देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडलं आहे हे व्यंगचित्र दाखवतं – नागराज मंजुळे

श्रीपाल ललवाणी -

अंनिसच्या ‘विवेकरेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

व्यंगचित्र वास्तव अधिक उजागर करून मांडतं. स्वतःला कुरूप बघणे कोणालाच आवडत नाही, पण तुमच्यात नेमकं काय कमी आहे, हे व्यंगचित्र दाखवतं. देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडलं आहे, हे योग्य आणि बोलक्या रितीने व्यंगचित्रातून मांडलं जातं. त्याला कोणताही फिल्टर नसतो, म्हणून ते प्रभावी ठरतं. व्यक्ती असो वा समाज, त्याला व्यंगचित्राची गरज आहे, असं विधान सुप्रसिद्ध दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे यांनी केलं. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘विवेकरेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, “आम्ही व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रश्न विचारतो. जो कोणी चमत्काराला नमस्कार करतो, त्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कोणी नेता आपण अजैविक असल्याचा दावा करतो, त्यावर आम्ही व्यंगचित्रातून प्रश्न विचारतो.”

सा. मार्मिकचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव हे या व्यंगचित्र प्रदर्शनाचे संयोजक आहेत. त्यांनी आपल्या मनोगतात त्यांचा सनातनी विचारांपासून ते महा. अंनिस पर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगितले. ते म्हणाले, “फुले-शाहू- आंबेडकर ते दाभोलकरांपर्यंतचे विचार हे अंधश्रद्धेविरूद्धची लस आहे, ती फक्त आपल्याला सर्वत्र न्यायची आहे.”

पटकथा लेखक अरविंद जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “हुकूमशाही जेवढी जोरात असते तेवढा विनोद खुलत असतो. व्यंगचित्रकारांच्या कलेबरोबर हिमतीला पण दाद दिली पाहिजे. राजकारणी नेते व व्यंगचित्रकार याचं बोलणं होईल असा काळ पाहिजे”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यंगचित्र स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती, त्या सर्व विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.

रुपाली आर्डे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, मिलिंद देशमुख, संजय मालती कमलाकर, श्रीराम नलावडे, अरविंद पाखले, दीपक गिरमे, गणेश चिंचोले, सौरभ बागडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

व्यंगचित्रांचा उपयोग विवेकवादी चळवळीसाठी- साधनाचे संपादक विनोद शिरसाठ

‘विज्ञान-निर्भयता-नीती’ हे ब्रीदवाक्य घेऊन चालणारी अंनिस संघटना आता ‘विज्ञान-विवेक-विनोद’ या दिशेने पुढे गेली आहे. गौरव सर्जेराव आणि देशभरातील पंचवीस व्यंगचित्रकार यांच्या पुढाकाराने पार पडलेली व्यंगचित्र स्पर्धा व व्यंगचित्र प्रदर्शन हे विवेकवादी चळवळीतील पुढील पाऊल आहे, असे प्रतिपादन ‘साप्ताहिक साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी ५ ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान पुणे येथे पार पडलेल्या विवेकरेषा राज्यस्तरीय व्यंगचित्र प्रदर्शनाचा समारोप करतेवेळी समारंभ अध्यक्ष म्हणून केले. “डॉ. दाभोलकर यांच्या सार्वजनिक जीवनात जेव्हा जेव्हा ते भाषण करायचे किंवा कामाचा भाग म्हणून साधनाचा अंक संपादित करायचे तेव्हा विनोदी लिखाण, विनोदी किस्से याच्यावर त्यांचा नेहमी भर असायचा”, असेही ते पुढे म्हणाले. विनोद शिरसाठ यांनी त्यांच्या भाषणात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे व अलीकडचे लेखक मुकुंद टाकसाळे यांच्या साहित्याचा तसेच प्रसारमाध्यमांत येणार्‍या विनोदी साहित्याचा, लिखाणाचा आढावा घेतला.

“चित्रांत, कलेमध्ये प्रचंड ताकद आहे, ते भाषण देऊन, आंदोलने करण्याइतपत दमदार आहे हे अंनिस चळवळीने ओळखले. त्यामुळेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर अतुल पेठे यांच्या संकल्पनेने गोळीचे उत्तर नाटकाने देण्याचा निर्णय झाला आणि त्यातून रिंगण नाट्याचा उदय झाला. अशा संघटनेने व्यंगचित्र या विचार करायला लावणार्‍या संकल्पनेवर प्रदर्शन आयोजित करून प्रश्न विचारायला लावणारे काम आणखी एकदा जोरकसपणे केले आहे,” असे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक धिवरे यांनी सांगितले. “भावना जेव्हा विचारावर स्वार होते तेव्हा विवेक मरून जातो. त्यामुळे विवेकाला जिवंत ठेवणारे अवघड काम हे व्यंग/ चित्रकलेच्या रेषा सहजपणे करतात. अशा व्यंगचित्रांकडून शिकण्याची संधी यामुळे रसिक नागरिकांना मिळाली. असे अभिनव प्रदर्शन आयोजित करणारे गौरव सर्जेराव सारख्या आणखी कलाकार व्यक्तिमत्त्वे अंनिसने घडवावीत यासाठी सदिच्छा”, असेही ते पुढे म्हणाले.

प्रदर्शनाची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी या प्रकारची प्रदर्शने जिल्ह्याजिल्ह्यात भरवण्याची इच्छा व्यक्त केली. “प्रश्न विचारण्याचे बीज माझ्या मनात डॉ. दाभोलकरांचे एक भाषण ऐकल्यावर रोवले गेले आणि त्यातूनच माझा कलाप्रवास सुरू झाला. शहाणपणात आणि विवेकात काय ताकद असते हे मला या विज्ञानवादी चळवळीचे वाचन केल्यावर जाणवले. प्रत्येकाने आपल्या कामाच्या क्षेत्रात, आवडीच्या क्षेत्रात प्रश्न विचारायला सुरुवात केली तर नकीच आपण सर्व जण विवेकाच्या वाटेवर पुढे जाऊ शकतो”, असेही ते पुढे म्हणाले.

या वेळी प्रदर्शन संकल्पना प्रत्यक्षात आणणारे कलाकार गौरव सर्जेराव, ओंकार बागवे, जयेश दळवी आणि आदित्य उल्हारे यांचा अशोक धिवरे आणि विनोद शिरसाठ यांनी वैचारिक पुस्तके देऊन सत्कार केला. अंनिस ट्रस्टचे दीपक गिरमे, शहराध्यक्ष वसंत कदम, श्रीपाल ललवाणी, राज्य कार्यकारी समिती सदस्य मिलिंद देशमुख, रुपाली आर्डे आणि अनेक रसिक नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. शहर कार्याध्यक्ष अनिल वेल्हाळ यांनी सर्वांचे आभार मानले.

विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर

खुल्या गटात आनंद गायकवाड (संगमनेर) तर लहान गटात हृदय भंडारी (पालघर) प्रथम

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय ‘विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धा’ आयोजित केली होती. यामध्ये खुल्या गटात प्रथम क्रमांक आनंद गायकवाड, (संगमनेर), द्वितीय क्रमांक तुषार दिलीप कुरणे (बेंगलोर), तर तृतीय क्रमांक नीरज सबनीस, (धनकवडी, पुणे) यांना जाहीर झाला आहे.

लहान गटामध्ये प्रथम क्रमांक हृदय मनोज भंडारी, माहीम रोड (पालघर), द्वितीय क्रमांक मानसी दत्तात्रय पाटील (बेडग, ता. मिरज) तर तृतीय क्रमांक आफताब हमीद शेख (करंजे, सातारा) यांना जाहीर झाला आहे.

या स्पर्धेतून प्रदर्शनासाठी दीपक नागलकर, धनराज गरड, नरेंद्र साबळे, प्रशांत कुडकर, सुरेश राऊत, अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्रे निवडली आहेत.

सर्व गटातील स्पर्धकांना व्यंगचित्राचे विषय भुताटकीचा खोटेपणा, बुवाबाजी – एक फसवणूक, अंधश्रद्धा आणि विज्ञान, विवेकी विचार हे दिले होते. दोन्ही वयोगटाकरिता बक्षिसे ही प्रथम पारितोषिक ३,०००, द्वितीय २,०००, तृतीय १,००० अशी आहेत.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ‘साप्ताहिक मार्मिक’चे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव आणि व्यंगचित्रकार उदय मोहिते यांनी काम पाहिले.

श्रीपाल ललवाणी


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]