‘अंनिस’चा आधारस्तंभ कार्यकर्ता : डॉ. अरुण बुरांडे

धनंजय शांताराम कोठावळे -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भोर शाखेचे ज्येष्ठ क्रियाशील कार्यकर्ते, पुणे जिल्हा ‘अंनिस’चे अध्यक्ष, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण बुरांडे यांची मुलाखत वाचकांना व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना निश्चितच प्रेरणादायक ठरेल. आपल्या मुलाखतीत ते म्हणतात,

जातधर्म हे काही खरे नसते, सर्वच माणसे चांगली असतात. त्यांना जात, धर्म नंतर चिकटतात. मग मंगळअमंगळ असे भेदाभेद सुरू होतात. असा नव्या युगाचा, नव्या मनुचा सुंदर नवा संस्कार ‘अंनिस’मध्ये माझ्यावर घडला. माझ्यातील अनेक कुप्रथाकुसंस्कारांची पुटे गळून पडू लागली आणि मी खर्‍या विवेकवादाकडे वाटचाल करू लागलो. ‘अंनिस’मध्ये असणं मला माणूस म्हणून जगण्यासाठी अतिशय फायद्याचं ठरलं.”

अंनिस’ कार्यकर्ता होण्यामागील तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कृपया सांगा.

– माझे मूळ गाव धर्मापुरी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड). घरात वातावरण मिश्र. एका बाजूला देवपूजा, दुसरीकडे दलितांबरोबर त्यांना चहा पिण्यासाठी घराच्या बाहेर ठेवलेली वेगळी कपबशी; तर तिसरीकडे रझाकारांविरुद्ध झालेल्या ‘मिलिट्री अ‍ॅक्शन’वेळी (१७ सप्टेंबर १९४८) मुस्लिम समाजाच्या गरीब, निराधार कोंडिबा आतार यांच्या कुटुंबाला गावाच्या इच्छेविरुद्ध आधार देणे. लिंगायत समाजात चारपदरी फडक्याने गाळून पाणी पिण्याची पद्धत होती. त्यामुळे आमच्या समाजातील लोकांना नारू होत नसे. नारू झाल्यास संबंधित व्यक्तीवर बहिष्कार टाकण्यात येण्याची रुढी होती. गावातील ब्राह्मणसुद्धा अशाप्रकारे पाणी पित नसत. ते सुद्धा अस्पृश्यच आहेत, असे माझी आजी लहानपणी सांगायची. त्यामुळे अशा संस्कारात आम्ही लहानाचे मोठे झालो. माझे आजोबा (महादेवआप्पा शिवलिंगआप्पा बुरांडे) त्या काळी अनेक असाध्य आजारांवर (बहुधा गुप्तरोग) स्वतः औषध तयार करून देत असत, अनेक लोक बरे होत. मग आजारांतून बरे झालेले ते लोक आजोबांना गाय, बैल, बैलगाडी, इमारतीचे लाकूड अशा देणग्या देत असत. आजोबांच्या नंतर माझी आजी (सरस्वती महादेवआप्पा बुरांडे) सुद्धा काही आजारांवर गुणकारी औषधे स्वतः बनवून देत असे; शिवाय आम्हा नातवंडांना आजारी पडल्यास काही भूतबाधा, देवाचा काही त्रास आहे का, हे बघत असे, त्यावर अंगारा पण लावत असे आणि आमचा आजारही (बहुधा व्हायरल अथवा मानसिक) बरा होत असे.

चौथी बोर्डाची परीक्षा देऊन मी सहावीला बार्शी (जि. सोलापूर) येथे घरगुती बिकट परिस्थिती ओढवल्याने स्थलांतरित झालो. सातवीला लिंगायत बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाला. तिथे राहून मी एस.एस.सी. (अकरावी) पास होईपर्यंत सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये (आठवी ते अकरावी) शिकलो. आमचे बोर्डिंग स्मशानभूमीजवळ बांधलेले होते. तिथे रात्री भुते असतात व त्यांचा संचार अमावस्या, पौर्णिमेला, शनिवारी असतो, असे मोठ्या इयत्तेतील मुलांनी सांगितलेले. त्याची मला खूप भीती वाटायची. पुढे, हळूहळू मी मोठ्या इयत्तेत गेलो. रात्री बारा-एकपर्यंत अभ्यास करू लागलो. भुतांची म्हणून जी जागा होती, तिथे १०० वॅटचा दिवा लावून भुतांची काही चाहूल लागते का, हे पाहू लागलो. सर्व संभाव्य संचारस्थळी व वेळी पडताळा घेतला; मात्र भुते आढळली नाहीत. अशी रीतीने माझे भुताच्या भीतीपासून निर्भयतेकडे रूपांतर झाले. आम्ही सर्वच मुलांनी यापुढे भुताच्या खोट्या गोष्टी लहान मुलांना न सांगता त्यांच्यावर निर्भयतेचे संस्कार करायचे ठरवले. अशा प्रकारे ‘जिथे अंधार, तिथे भुते’, ‘जिथे अज्ञान तिथे कुप्रथा’ असा बोध आम्हाला झाला. एक प्रकारचा वेगळाच आत्मविश्वास आमच्या ठायी निर्माण झाला. बहुतेक यातच माझ्यातील ‘अंनिस’ कार्यकर्त्याचे बीजारोपण झाले असावे.

आजूबाजूच्या श्रद्धाळू वातावरणात राहूनसुद्धा तुम्ही वेगळा विचार कसा करू लागलात?

– १९७२ मध्ये एस.एस.सी. उत्तम रीतीने पास होऊन (बार्शी केंद्रात पाचवा क्रमांक) पुढील शिक्षणासाठी मी व माझा मोठा भाऊ पुणे येथे आलो. गरवारे कॉलेज, पुणे येथून F.Y. B.Sc. उत्तम रीतीने पास होऊन १९७४ मध्ये बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलो. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या संत ज्ञानेश्वर वसतिगृह, पुणे येथे तत्कालीन समाजकल्याण मंत्री मा. प्रतिभाताई देवीसिंह पाटील (नंतरच्या काळात भारताच्या राष्ट्रपती) यांनी केलेल्या मदतीने मला प्रवेश मिळाला. तेथे ८० टक्के मागासवर्गीय व २० टक्के आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थी असायचे. तिथे आम्ही एका रूममध्ये पाचजण (विद्यार्थी) असायचो. माझे सर्व सहकारी अत्यंत प्रेमळ, शिक्षणाने वरिष्ठ गटातील (MBBS द्वितीय, तृतीय वर्षातील) होते. मला त्यांनी खूप सांभाळून घेतले, ‘रॅगिंग’ सारख्या कुप्रथेपासून माझे संरक्षण केले. ते सर्व (रूममेट) निर्व्यसनी होते. त्यामुळे मला कुठलेच व्यसन लागले नाही. अभ्यास, व्यायाम, लेवू र्लीळश्रवळपस हे त्यांचे छंद होते. मलाही ते नियमितपणे व्यायामाला जिममध्ये घेऊन जात. त्यांच्यापैकी श्री. एम. आर. डगला व श्री. सुभाष पवार हे ‘श्री. बी. जे.’ स्पर्धेत द्वितीय आले होते. ही सर्व मंडळी अनुसूचित जाती-जमातीची होती. लहानपणीचे माझ्यावर झालेले (त्यांच्याशी संबंध ठेवण्याबाबतचे) संस्कार तर भयानक होते. पण ही मुलं अगदी बंधुतुल्य होती. त्यामुळे लहानपणीचे जातिभेदांबाबतचे कुसंस्कार गळून पडले. जात-धर्म हे काही खरे नसते, सर्वच माणसे चांगली असतात. त्यांना जात, धर्म नंतर चिकटतात. मग मंगळ-अमंगळ असे भेदाभेद सुरू होतात. असा नव्या युगाचा, नव्या मनुचा सुंदर नवा संस्कार आमच्यावर घडला. माझ्यातील अनेक कुप्रथा-कुसंस्काराची पुटे गळून पडू लागली आणि मी खर्‍या विवेकवादाकडे वाटचाल करू लागलो. कदाचित हे संत ज्ञानेश्वर वसतिगृहात राहणं मला माणूस म्हणून जगण्यासाठी अतिशय फायद्याचं ठरलं.

