डॉ. प्रसन्न दाभोलकर -
सर वर्गात येऊन बसले. पण कोणी काही बोलेना. शेवटी आमचा मॉनिटर सर्वेश उभा राहून म्हणाला, “सर, आम्हाला कल्पना आहे, हे तुम्हाला आवडणार नाही. पण आमची विनंती आहे.” आणि तो गप्प उभा राहिला.
देशमुख सरांनी विचारले, “मोकळेपणाने सांगा. कुणाला आवडणार नाही म्हणून आपण बोललोच नाही असं नाही करायचं. तुमची विनंती मला आवडली नाही तर मी तसं तुम्हाला सांगेन.”
यावर मेधा धीर करून म्हणाली, “सर, पुढच्या वर्षी दहावी. त्यानंतरची दोन वर्षे वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामच्या तयारीत जाणार. एकाग्रता आणि स्मरणशती कशी वाढवायची, अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे.”
किंचित हसून सर म्हणाले, “हे मार्गदर्शन मी तुम्हाला करणार नाही, हा तुमचा अंदाज बरोबर आहे. परंतु एकाग्रतेबद्दल मी थोडे सांगेन. ‘एकाग्रता होत नाही’ अशी बहुसंख्य मुलांची तक्रार असते. मला सांगा, गोष्टी ऐकताना, सिनेमा बघताना, मित्रांबरोबर गप्पा मारताना कोणाचं लक्ष एकाग्र होत नाही?”
वर्गातून एकही हात वर झाला नाही. सर म्हणाले, “आता तुमच्या लक्षात आलं असेल. तुमच्यापैकी प्रत्येकात भरपूर एकाग्रता आहे. अभ्यासात लक्ष एकाग्र होत नाही ही अडचण असते. ज्या गोष्टीत आपल्याला रस असतो त्याच्यात आपले मन सहज एकाग्र होते.”
“सर, त्यासाठी अभ्यासात गोडी निर्माण झाली पाहिजे. पण अभ्यासात रस वाटत नाही हीच तर अडचण आहे.” विक्रमने मोकळेपणाने आपली अडचण मांडली.
“छान विक्रम.” सर कौतुकाने म्हणाले. “अभ्यासातील रस काही प्रमाणात आपल्या आवडीवर अवलंबून असतो पण मुख्यतः आपण विषय नीट समजावून घेणे त्यासाठी आवश्यक असते. जी गोष्ट आपल्याला नीट समजते त्याच्यात हळूहळू आपला रस निर्माण होत जातो. त्यामुळे न आवडणार्या विषयाबाबत मित्रांची, सरांशी, घरच्यांशी सतत बोलत रहा. एखादी गोष्ट नीट समजल्याशिवाय तिचा पिच्छा सोडू नका. मग हळूहळू कोणत्याही विषयात थोडा तरी रस निर्माण होईल. मग एकाग्रता वाढत जाईल.”
थोडे थांबून सर गंभीरपणे बोलू लागले, अभ्यास कसा करायचा, लक्षात कसं ठेवायचे, प्रश्नाची उत्तरं कशी लिहायची, पेपर कसा सोडवायचा, परीक्षेचं टेन्शन कसं टाळायचं आणि प्रवेश परीक्षांत चांगले गुण कसे मिळवायचे, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याचे मार्गदर्शन तुम्हाला शाळेतून वेळोवेळी होईलच. परंतु या प्रश्नांना आयुष्यात अति महत्त्व द्यायचं नसतं. आज आपण ‘अभ्यास म्हणजे काय’ आणि ‘अभ्यास कशासाठी करायचा’ याबाबत बोलू या.
“अभ्यास म्हणजे उत्तरं पाठ करायची.” सुबुद्धी बोलून गेला आणि त्याने पटकन आपली जीभ लावली.
“याच विचाराच्या पलीकडं आपल्याला जायचं आहे.” सर समजावून सांगू लागले. “अभ्यास म्हणजे नुसतं पाठांतर नव्हे. अभ्यास म्हणजे प्रश्नांची उत्तरे तयार करणे नव्हे. अभ्यास म्हणजे एखादा विषय नीट, मुळापासून समजावून घेणे. माझ्या सरांनी मला सांगितलं होतं, दहावीला प्रत्येक धडा दहा वेळा वाचायचा. असं केल्यानं काय होईल?”
“सगळे धडे पाठच होतील सर.” एक उत्तर आले.
“यामुळे धडे नीट लक्षात राहतील. पण प्रत्येक वेळी धडा वाचताना आपली दृष्टी बदलायची. पहिल्यांदा वाचताना या धड्यात नवीन काय आहे याकडे लक्ष द्यायचे. दुसर्या वाचनात त्यातील कठीण शब्द समजावून घ्यायचे. तिसर्या वाचनात त्यातील अवघड संकल्पना नीट समजावून घ्यायच्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची, या धड्यातील माहितीचा आणि इतर धड्यातील माहितीचा काय संबंध आहे, या माहितीमुळे माझ्या जीवनात काय फायदा होऊ शकतो अशी डोळस वृत्ती ठेवून दरवेळी तोच धडा वाचायचा. यामुळे काय होईल?” सरांनी विचारले.
आम्ही गप्प बघून सर पुढे बोलू लागले, “यामुळे ज्ञान आत्मसात होईल, या ज्ञानाचा आपल्या जीवनात कसा उपयोग करायचा ते कळेल. या ज्ञानाच्या आधारावर पुढचे ज्ञान मिळवण्याची क्षमता आपल्यात निर्माण होईल. असे करणे म्हणजे अभ्यास.
