-
३ जानेवारी २०२५ सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनीच सकाळी पेपर वाचायला घेतला आणि एक आश्चर्याचा धक्का देणारी आणि मन सुन्न करणारी बातमी वाचली.
‘भोंदू मांत्रिकाने दिले ३० कोटी, बॉक्स उघडताच निघाली रद्दी.’
सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा, पुरोगामी चळवळीचा जिल्हा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा उगम असलेला बालेकिल्ला मानला जातो. याच सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील दुष्काळी भाग मानल्या जाणार्या माण तालुक्यातील घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपिक म्हणून काम केलेले कांता वामन बनसोडे राहणार देवापूर (ता. माण, जि. सातारा) म्हसवड आरोग्य केंद्रात काम करताना २०२३ रोजी श्री. सर्जेराव वाघमारे यांच्याकडे येत जात होते. ओळखीतून त्यांना श्री. मंगेश गौतम भागवत रा. कवस (ता. इंदापूर, जि. पुणे) हे मायाक्का देवीचे पुजारी असून ते दैवी शक्तीचे व जादूटोण्याचा वापर करून पैशांचा पाऊस पाडून आपल्याकडील रक्कम चक्क २० पट करून देतात, असे सांगितले. हे ऐकून प्रथम बनसोडे यांनी अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही म्हणून टाळाटाळ केली. तरीही भागवत यांनी वारंवार भेट घेऊन “तू माझ्यासोबत चल, मी तुला त्यांना भेटवतो,” असे सांगत गळ घातली. एकदा तर चक्क मंगेश भागवत व त्यांचे सहकारी सर्जेराव वाघमारे बनसोडे यांच्याकडे गेले आणि “जर तुम्ही देवीच्या पूजेसाठी ३६ लाख रुपये दिले तर तुम्हाला ३६ कोटी रुपयांचा हवेतून पैशांचा पाऊस पाडून देतो,” असे सांगितले. तरीही बनसोडे यांनी एवढी रक्कम माझ्याकडे नाही म्हणत नकार दिला. तरीही संबंधितांनी पाठपुरावा सोडला नाही.
काही दिवसांनी वाघमारे हा बनसोडे यांच्याकडे हरिभाऊ काटकर, काशीनाथ पवार, सुनील धोतरे यांना घेऊन गेले. “हे सर्वजण देवीची पूजा करून पैशांचा पाऊस पाडून घेण्यास इच्छुक आहेत. तुम्ही सर्व जण मिळून आम्हाला पूजेच्या साहित्यासाठी ३६ लाख रुपये द्या,” असे सांगितले आणि या आग्रहाला व आमिषाला सर्वजण बळी पडून पैसे देण्यास तयार झाले.
८ एप्रिल २०२३ रोजी सर्वांनी मिळून म्हसवड या ठिकाणी एकत्र येऊन फोन पे, बँक खात्यावरून, रोख रक्कम मंगेश भागवत आणि सर्जेराव वाघमारे यांना देण्याचे ठरवले आणि वेळोवेळी हे पैसे देण्यातही आले.
१ ऑगस्ट २०२३ रोजी मंगेश भागवत व सर्जेराव वाघमारे हे पीडितांच्या घरी आले आणि त्यांना सांगितले की, “आम्ही पूजा केल्यानंतर पैशांचा पाऊस कसा पडतो हे बघण्यासाठी माझ्या घरी कळस येथे चला.” याला भुलून भागवत यांच्या वाहनाने ते कळस येथे गेलेही. भागवत यांच्या घरामध्ये असलेल्या रूममध्ये हळदीकुंकवाचे गोल रिंगण करून त्यामध्ये काळ्या कपड्यांच्या बाहुल्या व पिना टोचलेले लिंबे ठेवून पीडितांना सदर रिंगणात बसण्यास सांगितले व डोळ्यावर पट्टी बांधून मंगेश भागवत व सर्जेराव वाघमारे यांनी मंत्र म्हणत पट्टी सोडण्यास सांगितले. डोळे उघडताच सदर रूममध्ये हळदीकुंकवाचे गोल रिंगण होते त्या रिंगणामध्ये ५०० रु.च्या भारतीय नोटांच्या बंडलांचा ढीग लावलेला दिसला. यामुळेच पीडितांचा या गोष्टीवर विश्वास बसला आणि पैशांचा लोभ झाला. या कारणानेच पीडित व त्यांच्या सहकार्यांनी वेळोवेळी त्यांना ३६ लाख रुपये विविध मार्गांनी दिलेही. प्रत्यक्ष पीडिताने २० लाख, हरिभाऊ काटकर यांनी २ लाख, काशीनाथ पवार यांनी ४ लाख, सुनील धोतरे यांनी २ लाख तर आनंदा पाटील यांनी ८ लाख रुपये दिले.