मग तुमचा ‘अंनिस’शी कधी आणि कसा संबंध आला?

– पुढे, मी MBBS, MS Gen. Surgery हे शिक्षण घेत असताना कोणताही रोग गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा भेदभाव न करता सर्वांना होतो, हे दिसून आलं. आपण आता कृत्रिम भेदांच्या पलीकडे जाऊन काम करायला हवं, हे मनामध्ये पक्कं केलं. पुढील काळात मी वैद्यकीय अधिकारी पदावर (१९८४ ते १९९२) कार्यरत असताना, १९९० च्या आसपास डॉ. नरेंद्र दाभोलकर व त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतचे कार्य वर्तमानपत्रात वाचू लागलो. माझी त्यांच्याशी भेट व्हावी असे वाटत होते. पण body building म्हणून असलेल्या रात्रंदिवसाच्या शिबिरांमुळे मला ती भेट घेणे शक्य झाले नाही. फार उशीर होतोय, असे वाटू लागले. मी श्री. गोविंद (नाना) भिलारे, श्री. भोसले (भिवडी, ता. पुरंदर) व त्यांचे S.Y. B.Com. मधील चार मित्र अशा सातजणांसह १९९२ मध्ये माझ्या भोर येथील क्लिनिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भोर शाखेची स्थापना केली. दर रविवारी आम्ही भेटत असू व वृत्तपत्रांतील अंधश्रद्धेच्या व ‘अंनिस’च्या, डॉ. नरेंद्र दाभोलकरांविषयीच्या बातम्यांचे वाचन करून चर्चा करू लागलो. आपल्या आसपासच्या तशा प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवून त्याचीही चर्चा करत असू. १९९७ मध्ये डॉ. दाभोलकरांचे मला पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले की, कॉ. ज्ञानोबा घोणे यांना नुकताच सामाजिक कृतज्ञता निधीचा एस. एम. जोशी पुरस्कार मिळाला आहे, त्यांना संपर्क करून शाखेचे काम वाढवा. त्यानुसार कॉ. घोणे यांना भेटून ‘अंनिस’भोर शाखेचे नव्याने संघटन वाढविले.

अंनिस’ची ध्येयधोरणे सोबत घेऊन जाताना कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी किंवा कार्यक्षेत्रातील सहकारी यांच्यासोबत कधी संघर्षाचे प्रसंग आले का?

– ‘अंनिस’चे काम करताना मला कुटुंबातून १०० टक्के सहकार्य मिळाले. माझी आई देवपूजा करते. आईने तिच्या जातीविषयक अंधश्रद्धा सोडून दिल्या. आता दलित मित्रसुद्धा देव्हार्‍यापर्यंत, स्वयंपाकघरात प्रवेश करू शकतात. पत्नी डॉ. विद्या, मुलगा डॉ. आशिष, सून इंजिनिअर मृण्मयी, कन्या इंजिनिअर कल्याणी मला ‘अंनिस’कार्यात खूप मदत करतात. मित्रमंडळी सहकार्य करतात, प्रोत्साहन देतात; एवढेच नाही, तर ‘अंनिस’ला व माझ्या इतर सामाजिक कार्यांसाठी सुद्धा जरूर तेवढा निधी देतात. खरंतर मित्र आहेत म्हणूनच मी आहे, हे कार्य आहे. ‘अंनिस’चे काम करताना, तात्त्विक चर्चा करताना मित्रांची/इतरांची मने दुखावली जाणार नाहीत, याची मीच माझ्या बाजूने काळजी घेतो. टोकाची किंवा एकांतिक भूमिका घेत नाही. आधीच आपल्या विचारांची माणसे कमी आहेत, त्यांना गमावणे आपल्यासारख्या चळवळीस परवडणार नाही, याची जाणीव सतत मनामध्ये ठेवत आलो. त्यामुळे संघर्षाचे प्रसंग फार कमी आले.

शासकीय नोकरीतील काही अनुभव सांगाल का?

– ग्रामीण रुग्णालय, भोरमध्ये मी १९९४ पासून २०११ पर्यंत कार्यरत होतो. त्यामुळे भोरमधील खूप लोक माझ्यावर स्नेह करू लागले. कधी आजारी पडले व बाह्यरुग्ण विभागातील इतर डॉक्टरांकडून जर आजार कमी झाला नाही, तर ते मेडिकल ऑफिसर त्या लोकांना माझ्याकडे पाठवत असत. तसेच क्षयरोग, कुष्ठरोगाच्या रुग्णांना माझ्याकडे ‘रेफर’ करीत असत. अशा रुग्णांना तपासणीसाठी आजाराचा पूर्वेतिहास घेण्यासाठी, जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागत असत. सरकारी दवाखान्यात सुद्धा एवढी काळजी घेतात, याबद्दल माझे खरे तर अभिनंदन व्हायला पाहिजे होते. परंतु मी रुग्ण तपासणीस वेळ लावतो, अशी एका विचित्र व्यक्तीने वरिष्ठांकडे तक्रार केली. भोरमध्ये दलित रुग्ण माझ्याकडे जास्त प्राधान्याने येतात. परंतु एका विचित्र व्यक्तीने डॉ. बुरांडे दलितांना न्याय देत नाहीत, अशी तक्रार केली. दलित वस्तीतील अनेक व्यक्तींनी मला येऊन स्वतः निवेदन दिले, की आम्ही तुमच्या बाजूने निवेदन देण्यास कोठेही येण्यास तयार आहोत. दलितांसंदर्भात इश्यू केल्याने डॉ. बुरांडे यांना त्रास होईल, अशा भ्रामक कल्पनेपोटी ही तक्रार होती, असे नंतर समजले.

ग्रामीण रुग्णालयात ज्यांचे-ज्यांचे मी ऑपरेशन केले, उपचार केले, क्षयरोग, कुष्ठरोगातून बरे केले, असे शेकडो रुग्ण अनेक सार्वजनिक समारंभामध्ये मला भेटून कृतज्ञता (चरणस्पर्श करून- जे मला आवडत नाही) व्यक्त करतात. असे लोक भेटले की, आपण शासकीय सेवा केल्याचे समाधान मिळते.

शासकीय नोकरीत (वैद्यकीय अधिकारीच्या) मेडिको लीगल केसेस तपासणे, पोस्टमॉर्टेम म्हणजे शवविच्छेदन करणे या अत्यंत नाजूक आणि रिस्की अशा बाबी असतात. माझ्या परिचयाच्या एका मेडिकल ऑफिसरनी (गांभीर्याने काम करण्याचा अभाव असल्याने) पोलिसांनी पंचनाम्यात जे मृत्यूचे कारण दिले होते, तेच आपल्या अहवालात दिले होते (परंतु वस्तुस्थितीला धरून नव्हते). नंतर एका अनोळखी व्यक्तीने; ज्याने खून होताना पाहिले होते, मा. मुख्यमंत्री/ गृहमंत्री यांच्याकडे आँखो-देखा हाल कळवला व पुन्हा पोस्टमॉर्टेम व्हावे, अशी मागणी केली. सी.आय.डी.कडे तपास दिला गेला. मृतदेह काढून वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पुन्हा पोस्टमॉर्टेम केले गेले. आधीच्या अहवालापेक्षा वेगळे असे खून हे मृत्यूचे कारण आढळून आले. हे आणि असे अनेक किस्से मेडिकल सर्कलमध्ये चर्चिले जातात. त्यामुळे मी पोस्टमॉर्टेम अत्यंत काळजी घेऊनच करत असे. बुडून मृत्यू, गळा दाबून मृत्यू, नाक दाबून मृत्यू हे सर्व प्रकार डॉक्टरांना खूप त्रासदायक ठरू शकतात. मात्र मी संपूर्ण नोकरीत खूप काळजी घेतल्याने कोर्टात कधी माझी भंबेरी उडाली नाही. कारण मी प्रत्येक केसचा व्यवस्थित अभ्यास करून कोर्टात साक्षी दिल्या. याचा खर्‍या आरोपीला योग्य ती शिक्षा देण्यास व मयताला न्याय मिळण्यात खूप उपयोग झाला. मी लिहिलेल्या पीएम नोट्स अनेक जण थोडाफार बदल करून तशाच्या तशा लिहितात, असे रेकॉर्ड कीपरने मला सांगितले. याचा उघडपणे ते वैद्यकीय अधिकारी स्वीकार करत नसत. असो.

वैद्यकीय क्षेत्रातील काही उल्लेखनीय कार्य सांगता का?

– १९९० मध्ये माझी प्राथमिक आरोग्य केंद्र, भोर येथे नेमणूक झाली. मी रुजू होताच माझ्या केंद्राच्या शेजारच्या केंद्रात गॅस्ट्रो/कॉलर्‍याचे दोन मृत्यू जोगवडी या गावी झाल्याचे मला तिकडील केंद्रातील एका कर्मचार्‍याने सांगितले. वास्तविक, ते माझे कार्यक्षेत्र नव्हते. परंतु मी त्याचा विचार न करता माझ्या केंद्राचे चार कर्मचारी, प्रतिबंधक उपाय (ब्लीचिंग पावडर), उपचार सामग्री (Cap Tetracycline, Furadone, ORS Packets), सलाईनच्या बाटल्या इ. जीपमध्ये घेऊन तिकडे रवाना झालो. गावात जाताच वयोवृद्ध लोक देवळात बसलेले दिसले; बाकी इतर लोक स्मशानभूमीत अंत्यविधीला गेल्याचे समजले. पाहणी केली असता गावात पिण्याच्या पाण्याची व संडासाची सोय नव्हती. एक माणूस नुकताच पंढरपूरच्या वारीला जाऊन आला होता. पंढरपुरात दोन दिवस जुलाब/वांत्याने तो अ‍ॅडमिट होता. पूर्ण बरा न होताच तो गावी आला होता. बहुधा त्याने उघड्यावर केलेल्या शौचामुळे गावात साथ पसरली होती.

गावातील लोक स्मशानातून परत येताच भोरच्या सरकारी दवाखान्याची जीप मंदिरासमोर पाहून आमच्याकडे आले. त्यांना एकत्र बसवून सर्व माहिती दिली. सर्वांची तपासणी केली, आजारी रुग्णांवर उपचार केले. ग्रामपंचायतीकडे ब्लीचिंग पावडर दिली, विहिरीचे मोजमाप, पाण्याचा साठा कसा मोजावा, त्यावरून किती ब्लीचिंग पावडरची गरज आहे, हे कसे ठरवावे याचे प्रशिक्षण सरपंच, सदस्य, शिपाई, ग्रामसेवक, शिक्षक, पोलीस पाटील, कार्यकर्ते यांना दिले. विहीर पाण्याने भरून वाहत असेल तर सर्वांनी पावसाचे पाणी छतावरून, पत्र्यावरून पिंपात जमा करून गाळून घ्यावे, पूर्ण पावसाळ्यात तेच पाणी प्यावे, हे त्यांना सांगितले. जुलाब झाले तर Cap Tetracycline, ORS Packets चा वापर, त्यांचा डोस याची माहिती दिली. सगळ्या लोकांना धीर देऊन त्यांची भीती दूर केली. ‘कोणीही कोणत्याही अडचणीत मला येऊन भेटावे, मी जरूर मदत करेन,’ असे आश्वासन दिले. त्या काळात नुकतेच Cholera vaccine चा वापर निरर्थक ठरत असल्याचे निदर्शनास आल्याने ते इंजेक्शन दिले जाणार नाही, याचीही माहिती दिली.

अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी झाल्या. बर्‍याच वेळा तहसीलदार मला निरोप पाठवून माहिती कळवीत असत आणि मी व माझी टीम तात्काळ (दोन ते चार तासांत) संबंधित गावी पोचत असू व वरीलप्रमाणे उपाययोजना करून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पुणे यांना अहवाल पाठवला जाई. सन १९९० मध्ये ६०, १९९१ मध्ये ७२ मृत्यू गॅस्ट्रो/कॉलराचे तालुक्यात झाले होते. आम्ही ज्या-ज्या गावी उपाययोजना केल्या, तिथे साथ आटोक्यात येत असे. नवीन मृत्यू झाले नाहीत. पण अतिवृष्टीने, वरील परिस्थितीमुळे, दुर्गम डोंगरी असा भाग असल्याने १९९०-९१ मध्ये सतत हे मृत्यू झाले. हे म्हणजे आग लागल्यानंतर अग्निशमनची गाडी तिथे जावी तसेच आमचे झाले. मग मी विचार केला की पुढच्या वर्षी, १९९२ ला पावसाळ्यापूर्वीच मे महिन्यामध्ये माझ्या भोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ४५ गावांमध्ये साथींचे रोग टाळण्यासाठी ‘जनजागरण अभियान’ सुरू करायचे.

या जनजागरण अभियानाबद्दल जरा सविस्तर सांगा.

– या अभियानाला सर्वांचा पाठिंबा असावा म्हणून मी काढलेल्या पत्रावर माझी सही व त्या बाजूला गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती व सभापती, पंचायत समिती, भोर यांच्या सह्या घेतल्या व ‘आम्ही आमच्या कर्मचार्‍यांसह तुमच्या गावी येऊन (पहिली सभा सायंकाळी सहा वाजता व दुसरी सभा दुसर्‍या गावी रात्री नऊ वाजता) गावात पाणी दूषित कसे होते, ब्लीचिंग पावडर वा ‘मदर सोल्युशन’ टाकून ते शुद्ध कसे करावे, शुद्ध पाणी OrthoToludene test करून कसे ओळखावे, जुलाब, उलटी झाल्यास घरून दवाखान्यात जाईपर्यंत ‘जलसंजीवनी’चा उपयोग कसा करावा, जलसंजीवनी कशी बनवावी, गंभीर अवस्थेत नसलेले व रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील लोकांना Cap Tetracycline किती प्रमाणात द्यावे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवू. तुम्ही आम्हाला ग्रामस्थ एकत्र करून द्या, एक सतरंजी, शक्य असेल तर लाऊड स्पीकरची, लाईटची व्यवस्था करून द्या, बाकी आम्हाला काहीही नको,’ असे पत्र आम्ही आमच्या कर्मचार्‍यांमार्फत ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, दूध सोसायटीचे चेअरमन, पोलीस पाटील यांना पोचवले. त्यानंतर ११ मे ते १ जून १९९२ असे २३ दिवसांत ४५ गावांमध्ये जनजागरण अभियान राबवले. शेवटच्या दिवशी गटविकास अधिकारी श्री. जे. ई. पवार अभियानास उपस्थित राहिले. त्यामुळे हे अभियान सरकारी आहे, असे लोकांना वाटून गेले. वास्तविक, त्या काळात सरकारी जीप बंद होती. माझी हिरो होंडा मोटारसायकल, त्यावर तीन कर्मचारी असे आम्ही चारजण सायंकाळी पाचला भोरमधून निघायचो. गावात जाताच सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना भेटून, घरोघरी जाऊन, लोकांच्या चुलीपाशी जाऊन महिला, पुरुषांना घराबाहेर काढायचो. आमचा एक कर्मचारी तशा स्वरुपाचे आवाहन स्पीकरवरून देवळातून करायचा. अगदी ७० लोकसंख्येपासून ते पाच हजार लोकसंख्येपर्यंत असलेल्या गावांना त्या काळात यानिमित्ताने भेट दिली. काही कार्यकर्ते म्हणाले, “स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्या गावात कधीही राजपत्रित अधिकारी आलेले नाहीत, मग त्यांनी काम करणे तर सोडूनच द्या.” लोक देवळात जमा झाल्यावर आम्ही त्यांच्यातील एकाला, शक्यतो सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांना रीतसर अध्यक्ष निवडायचो. १९९० व १९९१ मध्ये गॅस्ट्रो/कॉलरा साथीच्या परिस्थितीचे अनुभवकथन करायचो. ‘आता साथ येऊच नये, म्हणून आम्ही तुमच्या गावात आलो आहोत. आपण साथ टाळू शकतो, आपले आरोग्य उत्तम ठेवू शकतो,’ असे ठामपणे सांगून पत्रात लिहिल्याप्रमाणे आमचे कर्मचारी प्रात्यक्षिके करून त्यांचे स्पष्टीकरण द्यायचे. त्यातील सगळे प्रयोग लोकांच्या हस्ते देखील करून घ्यायचो.

