प्रा. प. रा आर्डे -
व्हॉल्टेअर मानवी स्वातंत्र्याचा मुक्तीदाता. जग हालवून सोडणार्या या महामानवाचा जन्म 1694 मध्ये फ्रान्समध्ये झाला. जन्मत:च कृश आणि दुर्बल, क्षणाक्षणाला मृत्यू आणि जीवन यांच्यात हेलकावे खाणारा व्हॉल्टेअर रडतखडत अल्पकाळ जगला नाही, तर तब्बल 84 वर्षे खणखणीतपणे जगला व चैतन्याने ओसंडलेले, कार्यांनी भारलेले आयुष्य जगून त्याने सबंध जगाला हालवून सोडले. जीवनात सदैव रमलेला व्हॉल्टेअर सतत न थकता, न भीता प्रचंड सामाजिक परिवर्तन करू शकला, याचे आश्चर्य वाटते. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यांच्या अन्यायाविरुद्ध सामान्य माणसाला जागे करून मानवाचे स्वातंत्र्य, समता आणि सहिष्णुता या मूल्यांना युरोपमध्ये कृतिशील समर्थन देणारा व्हॉल्टेअर याचे जीवन सरळमार्गी नव्हते. बंडखोर, दोनवेळा तुरुंगवास पत्करलेला, फ्रान्समधून निर्वासित होऊन बाहेरच्या देशात जावे लागलेला कवी, नाटककार, इतिहासकार, तत्त्वज्ञानी असा हा कलंदर ध्येयवेडा माणूस.
जीवनपट
व्हॉल्टेअरचा जन्म एका मध्यमवर्गीय खानदानी घराण्यात झाला. त्याचे वडील वकील होते आणि आई ही सुद्धा एका वकिलाची कन्या होती. व्हॉल्टेअरला दोन भावंडे. एक थोरला आणि एक आवडती बहीण. व्हॉल्टेअरचं मूळ नाव फ्रान्सुआ मारी आरूपु. आरूपु सात वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. त्याच्या आईची संवेदनशीलता, कल्पकता आणि विनोदबुद्धी आरुपुला लाभली होती.
वयाच्या दहाव्या वर्षी आरूपुला जेझुईट या धार्मिक शिक्षण देणार्या शाळेत घालवण्यात आले. पुढे आरुपु; अर्थात व्हॉल्टेअर याने धार्मिक विचारांचा उपहास केला; पण या शाळेत त्याच्या एका शिक्षकांनी त्याला साहित्याची गोडी लावण्याचे ऋण तो मान्य करी. आरुपुने वयाच्या 17 व्या वर्षी कॉलेज सोडले.
आरुपुला साहित्यिक व्हावयाचे होते, कलावंत बनावयाचे होते; पण त्याच्या वडिलांचा याला विरोध होता. साहित्यिकाला आनंद मिळत असेल; पण पैसा मिळत नाही, दरिद्री राहावे लागते. म्हणून त्याच्या वडिलांनी आरुपुनं वकील व्हावे असा प्रयत्न केला; पण आरूपुनं साहित्याचीच वाट धरली. त्यासाठी त्याने आपले नावही बदलले आणि तो स्वत:ला ‘द व्हॉल्टेअर’ म्हणवून घेऊ लागला. नाव बदलण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याच्या लिखाणाला धर्मसत्तेकडून आणि राजसत्तेकडून होणारा विरोध. वयाच्या विशीपासूनच त्याने कविता आणि नाटके लिहायला सुरुवात केली. त्यावेळचा फ्रान्सचा राजा चौदावा लुई याची गरिबांना छळणारी राजवट त्याला पसंत नव्हती. ‘व्हॉल्टेअर’ या नावाने तो कविता, चुटके आणि नाटके याद्वारे त्यावेळच्या राजकारणावर व धर्मसत्तेवर उपहासात्मक टीका करी. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी व्हॉल्टेअरने इदिप (Oediepe) हे शोकात्म नाटक लिहिले. त्याचे प्रयोग रंगभूमीवर सतत 45 दिवस चालू राहिले.
तुरुंगवास
ऐन तारुण्यात लिहिलेल्या एका कवितेमुळे व्हॉल्टेअरला तुरुंगवास पत्करावा लागला. राजघराण्याशी संबंधित एका उमरावावर त्याच्या मुलीशी अनैतिक संबंध आहेत, अशी सूचकता त्या कवितेत होती. त्यामुळे सत्ताधारी नाराज होऊन त्यांनी या कृत्याबद्दल व्हॉल्टेअरला एक वर्षभर तुरुंगवासाची शिक्षा दिली. बेस्टिलीच्या तुरुंगात असताना आपल्याला शांतपणे विचार करायला संधी मिळाली, अशी त्याने भूमिका घेतली. एका अमीर उमरावाने भांडणात व्हॉल्टेअरला अपमानित करून मारहाण केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याचा बदला घेण्यासाठी द्वंद्वयुद्ध खेळण्याची तयारी व्हॉल्टेअर करीत आहे, हे कानावर येताच सत्ताधार्यांनी त्याला परत तुरुंगात टाकण्याची तयारी केली. हे कानावर येताच तुरुंगवास नको म्हणून व्हॉल्टेअर इंग्लंडला अज्ञातवासात गेला आणि तेथे तो तीन वर्षे राहिला.
हद्दपारी हीच संधी
इंग्लंडमधील त्याच्या वास्तव्यात त्याने काव्य, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान आदी इंग्लिश साहित्य सखोलपणे वाचले. तिथल्या अनेक साहित्यिकांशी त्याची मैत्री जुळली. इंग्लंड त्याला विशेष आवडले. याचे कारण तेथे विचार आणि संशोधन याला पूर्ण स्वातंत्र्य होते, वैज्ञानिक संशोधनाला वाव होता. न्यूटनप्रणित विज्ञानामुळे बुद्धिवादी दृष्टीनं जगाकडे पाहण्याची वृत्ती भौतिक समृद्धीला उत्कर्ष देणारी ठरली. एकूणच, जीवनातील सर्व क्षेत्रांत मोकळे आणि उत्तेजक वातावरण इंग्लंडमध्ये त्याने अनुभवले. याच काळात न्यूटनचा प्रख्यात ग्रंथ ‘प्रिन्सीपिया मॅथामॅटिका’ जेव्हा त्याच्या हाती आला, तेव्हा त्याने त्या ग्रंथासमोर गुडघे टेकत आदरभाव व्यक्त केला. त्याच्या मते, एकमेव सत्य सांगणारा ग्रंथ म्हणजे ‘प्रिन्सीपिया मॅथामॅटिका.’ न्यूटनच्या संदर्भात तो म्हणे- “हिंसेच्या बळापेक्षा सत्याचे सामर्थ्य जो आपल्याला दाखवून देतो, तो आदरणीय ठरतो. न्यूटन हा असा होता.” न्यूटनचं विज्ञान फ्रान्समध्ये लोकप्रिय करण्यात व्हॉल्टेअरचा सिंहाचा वाटा होता. सफरचंदाचं फळ खाली पडताना पाहून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कसा सुचला, यावरचा किस्सा त्यानेच फ्रान्समध्ये लोकप्रिय केला.
पुन्हा वनवास…
संघटित ख्रिस्ती धर्म आणि फ्रान्समधील न्यायव्यवस्था याचा उपहास करणारं विविध प्रकारचं साहित्य ‘व्हॉल्टेअर’ या टोपणनावाने तो प्रसिद्ध करी. एच. जे. कॅलस या गृहस्थाला आपल्या मुलाच्या खुनाबद्दल (ज्याबद्दल पुरेसा पुरावा उपलब्ध नव्हता) त्याचा छळ करून व चाकाला बांधून देहांताची शिक्षा देण्यात आली. या शिक्षेच्या विरोधात व्हॉल्टेअरने पत्ररुपाने आणि साहित्यातून टीकेची झोड उठवली. अशा क्रूर आणि धर्मांध न्यायव्यवस्थेच्या विरोधात व्हॉल्टेअर आपल्या साहित्यातून जोरदार टीका करत होता. परिणामी फ्रान्स सरकारकडून त्याच्या ग्रंथांवर बंदी घालण्यात आली. त्याची काही पुस्तके सत्ताधार्यांकडून जाळण्यात आली. यावरचा उपाय म्हणून व्हॉल्टेअर आपली पुस्तके परदेशात छापून घेई आणि ती टोपणनावाने प्रसिद्ध करी. ‘लेटर्स