प्रत्यक्ष पाऊस पाडण्याचा दिवस ठरला. ११ फेबु्रवारी २०२४ रोजी मंगेश भागवत व सर्जेराव वाघमारे यांनी भागवत यांच्या राहत्या घरी- मौजे कळस येथे बोलावून घेतले. ‘आपण आज पैशांचा पाऊस पाडणार,’ असे सांगितलेही. भागवत यांच्या चारचाकी वाहनामध्ये बसवून त्यांच्या घरातून पांढर्या कपड्यांमध्ये बांधलेले चक्क ६ बॉक्स व त्यावर लिंबू बांधलेले असे बॉक्स गाडीमध्ये घेऊन म्हसवड येथील पीडित कांता बनसोडे यांच्या घराजवळ आले. घरामध्ये सर्व बॉक्स ठेवून त्याच्यावर हळदकुंकू टाकून पूजा केली आणि या सर्व बॉक्समध्ये ३६ कोटी रुपये असल्याचे सांगितले. आजपासून बरोबर २१ दिवसांनी अभिषेक घालून सदरचे बॉक्स उघडल्यास घरामध्ये पैशांचा पाऊस पडेल असे सांगितले.
सांगितल्याप्रमाणे बरोबर २१ दिवसांनी मोठ्या आशेने मनोभावे अभिषेक घालून बॉक्स उघडले तर त्या बॉक्समध्ये चक्क वर्तमानपत्राची रद्दी मिळाली. पीडित आणि इतर सहकारी यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ मंगेश भागवत व सर्जेराव वाघमारे यांना फोन करून सदरचा प्रकार सांगितले. तर आश्चर्य म्हणजे त्यांनी पीडितांना चक्क ‘सध्या तुमच्यात गृहदोषमान आहे पुढील १५ दिवसांत पुन्हा पूजा करू त्याशिवाय पैशांचा पाऊस पडणार नाही,’ असे सांगितले.
सदरचा सर्व प्रकार उघडपणे फसवणूक असल्याचे बनसोडे व त्यांच्या सहकार्यांच्या लक्षात आले आणि सर्वांना मोठा धक्काच बसला. आपण पूजा करून हवेतून पैशांचा पाऊस पडण्याच्या बहाण्याने फसलो आहोत याची मनोमन जाणीव झाली आणि पीडितांनी म्हसवड पोलीस स्टेशन गाठले. सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. प्रथम टाळाटाळ करत नंतर फसवणुकीचे गांभीर्य ओळखून म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये दि. ४ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ प्रमाणे व इंडियन पिनल कोड ३१८ (४), ३१६(२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल झाला.
आता खरी गरज आहे अशा प्रकारे दैवी चमत्काराने पैशांचा पाऊस पाडून रक्कम दहापट करून देणार्या संबंधित मांत्रिक मंगेश भागवत व सर्जेराव वाघमारे यांना त्वरित अटक करून त्यांच्या अशा कृत्यात सहभागी असलेल्या सर्व साथीदारांना पकडून कडक शासन करण्याची.
पैशाचा हव्यास माणसाला कोणत्या थरापर्यंत नेतो आणि आहे तोही पैसा माणूस गमावून बसतो, हे याचे जळजळीत उदाहरण आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा भोंदूगिरीच्या प्रकाराविरुद्ध नेहमीच प्रबोधन, संघर्ष करत असतेच. जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात येऊनही आता जवळपास १२ वर्षे पूर्ण होतील. तरीही आज समाजात या कायद्याची गरज असल्याचे या प्रकरणावरून अधोरेखित झाले आहे. कायद्याचा प्रचार, प्रसार, दक्षता अधिकारी यांची प्रत्येक पोलीस स्टेशनला नियुक्ती या निमित्ताने तरी शासन करेल अशी आशा करू या. अशा प्रकरणांमध्ये जनतेने निर्भयपणे पुढे येऊन अंनिस अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करून निर्भयपणे तक्रार दाखल करावी, असे आवाहन या निमित्ताने पुनश्च महाराष्ट्र अंनिस करीत आहे.
– प्रशांत पोतदार, सातारा
संपर्क : ९४२११२१३२८