संपूर्ण अभियान पार पाडत असताना ‘सकाळ’चे वार्ताहर श्री. सहस्रबुद्धे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी वेळवंड, नांदघुर, पांगारी, कोंडगाव या अतिदुर्गम भागात आले होते. मोटारसायकलवरून जाताना चार जणांना त्यांनी पाहिले. सर्व काही विचारले. त्यानंतर त्यांनी १६ जून १९९२ रोजी ‘सकाळ’मध्ये ‘विशेष’ नावाचे पहिल्या पेजवरील एक सदर होते. त्यामध्ये आमच्या अभियानाची माहिती छापली. त्यानंतर पुणे आकाशवाणीवर श्री. प्रमोद चोपडे यांनी माझी मुलाखत घेतली. ती प्रसारित झाली. मी आठ मे १९९२ रोजी या अभियानाचे ‘सायक्लोस्टाइल’ प्राथमिक आरोग्य केंद्र, भोरमध्ये बसून करून घेत होतो. दुसरा शनिवार असल्याने सुट्टी होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सु. ल. सोनवे अचानक आलेले होते. आज सुट्टीच्या दिवशी तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय, असे त्यांनी विचारले. त्यांना सर्व कथन केले. ‘तुम्हाला हे सर्व करायला कोणी सांगितले,’ असे त्यांनी विचारले. त्यावर, ‘इथल्या परिस्थितीने व स्वयंप्रेरणेने,’ असे मी सांगितले. त्यावर, त्यांनी माझे अभिनंदन केले व ‘एक प्रत मला द्या, मी संपूर्ण पुणे जिल्ह्यात हे अभियान करण्याचे आदेश देतो,’ असे सांगितले. त्याप्रमाणे तसे आदेश पुणे जिल्ह्यात निर्गमित केले. वृत्तपत्रातील बातमी वाचून त्या वेळचे जिल्हा आरोग्य अधिकारी व माझे मित्र डॉ. विजयसिंह हिंदूराव मोहिते यांनी सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांसमोर सादरीकरण करण्यास पाचारण केले. तेथे सादरीकरण केले. तेथे सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बेळांबे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, आरोग्य समितीचे सभापती व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने सरपंचांना पत्र पाठवून आवाहन केले. त्यामध्ये, मी केलेल्या सर्व बाबी व काही अतिरिक्त बाबींचाही समावेश केला. वृत्तपत्रातील माझी आलेली बातमी वाचून तत्कालीन सहसंचालक (साथरोग, पुणे) यांनी या अभियानाचा खर्चाचा तपशील विचारला. मला ‘सायकलोस्टाइल’ करण्याचा ६० रुपये खर्च, २३ दिवसांतील पेट्रोल खर्च साधारणपणे १००० रुपये असा १०६० रुपये खर्च आला होता; शिवाय दिवसभर आम्ही आमची ड्युटी करून सायंकाळी पाचला जाऊन दोन गावांत अभियान करून रात्री अकरा-बारापर्यंत भोरला येत असू. त्याचा आम्ही प्रवासभत्ता सुद्धा घेतला नाही. कारण आम्हा सर्वांना लोकसेवेच्या जंतूने पछाडले होते. त्यानंतर डॉ. दामा साहेबांनी ही योजना तत्कालीन संचालकांमार्फत तत्कालीन आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासमोर मांडली. नंतर श्री. शरद पवार यांचा फोटो आणि खाली श्री. शरद पवार यांची स्वाक्षरी असे आवाहन करणारी पत्रे सरपंचांना पाठवली गेली. ते अभियान १ जून ते १५ जुलै १९९३ या काळात राबविले गेले. आम्ही भोरमध्ये १९९२ पासून अभियान सुरू केले होते. १९९२ मध्ये ११, १९९३ मध्ये २ व १९९४ पासून भोर मध्ये शून्य मृत्यू आम्ही साध्य करू शकलो. त्या अभियानाचा लाभ संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा खूप छान झाला. पूर्वी कोणत्याही दैनिकात, महाराष्ट्रात दर पावसाळ्यात गॅस्ट्रो-कॉलरामुळे होणार्‍या शेकडो-हजारो मृत्यूच्या बातम्या छापून येत असत. अभियानानंतर महाराष्ट्रातील वृत्तपत्रांत क्वचितच गॅस्ट्रो/ कॉलराच्या बातम्या येतात. महाराष्ट्रव्यापी अभियानाचा प्रचार डॉ. दामा साहेब जिल्ह्याजिल्ह्यांत आरोग्य अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन करत असत. अभियानाची संपूर्ण माहिती सांगून, ‘हे अभियान तुम्ही यशस्वी करू शकता. कारण ते भोर (जि. पुणे) येथील महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे (MGMOA) कोषाध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे यांनी स्वतः निर्माण करून यशस्वी केले आहे. त्यांच्याकडे मृत्यू ७२ वरून २ वर आले आहेत,’ असेही सांगत असत. १९९३ मध्ये हेच अभियान मी दररोज एक गाव याप्रमाणे १ जून ते १५ जुलैपर्यंत ४५ गावी केले. आता वेळ जास्त होता. आम्ही साथीचे रोग टाळण्याबरोबरच आणखी सहा राष्ट्रीय कार्यक्रमांची (TB, Leprosy, Malaria, Family welfare, Blindness control इतर साथींचे रोग) यावेळेला माहिती दिली. त्यानंतर जमलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी केली. त्याचा ८००० रुग्णांनी लाभ घेतला. १९९४ मध्येही असेच अभियान राबविले. १९९४ पासून आम्ही भोर तालुक्यात गॅस्ट्रो/ कॉलरापासून होणारे मृत्यू शून्यापर्यंत खाली घेण्याचे उद्दिष्ट साध्य केले.

तुम्ही राबविलेल्या या ग्राम अभियानाबद्दलही सांगा.

