल्याचे सांगतो. त्याच्याकडे पोलिसांसह जाऊन स्टिंग ऑपरेशन झाल्यानंतर तेथे अनेक चिठ्ठ्या आणि छायाचित्रे मिळाली. त्यामध्ये लग्न न जमणे, तीच मुलगी मिळाली पाहिजे, पदोन्नती व्हावी, व्यवसाय वाढावा, यासह अन्य कारणांच्या चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. गेली चार-पाच महिने पत्नी-मुलांसह तो येथे राहतो. अकरा महिन्यांचा भाडे करार आहे. त्याच्या दारात ‘प्रसिद्ध ज्योतिषी पंडित विनायक शास्त्रीजी आणि मोबाईल क्रमांक’ असा फलक आहे.