संविधान बांधिलकी महोत्सवानिमित्ताने शहादा अंनिसचे रक्तदान शिबीर

रवींद्र पाटील -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा शहादाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 26 जानेवारी रोजी करण्यात आले. 26 ते 30 जानेवारी असा 5 दिवस संविधान बांधिलकी महोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दर वर्षी 26 जानेवारीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा शहादा रक्तदान शिबिराचे आयोजन करते. हे रक्तदान शिबिराचे 8 वे वर्षे होते. या वर्षी रक्तदान शिबिरास एकूण 35 लोकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून शहादा प्रांताधिकारी चेतनसिंग आनंदसिंग गिरासे लाभले. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मला शहाद्यात येऊन 5 महिने झालेत आणि या 5 महिन्यात अंनिस शहादा शाखेने मला दोन वेळेस बोलाविले. दोन्ही कार्यक्रम हे उत्तम होते. एक दिवाळीच्या वेळेस सर्व धर्मांतील जनतेचा मेळावा आयोजित केला होता. तो मला खूपच भावला व दुसरा रक्तदान शिबीर मेळावा हा देखील सर्वधर्म समभावाचाच कार्यक्रम आहे. उद्घाटन हे प्रांताधिकारी गिरासे यांच्या हस्ते संविधानाची प्रास्ताविक वाचून करण्यात आली व स्वत: प्रांताधिकारी चेतनसिंग गिरासे यांनी रक्तदान केले. याप्रसंगी डॉ. शशिकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, पुढच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी गांधी टोपी घालून सुरुवात करायची. त्याचबरोबर डॉ. अलका कुलकर्णी यांनी आपले अनुभव रक्तदानाबाबत कथन केलेत की, शहाद्यात अगोदर रक्त मिळत नसे व कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावे लागत असे, याबद्दल माहिती दिली. शहादा शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. डी. पटेल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रक्तदान करण्यात महिलादेखील आघाडीवर होत्या. यात रमाई ग्रुपच्या अध्यक्षा अलका जोंधळे, डॉ. स्मिता जैन, अनामिक चौधरी यांनी महिलांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमास वनश्री हैदर अली नुरानी, ‘मअंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ. शशिकांत कुलकर्णी, डॉ. अलका कुलकर्णी, डॉ. बी. डी. पटेल, संभूदादा पाटील, राष्ट्रीय सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, डॉ. स्मिता जैन, चेअरमन लियाकत अली सय्यद महात्मा फुले समता परिषदेचे राजेंद्र वाघ, विनायक सावळे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहादा शाखेचे संतोष महाजन, प्रवीण महिरे, आरिफ मणियार, राजेंद्र निकुंभे, रवींद्र पाटील, प्रदीप केदारे, शाम भालकारे, तेहराज पाटील, समीर मणियार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुवर्णा मोरे यांनी केले. भारती पवार यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.