– १९९४ मध्ये ग्रामीण रुग्णालय, भोरमध्ये माझी बदली झाली. डिसेंबर १९९४ मध्ये शासकीय आदेशान्वये ‘ग्राम अभियान’ आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये अशी कल्पना होती, की तुम्ही जर निःस्पृहपणे रुग्णालयीन सेवा जनतेला देत असाल तर तुम्ही जनतेकडून पाच रुपये देणगी मिळवू शकता. त्या निधीतून रुग्णालयाची छोटी-मोठी कामे करू शकता. आम्ही कार्यरत असलेले ग्रामीण रुग्णालय, भोर १९८२ मध्ये सुरू झाले होते. विविध अडचणींना तोंड देत आम्ही काम करत होतो. कारण शासकीय निधीअभावी खूप छोटी-मोठी कामे खोळंबून राहिली होती. आम्ही पाच-पाच रुपयांच्या पावत्या छापून घेतल्या. २१ हजार रुपयांचा निधी जमा केला. रुग्णालयाला संपूर्णपणे रंगरंगोटी, स्वच्छतागृह- स्नानगृहाची कामे, वॉर्डमधल्या फुटलेल्या फरशा व टाइल्सची दुरुस्ती, बंद पडलेले पंखे; शक्यतो दुरुस्ती व ते शक्य नसेल तर नवीन खरेदी, १५ खाटांच्या वॉर्डमध्ये फक्त दोन ट्यूबलाइट होत्या. त्यानंतर एकेका वॉर्डमध्ये दहा-दहा ट्यूबलाइट लावल्या. हॉस्पिटलचे प्रवेशद्वार दुरुस्ती व बाहेर दोन ओटे नव्याने बांधून घेतले. ‘सुदृढ माता व बालक स्पर्धा’ आयोजित केल्या. प्रत्येकी दहा-दहा बक्षिसे रोख स्वरुपात दिली गेली. सर्व पैशांचा हिशोब उपसंचालक (आरोग्य) डॉ. भातलवंडे यांच्यासमोर; तसेच ३०० स्पर्धकांसमोर व कर्मचार्‍यांसमक्ष जाहीर करून आर्थिक शिस्त व पारदर्शकतेचे पालन केले. ‘जनजागरण’ व ‘ग्राम अभियान’ याबद्दल पंचायत समिती, भोर यांनी माझ्या नावे उत्कृष्ट कार्याचे ठराव १९९२ व १९९५ मध्ये केले. १९८५ पासून १९९९ पर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यात जाऊन हजारो शिबिरांमध्ये स्त्रियांच्या बिनटाक्याची ३२ हजार (टाक्यांच्या शस्त्रक्रियांसह) शस्त्रक्रिया केल्या. त्यामुळे अनेक वेळा पुणे जिल्हा परिषदेमार्फत माझा प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन सत्कार झाला. १९८६ ते ८८ दरम्यान त्या वेळच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन सत्कार केला गेला. तसेच “Asias Who’s Who Reference Asia’ या ग्रंथात माझे नाव प्रसिद्ध झाले. २००७-०८ मध्ये केलेल्या सर्वांगीण शासकीय सेवेमुळे माझे नाव ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कारा’साठी पुणे विभागीय पातळीवर निवडले गेले.

या अभियानांचा तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात कसा फायदा झाला?

– या अभियानांचा आमच्या कामाला नक्कीच फायदा झाला. आम्ही ज्या जनजागरण अभियानात गावागावांत फिरून प्रत्यक्ष उपचार व प्रबोधन करत होतो. ते एक प्रकारे आरोविषयक अंधश्रद्धांच्या विरोधातीलच प्रबोधन होते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे तो जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचाच भाग होता.

तुम्ही तुमच्या मुलाचा आंतरजातीय विवाह सत्यशोधकी पद्धतीने केलात, त्याविषयी सांगाल का?

– आमचा मुलगा डॉ. आशिष याने त्याची जोडीदार निश्चित केली असल्याचे सांगितले. प्रथम मी व पत्नीने सत्यशोधकी पद्धतीने विवाह करण्याचे ठरविले. नंतर मुलाला, माझी आई, भाऊ-वहिनी, बहीण आणि इतर नातेवाईकांना, मुलीला, तिच्या आई-वडिलांना सांगितले. सर्वांना ही कल्पना आवडली. ‘समग्र महात्मा फुले’ या पुस्तकात वाचून सर्वांना हा विवाह कसा केला जातो, हे सांगितले. दोन्ही पक्षांपैकी (वर-वधू) कोणालाही काहीही कर्मकांडे करायची नाहीत, एकमेकांनी एकमेकांसाठी कशाच्याही नावाखाली (पैसे, भांडी, सोने, चीजवस्तू, कपडेलत्ते) कसलाही खर्च करायचा नाही, हे सांगितले. हळद लावणे वगैरे हौसेच्या गोष्टी करू शकतात, समारंभात अगदी कोरडेपणा नको, हे सर्वांना समजून सांगितले, सर्वांना ते पटले.

२१ जानेवारी २०१८ रोजी, सायंकाळी ६.३० वाजता विवाह संपन्न झाला. सुरुवातीला वधू-वर यांची माहिती देण्यात आली. मंडपामध्ये ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी मंगलाष्टिका गायल्या. पौरोहित्य मनीषा महाजन यांनी केले. (पौरोहित्य कोणीही करू शकते, भटजीच पाहिजे, असे नाही). वधू-वर सत्यशोधकी पद्धतीची सप्तपदी चालले. म्हणजे काय, तर मा. शैलाताई दाभोलकर यांनी वधू-वराकडून सात प्रतिज्ञांचे वाचन करवून घेतले. त्यानंतर मा. आमदार संग्रामदादा थोपटे व माजी आरोग्य संचालक डॉ. दामा व माजी मंत्री मा.अनंतराव थोपटे यांनी आशीर्वाद दिले. मंगलाष्टिका गायल्यानंतर वर्‍हाडी मंडळींनी वधू-वरावर फुलांचा वर्षाव केला (यासाठी तांदूळ वाया घालविले गेले नाहीत). नंतर समारंभास उपस्थित सर्व ‘अंनिस’ कार्यकर्ते (मा. मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, माधव बावगे, प्रशांत पोतदार, संजय बनसोडे, डॉ. नितीन शिंदे, भोर, चाकण, पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील ‘अंनिस’ कार्यकर्ते), भोर शहरातील डॉक्टर्स, पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी संघटनेचे (मॅग्मो) पदाधिकारी, विविध क्षेत्रातील नागरिक, पंचायत समिती, भोरच्या सभापती, भोर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सर्व पत्रकार असे सर्व मिळून सुमारे २००० जणांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने १००० पुस्तके (प्रश्न तुमचा, उत्तर डॉ. दाभोलकरांचे) वर्‍हाडी मंडळींना सप्रेम भेट देण्यात आली. संपूर्ण भोर तालुकाभर या सत्यशोधकी आंतरजातीय विवाहाची चर्चा झाली. सध्या राजर्षी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी सुरू आहे. त्यानिमित्त आपण ‘अंनिस’ भोर, फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर आणि बुरांडे हॉस्पिटल, भोरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भोरमध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या २० जोडप्यांचा सत्कार ‘अंनिस’ च्या कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते केला व जातिअंताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला.

अंनिस’चे विविध उपक्रम तुम्ही भोरमध्ये कशाप्रकारे राबविलेत?

