कोरोना आपत्कालीन स्थितीत ‘अंनिस’चे ‘मानसमित्र’ देताहेत मानसिक आधार!

डॉ. प्रदीप जोशी - 9422603390

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘मानसमित्र’ हा प्रकल्प गेली सुमारे दहा वर्षे राबवत आहे. कोरोना महामारीच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अशी ‘मानसमित्रां’ची फळी उभी केलेली आहे. आमच्या सुमारे 80 कार्यकर्त्यांनी या कामासाठी उत्साह दाखविला आहे. या सर्वांचे आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण घेतले आहे. या सर्वांना महासंकटाचे मानसिक दुष्परिणाम काय होतात, अशा लोकांची मन:स्थिती कायकाय होऊ शकते, ती कशी ओळखावी, त्यांना धीर कसा द्यावा, अफवा आणि वास्तव यांची त्यांना जाण कशी करून द्यावी, अधिक गंभीर आजार कसे ओळखावेत, त्यांना योग्य मदतीसाठी मार्गदर्शन कसे करावे, याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले.

कोरोनाच्या कहराने संपूर्ण जगच हादरले आहे. या पिढीतील कोणीही एवढे मोठे सार्वजनिक संकट बघितलेले नसावे; निदान जाणत्या वयात तरी. अशा वेळी कोरोनामुळे येणारे शारीरिक आजाराचे संकट आणि कोरोना टाळण्यासाठी घ्याव्या लागणार्‍या खबरदारीचे उपाय, या दोन्ही गोष्टी लोकांच्या मनावर विपरीत परिणाम करीत आहेत. उद्याविषयीची अनिश्चितता, माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आलेली अनेक बंधने, आर्थिक ताण समाजात दिसत आहे. कोरोनाच्या महामारीचे हे एक महासंकट आहे; म्हणजे ज्याला डिझास्टर म्हणतात तसे.

अशा प्रसंगी केवळ शारीरिक मदत पुरेशी पडत नाही. शारीरिक काळजी घेणे तर आवश्यक आहेच; पण ते पुरेसे नाही. कारण खचलेल्या मनाला उभारी देण्याचे काम कोणाला तरी करावे लागणार असते. मन खंबीर असेल, तर या संकटाला यशस्वीपणे तोंड देण्याची ताकद समाजात निर्माण करावी लागते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘मानसमित्र’ हा प्रकल्प गेली सुमारे दहा वर्षे राबवत आहे. याचा उद्देश समाजात मानसिक आजारांविषयी जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा व गैरसमज आहेत, ते दूर करण्याचे कार्य करणार्‍या स्वयंसेवकांची फळी निर्माण करणे हा आहे. या माध्यमातून आम्ही असे अनेक ‘मानसमित्र’ कार्यकर्ते आणि संघटनेतील मानसोपचार तज्ज्ञांच्या सहाय्याने तयार केले आहे. याचेच एक ठळक उदाहरण म्हणजे चाळीसगाव येथे उभी राहिलेली ‘मानसमित्रां’ची फळी. या ‘मानसमित्रां’चे आम्ही 12 ते 15 सेशन्समध्ये प्रशिक्षण घेतले. मानसिक आजार कसे ओळखावेत, प्राथमिक स्तरावर ते कसे हाताळावेत, बुवाबाजीकडे न जाता योग्य उपचारांकडे त्यांनी कसे वळावे, याबरोबरच उपचार चालू असताना आणि नंतरही पेशंट व नातेवाईकांना कसा आधार द्यावा, याचे त्यांना प्रशिक्षण दिले. यातूनच चाळीसगाव येथील बामोई बाबाच्या दर्ग्यावर अंधश्रद्धांमुळे येणार्‍या अनेक मनोरुग्णांना मोफत तपासणी आणि उपचार करण्यासाठी ‘डॉ. दाभोलकर मानसिक आधार केंद्र’ आम्ही गेली सात वर्षे चालवीत आहोत. त्यातून अनेक मनोरुग्ण अंधश्रद्धांच्या अघोरी संकटातून मोकळे झाले आहेत.

तशाच प्रकारे या महामारीच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अशी ‘मानसमित्रां’ची फळी उभी केलेली आहे. आमच्या सुमारे 80 कार्यकर्त्यांनी या कामासाठी उत्साह दाखविला आहे. या सर्वांचे आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण घेतले आहे. या सर्वांना महासंकटाचे मानसिक दुष्परिणाम काय होतात, अशा लोकांची मन:स्थिती काय-काय होऊ शकते, ती कशी ओळखावी, त्यांना धीर कसा द्यावा, अफवा आणि वास्तव यांची त्यांना जाण कशी करून द्यावी, अधिक गंभीर आजार कसे ओळखावेत, त्यांना योग्य मदतीसाठी मार्गदर्शन कसे करावे, याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले.