आमच्याकडे प्रेमाने बघत सरांनी विचारले, “आता मला सांगा, आपण अभ्यास का करतो? खरं, खरं सांगायचं.”
“परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी.” “चांगला नंबर काढण्यासाठी.” काही उत्तरे आली.
“आपल्याला चांगले मार्क का हवे असतात?” सरांनी विचारले.
“शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी.” “चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवण्यासाठी.” दिनेश आणि मिहीर म्हणाले.
“चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचा काय फायदा होतो?”
“चांगले शिक्षण मिळते आणि चांगली नोकरी मिळते.” गार्गी म्हणाली.
“चांगली नोकरी म्हणजे काय?” सरांचे प्रश्न सुरूच.
“चांगली म्हणजे भरपूर पगाराची, आयटीतली.” शकील म्हणाला.
“भरपूर पैसे कशासाठी हवेत?” सरांनी विचारलेच.
“मजा करायला.” “जगभर हिंडायला.” “खरेदी करायला.” भराभर उत्तरे आली.
“या गोष्टी केल्यामुळे आपल्याला काय मिळते?” परत प्रश्न आला.
“आपल्याला आनंद मिळतो, सुख मिळते.” विचक्षणने विचार करून उत्तर दिले.
“सगळ्यांच्या मनात हाच विचार असतो. उत्तम गुण मिळवायचे, उत्तम कॉलेजात प्रवेश मिळवायचा, भरपूर पगाराची नोकरी पटकवायची आणि पैशाच्या जोरावर सुख मिळवायचे. आपण कधीच ज्ञानाचा आनंद घेण्यासाठी अभ्यास करीत नाही. म्हणून आपलं मन अभ्यासात एकाग्र होत नाही.” सर म्हणाले.
“आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी शिक्षणाचा, चांगल्या नोकरीचा, पैशाचा आणि सुखाचा त्याग केला. त्यांनी बरोबर केले का चूक केले? सर्वांनी आपल्यापुरता विचार केला तर आपल्या समाजाची, देशाची प्रगती होईल का? तुम्हीच विचार करा.” एवढे बोलून सर थांबले.
काही वेळाने पुढे बोलू लागले. “त्यांच्यासारखे सगळ्यांना जमणार नाही. आपण प्रथम आपल्या सुखाचा विचार करीत असतो. आणि सुखी जीवनासाठी पैसा आवश्यक असतो हे खरं आहे. परंतु केवळ खूप पैसे मिळवून सुख मिळेल का?”
“सर, पैशानं सगळं मिळतं. माझे काका नेहमी म्हणतात. गार्गीने सांगितले.
“पैशाने विकत मिळणार्या गोष्टी आपल्याला लागतातच. पण पैशाने विकत न मिळणार्या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. कोणत्या अशा गोष्टी आहेत?” सरांनी आम्हाला विचारले.
“आईचे प्रेम.” लेखक अमेय म्हणाला.
“शती.” सैन्यात जाऊ इच्छिणारा राजेश म्हणाला.
“नशीब.” परीकथेत रमणारी विशाखा म्हणाली.
“याशिवाय इतर अनेक गोष्टी सुखी आणि आनंदी जीवनासाठी आवश्यक असतात. उदाहरणार्थ, चांगले आरोग्य. आरोग्य नसेल तर पैशाचा काय उपयोग?” सरांचे प्रश्न संपत नव्हते.
“Health is wealth.” अबोल सायली अचानक म्हणाली.
“Health is far more than wealth.” सर म्हणाले. “आजारातून बरं होण्यासाठी पैसे नकीच लागतात. पण आरोग्य मिळवण्यासाठी जास्त पैसे लागत नाहीत. जर आपण निरोगी व उत्साही नसू तर कितीही पैसा काय उपयोगाचा? बरं, आरोग्याशिवाय आणखी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?”
कोणाला काही सुचेना. शेवटी सरच पुढे बोलू लागले, “सुखी जीवनासाठी चांगले आरोग्य, चांगल्या मित्र-मैत्रिणी, आवडणारे काम, आपली कर्तव्ये नीट पार पाडणे, ज्ञानाचा व कलेचा आनंद घेणे, कृतज्ञता बुद्धी, जीवनाला काही ध्येय असणे या सार्या गोष्टी पैशाएवढ्याच महत्त्वाच्या असतात असे मानसशास्त्रातील संशोधन आहे. या सार्या गोष्टी कशा मिळवायच्या आणि कशा टिकवायच्या हे समजून घेण्यासाठी जीवनभर डोळे उघडे ठेवून या जगाच्या पुस्तकाचा अभ्यास करीत राहायचं असतं. समजलं?”
सर गप्प झाले. तेजस्विनी म्हणाली, “सर, थोडे नकी समजलं. आम्ही तुमचे सांगणं विसरणार नाही. आम्ही आणखी मोठे होऊ तसं ते आम्हाला जास्त समजेल.”
उभे राहून सर बोलू लागले. “आजचा हा आपला मुक्त प्रश्नांचा शेवटचा तास असेल. या तासाला मी कधी तुम्हाला काही उपदेश केला नाही. पण शेवटचं एक सांगावंसं वाटतं. जीवनातील सर्व क्षेत्रांचा चांगला अभ्यास करून एक यशस्वी आणि उत्तम माणूस बना. स्वतःच्या गुणांचा विकास करून आणि दोष कमी करून अधिक आनंदी बना. आपला आनंद फक्त स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी मर्यादित न ठेवता सार्या समाजात पसरण्याचा प्रयत्न करा. मग तुमचं जीवन नकीच समाधानी बनेल.”
-डॉ. प्रसन्न दाभोलकर