कन्सर्निंग द इंग्लिश नेशन’ हा ग्रंथ त्याने 1734 मध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथावर आक्षेप घेऊन फ्रेंच सत्ताधार्यांनी त्याला पळून जाण्यास भाग पाडले. आक्षेप घेण्याचे कारण म्हणजे इंग्लंडमधील न्यायव्यवस्था आणि युद्धविरोधी भूमिका याची त्याने केलेली स्तुती व राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्यात झालेली फारकत फ्रान्सच्या त्यावेळच्या राजसत्तेला ही आपल्यावरील टीका वाटली. म्हणून त्यांनी व्हॉल्टेअरला अटक करण्याचे वॉरंट काढले; पण व्हॉल्टेअरने फ्रान्समधीलच सिरे येथे गुप्तपणे प्रयाण केले आणि तेथेच जवळजवळ 16 वर्षे आपल्या प्रिय मैत्रिणीच्या सहवासात तो वैचारिक साहित्याच्या निर्मितीत रममाण झाला. त्याच्या मैत्रिणीचे नाव मादाम एमिली शाटले. एमिली अत्यंत बुद्धिमान, कष्टाळू आणि अभ्यासू वृत्तीची होती. ती विज्ञानप्रेमी आणि उत्कट भावनाप्रधान स्त्री होती. एमिली व व्हॉल्टेअर हे सोळा वर्षे एकमेकांवर निष्ठेने प्रेम करून एकत्र राहिले. त्यांनी विज्ञान, इतिहास यावर एकत्र संशोधन केले. व्हॉल्टेअरने सिरे येथील वास्तव्यात मेरोप (Merope) व माहोमेद (Mahomed) ही शोकात्म नाटके लिहिली. एमिलीने मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर न्यूटनवरील तिचा ग्रंथ लिहून पुरा केला. 1733 ते 1749 अशी सोळा वर्षे व्हॉल्टेअर आणि एमिली यांनी निष्ठेने एकत्र कार्य केले. तिच्या मृत्यूने व्याकुळ झालेला व्हॉल्टेअर अत्यंत दु:खी झाला.
यानंतर पर्शियाचा युवराज ‘फ्रेडारेक द ग्रेट’ याच्याशी व्हॉल्टेअरची मैत्री झाली. त्याच्या निमंत्रणावरून व्हॉल्टेअर त्याचा पाहुणा म्हणून पॉट्सडॅम येथे राहिला. तेथे त्याने इतिहासावर एक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. त्या काळातील गंभीर राजकीय समस्यांचे; तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचे चित्रण त्यात त्याने केले आहे. राजे-रजवाडे आणि युद्धे यामध्ये इतिहासाला सीमित करण्यापेक्षा समाज, मानवी मन आणि संस्कृती यांच्या अभ्यासाला त्याने महत्त्व दिले. त्याच्या मते, इतिहास ही रानटी अवस्थेकडून संस्कृतीकडे झालेल्या वाटचालीची कहाणी होय. राजे-रजवाड्यांना इतिहासातून हद्दपार करण्याची कृती या ग्रंथामुळे गतिमान झाली. फ्रेडरिकशी संबंध बिघडल्याने 1753 मध्ये व्हॉल्टेअर पर्शियातून फ्रान्सला-जीनिव्हाला परतला; परंतु तिथेही त्याला विरोध होऊ लागल्याने अखेरीस तो स्वित्झर्लंडच्या सीमेजवळ फेर्ने या गावी स्थायिक झाला.
फेर्ने येथील आयुष्याची अखेरची वीस वर्षे त्याने एखाद्या राजासारखी घालवली. लिखाणातून आणि इतर मार्गाने मिळालेल्या प्रचंड संपत्तीतून त्याने फेर्ने येथे प्रचंड घर आणि मोठी जमीन विकत घेतली. निसर्गसान्निध्यात त्याच्या चित्तवृत्तीला बहर आला. त्या प्रदीर्घ जीवनात सुखसंपन्नतेत आणि साहित्यनिर्मिती यात त्याचा काळ आनंदात गेला. फेर्ने येथे धार्मिक मतांवर हल्ले करणारा, असत्य, जुलूमशाही आणि दडपशाही यांच्या विरोधात तो साहित्यनिर्मिती करीत राहिला.