एकूण 80 कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षणात भाग घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून या कार्यकर्त्यांचे आम्ही पाच विभाग केले आहेत. मुंबई व परिसर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व खानदेश. प्रत्येक गटात साधारण दहा ते वीस ‘मानसमित्रां’चा सहभाग होता. या प्रत्येक गटाचा एक प्रमुख नेमण्यात आला आणि त्या सर्वांना मिळून मानसोपचारांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. सोबत काही स्थानिक डॉक्टर आणि मनोविकारतज्ज्ञांचेही सहकार्य घेण्यात आले. या सर्व ‘मानसमित्रां’चे अनुभव चांगले आहेत. अनेक मानसिक आजार असलेल्या लोकांचे त्यांना फोन येऊ लागले. गोपनीयतेचे त्यांना आश्वासन देण्यात आले होते. स्वत:ची ओळख द्यायची असेल तर द्या, नाहीतर नका देऊ, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे सर्वचजण अतिशय मोकळेपणे बोलत होते. अनेक वयस्क मंडळींमध्ये चिंतेचे वातावरण दिसले. वयस्करांना असा हा आजार झाल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त असते, अशा बातम्यांमुळे ते घाबरलेले होते. काहींची मुले परदेशात किंवा दुसर्‍या गावात अडकलेली होती. त्यांच्या काळजीचे निराकरण करण्यात आमचे मित्र यशस्वी झाले. काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनिश्चिततेने, काही जणांत घरातच राहावे लागल्याने वेळ कसा घालवावा, याचे मार्गदर्शन करावे लागले. काही फोन तर असे होते की, नवरा-बायको, मुले 24 तास घरात असल्याने आपापसांंत खटके उडण्याचे प्रमाण वाढले होते. तिथे संपूर्ण कुटुंबाशी बोलून मार्गदर्शन करता आले. काही जणांना आधीचा मानसिक आजार होता. त्याची लक्षणे या ताणामुळे वाढली होती. त्यांना योग्य मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणी करवून घेण्याचा सल्ला देण्यात आला. कोणतेही सामाजिक काम करताना काही विकृत लोकांकडून वाईट अनुभव येतातच. तसा एखादा अनुभव आलाही; पण अशावेळी सर्व संघटना एकत्रित येऊन पोलीस आणि सायबर गुन्हे शाखेच्या सहाय्याने अशा वितुष्टांचा बंदोबस्तही करण्यात आला. एकूण सर्व 80 ‘मानसमित्रां’चा अनुभव अतिशय चांगला आहे. त्यांचे काम जोमाने चालू आहे. यातूनच पुढे वेगवेगळ्या प्रकारे हा ‘मानसमित्र’ प्रकल्प अधिक प्रगत स्वरुपात विकसित करण्याचा आमचा निर्धार आहे. मानसिकतेविषयी समाजात असलेले अज्ञान, अंधश्रद्धा आणि तुटपुंजे मानसिक स्वास्थ्य याला ते चांगले उत्तर आहे, असे आम्हाला वाटते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस विनायक सावळे म्हणाले, साधारण दिवसाला 40 कॉल्स येत आहेत. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून सर्वाधिक कॉल्स येत आहेत. यात तरुण व ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे. तसेच महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या कॉल्सचे प्रमाण जास्त आहे. यात तरुणांमध्ये प्रेमसंबंधांमुळे येणारे नैराश्य-चिंता अशा तक्रारी आहेत, तर वृद्धांमध्ये मुलांची चिंतेची समस्या अधिक भेडसावत असल्याचे दिसून आले आहे. स्थलांतरित विद्यार्थ्यांनीही या हेल्पलाईनवर कॉल्स केले असून यांच्यातील काही जणांचे घर-पालक बिहार, मध्य प्रदेशामध्ये आहेत. कोरोनामुळे शिक्षण-रोजगार सर्वच थांबल्याने हे विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यांच्याशी ‘मानसमित्रा’नी संवाद साधून समजूत काढून मनमोकळा संवाद साधला आहे. याखेरीज, परराज्यांतून म्हणजे सूरत, दिल्लीतून काही महिलांचे कॉल्स आले असून, त्यांनी या सर्व परिस्थितीमुळे भीती वाटत असल्याचे सांगितले आहे. आपण उपचार करत नाही, मात्र आधार मागणार्‍या प्रत्येकांसाठी खंबीरपणे उभे राहतो. त्याचं ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे सावळे यांनी सांगितले.

एका ज्येष्ठ नागरिकाला दिलासा ः नातवापासून ताटातूट झाल्याने नैराश्य आलेल्या पुणे येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा हेल्पलाईनवर कॉल आला होता. त्यांनी सांगितले, कोरोनामुळे त्यांच्या मुलाने नातवापासून दूर लोटल्यामुळे एकटेपणा वाढत आहे. यातून नैराश्य येण्याची भीती आहे. सध्या पुण्यातील घरात एकटेच राहत असल्याने ही एकटेपणाची भीती दिवसागणिक वाढतेय. यानंतर ‘मानसमित्रा’ने त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना आधार दिला. ‘कापूस पडून आहे, करू काय?’ ही व्यथा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील हवालदिल शेतकर्‍याने हेल्पलाईनवर कॉल करून सांगितली, ‘कापसाचा शेतमाल घरात पडून आहे. या कोरोनामुळे शेतमालाचं नुकसान व्हतंय, घाम गाळून जमीन कसलीय, आता काय करू, इतका शेतमाल घरात पडून आहे. अर्ध्या शेतमालाचं रानडुकरांनी नुकसान केलंय. आम्ही जगावं कसं, न्याय कुणाकडे मागावा,’ या शब्दांत व्यथा सांगितल्याने या बळीराजाला धीर देण्यात आला. त्याच्याशी रोज काही वेळ संवाद साधून त्याची चिंता कमी करण्याचा प्रयत्न केला.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ]