सोनार बांग्ला, प्रगतोशील बांग्ला!

-

बंगाली युक्तीवादी समिती आणि गुरुबस्टर प्रबीरदा

फारुक गवंडी, राहुल थोरात

पश्चिम बंगाल. ईस्ट इंडिया कंपनी मार्फत ब्रिटिश गुलामीची भारतात सुरुवात झालेला पहिला प्रांत. साहित्य आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा असणारे राज्य. स्वातंत्र्य आंदोलन, सामाजिक सुधारणा आणि विज्ञान चळवळींच्या नवजागरणामध्ये भारताला पुढे नेणारा बंगाल.

साहित्याचे पहिले नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर, जागतिक किर्तीचे स्वामी विवेकानंद, जीनियस शास्त्रज्ञ मेघनाथ साहा, सती प्रथा बंद करायला लावणारे सुधारक राजा राममोहन रॉय, स्वातंत्र्य आंदोलनाचे मुकुटमणी सुभाषचंद्र बोस, आईनस्टाईन सोबत संशोधन करणारे बोस, आईनस्टाईन थिअरीचे जनक जगदीशचंद्र बोस, भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते ज्यांच्या नावे आपण विज्ञान दिन साजरा करतो ते सर सी. व्ही. रमण, एकूण आठ भारतीयांपैकी पाच सर्वोच्च नोबेल पुरस्कारार्थी देणारा बंगाल. भारतात साम्यवादी चळवळ आणणारे एम. एन. रॉय, साहित्यिक महाश्वेतादेवी, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे ते आजचे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, अभिजीत बॅनर्जीअसे माणिक मोती बंगालच्या मातीने दिले आहेत. अशा या पश्चिम बंगालमधल्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणार्‍या चळवळी व विज्ञानवादी चळवळी यांचा धांडोळा घेण्यासाठी आम्ही पश्चिम बंगाल दौर्‍याचे नियोजन केले. पश्चिम बंगालमधील अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणार्‍या युक्तीबादी समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून संपूर्ण दौर्‍याचे नियोजन केले. या पश्चिम बंगालच्या दौर्‍यात आम्हाला काय काय दिसले, काय जाणवले याचा हा ‘आँखो देखा हाल’ अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांसाठी!

मंगळवार दिनांक १० नोव्हेंबर. कोलकात्याला पोहोचायला रात्रीचे दोन वाजले होते. पश्चिम बंगालचा सगळ्यात मोठा उत्सव दुर्गा उत्सव. या उत्सवाच्या काळातच आम्ही कोलकाता आणि पश्चिम बंगाल फिरणार होतो. संपूर्ण रस्त्यावर लाइटिंग, मोठमोठ्या पेंडॉलचा झगमगाट होता. मध्यान रात्रीसुद्धा उत्साहाचा माहोल होता. कोलकाताच्या मध्यवर्ती ठिकाण पार्क स्ट्रीट च्या एका हॉटेलवर पोहोचलो. या भागात अजूनही इंग्रज राजवटीच्या खाणाखुणा इमारतींच्या माध्यमातून दिसत होत्या.

सकाळी संतोष शर्माच्या फोनने जाग आणली. प्रवासाची, सोयीची, झोपेची चौकशी करून आम्ही चौघे कार्यकर्ते भेटण्यासाठी येत असल्याचे त्यांनी कल्पना दिली. आम्ही फ्रेश होऊन वाट पहात थांबलो. ठरल्याप्रमाणे चौघेही आले. चौघेही ‘भारतीय विज्ञान आणि युक्तिबादी समिती’चे कार्यकर्ते. अध्यक्ष दिलीपदास मंडल, उपाध्यक्ष संतोष शर्मा, जनरल सेक्रेटरी मनीष रॉय चौधरी, कार्यकर्ता जयदीप मुखर्जी.

युतिबादीचे जनरल सेक्रेटरी मनीष रॉय चौधरी आणि उपाध्यक्ष संतोष शर्मा दोघेही ४०-४२ वर्षांचे तरुण. जवळजवळ १६ वर्षे म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासूनचे युक्तिबादी समितीचे कार्यकर्ते.

मनीष रॉय चौधरी दिसण्यापासून ते वागण्या-बोलण्यापर्यंत खास बंगाली टच असणारा, जाड भिंगाचा चष्मा आणि डोक्याचा विस्तीर्ण भाग केसांपासून मोकळा असलेला! या बंगाली तरूणाचा प्रादेशिक संस्कृती, सुधारकांचा प्रचंड अभ्यास होता.

संतोष शर्मा बिहारमधून कारागिरीसाठी येऊन बंगालमध्ये स्थायिक झालेल्या कुटुंबातील मुलगा, पत्रकारिता करणारा, उत्तम हिंदीची जाण असणारा, मूळ बिहारी धडाडी असणारा, जन्म बंगाल मध्ये होऊन सध्या बंगाली असणारा, अतिशय मनमिळाऊ आणि बोलका तरुण.

एकमेकांची ओळख, औपचारिक विचारपूस झाल्यानंतर आम्ही संवादास सुरुवात केली. पहिलाच प्रश्न राहुलने या दोघांनाही विचारला.

आपण युतिबादी समितीमध्ये कसे आलात?

संतोष शर्माने सांगण्यास सुरुवात केली. “आमची दुसरी पिढी बंगालमधली. माझा जन्मही बंगालचा. बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यामधून आम्ही कारागिरीसाठी बंगालमध्ये आलो. आम्ही कट्टर ब्राह्मण. ब्राह्मणांची सर्व कर्मकांडे आमच्या घरात केली जात. पण त्याचबरोबर आमच्या घरातल्या अनेक महिलांच्या अंगात कधी देवी येत असे, तर कधी भुते येत असत. मला मात्र अनेक प्रश्न पडायचे. पण उत्तर सापडायचे नाहीत. मग माझ्या हातात ‘नॉस्ट्रेडेमसची भविष्यवाणी’ हे पुस्तक पडलं आणि आणखी वैचारिक गोंधळात वाढ झाली. घरच्या वातावरणात मी देखील प्रचंड धार्मिकच होतो. मला वाचनाची आवड होती. मी कॉलेजला जात होतो. त्या काळात आमच्या घराजवळच्या पब्लिक लायब्ररी मधून प्रबीर घोष यांचे ‘लौकिक ना अलौकिक’ हे पुस्तक मला वाचायला मिळाले आणि मला त्या पुस्तकात माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत असं वाटू लागले. ‘अलौकिक ना लौकिक’ नावाने पाच खंड प्रसिद्ध आहेत असं मला कळाले. आणि पाचही पुस्तके घेऊन मी वाचली. माझ्या विचारांमध्ये मध्ये ड्रास्टिक म्हणावा असा बदल होऊ लागला. आता पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याची मला तीव्र ओढ लागली आणि मी जवळपास दोन-तीन तासांचा प्रवास करून शोधत कोलकात्यामधील डमडम या भागातील त्यांच्या राहत्या घरी लेखकाची भेट घेतली. त्या लेखकाचे नाव होते प्रबीर घोष. तोच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता.”

आता मनीष रॉय चौधरीने सांगण्यास सुरुवात केली.

“तसं आमचं घर मध्यमवर्गीय. खाऊन-पिऊन सुखी. माझे वडील शिक्षक तर चुलते डाव्या चळवळीत काम करणारे. आमच्या कुटुंबाची देव नाकारण्याची विद्रोही परंपरा जुनीच. मलाही कुणी धार्मिक बाबतीत कसलाही आग्रह धरलेला नसायचा. या मोकळ्या वातावरणाचा मला पुढील आयुष्यात फायदाच झाला. मला वाचण्याची सवय होती. घराशेजारच्या वाचनालयात मला ‘अलौकिक ना लौकिक’ हे पुस्तक सापडले. सहज म्हणून वाचण्यास घेतले आणि संपूर्ण पुस्तक वाचूनच ते खाली ठेवले. या पुस्तकाचे लेखक प्रबीर घोष यांना भेटण्याची इच्छा झाली. ते कोलकात्यामध्ये डमडम येथे राहात असल्याचे कळाले. त्यांच्या घरी रविवार आणि बुधवारी स्टडी सर्कल होत असल्याचे कळाले. मी एकदा जाऊन त्यांना भेटलो. ती तारीख देखील मला आजही आठवते. २५ डिसेंबर २००७. काही स्मृती या न विसरण्यासाठीच असतात. त्यातलीच ही एक माझी स्मृती आहे. मग सुरू झाली चर्चा, वाद-संवाद. प्रत्यक्षात त्यांच्यासोबत बुवा-बाबांचा भांडाफोड करणेसाठी जाणे इ. मार्गाने मी कायमस्वरूपी प्रबीर घोष यांच्या युतिबादी समितीशी जोडलो गेलो. मोठ्या भावासाठी बंगालमध्ये आदराने ‘दादा’ हा शब्द जोडला जातो. म्हणून आम्ही प्रबीर घोष यांना ‘प्रबीरदा’ म्हणू लागलो.”

भारतीय विज्ञान व युक्तीवादी संघटनेला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओळख त्यांच्या बलिदानानंतर झालेली होती, त्यामुळे संतोषने अतिशय थेटपणे महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यामध्ये प्रबीर घोष आणि त्यांच्या संघटनेची ओळख करून दिली.

ज्या धडाडी, धाडस आणि कार्यक्षमतेने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून कार्य केले, त्याच धडाडी, धाडस आणि कार्यक्षमतेने प्रबीर घोष यांनी पश्चिम बंगालमध्ये भारतीय विज्ञान व युतिबादी समितीच्या माध्यमातून कार्य केले आहे. ‘भारतीय विज्ञान ओ युक्तिबादी समिती’ ज्याला बंगालमध्ये संक्षिप्तपणे ‘युतिबादी समिती’ म्हणून पण ओळखले जाते.

आत्तापर्यंत आमच्या लक्षात आले होते की, भारतीय विज्ञान व युतिबादी समितीला जाणून घ्यायचं असेल, तर प्रबीर घोष या माणसाला समजून घ्यावे लागेल. कारण अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हे जशी समानार्थी नावे महाराष्ट्रात आहेत,अगदी तसेच पश्चिम बंगालमध्ये भारतीय विज्ञान ओ युतिबादी समिती आणि प्रबीर घोष ही नावे समानार्थी आहेत.

त्यानंतर आम्ही पुढचा प्रश्न विचारला…

प्रबीर घोष आणि त्यांनी सुरू केलेल्या युतिबादी समितीबाबत विस्ताराने सांगा.

यावर मनीष आणि संतोष अगदी उत्स्फूर्तपणे आणि भरभरून बोलू लागले. “प्रबीरदा यांचा जन्म मार्च १९४५ मध्ये बांगला देशमधील फरीदपूर या जिल्ह्यात झाला. १९६० साली त्यांचे वडील कोलकात्यामधील डमडम या भागात स्थायिक झाले. प्रबीर घोष त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे एप्रिल २०२३ पर्यंत तेथेच राहत होते. लहानपणापासून प्रबीरदांना जादू शिकण्याची हौस होती. त्यांनी जादूगारांकडून काही जादूचे प्रयोग शिकून घेऊन त्याचे प्रयोगही केले होते. ते पदवीधर झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला लागले. कोलकात्यामधील काही विज्ञानवाद्यांना घेऊन त्यांनी ‘भारतीय विज्ञान ओ युक्तिबादी समिती’ची स्थापना १ मार्च १९८५ रोजी केली. युक्तिबादी समितीचे ते संस्थापक-सरचिटणीस राहिले. १९९९ साली स्टेट बँकेतील नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ त्यांनी युक्तिबादी समितीसाठी स्वतःला वाहून घेतले आणि युतिबादी समितीला पश्चिम बंगालच्या समाजकारणामध्ये निश्चितपणे एक नाव मिळवून दिले. समितीसाठीचे कृती कार्यक्रम आणि साहित्य त्यांनी निर्माण केले. टाइम्स ऑफ इंडिया, आनंद बझार पत्रिका इ. प्रतिष्ठित वर्तमानपत्रांच्या लेखांबरोबरच इतर वर्तमानपत्रे, मासिके आणि ‘आमरा युतिबादी’ थश रीश ींहश ठरींळेपरश्र नावाचे त्रैमासिक १९९० पासून निघते, इ. मध्ये त्यांनी लिखाण केले. या लिखाणा बरोबरच त्यांनी बंगाली आणि इंग्रजीमध्ये ७० पुस्तकांची निर्मिती करून प्रचंड चळवळीचं साहित्य आणि तत्त्वज्ञान निर्माण केले आहे. या सर्व पुस्तकांपैकी ‘अलौकिक ना लौकिक’ या पाच पुस्तकांच्या दहा लाख प्रती आजपर्यंत विकल्या गेल्या आहेत. बांगलादेशमध्ये त्यांच्या या पुस्तकाला प्रचंड मागणी असते. तसेच त्यांचे ‘संस्कृती, संघर्ष और निर्माण’ हेही पुस्तक प्रचंड गाजले.”

प्रबीरदा यांच्या पुस्तकाबद्दल अजून काही सांगा

असे विचारल्यानंतर मनीषने सांगण्यास सुरुवात केली. “प्रबीरदा यांनी सत्तर पुस्तके लिहिली. सगळीच पुस्तके महत्त्वाची आहेत. परंतु त्यातील तीन पुस्तके अति महत्त्वाची आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे पाच खंडात लिहिलेले आहे ते म्हणजे, ‘अलौकिक ना लौकिक.’ अनेक अतार्किक, अबुद्धिगम्य, चमत्कारी घटनांचे विश्लेषण या पुस्तकात आहे. सर्वसामान्य लोकांना पडणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकामुळे मिळतात. गॉडमॅन, दैवी शक्ती इत्यादी विरुद्धचे मन या पुस्तकामुळे तयार होऊ शकते. ही पुस्तकेच आमच्यासारख्या अनेकांना प्रबीरदा यांच्या युतिबादी समितीत आणण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहेत. १९९३ साली लिहिलेले ‘संस्कृती, संघर्ष आणि निर्माण’ हे दुसरं पुस्तक म्हणजे युतिबादी समितीचा मेनिफेस्टो असल्याचे मनीष चौधरी सांगतात. या पुस्तकात समाजव्यवस्थेची मुळातून चिकित्सा केली गेली आहे. धार्मिक आचरण आणि सेवा करून जसे गणवेश, वह्या-पुस्तके वाटणे, हॉस्पिटल उभी करणे इ. मुळे समाज परिवर्तन होणार नाही, तर समाज बदलांसाठी संघर्ष करावा लागेल. जनतेला कर्मकांडापासून मुक्त करून पारलौकिक कल्याणमध्ये सुख शोधण्याऐवजी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याची प्रेरणा दिली पाहिजे, अशी या पुस्तकात मांडणी आहे.”

प्रबीरदा यांनी कामाची सुरुवात कशी केली?

“१९६०-७० चे दशक भारतीय तरुणांसाठी अस्वस्थतेचे दशक होते. नक्षलवादी चळवळीचा उगम पश्चिम बंगालच्या नक्षलबाडी या भागात याच काळात झाला. अनेक तरुणांना या चळवळीचे आकर्षण होते. अनेक उच्चशिक्षित आणि संवेदनशील तरुण झेुशी लेाश षीेा लरीीशश्र ेष र्ॠीप या राजकीय विचारधारेवर विश्वास ठेवून नक्षल चळवळीत सहभागी झाले. परंतु प्रबीर घोष यांनी खूप विचार करून निष्कर्ष काढला की, हिंसक आंदोलन न करता जनतेला शिक्षित केले पाहिजे. शोषणाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी अंधश्रद्धा, चमत्कार, कर्मविपाकाचा सिद्धांत असे धार्मिक विचार आडवे येतात. आणि हे चमत्कारी बुवा-बाबा ज्योतिषी जनतेची जैसे थे मानसिकता ठेवून व्यवस्था परिवर्तन होऊ देत नाहीत. म्हणून यांच्या विरोधात लढा उभारणे आवश्यक आहे आणि हाच विचार घेऊन त्यांनी युतिबादी समिती सुरू करून बंगालमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू केले. प्रबीरदा यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात व्यवस्था परिवर्तनाचाही विचार होता.”

प्रबीरदा यांनी सुरुवातीच्या काळात कशा प्रकारचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले?

“अंधश्रद्धा निर्मूलन कामाची सुरुवात प्रबीरदा यांनी भारतीय विज्ञान व युतिबादी समितीच्या माध्यमातून सुरुवात केली. सुरुवातीला प्रबीरदा म्हणजे वन मॅन आर्मी होते. त्यांनी अनेक मोठ्या बाबा-बुवांचा भांडाफोड स्वतः पुढे होऊन धाडसाने, जिवावर उदार होऊन केला. पहिल्या टप्प्यात त्यांना साथ दिली ती त्यांच्या कुटुंबीयांनी. त्यांची पत्नी सीमा भाभी, जी रवींद्र संगीताची गायिका होती. फक्त चार वर्षांचा त्यांचा मुलगा पिनाकी घोष व स्वतः प्रबीरदा अशा तीन लोकांची आर्मी त्यांनी तयार केली अंधश्रद्धेविरुद्धच्या लढ्यासाठी… आगे आगे लोग जुडते गये और ये कारवाँ बनता गया. पहिल्यांदा त्यांनी स्वतःचं घर गहाण ठेवून चमत्कार सिद्ध करणार्‍याला रुपये १५ हजाराचे जाहिर आव्हान दिले. आज या आव्हानाची रकम ५० लाखाची आहे. दिल्ली येथील प्रसिद्ध पत्रकार, लेखक खुशवंतसिंह यांनी देखील स्वतःची काही रक्कम देऊन यामध्ये भर घातली आहे.

ज्या चिकाटीने, धडाडीने, धाडसाने आणि जिवावर उदार होऊन प्रबीर घोष यांनी मोठमोठ्या बुवा-बाबांचा भांडाफोड केले. तो इतिहास म्हणजेच प्रबीर घोष आणि युक्तिबादी समितीचा इतिहास आहे.”

प्रबीरदांनी युक्तिबादी समितीच्या माध्यमातून बुवाबाजीचा भांडाफोड केलेल्या केसेसची माहिती सांगा.

“तशा केसेस तर खूप आहेत. पण काही वैशिष्ट्यपूर्ण केसेस आपण जाणून घेऊ शकतो. मे १९९० मध्ये कोलकात्यापासून ७० किलोमीटर अंतरावर असणार्‍या नकाली या गावात अफवा पसरली की, गावात असणार्‍या एका तळ्यामधील चिखलामध्ये अंघोळ केली की कॅन्सर आणि इतर आजार बरे होतात. थोड्याच दिवसात हे घाणेरड्या चिखलाने भरलेले तळे एक धार्मिक क्षेत्र झाले. रेल्वेने, गाडीने, भाड्याने बसेस करून ज्या वाहनाने मिळेल त्या वाहनाने लोक या पवित्र स्थानी येऊ लागले. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी जमू लागली होती. लोक आता फक्त चिखलाची अंघोळ करीत नव्हते, तर ते चिखलातील पवित्र पाणी देखील पिऊ लागले होते आणि जे येथे येऊ शकत नव्हते त्या आजारी माणसासाठी बाटल्या, कॅन भरभरून लोक हे पवित्र चिखल घेऊन जात होते. या तलावाच्या मालकाच्या कुटुंबातील एक व्यक्ती चिखल उपचारामुळे मरण पावली. तरीदेखील तलावाकडे येण्याचा ओघ कमी झालेला नव्हता. घाणेरड्या, प्रदूषित चिखल आणि पाण्यामुळे अनेक जण आजारी पडत होते. अशा मूर्खपणाच्या जीवघेण्या अंधश्रद्धेविरुद्ध प्रबीर घोष यांच्या नेतृत्वाखालील युक्तिबादी संघटनेने विरोध केला आणि शासनाच्या मदतीने शेवटी तलाव बंद करण्यात आला.”

फकीरबाबाचा भांडाफोड

पश्चिम बंगालच्या खेड्यामध्ये काही फकीर मानसिक रुग्णावर व आजारी व्यक्तीवर आग फेकून रोग बरा करतात. एक चौकोन आखला जातो. त्या चौकोनाला तो दैवी चौकोन म्हणतो. चौकोनामध्ये रुग्णाला बसवले जाते. रुग्णावर चादर लपेटली जाते. विशिष्ट अंतरावरून फकीर बाबा पवित्र कुराणाच्या आयती पठण करीत, पेटलेली मशाल समोर धरून त्या व्यक्तीवर मंतरलेली माती मारतो. आगीचा लोळ त्या माणसाच्या शरीराला जाऊन धडकवतो. परंतु माणसाला भाजत नाही. असा प्रत्यक्ष दैवीशक्तीने रोग बरा करण्याचा उपचार करण्याचा कार्यक्रम चालू असताना प्रबीरदा त्यांची टीम घेऊन तेथे पोहोचतात आणि फकीर बाबाची पंगा घेऊन लोकांना त्या पाठीमागील विज्ञान सांगतात. फकीर बाबांचा जळफळाट होतो. मनीष पुढे म्हणाला, “असा थेट पंगा घेणे कधी कधी धोकादायक होऊ शकते. कारण बुवाबाजी करणार्‍या बाबांच्याकडे पिस्तुलापासून ते गुंडांची फौज असते.” पण अतिशय आत्मविश्वासाने तो पुढे म्हणाला, “अशांना भिणारे ते प्रबीरदा कसले?”

नागबाबाचा पर्दाफाश

शेकडो लोकांसमोर कुत्र्याला नागाचा दंश करवून, सापाचे विष मंत्राने उतरवण्याचे आव्हान नागबाबा या मांत्रिकाला दिलेले आहे. परंतु मांत्रिक ते आव्हान सपशेल हरतो आणि कुत्र्याचा जीव याच्यामध्ये जातो. पत्रकार ज्या वेळेला प्रबीर घोष यांना प्रश्न विचारतो की, अशा प्रकारे प्रयोगासाठी कुत्र्याचा जीव घेणे बरोबर आहे का? त्या त्या वेळी प्रबीर घोष यांनी उत्तर दिलेले आहे की, भारतामध्ये सर्पदंशामुळे वीस हजार लोक मृत्युमुखी पडतात. याचे मुख्यतः कारण सर्पदंशावर मंत्राने विष उतरवण्याचा दावा असे मांत्रिक करतात. खेडोपाड्यातील बहुसंख्य लोक अशा प्रकारच्या मांत्रिकाकडे जाऊन मंत्राने सर्पदंश उतरवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून जसं प्रयोगशाळेत गिनिपिग म्हणून प्रयोग केला जातो, त्या पद्धतीने हजारो माणसांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही एका कुत्र्याचा बळी दिलेला आहे आणि या कुत्र्याच्या मृत्यूसाठी एक मिनिट उभे राहून सर्व जणांना ते आदरांजली वाहण्यास सांगतात. अशा पद्धतीने बुवा-बाबांना थेट त्यांच्या दारात जाऊन आव्हान देणारी पश्चिम बंगालमधील युतिबादी ही एकमेव संघटना आहे.

पाद्री सेरिलोला आव्हान

“पोपनंतरचा सर्वांम लोकप्रिय, प्रभावशाली ख्रिश्चन धार्मिक नेता मॉरिस सेरिलो, सर्व देश जिंकून शेवटी कोलकात्यात बुडून गेला! अविश्वसनीय! हा चमत्कारच असावा!” हे शब्द आहेत रॉबर्ट ईगलचे. रॉबर्ट हा चॅनल फोरचा लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माता आहे. रॉबर्ट पुढे असेही म्हणाला, “तुम्ही किती छान काम केले आहे याची तुम्ही कल्पना करू शकत नाही.” हे सर्व कौतुक होते युक्तिबादीच्या प्रबीर घोष यांच्यासाठी. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कामच तसे केले होते.

ऑक्टोबर १९९२ साली मॉरिस सेरिलो नावाचा चमत्कार करणारा पाद्री कोलकात्यामध्ये आला. ‘हले हुईया’ म्हणून प्रचंड मोठ्या गर्दीत त्याने चमत्कार सुरू केला. पांगळे चालू लागले. बहिरे ऐकू लागले. मुके बोलू लागले आणि अचानक प्रबीरदा यांनी समोर उभे असणार्‍या पोलीस कमिशनरच्या हातामधून माईक हिसकावून घेऊन ‘आमचं चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान स्वीकारा”, असे त्या बाबाला ठणकावून सांगितले. तुम्हाला इतकं कळते तर दुर्गादेवीला हात किती हे सांगा? म्हणून माईकवरून प्रबीरदा यांनी थेट आव्हान दिले. त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये असणार्‍या युक्तिबादी कार्यकर्त्यांनी पत्रके उधळण्यास आणि आव्हान स्वीकारा म्हणून घोषणाबाजीस सुरुवात केली. या सगळ्या गोंधळामध्ये कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. जगभर फिरून आलेल्या मॉरिस सेरिलोला कोलकात्यातून अक्षरश: पळून जावे लागले आणि त्याची नोंद वर सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय मिडियाकडून घेतली गेली. याचे कारण पण तसेच होते. प्रबीर घोष यांनी फक्त ५० कार्यकर्त्यांना घेऊन ४० हजारांच्या जमावासमोर केलेलं प्रचंड धाडस, अचूक नियोजन, गोपनीयता आणि अभ्यास यातून त्यांनी एका मोठ्या पाद्रीला आव्हान दिले होते.

बालक ब्रह्मचार्‍याच्या शवाचे दहन

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु बालक ब्रह्मचारी. त्यांचे दावे म्हणजे, मी माझ्या आध्यात्मिक शक्तीने माझे हृदय थांबवतो. मी माझ्या आध्यात्मिक शक्तीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेबरोबर बोलतो. ‘नेताजी फिर आयेंगे’ असे पोस्टर तो बंगालभर लावत असे. अशा महान बालक ब्रह्मचार्‍याचे हृदय एकदा मे १९९३ रोजी खरोखरच थांबलं. इतकी प्रचंड आध्यात्मिक शक्ती असताना देखील बालक ब्रह्मचारी यांचं थांबलेलं हृदय काही चालू करता येईना. परंतु त्यांच्या भक्तांचा मात्र आपल्या गुरुजींचे हृदय थांबलेले आहे याच्यावर काही विश्वास नव्हता. ‘गुरुजी निश्चितपणे पुन्हा स्वत:चे हृदय चालू करणार आहेत,’ असे सांगत त्यांनी त्यांचे क्रियाकर्म करण्यास नकार दिला आणि मृतदेह सडू लागला. शेवटी पोलिसांनी काही दिवस त्यांचे पार्थिव बर्फामध्ये ठेवले. या थोतांडाविरोधात सुद्धा प्रबीरदा यांना चळवळ उभी करावी लागली. स्वतःच्या मृत्यूनंतर ५५ दिवसांनी हृदय चालू न करता आल्यामुळे शेवटी पोलिसांनी चिता रचून, अग्नी देऊन बालक ब्रह्मचारी यांना अनंतात विलीन करून टाकले आणि जनतेने युक्तिबादीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

पश्चिम बंगाल मध्ये फिरत असताना आज देखील आम्हाला बालक ब्रह्मचारी त्यांच्या मठामध्ये प्रकट होणार आहेत. असे पोस्टर अनेक ठिकाणी लावलेले दिसले. त्यांचे भक्त आजही असे मानतात की, ‘बालक ब्रह्मचारी भक्तांना दर्शन देण्यासाठी येणार आहेत’ आणि दरवर्षी त्यांचा असा कार्यक्रम भरतो. याबाबत आम्ही मनीषला विचारले असता. मनीष म्हणाला, ‘लोकांचा शहाणपणा मर्यादित आहे, पण मूर्खपणा अमर्यादित.’

संतती मंत्र देणारा हुजूर सैदाबादी!

हुजूर सैदाबादी हे बांगलादेशातील लोकप्रिय सूफी संत. बांगलादेशातील वर्तमानपत्रे आणि मासिकांनी चाळीस वर्षांच्या या चमत्कारिक बाबाच्या बातम्या भरपूर छापल्या आहेत. भक्तांना आकर्षित करण्यासाठी हुजूर कधीकधी कोलकात्याला येत असत. आता त्यांच्या आगमनाचा संदेश सर्वांपर्यंत पत्राद्वारे पोहोचवणे शक्य नव्हते, म्हणून हुजूर ते कोलकात्याला कधी असतील, कुठे असतील आणि कधी भेट देतील, त्यांच्या फोटोसह वर्तमानपत्रात जाहिरात देत असत. तो सहसा ग्रँट स्ट्रीटवरील मोठ्या हॉटेलमध्ये राहत असत.

हुजूर सैदाबादी यांचे पूर्ण नाव बरेच मोठे आहे – ‘अलहाज हुजूर दिवाण मोहम्मद सदुर रहमान चिती सैदाबादी.’ थोडक्यात हुजूर सैदाबादी. प्रचंड श्रीमंती थाट. सरकारी मदतीमुळे कोट्यवधीचे मालक. बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या सोबत यांचे संबंध. जाईल तिथे गुंडांचे संरक्षण.गुजरात मधील पार्वती माँ सारखे निपुत्रिकांना संतान देण्याचा याचा धंदा. कोलकातामधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये गुंडांच्या सोबतीने राहणारा आणि दुवा देऊन निपुत्रिकांना संतान देणारा हा बाबा. फेब्रुवारी १९९१ मध्ये कोलकात्याच्या एका लोकप्रिय वृत्तपत्रात जाहिरात देऊन ते कोलकात्यात आले. प्रबीरदा याच्या गुहेमध्ये धाडसाने आपल्या पत्नीसह गेले आणि त्याला आव्हान देऊन त्याचा भांडाफोड केला. त्याकाळी हे प्रकरण वर्तमानपत्रामध्ये खूप गाजले. हुजुर सैदाबादीला कोलकात्त्यातून आपला गाशा गुंडाळावा लागला.

ज्योतिषी सत्यानंदचा भांडाफोड

आचार्य सत्यानंद, स्वतःचे विमान, स्वतःचे विमानतळ, स्वतःचे टीव्ही चॅनल असणारा, अमर्यादित संपत्तीचा मालक. हायप्रोफाईल ज्योतिषी. प्रबीर घोष काही कार्यकर्ते, आपला मुलगा पिनाकी, सून सोनालीसोबत नॅशनल जिओग्राफिकचे पत्रकार फ्रेंच रोबोट यांना घेऊन सत्यानंदच्या दरबारात शिरले. सोबत असणार्‍या मुलीला मंगळ दोष असल्याचे सांगून उपचार करण्यास सांगितले. त्यांना काही प्रश्न विचारून ही सगळी बातचीत कॅमेर्‍यामध्ये रेकॉर्ड केली. परंतु सत्यानंदला शंका आल्याने त्याच्या गुंडांनी सर्व कॅमेरे फोडून टाकले. कार्यकर्त्यांना मारहाण केली. आणि आपल्या चॅनलवरून सत्यानंदनी भक्तांना चिथावणी दिली. “प्रबीर घोष जैसे लोग हिंदू धर्म, सनातन धर्म विरोधी है| वो जहाँ मिले, पीट पीट कर मार डालो|” राहुलने टिप्पणी केली. म्हणाला,”आमच्याकडे सुद्धा डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि एन. डी. पाटील या विवेकवाद्यांचे हात-पाय तोडा, अशी चिथावणी एका बुवाने दिली होतीच आणि या लबाडांचा अंतिम सहारा देव, देश आणि धर्म आहेच. तो सनातन आणि सर्वत्र आहे.”

मदर तेरेसांच्या चमत्काराची चिकित्सा

मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यासाठी दोन चमत्कार सिद्ध करण्याच्या अटी व्हॅटिकन चर्चने लावल्यानंतर पश्चिम बंगालमधील अनेक विज्ञानवादी चळवळींनी चमत्काराचा दावा सिद्ध करण्याच्या या प्रक्रियेचा विरोध केला होता.

परंतु युतिबादी संघटनेच्या माध्यमातून प्रबीरदांचा विरोध हा कृतिशील होता. त्यांनी मदर हाऊससमोर निदर्शने केलीच. त्यासोबत मोनिका बसेरा नावाच्या ज्या स्त्रीचा कॅन्सर मदर तेरेसा यांची प्रार्थना केल्यामुळे बरा झाल्याचा दावा केला जात होता, त्या मोनिकाच्या गावात जाऊन मुलाखती घेतल्या. मोनिकाच्या पतीची मुलाखत प्रसिद्ध केली. मोनिकाच्या पतीचा दावा होता की, मोनिकाचा कॅन्सर डॉक्टरांच्या औषधोपचारामुळे बरा झाला आहे ना की मदर तेरेसा यांची प्रार्थना केल्यामुळे. याबाबत आपल्या मुलाखती लोकल बरोबरच इंटरनॅशनल मीडियाला दिल्या. तसेच ‘ढहश चरीींशीू ेष चेींहशी ढशीशीर रपव डरळपींहेेव’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाची ई-बुक देखील प्रसिद्ध केली. भारतरत्न आणि नोबेल पुरस्कार विजेत्या जागतिक किर्तीच्या मदरला विरोध करणे तसे सोपे नव्हते. पण तो केला.

सॉल्ट लेकची भुते, इपसिता रे चक्रवर्ती, बारानगरची हणाबरी, आगरपारची आग, रेकी मास्टर क्लीव्ह हॅरिस, कॅनडा इ. रंजक आणि धाडसी बुवा भांडाफोडीचे किस्से आहेत. जिवावर उदार होऊन “बुडते हे जन, देखवेना या डोळा, म्हणूनी येतो कळवळा’ या कळवळ्याने अंधश्रद्धे विरुद्ध लढले गेलेले लढे, युतिबादीच्या प्रबीर घोष यांच्या अकाउंटवर जमा आहेत.

पशुबळीविरोधी मोहीम

दुर्गा उत्सवाच्या काळामध्ये दिल्या जाणार्‍या पशुबळीबद्दल मनीषला विचारले असता मनीष म्हणाला,”पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेची एक काळी बाजू आहे. या दिवसात कालीमातेच्या अनेक मंदिरांमध्ये पशुबळी दिले जातात. म्हैस, बकरे, डुकरे, कबुतरे अशा वेगवेगळ्या प्राण्यांचे बळी दिले जातात. कालीघाट मंदिर किंवा दक्षिणेश्वर काली मंदिर हे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एक प्रसिद्ध मंदिर आहे; जे गंगा नदी जिला बंगालमध्ये ‘हुगली नदी’ म्हणतात तिच्या काठावर १८५५ साली जमीनदार राणी रासमनी हिने उभारले आहे. या मंदिराला २५ एकरांचा परिसर आहे. ५१ शक्तिपीठांपैकी हे एक शतिपीठ मानले जाते. आम्ही युक्तिबादी समितीच्या वतीने १९६० च्या पशुबळी कायद्याचे पालन व्हावं म्हणून प्रशासनाकडे मागणी लावून धरलेली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी देवाच्या नावानं केली जाणारी पशूंची क्रूर हत्या हे अमानवी असल्याने त्याचे प्रबोधन सुरू केले. कायदा आणि प्रबोधन अशा माध्यमातून आम्ही काही ठिकाणी यशस्वी होत आहोत. जसे वर्धमान जिल्ह्यातील सर्वमंगला मंदिरात १००० पेक्षा जास्त बळी दिले जायचे. आम्ही या विरोधात कॅम्पेनिंग केलं. निषेध केला. महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांची पत्रके काढून वाटली. कायद्याचं पालन करण्यात यावं म्हणून प्रशासनाकडे जोर लावला. त्याचे फळ म्हणून २००५ साली सर्वमंगला मंदिरातील पशुबळी बंद झालेला आहे. तसेच कालीमाता मंदिर, विष्णुपुरा येथील पशुबळी बंद करण्याचा निर्णय २०२१ पासून मंदिर कमिटीने आणि प्रशासनाने घेतलेला आहे. हळूहळू यश मिळत आहे. कालीघाट सारख्या मोठ्या मंदिरामध्ये जे पशुबळी दिले जातात, त्याच्या विरोधामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे आमदार विकास रंजन भट्टाचार्य जे आमचे सहकारी आहेत, त्यांनी कोलकाता हायकोर्टात पब्लिक रिट पिटीशन दाखल केली आहे. तसेच कॉम्रेड भट्टाचार्य यांनी दुर्गा उत्सवासारख्या धार्मिक कारणासाठी दिल्या जाणार्‍या सरकारी मदतीच्या विरोधात देखील रिट पिटीशन दाखल केली आहे. आम्ही आमच्या मार्गाने समाज बदलाचा प्रयत्न करत आहोत. बदल निश्चितच होईल. हा आमचा विश्वास आहे.”

बराच वेळ शांत असणार्‍या जयदीप मुखर्जी यांच्याकडे आता राहुल वळला. बघताक्षणी कलाकार वाटावा असा हा मध्यमवयीन तरुण. अंगापिंडानं सशक्त. युक्तिबादी समितीचा एक वरिष्ठ कार्यकर्ता आहे. व्यावसायिक संगीतकार आहे. तो उत्कृष्ट ऑक्टोपॅड वाजवतो. त्याने मुंबईमध्ये बाप्पी लाहिरी, अभिजीत बॅनर्जी, सुदेश भोसले इत्यादी चित्रपट सृष्टीतल्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केलेले आहे. जयदीप संगीतकार आहे म्हटल्यानंतर, मी गीतकार सलील चौधरी, संगीतकार एस. डी. व आर. डी. बर्मन आणि गायक हेमंत कुमार या बंगालच्या कलाकारांनी आमचे जगणे समृद्ध केल्याचे सांगितल्या बरोबर जयदीप खूषच झाला.

आपण युक्तिबादी समितीत कसा आला? हा नेहमीचा प्रश्न विचारल्याबरोबर जयदीप बोलू लागला. प्रबीरदा यांचे ‘अलौकिक ना लौकिक’ हे पुस्तक वाचून मी या समितीमध्ये आलो. या पुस्तकाचा प्रभाव इतका होता की त्यातूनच बरेच लोक प्रबीरदांशी जुळत गेले. हे पुस्तक मी वाचल्यानंतर कोणीतरी माझ्या गालावर जबरदस्त थप्पड मारल्यासारखं वाटलं. सगळ्यात पहिल्यांदा मी तंत्र-मंत्र, भूत, करणी अशा अंधश्रद्धेतून बाहेर निघालो. या विचाराने माझा आयुष्याचा खूप मोठा भाग व्यापला होता. कारण, माझे वडील लहानपणीच गेले होते. कुटुंबाची जबाबदारी लवकरच माझ्या खांद्यावर पडली होती. विचार करायला वेळच नव्हता. मी इतका अंधश्रद्ध झालो होतो की, स्वतः घरामध्ये दुर्गेची मूर्ती बनवून त्याची पूजा तासन्तास करायचो. प्रबीरदा यांच्या या पुस्तकाच्या वाचनानंतर माझ्या डोक्यातून मंत्र-तंत्र या अंधश्रद्धा निघून गेल्या. पण ईश्वर अजूनही शिल्लक होता. मग आणखी एक प्रबीरदाचं पुस्तक माझ्या हाताला लागलं. ‘मै ईश्वर में क्यूँ विश्वास नही करता हूँ?’ या पुस्तकाने आता मी संपूर्ण अंधश्रद्धामुक्त आणि ईहवादी झालो. आता मी माझ्या संगीत क्षेत्रामध्ये, जीवनामध्ये कुठल्याही चमत्कारावर विश्वास न ठेवता आनंद घेऊ शकतो. माझी पत्नी थोडं थोडं धार्मिक कर्मकांड करीत असते. परंतु माझी मुलगी; तिला तर स्वतःचा धर्म, जात आणि कसली कर्मकांडं माहिती नाहीत. त्यामुळे खर्‍या अर्थाने हा विचार पुढच्या पिढीला संक्रमित झालेला आहे असे मी मानतो. कोलकात्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये बुक फेअर भरते. या बुक फेअर मध्ये प्रबीरदा स्वतःच्या पुस्तकाचा स्टॉल दरवर्षी लावायचे. मी माझ्या मुलीसह दरवर्षी पुस्तक खरेदीसाठी जायचो. ते इतकं नियमित होतं की माझ्या मुलीने प्रबीरदांचे नाव ‘बुकफेअर अंकल’ ठेवलं होतं. मला वडील नाहीत. मला कोणी पालकही नव्हते. प्रबीरदा भेटल्यानंतर त्यांच्या सहवासातून मी त्यांनाच माझे पालकत्व दिले आणि आज माझ्या बेडरूममध्ये माझे पालक म्हणून प्रबीरदा आणि त्यांच्या पत्नीचे फोटो लावलेले आहेत. त्यांच्या विचारांची आठवण सातत्याने राहावी म्हणून.

तुम्हाला आणखी एक सांगायचं आहे. प्रबीरदांनी आमची फक्त बौद्धिकच क्षमता वाढवली नाही, तर आम्हाला कराटेचे प्रशिक्षण देऊन आमची शारीरिक क्षमता देखील वाढवलेली आहे. आपण नेहमी आपल्या स्वसंरक्षणासाठी सज्ज असले पाहिजे हा त्यांनी आम्हाला संदेश दिला आहे. त्यामुळे मी नियमित कराटेचे प्रॅक्टिस करतो. म्हणूनच मी फीट अँड फाईन आहे.

आतापर्यंत कान देऊन तरुण कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकत असलेल्या, युक्तीबादी अध्यक्ष, सत्तर वर्षाचे अमोल स्वभावाचे दिलीप दास मंडल यांच्याकडे आम्ही मोर्चा वळवला आणि त्यांना तोच प्रश्न विचारला, तुम्ही युक्तिबादी समितीमध्ये कसे आलात?

हे विचारले असता दिलीप दास मंडल म्हणाले की, माझा प्रवास भुतापासून ते नास्तिकतेपर्यंत झाला आहे. मी अनेक अतार्किक बाबींवर विश्वास ठेवत होतो. पण मी आता तर्कशुद्ध विचार करू लागलो आहे. हुबळी जिल्ह्यातील सिंगूर एक लहान खेडेगाव आमचे गाव आहे. आमच्या सिंगूर गावामध्ये येऊन दोन ते तीन वेळा प्रबीरदा यांनी चमत्कार सादरीकरण कार्यक्रम घेतला होता. मी प्रबीरदांचे मार्गदर्शन घेऊन माझ्या गावात सुरू असणारी काली पूजेच्या वेळेची पशुबळीची प्रथा बंद केली. अंधश्रद्धा निर्मूलनाचं, बुवा-बाबांविरुद्धचं हे काम मला महत्त्वाचं वाटायचं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, मला त्यांचं काम वाटत होतं. ते म्हणजे शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत अधिकारांबद्दल प्रबीरदा बोलायचे ते. हे मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी अंधश्रद्धेचा अडथळा कसा येतो, हेही प्रबीरदा समजून सांगायचे. हीच त्यांची गोष्ट आवडली आणि मी समितीशी कायमस्वरूपी जोडलो गेलो.

संवाद इतका चांगला रंगला होता की, रात्रीचे आठ कधी वाजले कळलेच नाही. दिलीप सरांनी पोक्तपणे संतोषला आठवण करून दिली. आता निघावे लागेल, नाहीतर ट्रेन चुकतील. मग सगळ्यांचीच तंद्री भंगली. त्यांची घरच्या ओढीमुळे आणि आमची भुकेच्या जाणिवामुळे. आम्ही सगळ्यांना जेवून जाण्याचा आग्रह केला. परंतु प्रत्येकाला लांबपर्यंतचा पल्ला गाठायचा होता. म्हणून जेवायला कोणीही थांबायला तयार नव्हते. कारण कोलकात्यापासूनच्या वेगवेगळ्या शहरातून आणि खेड्यातून सगळेजण आले होते. चळवळीच्या प्रेमापोटी. ते सर्वजण निघून गेले. आम्ही थोडंसं फ्रेश होऊन जेवणाच्या शोधात बाहेर पडलो. पाच-सहा हॉटेल बघितल्यानंतर लक्षात आलं. प्रभाकर नानावटी सरांनी सांगितलेला अनुभव. कोलकात्यामध्ये दोन प्रकारचेच हॉटेल आहेत. एक श्रीमंतासाठी प्रचंड महागडी हॉटेल्स, नाहीतर गरिबासाठींचे जेवणाचे रस्त्यावरील अस्वच्छ स्टॉल्स. अधले मधले मध्यमवर्गीयासाठी फारच कमी. जेवणामध्ये मोठा राशनचा भात आणि बटाट्याची पातळ आमटी. त्यातल्या त्यात मध्यमवर्गीयाचे एक हॉटेल शोधून जेवायला गेलो. परत येऊन कधी झोप लागली. कळाले देखील नाही.

भारतीय विज्ञान व युतिबादी समितीची कार्यपद्धती ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखीच आहे. युक्तिबादी समितीचे कार्यकर्ते गावागावांमध्ये जाऊन चमत्कार सादरीकरणाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करतात आणि बुवा-बाबा, अम्मा- टम्माच्या विरोधामध्ये थेट भूमिका घेतात. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या देवाधर्माच्या भूमिकेपेक्षा त्यांची भूमिका ही थेट नास्तिकवादाची आहे.

कोलकात्यापासून ४० किलोमीटर दूर असणार्‍या सिंगूर या गावात युक्तिबादी समितीने चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमास त्यांनी आम्हाला बोलवले. आम्ही हावडा स्टेशनवरून लोकल पकडून सिंगूरला पोहोचलो. तेथे आम्हाला मनीष रॉय चौधरी, संतोष शर्मा, दिलीपदास मंडल, मिहिर कोल्हे, देबराज दास, संजय हैत भेटले.

हेच ते पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यातील सिंगुर गाव. २००६ च्या टाटा नॅनो प्रकल्पविरुद्धच्या आंदोलनाने पुढे २०११ ला ममता बॅनर्जी ला पश्चिम बंगालची सत्ता दिली. आणि डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता संपुष्टात आली.

चमत्कार सादरीकरण कार्यक्रम

सिंगूर बाजारपेठेत एका दुर्गादेवी मंडपाच्या शेजारीच असणार्‍या जागेमध्ये चमत्काराचे सादरीकरण त्यांना करायचे होते. वीस किलोमीटरच्या परिसरातून कार्यकर्ते अतिशय उत्साहाने आम्हाला भेटायला आले होते. मुंबईच्या हॉटेलमध्ये सेफची नोकरी करून आलेला देबराज दास हा मुख्य सादरकर्ता होता. पोलीस सेवेत असलेला तरुण अबोल मिहीर कोल्हे आलेला होता. विद्यार्थी असणारा संजय हैत, युतिबादी समितीचे अध्यक्ष दिलीप दास मंडल,

आमच्यासोबत असणारे मनीष रॉय चौधरी आणि संजय शर्मा अशी टीम चमत्कार सादरीकरणासाठी सज्ज होती. बंगाली भाषेमध्ये मिठाई बाबा (गोड बाबा), मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन, केळीतून करणी काढणे, मंत्राने अग्नी पेटवणे, मानवी कवटीला दूध पाजणे, अंगातून कावीळ काढणे, पेटता पलिता अंगावरून फिरवणे, पेटता कापूर खाणे असे चमत्कार सादरीकरण… बर्‍यापैकी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारखेच ते करत होते. परंतु काही नवीन चमत्कार त्या ठिकाणी आम्हाला दिसले. त्यापैकी तुळशीचं पान खाली वाकून पाणी पिते आणि दुर्गा अंगात आल्यानंतर ४० किलोची घागर दाताने उचलणे, हे दोन नवीन चमत्कार बघण्यास मिळाले. आपल्या राहुल दादाने हौसेने पाण्याने भरलेले ४० किलोचे भांडे दातांनी उचलण्याचा प्रयत्न केला.

पोस्टर प्रदर्शन

कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले युक्तीबादी समितीचे प्रबोधनपर डिजिटल बोर्ड हे आकर्षक होतेच. परंतु त्यातील लिखाण समितीची विचारधारा स्पष्ट करणारे होते. युतिबादी समितीच्या काही वाक्यांसोबतच प्रवीण घोष यांची काही महत्त्वाची वाक्ये होती ती पुढीलप्रमाणे -“जात से भेदभाव ना करे, खुद सोचना सीखिए. हर इन्सान समान है. भाग्य, परलोक, स्वर्ग, नरक, भूत नही है. जो जितना बडा ज्योतिष है, वो उतना बडा ठग है. इन्सान मरेगा ही, उसके साथ आत्मा भी मरेगा. अन्न, वस्त्र,निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे भारतीय नागरिकांचे संविधानिक अधिकार आहेत. सरकार हे सगळे अधिकार आपल्या नागरिकांना देण्यासाठी बांधील आहे. तसेच कार्ल मार्क्सच्या फोटोसोबत वाक्य लिहिलेले होते,‘धर्म एक नशा है.’

चमत्कार सादरीकरण कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही इतर काही प्रश्नांबद्दल कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

अघोरी डाकीण प्रथा

डाकीण प्रथेबद्दल सांगताना संतोष शर्मा म्हणाला,” पश्चिम बंगालच्या आदिवासीबहुल पुरूलीया या जिल्ह्यामध्ये डाकिणीची प्रथा आजही आहे. युक्तीबादी समितीचे कार्यकर्ते मधुसुदन मंहतो हे डाकीण प्रश्नाबदल्ल गेले अनेक वर्षे तेथे काम करत आहेत. या भागात चार प्रकारचे बुवा आढळतात ‘माझी, सखा, ओझा आणि जनगुरु’. हे बाबा चढत्या क्रमाने आहेत जसे डॉक्टरांमध्ये इअचड, चइइड, चऊ आणि सर्जन तसे काहीशा वरच्या स्तराने यांच्या या पदव्या. फरक इतकाच, डॉक्टरांच्या पदव्या ओरिजनल असतात, लोकांचे जीव वाचवणार्‍या. यांच्या मात्र पूर्ण बोगस आणि जीव घेणार्‍या. एखाद्या स्त्रीला डाकीण ठरवून अघोरी उपाय केले जातात. परंतु वेदनादायी गोष्ट ही आहे की, गेल्या दहा वर्षांत एकही डाकीण मामला घडलेला नाही, असे राज्य शासनाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे. त्याचं कारण डाकीण ठरवली गेलेली स्त्री किंवा तिचे कुटुंब समोर येत नाही आणि जिथे खून झालेला आहे तिथे फक्त खुनाचे गुन्हे नोंद होतात आणि त्या पाठीमागची डाकीण प्रथा नामानिराळी राहते. महिलेस डाकीण ठरवून मारहाण करणे, बहिष्कृत करणे, नग्न करून धिंड काढणे, मलमूत्र पाजणे अशा घाणेरड्या प्रथा आजही अस्तित्वात आहेत. त्या विरोधात युक्तिबादी समितीने अनेक आंदोलने केलेली आहेत. अनेकांची सुटका केलेली आहे आणि डाकीण प्रथेविरुद्ध कायदा करावा यासाठीची मागणी पण लावून धरलेली आहे.”

तरुण कार्यकर्ता देबराज दास म्हणाला की, आपल्याला माहीत असेल – फेब्रुवारी २०१५ मध्ये बांगला देशात एका बुक फेअरमध्ये विज्ञानवादी आणि धर्मनिरपेक्ष ब्लॉगर असणार्‍या अभिजीत रॉयचा इस्लामी कट्टरवाद्यांकडून खून करण्यात आला. जगभरात या खुनाचा निषेध झाला. परंतु आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो, अभिजीत रॉय हा बांगलादेश मधील युक्तीवादी कार्यकर्ता होता. यानंतर देखील कट्टरवाद्यांनी निलॉय रॉय नावाचा आमचा आणखी एक कार्यकर्ता संपविला. म्हणून आम्हाला प्रबीरदा यांनी कराटेचे ट्रेनिंग दिले होते, त्याचे महत्त्व आज पटत आहे. सामाजिक काम सध्याच्या काळामध्ये जास्त अडचणीचे होत आहे. फक्त शाब्दिक हल्ल्यावर न थांबता शारीरिक हल्ले तर वाढूच लागले आहेत. प्रबिरदा यांना आपण करीत असणार्‍या कामातील धोके माहीत होते. त्यामुळे त्यांनी स्वसंरक्षणाची जबाबदारी शासनावर विश्वास नसल्याने स्वतः घेतली होती. काही काळ त्यांनी आम्हाला कराटेचे ट्रेनिंग दिले आणि अनेक कार्यकर्ते स्वसंरक्षणासाठी सिद्ध केले.

आधुनिक बुवाबाबांबद्दल युक्तिबादी समितीने कशा प्रकारे लढा दिला आहे?

यावर मनीषने सटीक टिप्पणी केली. “निर्मलबाबा पासून ते मध्य प्रदेशच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम या आध्यात्मिक बुवांना युतिबादी समितीच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. पण कोणीही हे आव्हान अजून स्वीकारलेले नाही. ऐसे भोंदू युतिबादी ते अंनिसचे आव्हान स्वीकारतील तर कैसे?

फक्त पश्चिम बंगालमध्येच नव्हे, तर वेगवेगळ्या ठिकाणी घडणार्‍या चमत्कारांच्या घटनेबाबत प्रबीरदा सजग असत. म्हणूनच महाराष्ट्रामधील बारामती येथील भानुदास गायकवाड नावाचा बुवा जो ‘गोडबाबा’ म्हणून प्रसिद्ध झाला होता. सॅकरिन हाताला लावून वस्तू गोड करणार्‍या या बाबाची पोलखोल करायला प्रबीरदा हे देखील तुमच्या महाराष्ट्रामधील बारामतीला येऊन गेले होते”, अशी माहिती मनीषने दिली.

युतिबादी समितीला जनतेचा आणि बुद्धिजीवींचा पाठिंबा कसा राहिला आहे?

“स्वतःपासून कुटुंबाला सोबत घेऊन चाललेल्या या चळवळीचा जनाधार नंतर वाढत गेला. पश्चिम बंगालमधल्या अनेक मान्यवरांनी याला पाठिंबा दिला. सक्रिय सहभाग दिला. त्यामध्ये फिल्मस्टार अपर्णा सेन व रुपा गांगुली, सुरेंद्र चटर्जी इत्यादी सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार खुशवंत सिंग यांनी देखील पाठिंबा दिला. आमच्या युक्तीबादी समितीचे कायदेशीर सल्लागार म्हणून ज्येष्ठ विधीतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार असलेले विकास रंजन भट्टाचार्य काम पाहतात.

पश्चिम बंगालसोबत आसाम आणि त्रिपुरामध्ये देखील भारतीय विज्ञान ओ युक्तिबादीच्या शाखा सध्या सुरू आहेत. तसेच शेजारच्या बांगलादेशात देखील बांगलादेश युक्तिबादी समिती म्हणून स्वतंत्रपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू आहे.

आम्ही मनीषला मुस्लिम बांगलादेशबद्दल थोडेसे छेडले असता, तो भावनिक होऊन म्हणाला, “आमच्या बंगाल प्रांताचं राजकीय विभाजन झालं म्हणून लोकांची मने वेगळी होत नाहीत. आता पूर्व बंगाल म्हणजे बांगलादेश आणि पश्चिम बंगाल असे दोन वेगवेगळे भाग जरी झालेले असले. तरी आमची बंगाली संस्कृती आणि बंगाली भाषा एकच आहे. त्यामुळे अनेक लोकांचा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येणे जाणे सहजपणे असते. आमचा नझरून इस्लाम बांगलादेशने त्यांचा राष्ट्रीय कवी म्हणून स्वीकारला आहे आणि बांगलादेश हा जगासमोर एक इतिहास आहे की, धर्म माणसाला एकत्रित बांधू शकत नाही. संस्कृती आणि भाषा हीच माणसांना बांधणारी एकमेव शक्ती आहे.”

चमत्काराचा दावा करणार्‍या अनेक बुवाबाबांवर जी कायदेशीर कारवाई केली जायची ती कारवाई कोणत्या कायद्यांतर्गत केली जात असे?

यावर संतोष म्हणाला की, १९५४ च्या ‘इंडियन ड्रग्ज अ‍ॅन्ड मॅजिक रेमेडिज (ऑब्जेक्शनल अ‍ॅडव्हर्टाइजमेंट) अ‍ॅक्ट’ या कायद्यान्वये कारवाई केली जात असे. त्यामुळे आता आम्हाला देखील बंगालमध्ये महाराष्ट्रासारख्या जादूटोणाविरोधी कायद्याची गरज आहे. म्हणून आम्ही जादूटोणाविरोधी कायद्याची मागणी बंगालमध्ये केलेली आहे.

बंगालचा धार्मिक सलोखा

जातीय आणि धार्मिक सलोख्याच्या बाबतीत पश्चिम बंगालमध्ये कशी परिस्थिती आहे? अशी विचारणा केली असता मनीष रॉय म्हणाला की, याबाबतीत आम्हाला आता २०१४ पूर्व आणि २०१४ नंतर असे कालखंड पाडता येतील. जात आणि धर्माच्या बाबतीत तितकासा भावनाशील नसणारा बंगाली २०१४ नंतर प्रचंड भावनाशील होत आहे आणि त्याच्या भावना आता चटकन दुखावू पण लागल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये कधीही साजरी न होणारी रामनवमी २०१४ नंतर साजरी होऊ लागली आहे. त्याच्या रॅली निघू लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा घुमू लागल्या आहेत. दुर्गापूजा आता सरकारी खर्चाने होतात. मोठ्या मशिदीमध्ये इमाम भत्ता दिला जातो. प्रत्येक सरकारी शाळेमध्ये सरस्वती पूजन चालू झालेले आहे. सरस्वती पूजन तर ‘विश्वभारती’ नावाच्या रवींद्रनाथ टागोर यांच्या संस्थेत देखील सुरू आहे. ही सर्व धोक्याची लक्षणे आहेत.

आम्ही भारतीय विज्ञान ओ युतिबादी समितीच्या बोधचिन्हाबाबत विचारलं. मनीष रॉय चौधरी म्हणाला, “चमकती तलवार असे आमचे बोधचिन्ह आहे. विज्ञानाच्या विचाराने तळपणारी तलवार असा त्याचा अर्थ आहे.”

स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आणि समाज सुधारण्याच्या पुनर्जागरणामध्ये पश्चिम बंगालने भारताला खूप काही दिले आहे. साहित्याचे पहिले नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर, जागतिक किर्तीचे स्वामी विवेकानंद, जीनियस शास्त्रज्ञ मेघनाथ साहा, सती प्रथा बंद करायला लावणारे सुधारक राजा राममोहन रॉय, स्वातंत्र्य आंदोलनाचे मुकुटमणी सुभाषचंद्र बोस, आईनस्टाईन सोबत संशोधन करणारे बोस, आईनस्टाईन थिअरीचे जनक जगदीशचंद्र बोस, भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते ज्यांच्या नावे आपण विज्ञान दिन साजरा करतो ते सर सी. व्ही. रमन, भारतात साम्यवादी चळवळ आणणारे एम. एन. रॉय, साहित्यिक महाश्वेतादेवी, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे ते आजचे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, अभिजीत बॅनर्जी; इतके हिरे-मोती बंगालच्या मातीने दिले असून देखील, आज सर्वसामान्यपणे बंगाल, बंगाली बाबामुळे आणि बंगालच्या काळ्या जादूमुळे ओळखला जातोय. हे कशामुळे झाले हा प्रश्न आम्ही विचारल्यावर संतोषने याचे उत्तर दिले. याचा एक मुद्दा लोकांच्या मानसिकतेमध्ये आहे. लोक आजच्या विज्ञान युगात देखील अंधश्रद्धाळू बनत आहेत. आर्थिक आणि सामाजिक अगतिकतेमुळे चमत्कारावर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे बंगाली लोक बंगालच्या विज्ञानवादी चळवळीकडे, समाज सुधारणांकडे न बघता त्यांचे लक्ष बंगाली बुवाबाबाकडे असते. पुढचा दुसरा मुद्दा येथील वास्तवाशी जोडलेला आहे.

बंगाली बाबा, काळी जादू आणि तारापीठ मंदिर

संतोष पुढे सांगू लागला, “५१ शक्तिपीठांपैकी एक शतिपीठ हे पश्चिम बंगालमधील तारापीठ मंदिर आहे. सतीची वेगवेगळी अंगं ज्या ज्या ठिकाणी पडली त्या त्या ठिकाणी शतिपीठ निर्माण झाले अशी पौराणिक कथा आहे. पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यामध्ये एक तारापीठ मंदिर आहे. तारा माँ नावाची देवी ही कालीचं एक रूप मानली जाते. या मंदिराशेजारी असणार्‍या स्मशानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तंत्र, मंत्र, जादूटोणा, काळी जादू शिकवली जाते. ती शिकण्यासाठी अनेक बुवा-बाबा या ठिकाणी येतात. मंत्र, नशापान, मद्यसेवन, मांससेवन आणि महिलांसोबत संभोग ही जादूटोणा करणार्‍या मांत्रिकाची डिग्री घेण्यासाठीची पहिली अट असते. आसाममधील कामाख्या मंदिर. हो, तेच महाराष्ट्रामध्ये गाजलेलं. कामाख्या मंदिरानंतर काळ्या जादूसाठी तारापीठ मंदिराचा नंबर लागतो. त्यामुळेच इथे असले विकृत चाळे करणारे महाराष्ट्रात येऊन बंगाली बाबा म्हणून मिरवतात. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात जाऊन या बंगाली बाबांचं सत्य लोकांना सांगा आणि तुमचे पैसे, सोने, पासून ते तुमच्या आया-बहिणी देखील या बंगाली बाबांपासून यापासून सुरक्षित नाहीत, हा संदेश तुम्ही महाराष्ट्राला द्या.”

बंगालमध्ये ज्योतिषांचे वाढते प्रस्थ :

कोलकात्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड मोठे जोतिष्यांच्या जाहिरातीचे फ्लेक्स लावलेले दिसत होते. याबाबत आम्ही मनीषला विचारले. तो म्हणाला की, कोलकात्यामध्ये ज्योतिषाचा एक खूप मोठा बिझनेस आहे. अनेक सोन्या-चांदीच्या दुकानात ज्योतिषांना स्वतंत्र खुर्ची दिलेली आहे. सोने घेत असताना दागिने आणि अंगठी सोबत नवरत्ने खड्यांचा देखील धंदा मोठ्या प्रमाणात चालतो. त्यासोबत हस्तरेषा बघून ज्योतिष सांगणार्‍यांची पण चलती आहे. प्रबीर घोष यांनी एक आंदोलन चालवले. जे ज्योतिषी व्यवसाय कर भरतात (जो रू.२०० ते ३०० इतकाच असतो.) त्यांच्याकडून हा टॅक्स भरून घेण्यात येऊ नये, असे ते आंदोलन होते. पहिल्यांदा तर आम्हाला ‘ज्योतिषाकडून व्यावसायिक कर शासनाने घेऊ नये’ हे प्रबीरदांचे आंदोलन लक्षातच येत नव्हते. इतक्या छोट्या रकमेसाठी आणि ती रकम तर थेट सरकारी खात्यात जमा होत असताना आपण विरोध का करावा? असा आमचा प्रश्न होता. परंतु मनीष यांनी या मागचे कारण सांगितलं की, कोणत्याही व्यवसायासाठी व्यवसाय कर भरला जातो. अगदी सरकारी नोकरांना सुद्धा तो बंधनकारक असतो. परंतु ज्योतिष हा काही अधिकृत व्यवसाय नाही. तो फसवणुकीचा धंदा आहे. त्यामुळे ज्योतिषी शासनाकडे व्यवसाय कर भरून आपला हा फसवणुकीचा धंदा शासकीय मान्यताप्राप्त करीत आहेत. आणि या निमित्ताने एका बाजूला सरकारी पातळीवर आणि दुसर्‍या बाजूला जनतेच्या दरबारामध्ये ज्योतिष बाबतचे प्रबोधन आपण करीत आहोत. हे सर्व ऐकल्यावर ज्योतिषापेक्षा प्रबीरदाच आम्हाला जास्त भविष्यवेत्ते वाटू लागले.

बंगालमध्ये कायद्याची मागणी, हेच डॉ. दाभोलकरांना अभिवादन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल विचारले असता संतोष म्हणाला की, २० ऑगस्ट २०१३ ला डॉ. दाभोलकरांचा खून झाल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी प्रबीरदांना बंगाल दूरदर्शनवर बोलावले गेले. त्यावेळी त्यांना मुलाखतीत एक प्रश्न विचारला, ‘जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे गोळ्या घातल्या असत्या तर, मारेकर्‍याचा शोध घेतला असता का नाही?’ आजदेखील तोच प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. दाभोलकरांच्या खुनानंतर आमच्या युक्तिबादी समितीची मीटिंग झाली आणि आमच्या लक्षात येऊ लागले की, डॉ. दाभोलकरांचे काम आणि प्रबीरदांचे काम हे जवळपास सारखेच आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दोन कायदे संघटनेच्या जोरावर शासनाकडून करून घेतलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ‘जादूटोणाविरोधी कायदा’ करणेबाबतची मागणी करून डॉ. दाभोलकरांना अभिवादन करण्याचा आमचा सुद्धा मानस आहे. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आम्हाला मदत लागणार आहे.

आम्ही कोलकात्याला जाण्याच्या सहा महिन्यांपूर्वीच प्रबीरदांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले होते. बांगलादेशच्या ‘डेली स्टार’ या इंग्रजी वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण बातमी दिली. ‘झीरलळी ॠहेीह, र्उीीीरवशी रसरळपीीं र्डीशिीीींळींळेप, वळशी रीं ७८.’ ‘प्रबीर घोष, अंधश्रद्धेविरुद्धचा धर्मयोद्धा वयाच्या ७८ वर्षी मरण पावला.’ संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणार्‍या प्रबीरदांनी जाताना शरीर देखील देहदानाच्या माध्यमातून समाजाला देऊन जाणं स्वाभाविक होतं. आता जरा हळहळच वाटली, मागच्या दिवाळी अंकाच्या स्टोरीसाठी आलो असतो, तर या लढवय्या माणसाला भेटता आले असते. काही माणसांबद्दल जी रुखरुख वाटते ती आता कायमच राहील.

आयुष्यभर वैयक्तिक पातळीवर विरोधकांसोबतच स्वकीयांकडून देखील प्रबीरदा यांना त्रास देण्यात आला. प्रसिद्ध करोडपती ज्योतिषी आचार्य सत्यानंदने प्रबीदांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांच्यावर अनेकदा शारीरिक हल्ले तर झालेच, परंतु मोठे ज्योतिषी आणि बुवांच्या सांगण्यावरून प्रबीरदा यांचेवर सीआयडीची धाड टाकण्यात आली. सीआयडीची चौकशी लागली. अगदी विनयभंग, दरोडा यांसारख्या सिव्हिल आणि क्रिमिनल खोट्या केसेस टाकण्यात आल्या. मानसशास्त्राच्या त्यांच्या डिग्रीबद्दल अफवा उठवण्यात आली. परंतु या सगळ्याला पुरून उरत युतिबादी समितीच्या चिन्हाप्रमाणे त्यांच्या ज्ञानाच्या कर्तृत्वाच्या तेजाची झळाळी पश्चिम बंगालच्या भूमीवर झळाळत राहिली. पुढील पिढ्यांना विज्ञानाचे शस्त्र हाती देऊन अंधश्रद्धेच्या अंधकाराविरुद्ध लढण्यासाठी..!

लेखक संपर्क :

फारुक गवंडी : ८७६६९ ८०२८५

राहुल थोरात : ९४२२४ ११८६२


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]