फेर्ने येथील वास्तव्यात व्हॉल्टेअरच्या प्रतिभेला बहर आला. तेथेच त्याने आपले कांदीद (Candide) हे प्रख्यात विडंबन काव्य लिहिले. येथील वास्तव्यातच व्हॉल्टेअरने ज्ञानकोश तयार करण्याची योजना हाती घेतली. दिदेरो (didero) आणि डी. अल्बर्ट यांचे सहकार्य त्याने घेतले. निसर्गविज्ञान, तंत्रविज्ञान; त्याचबरोबर अंधश्रद्धा, सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणा, नवे पुरोगामी कायदे, विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य अशा विविध विषयांवरचे लेख या ज्ञानकोशात समाविष्ट केले आहेत.
पॅरिसकडे प्रयाण
वाढत्या वयाबरोबर फेर्ने सोडून पुन्हा पॅरिसला जावे, असे व्हॉल्टेअरला वाटू लागले. त्यावेळी त्याचे वय झाले होते 83 वर्षे. याचवेळी त्याने ईरन (खीशपश) ही शोकात्मिका लिहायला घेतली. बंदी उठवलेली नसताना त्याने पॅरिसला जायचा निश्चय केला. फेब्रुवारी 1778 मध्ये तो आपलं नवं नाटक घेऊन पॅरिसला निघाला. वाटेत लोकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले. दत्तककन्या बेल-ए-बॉन हिच्याकडे पॅरिसमध्ये त्याने मुक्काम केला. तेथे त्याला भेटायला प्रचंड संख्येने पॅरिसवासीय येऊ लागले. ज्या फ्रेंच साहित्य अकादमीने आयुष्यभर त्याचा उपहास केला होता. त्याच संस्थेने त्याची साहित्यसेवा आणि लोकप्रियता यापुढे झुकून त्याला अकादमीचे सभासदत्व बहाल केले. हा समारंभ ज्या रंगमंदिरात होणार होता, तिकडे जाण्यासाठी व्हॉल्टेअर निघाला, तेव्हा रस्त्यात त्याचे दर्शन घेण्यासाठी लोकांची झुंबड उडे. त्याचा सर्वत्र जयजयकार सुरू होता. मोठमोठ्या योद्ध्यांनाही कधी मिळाला नसेल, एवढा मान फ्रान्समध्ये एका साहित्यिकाला मिळत होता. त्याचा गौरव आणि सत्कार म्हणजे ज्या राजसत्तेने त्याला हद्दपार केले होते, तिचा धिक्कार अशीच सर्वसामान्यांची भावना होती. रंगमंदिरात सुप्रसिद्ध टोप घातलेल्या वेशात जेव्हा अकादमीने त्याचा सत्कार केला, तेव्हा 20 मिनिटे आनंदाने बेभान होऊन श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट चालू ठेवला.
जगाचा निरोप
पॅरिसमध्ये झालेल्या स्वागताने व्हॉल्टेअर भारावून गेला. त्याच्यात नवीन उत्साह संचारला आणि त्याने फ्रेंच भाषेचा शब्दकोश तयार करण्याची योजना त्याने सुरू केली. त्यासाठीचे मनोगत लिहिण्यासाठी तो रात्र-रात्र जागा राही, सतत कॉफी पिऊन लिखाण करत राही. परिणामी झोप उडाली; मग झोपेसाठी अतिप्रमाणात गुंगीचं औषध आणि त्यामुळे मनावरचा ताबा उडू लागला. तो निपचित पडून राहिला.
1778 मध्ये पॅरिसमध्ये व्हॉल्टेअरचे निधन झाले. त्याच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर कॅथालिक चर्चचे धर्मगुरू त्याला पुन्हा-पुन्हा भेटत होते. या भेटीचा उद्देश त्याने आपली धर्मविषयक मते परत घ्यावीत आणि कॅथालिक धर्मानुसार पापमुक्ती स्वीकारावी असा होता. व्हॉल्टेअर हा देववादी (deist) असला, तरी संघटित ख्रिस्ती धर्माचा तो कठोर टीकाकार होता. धर्मगुरूंच्या विनंतीने देखील हा महान लेखक आपल्या मतांवर ठाम राहिला. धर्मगुरूंना उद्देशून तो एवढंच म्हणाला, ‘मला शांतपणे मरू द्या.’ त्याचा हा नकार म्हणजे धार्मिक रिवाजानुसार दफनाला नकार. पण त्याच्या मित्राने आणि नातेवाईकाने मध्यस्थी केल्यामुळे त्याचे दफन ख्रिस्ती दफनभूमीत करण्यात आले.
व्हॉल्टेअरचा विवेकवाद
व्हॉल्टेअर तांत्रिक अर्थाने जरी तत्त्वज्ञानी नव्हता, तरी त्याने फ्रान्सला आणि त्यानंतर जगाला एक नवा विचार दिला. तो म्हणजे मानवाचे विचार आणि आचरण आणि स्वातंत्र्य याचा स्वीकार आणि राजसत्ता आणि धर्मसत्ता यांना विरोध. आपल्या ललित आणि वैचारिक साहित्याने जन्मभर झगडत राहून तो लोकांच्या गळ्यातील ताईत बनला. हयातभर त्याने अंधश्रद्धा व धार्मिक दडपशाही यांच्यावर कडाडून हल्ले चढवले. त्याच्या मते, धर्मगुरू लोकांचा मूर्खपणा, भोळेपणा आणि भाबडी श्रद्धा यांचा गैरफायदा घेऊन धर्माचा उपयोग स्वत:चे वर्चस्व व सत्ता टिकवून ठेवण्यासाठी घेतात. व्हॉल्टेअर विविध प्रकारच्या दडपशाहीच्या विरोधात स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असला, तरी तो लोकशाहीचा मात्र प्रेमी नव्हता.
व्हॉल्टेअर देव मानणारा होता. देव मानण्याचे दोन प्रकार म्हणजे Theist आणि Deist. Theist म्हणजे माणसांप्रमाणेच; पण माणसापेक्षा सर्व शक्तिमान असा देव, जो मानवी व्यवहारात आणि निसर्गात हस्तक्षेप करतो. पापाला शिक्षा करणारा तो हाच देव. विविध धर्मांचे संस्थापक देव म्हणजे Theist. लोक ज्याला मानतात तो देव; पण Deist हा असा देव नाही. Deist लोकांचा देव, म्हणजे निसर्ग आणि त्याचे नियम. तो व्यक्तिरूप नाही, तर चराचरांत निसर्गाच्या नियमातून व्यक्त होणारी शक्ती. हा देव मानवी व्यवहारांबाबत किंवा निसर्गाच्या नियमात हस्तक्षेप करण्याबाबत तटस्थ असतो.
व्हॉल्टेअर हा Deist होता. लोकांच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप करणारा, दुष्टपणाला शिक्षा करणारा, भक्तांचे रक्षण करणारा, सर्वज्ञ, सर्वनियंत्रक व दयाळू (सर्वमंगल) असा देव ही कल्पना व्हॉल्टेअरला अमान्य होती. देव एकच आहे आणि तो, त्याने एकदाच निर्माण केलेल्या सृष्टीत ढवळाढवळ करीत नाही, अशी त्याची कल्पना होती. व्हॉल्टेअर संघटित ख्रिस्ती धर्माचा ख्रिश्चन देव मानत नव्हता. मध्य युरोपात 17 व्या शतकात लढल्या गेलेल्या धर्मयुद्धांना ‘थर्टी इयर्स वॉर’ असे म्हटले जाते. ही युद्धे 1618 ते 1648 या काळात लढली गेली. प्रतिस्पर्धी होते कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट पंथाचे राजे आणि त्यांचे सैनिक. या युद्धात अंदाजे चार लक्ष पन्नास हजार लोक मारले गेले. युद्धानंतरच्या रोगराईत आणि दुष्काळामुळे यात आणखी भर पडली. खरंतर जगात शांतता नांदावी म्हणून धर्माची निर्मिती झाली; पण एकाच धर्मातील दोन गट परस्परांविरुद्ध लढले, म्हणजे धर्म हा माणसांना तारण्यासाठी की मारण्यासाठी, असा विचार व्हॉल्टेअरने केला असावा.
लॉकचा प्रभाव
लॉक हा इंग्लिश तत्त्वज्ञ आणि व्यवसायाने डॉक्टर. युरोपमध्ये बुद्धिप्रामाण्यवादाच्या विचारसरणीवर प्रभाव पाडणारा असा हा तत्त्वचिंतक होता. लॉकला उदारमतवादाचा जनक असे संबोधले जाते. राजा हा देवाचा प्रतिनिधी आहे, या विचाराचा लॉकने प्रतिवाद केला. त्याच्या मते, समाजातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा, स्वातंत्र्यांचा आणि संपत्तीचा हक्क आहे. हा हक्क जो राजा मान्य करणार नाही, त्याला गादीवरून दूर केलं पाहिजे, असा विचार त्यानं मांडला. लॉकच्या या तत्त्वज्ञानाचा व्हॉल्टेअरवर प्रभाव होता.
लेबनिझच्या तत्त्वज्ञानाला विरोध
लेबनिझ हा जर्मन तत्त्वज्ञ गणिती आणि वैज्ञानिक होता. श्रद्धेने नव्हे, तर बुद्धिवादाने देवाचे अस्तित्व सिद्ध करता येते, असा त्याचा विचार होता. लेबनिझचा देव सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वदयावान होता. अशा देवाने हे सध्याचं जग निर्माण केलं. यापेक्षा वेगळं जग त्याला निर्माण करता आलं असतं; पण त्याने हेच जग निर्माण केलं. कारण असं सगळ्यात ‘आदर्श जग’ त्याला निर्माण करायचं होतं. सध्याचं जग ही देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे, या लेबनिझच्या तत्त्वज्ञानाला ‘लेब्झियम ऑप्टिमिझम’ असे नाव आहे. आधुनिक विचारसरणीनुसार बुद्धिप्रामाण्याला लेबनिझची ही विचारसरणी मान्य नव्हती. ‘देव सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि दयाळू असेल, तर जगात एवढा अनाचार आणि दु:ख का,’ या विचाराचा व्हॉल्टेअरवर प्रभाव होता. त्याने आपल्या Candide या प्रसिद्ध कादंबरीत लेबनिझच्या ऑप्टीमिझमवर उपरोधिक युक्तिवाद केला आहे. ‘जगातील दुष्टता ही देवनिर्मित नसून ती मानवी प्रयत्नांनी दूर करता येते,’ या विचासरणीतूनच व्हॉल्टेअरने अमीर-उमराव आणि धर्मगुरू यांच्या जुलमाविरुद्ध संघर्ष केला.
फेर्ने येथील आपल्या वास्तव्यात त्याने, आपण स्वत:पासूनच जगातील दु:ख कमी करून जग सुंदर करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी प्रयोग केले. तेथे त्याने सुंदर वसाहत वसविली, झाडांची वने लावली, रस्ते तयार केले व गरीब शेतकर्यांना सुखी करण्यासाठी अनेक योजना कार्यवाहीत आणल्या.
समारोप
सामाजिक परिवर्तनासाठी व्हॉल्टेअरने जे जीवाचे रान केले, त्याचा मुख्य उगम होता, त्याचे मानवतावादी साहित्य. साहित्य हे केवळ लिहिण्यासाठी नाही, तर त्यातून लोकांना प्रेरणा मिळावी आणि अन्यायाच्या विरोधात लोक उभे राहावेत, या प्रबळ इच्छेने व्हॉल्टेअरने आपल्या साहित्याचा प्रसारही मोठ्या जोमाने केला. फ्रान्समध्ये बुद्धिवादी विचारसरणीस नुकताच आरंभ झाला होता. एमिली झोला ते जीन-पॉल सार्त्र हे फ्रान्समधील बुद्धिप्रामाण्यवादी अगोदरच्या बुद्धिवादी प्रबोधनातूनच निर्माण झाले. आधुनिक लोकशाहीप्रधान फ्रान्सच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारा सांस्कृतिक हिरो, बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कर्ता आणि धार्मिक सहिष्णुतेचा रक्षणकर्ता या नात्याने व्हॉल्टेअर बुद्धिप्रामाण्यवादी जगात कायमचा स्मरणात राहील. फ्रान्समध्ये पुढे झालेल्या क्रांतीचा हिरो जुन्या व्यवस्थेतील धार्मिक आणि राजकीय अनाचार यांच्या विरोधात जनसामान्यांना प्रबोधित करणारा म्हणून व्हॉल्टेअरकडे जग आदराने पाहते. विल ड्युरंट या प्रख्यात इतिहासकाराने म्हटले आहे की, इटलीला ‘नवजीवन’ लाभले होते, जर्मनीला सुधारणा लाभली होती; पण फ्रान्सला व्हॉल्टेअर लाभला होता. आमच्या मते केवळ फ्रान्सलाच नाही, तर व्हॉल्टेअर हा स्वातंत्र्याचा उद्घोष करणारा भविष्यकालीन जगाचा हिरो होता.