– सुरुवातीला आम्ही सर्व कार्यकर्ते नवीनच होतो. त्यामुळे १९९७ मध्ये ६० जणांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर (निवासी) आयोजित केले. त्यानंतर १९९७ ते २००२ अशी ५ वर्षे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची दोनदिवसीय वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबिरे घेतली. या शिबिरांत आरोग्य व अंधश्रद्धा, सर्पविषयक अंधश्रद्धा, स्त्रिया व अंधश्रद्धा, श्रद्धा-अंधश्रद्धा, मन-मनाचे आजार, भूत-देवी अंगात येणे, बुवाबाजीविरुद्ध वैचारिक भूमिका, वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष शास्त्र का नाही?, देव-धर्म-नीती, सत्यशोध प्रज्ञा प्रकल्प, एड्स : जागतिक समस्या व प्रतिबंध, चमत्कार सादरीकरण, यावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरांना लायन्स क्लब, भोरने सहाय्य केले.

२००० ते २००६ अशी सलग सात वर्षे ‘अंनिस’ भोरने विसर्जित गणेशमूर्ती दान व निर्माल्य संकलन मोहीम केली. सुरुवातीला १०५ व शेवटी २५० गणेशमूर्ती जमा झाल्या. मूर्ती जुन्या खाणीत निर्गत केल्या व निर्माल्य नगरपालिकेस खतनिर्मितीसाठी दिले. भोर तहसीलदार, पोलीस अधिकारी, नगरपरिषद, विविध शासकीय अधिकारी, गणेश मंडळे, बजरंग दल, राष्ट्रसेविका समिती, लायन्स क्लब, शैक्षणिक संस्था असे अनेकांचे सहकार्य मिळाले. दरवर्षी स्वतः डॉ. दाभोलकर एका सेलिब्रिटीला आणत असत व त्यांच्या हस्ते पहिली गणेशमूर्ती स्वीकारली जात असे. यामध्ये डॉ. श्रीराम लागू, नटवर्य निळू फुले, संपादक मुकुंदराव किर्लोस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मी नारायण व डॉ. माधवराव सानप आणि पत्रकार संतोष शेणई हे होते. आम्ही केलेल्या उपक्रमाला डॉ. दाभोलकरांनी ‘भोर पॅटर्न’ असे नाव दिले होते. पुढे मा. उच्च न्यायालयाने पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची काळजी घेण्याची जबाबदारी चझउइ व स्थानिक स्वयंसेवी संस्थांवर सोपवली व आपण हा उपक्रम राबवायचे थांबविले. यावरून डॉ. दाभोलकर व ‘अंनिस’ ही खरंच जनआरोग्याची तळमळ असणारे विज्ञानवादी व जुन्या विचारांची चिकित्सा करून विधायक पर्याय देणारे द्रष्टे असल्याचे दिसून येते.

मला साहित्य संमेलनाला हजर राहण्याची फार आवड; पण कामाच्या व्यस्ततेमुळे जमत नसायचे. म्हणून २००४ ते २००७ पर्यंत सलग चार वर्षे विद्यमान साहित्य संमेलन अध्यक्षांची भाषणे भोरमधील नागरिकांसाठी आयोजित केली. रा. ग. जाधव (२००४), केशव मेश्राम (२००५), मारुती चितमपल्ली (२००६), अरुण साधू (२००७) या सर्वांच्या भाषणांनी जनतेला व मला परमानंद मिळाला. तो मिळण्यात डॉ. दाभोलकरांचे फार मोठे योगदान होते. या सर्व वेळी डॉ. दाभोलकर सर स्वतः उपस्थित असायचे. २००२ मध्ये डॉ. लागू व डॉ. दाभोलकर यांचा ‘वाद-संवाद’ कार्यक्रम आयोजित केला. तो भोरमधील वैचारिक विश्वात खूप गाजला. २००३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मा. प. रा. आर्डे, सहसंपादक राजीव देशपांडे, प्रभाकर नानावटी, अनिश पटवर्धन यांनी भोरमध्ये येऊन वाचकांचा, जाहिरातदारांचा, देणगीदारांचा व कार्यकर्त्यांचा न्यायमूर्ती के. के. जहागिरदार यांच्या हस्ते कौतुक समारंभ केला. २००५ मध्ये भोरमधील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान श्रमिक महिलांना मा. पुष्पा भावे यांच्या हस्ते ‘अस्मिता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. भोर शाखेने गेल्या २० वर्षांत जाहिराती व देणगीच्या रुपाने ‘मध्यवर्ती’कडे मोठ्या प्रमाणात निधी पाठवला. त्यामुळे पाच वेळा ‘आधारस्तंभ’ पुरस्कार, ‘कार्यकर्ता’ पुरस्कार व दिवंगत वसंतराव गोळे, ज्ञानोबा घोणे आणि धनंजय कोठावळे यांना ‘शतकवीर’ पुरस्कार देऊन सन्मान केला गेला.

‘महाराष्ट्र अंनिस’ने आयोजिलेल्या विविध उपक्रमांमध्ये भोर शाखेचा सक्रिय सहभाग राहिला आहे. कार्यकर्त्यांनी राज्यव्यापी चमत्कार सत्यशोधन मोहीम, वैज्ञानिक जाणीव कृती परिषद, विज्ञानबोध वाहिनी, सोलापूर येथील महिलांचा जाहीरनामा संकल्प परिषद, राष्ट्रीय स्तरावरील भारतीय विवेकवाद्यांचे अधिवेशन, आंतरजातीय – आंतरधर्मीय विवाहितांचे समर्थन व संघटन परिषद, शासनाच्या वन विभागासह सर्पमित्रांचे पहिले संमेलन, चमत्कार सादरीकरण प्रात्यक्षिके, यात्रा-जत्रांमधील पशुहत्या थांबवण्यासाठी प्रबोधन मोहीम, जटामुक्ती, ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ मोहीम, ‘फटाकेमुक्त दिवाळी’ मोहीम यामध्ये सहभाग घेतला आहे. तपशिलात गेलो तर खूप पाने खर्च होतील. अशा सर्व उपक्रमांमध्ये यशस्वी सहभाग व अंमलबजावणीबाबत डॉ. दाभोलकरांनी सर्व कार्यकर्ते, जाहिरातदार, देणगीदार यांचा मेळावा घेऊन सलग दोन वर्षे (२००४ व २००५) सर्वांना ‘मध्यवर्ती’च्या वतीने मेजवानी दिली आणि जाहीर कौतुक (भोरमध्ये) केले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तर कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान नाही; मग ‘अंनिस’च्या कामाला तुम्ही निधी कुठून आणता?

– १९७७ मध्ये माझे ज्येष्ठ बंधू श्री. गणपत दिगंबर बुरांडे हे कर्वे समाजविज्ञान संस्था, कर्वे रोड, पुणे येथे एम. एस. डब्ल्यू. अभ्यासक्रम शिकत होते. त्या वर्षी दिवाळीत संस्थेने त्यांना इमारत निधी उभा करण्यासाठी रुपये ५० प्रत्येकी पावती अशा दहा पावत्यांचे पुस्तक दिले. भावाला खूप काळजी वाटली की, या पावत्या कोणास द्यावयाच्या व निधी कसा जमवायचा? मी म्हणालो, “दे माझ्याकडे, बघतो मी.” कसा कुणास ठाऊक; पण माझ्यात निधी जमवण्याचा आत्मविश्वास उपजतच असावा. जरी तो माझा पहिलाच अनुभव होता, तरी मला वाटले की, महर्षी कर्वे यांचे महान कार्य ऐकून नक्कीच रक्कम जमा होईल. निधी मी माझ्यासाठी थोडीच मागतोय; संस्थेसाठी मागतोय; देतील अथवा नाही म्हणतील. त्यात काय लाजायचं? त्यावेळी आम्ही बार्शी (जि. सोलापूर) येथे राहत होतो. आम्ही सुरुवातीला बाबूराव लिंगाडे या व्यापार्‍याच्या घरात भाड्याने राहत होतो. प्रथम त्यांच्याकडे मार्केट यार्डला गेलो. त्यांना सविस्तर माहिती सांगितली. त्यांना माझे खूप कौतुक होते. मी अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना वैद्यकीय शिक्षणासाठी गेलो, पुण्यात शिकतोय वगैरे कौतुकपात्र बाबी होत्या. त्यांनी त्वरित पावती घेतली. याचप्रमाणे बहुतेक ठिकाणी अनुभव आला. काही ठिकाणी ‘ती पुण्याची संस्था आहे; बार्शीला तिचा काय उपयोग?’ ‘कर्वे म्हणजे ब्राह्मण; मग त्यांना आपण का मदत करायची?’ वगैरे खुस्पट काढले गेले. त्यांचे शंका-समाधान झाल्यावर त्यांनी मदत केली. दहा पावत्या खपल्या. भावाला ते पाहून खूप आनंद झाला, मलाही खूप आनंद झाला. शाखेला जेव्हा डॉ. दाभोलकरांनी निधी संकलनाविषयी सांगितले, तेव्हा मी ठरवले प्रथम आपण १० हजार रुपये देणगी द्यायची. मग मित्रांना सहकार्‍यांना इतरांना देणगी/ जाहिरात मागायची. मी सहसा स्वतः दिलेल्या देणगीपेक्षा जास्त देणगी मागत नाही. ‘मी १० हजार रुपये दिलेत, तुम्हाला काय द्यायचे ते द्या,’ असे म्हटल्यावर चांगली रक्कम मिळते. हे काहीही असले तरी ‘मध्यवर्ती’ला या माध्यमातून चांगला निधी मिळतो. त्यावरच आपले वर्षभराचे बजेट अवलंबून असते. त्यामुळे कितीही चित्र-विचित्र अनुभव आले, तरी आपण निधी संकलन केलेच पाहिजे, याची खूणगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे. आमचे सहकारी कॉ. ज्ञानोबा घोणे म्हणतात, “लोक जाहिरात/देणगी मागायला गेल्यास आपला अपमान करतात, हे एक प्रकारे बरंच आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून असलेला आपला अहंकार ठेचला जातो व आपले पाय जमिनीवर राहतात. त्याने आपण विनम्र होतो.”

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयी काही हृदयस्पर्शी आठवणी, डॉक्टरांचे आवडणारे पैलू याबद्दल सविस्तर सांगा.

– १९९७ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मला पत्र आले. त्यात त्यांनी, ‘कॉ. घोणे यांना ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ चा ‘एस. एम. जोशी पुरस्कार’ मिळाला आहे, त्यांची ‘अंनिस’च्या कार्यवाढीसाठी मदत घ्या,’ असे लिहिले होते. त्याप्रमाणे कॉ. घोणे यांच्याशी चर्चा करून भोर शहरातील व तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. पहिल्या बैठकीमध्ये ८०-९० जण उपस्थित राहिले. बैठकीमध्ये ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची व्याख्या काय,’ असा प्रश्न आला. माझ्यासह कोणालाही याचा अर्थ, व्याख्या माहीत नव्हती. दाभोलकर सरांशी संपर्क केला, तेव्हा आम्हालाही नीट समजण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगितले व ते आम्हाला द्या, अशी मागणी केली. सरांनी ते मान्य केले. आम्ही लोकवर्गणीतून लायन्स निवासी मूकबधिर विद्यालय, भोर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर (शनिवार-रविवार) ठेवले. त्यामध्ये श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म-नीती, मन-मनाचे आजार, बुवाबाजीविरोधी संघर्ष, सर्पविषयक अंधश्रद्धा, चमत्कार सादरीकरण इत्यादी विषय सरांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी शिकवले. सरांची व आमची भेट सरांच्या साधेपणाची व दिलखुलासपणाची आमच्यावर अमीट अशी छाप पाडून गेली. ‘सर्व कार्यकर्त्यांशी फार जुनी ओळख आहे,’ असे आमच्याशी सर वागत होते. त्यामुळे नंतरच्या काळात प्रत्येक कार्यकर्ता आपली दाभोलकरांशी घनिष्ठ ओळख आहे, असेच वागत होता.

शिबीर संपल्यावर दाभोलकर सर माझ्या घरी आले. घर व हॉस्पिटलचे नुकतेच बांधकाम झाले होते. सरांनी वास्तूचे खूप कौतुक केले. माझ्या मुलांना भेटले, त्यांचेही कौतुक केले. त्यांनी माझी पत्नी व आईबरोबर फोटो काढून घेतले. मी शासकीय नोकरी करीत असून प्रायव्हेट प्रॅक्टिस व नोकरी मॅनेज करतो व ‘अंनिस’चे कामही करतो, या सर्वांबद्दल माझे खूप कौतुक केले. पत्नी व आई सपोर्ट करतात, याबद्दल त्या दोघींविषयी खूप आदराने बोलले. त्यामुळे सरांच्या या पहिल्या भेटीपासून आमचे कुटुंब, मी व माझे ‘अंनिस’ कार्यकर्ते सरांच्या खूप प्रेमात पडलो. त्यामुळे सर पुन्हा-पुन्हा भोरला यावेत, असे वाटत असे. सरांनी सुद्धा आमची ‘ती’ इच्छा पूर्ण केली. सर अनेक वेळा भोरमध्ये आले, आम्हाला मार्गदर्शन केले, आमचे कौतुकही केले, आम्हाला भोरमध्ये येऊन ‘मध्यवर्ती’च्या वतीने मेजवान्या दिल्या. प्राथमिक शिक्षकांची शिबिरे, विसर्जित गणेशमूर्ती दान कार्यक्रमाला दरवर्षी सेलिब्रिटीला घेऊन ते येत असत. सलग चार वर्षे तत्कालिन साहित्य संमेलनाध्यक्षांना सरांच्या प्रयत्नांमुळेच मी बोलावलेले असे. त्यामुळे त्यामध्ये सरसुद्धा आवर्जून उपस्थित असत. लायन्स क्लबच्या वतीने भोरमध्ये प्रांतपालांच्या उपस्थितीत कार्यक्रम (माध्यमिक शिक्षकांचे शिबीर – मी प्रांतपाल यांचा लायन्स क्लबमधील अधिकारी असल्याने) केला. त्या वेळी पण सर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. सुप्रसिद्ध साहित्यिक, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत व दाभोलकर सरांचे भोर तालुक्यात न्हावी या गावी दिवंगत नेते माधवरावजी टापरे यांच्या निमंत्रणावरून व्याख्यान आयोजित केले होते, तेव्हा पण सर आले होते. अशा अनेक वेळा सरांच्या भोर शाखेला भेटी झाल्या आणि मी भरून पावलो. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणानंतर प्राथमिक शिक्षकांची दरवर्षी १०० याप्रमाणे पाच वर्षे ५०० शिक्षक व एका वर्षी माध्यमिक शिक्षकांच्या खास आग्रहावरून १०५ शिक्षकांचे वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबीर असे सहा वर्षे (१९९८ ते २००३) घेतले. प्रत्येक वर्षी दाभोलकर सर आवर्जून येत व प्रशिक्षण देत. त्यामुळे आमचा वैयक्तिक स्नेह सरांशी जुळला व प्रत्येक वेळी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढत गेला.

पूर्वी मी तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवा केली होती. माझे तिथे डॉ. एल. के. कदम व त्यांचे कुटुंबीय, डॉ. एम. बी. गायकवाड, डॉ. राम पोटे (ऑर्थो. सर्जन), डॉ. राजेंद्र शिवले, डॉ. टेमगिरे, डॉ. सौ. टेमगिरे, डॉ. अडागळे, सौ. अडागळे, डॉ. डी. डी. ढवळे व इतर अनेक वैद्यकीय क्षेत्राशी निगडित नसलेल्या मित्रांशी संपर्क आला होता. त्यामध्ये श्री. बापू कुदळे, राजकीय नेते श्री. बाळासाहेब नरके यांचा समावेश होता. सौ. कदम वहिनींनी तळेगाव ढमढेरे येथे ‘अंनिस’ शाखा स्थापन करावी, असे सुचवले. इतर सर्वांशी चर्चा करून तेथे शाखा स्थापन करण्यासाठी डॉ. दाभोलकर सरांना घेऊन तळेगावी गेलो. सर्वांच्या समोर सरांचे ‘श्रद्धा-अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन’ यावर व्याख्यान झाले. शाखा स्थापन झाली. तेथून पुण्याकडे परत येताना, सरांनी मला, ‘आपण जादूटोणाविरोधी कायद्यासाठी अहिंसक पद्धतीने आंदोलन करतो, हे बरोबर आहे का? बरोबर असेल तर कसे आणि चूक असेल तरी कसे? तुला काय वाटतं?’ असे अचानक विचारले. त्यावर, ‘मी आपला अहिंसेचा मार्गच बरोबर आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळविण्यासारखे अत्यंत अवघड ध्येय सुद्धा अहिंसेच्या मार्गानेच साध्य केले; तेही परकीय सत्तेकडून. आपले काम तर त्या मानाने अत्यंत सोपे आहे. कारण आपल्याला आपल्याच सरकारकडून जादूटोणाविरोधी कायदा करण्याचे ध्येय साध्य करायचे आहे. यात सरकारला काहीही गमवायचे नाही, जनतेच्याच भल्यासाठी तो कायदा करायचा आहे. नुकताच अण्णा हजारेंनी ‘माहितीचा अधिकार कायदा’ गांधीजींच्याच अहिंसा व शांततेच्या मार्गाने मिळविला. आपला कायदा होण्याला उशीर जरी लागत असेल, तरी आपला अहिंसेचाच मार्ग बरोबर आहे.’ ते ऐकून सरांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे समाधानाचेच भाव दिसल्याचे मला जाणवले.

शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे मी व माझे लायन्स क्लब, भोर हे सहकारी लायन्स क्लबची स्थापना करण्यासाठी गेली दोन वर्षे चाचपणी करीत होतो. त्याच वेळी तिथे ‘अंनिस’ची शाखा स्थापन करावी, असे मला वाटले.

ठरल्या दिवशी विठ्ठल मंदिर, शिरवळ येथे सभा झाली. दाभोलकरांचे प्रमुख भाषण झाले. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शासकीय विश्रामगृहावर रात्री जेवणाचा कार्यक्रम झाला. तिथून जवळच शिरवळच्या एस.टी. स्टँडवर आम्ही दाभोलकरांना पोचवण्यास गेलो. तीन-चार बसेस खच्चून भरून आल्या व गेल्या. पुढची बस आली. काही प्रवासी उतरले, तरीही बसमध्ये उभे राहिलेल्या प्रवाशांनी सुद्धा बस गच्च भरली होती. रात्री ११.३० ची वेळ. आमच्याकडे सुद्धा त्या वेळी चारचाकी वाहन नव्हते. दाभोलकर बसमध्ये चढले. स्टँडिंगमध्ये आमच्या समोरून वर हात धरून सातार्‍याला गेले. अत्यंत वाईट वाटले. एवढा मोठा विद्वान आपला नेता, दुसरे महात्मा गांधी; पण त्यांना साधी चारचाकी गाडीसुद्धा आम्ही देऊ शकलो नाही? डोळ्यांत पाणी आले. आम्ही मोटारसायकलवर भोरला परत आलो. सकाळी दाभोलकरांना फोन केला. “सर, आमच्याकडे गाडी नाहीय; पण आपण ‘अंनिस’साठी गाडी घेऊया.” त्यावर, “त्याची काही गरज नाही रे. इंधनदर सारखे वाढणार, म्हणजे खर्च वाढणार. वाहनचालकाचा खर्च, दुरुस्तीचा खर्च, त्यापेक्षा आपली सरकारची गाडीच (एस.टी.) बरी,” असे म्हणून त्यांनीच आमचे समाधान केले.

पुढे, सा. रे. पाटील यांनी दाभोलकर सरांना (अं. नि. स. साठी) इंडिका गाडी भेट दिली. ग. प्र. प्रधान सरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. सरांनी मला व भोर शाखेच्या कार्यकर्त्यांना एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमासाठी बोलावले होते. दाभोलकर सर यापुढे या गाडीने भोरला येतील, या कल्पनेने आम्हाला आनंद झाला. मला दाभोलकर सरांचे शिरवळहून एस.टी. बसमध्ये लोंबकळत जाणे डोळ्यांसमोर दिसत राहिले; अजूनही दिसते! डोळे भरून येतात.

तुमच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बरीच कामे झाली, त्याबद्दल काही सांगा.

– माझ्या अध्यक्षपदाच्या कालावधीत (२०१५ ते २०१९) जी कामे झाली, ती सर्व आमच्या टीमने; म्हणजे कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, श्रीराम नलावडे, भारत विठ्ठलदास, मनोहर बापू शेवकरी, ‘पुणे शहर’चे श्रीपाल ललवाणी, माधव गांधी, राजू जाधव, राहुल माने, विवेक सांबरे, डॉ. नितीन अण्णा हांडे, मेघना हांडे, पिंपरी-चिंचवड शाखेचे कार्यकर्ते राजेंद्र कांकरिया, सुभाष सोळंकी, विजय सुर्वे, पुणे जिल्ह्यातील सहकारी व मार्गदर्शक प्रधान सचिव मिलिंद देशमुख, श्री. गिरमे सर, तसेच भोरमधील कार्यकर्ते गोविंद भिलारे, धनंजय कोठावळे, सविता कोठावळे, विवेक पोळ, सुरेश सुतार, अधिकराव सुतार, हसिना शेख आणि पुणे जिल्ह्यातील इतर सर्वच कार्यकर्त्यांनी केलेली कामे आहेत.

सध्या पुणे शहर शाखा, पिंपरी- चिंचवड शाखा, भोर व चाकण शाखा या उपक्रमशील शाखा म्हणून, तर इतर सतरा संपर्क शाखा म्हणून कार्यरत आहेत. या सर्वच शाखांच्या माध्यमातून शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मासिक स्मरणदिनी वि. रा. शिंदे पुलावर मूक मेणबत्ती मोर्चा, निदर्शने असा कार्यक्रम २०१८ पर्यंत केला गेला. मुक्ता व हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी यांच्यासह अनेक पत्रकार परिषदा ‘साधना’ कार्यालयात झालेल्या आहेत. दरवर्षी पुणे शहरातून सेलिब्रिटीच्या उपस्थितीत रॅलीज काढल्या गेल्या. ‘महाराष्ट्र अंनिस’चा रौप्य महोत्सवी कार्यक्रम शिवशंकर सभागृह, पुणे येथे नियोजनपूर्वक संपन्न झाला. ऋखठअ चा कार्यक्रम झाला. जोडीदाराची विवेकी निवड कार्यशाळा झाली. जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांचे दर वर्षी एक याप्रमाणे प्रशिक्षण शिबिरे झाली. प्रतिभा कॉलेज, चिंचवड येथे तीन प्रेरणा मेळावे घेतले गेले. २०१९ मध्ये (७ ते ९ जून) भोर येथे विस्तारित राज्य कार्यकारिणी घेतली. अत्यंत निसर्गरम्य अशा स्काऊट-गाईडच्या कार्यालय परिसरात दिवंगत पद्मश्री डॉ. एन. डी. पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस) यांच्या उपस्थितीत २८५ कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. शहरातून भव्य रॅली (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत) काढली गेली.

आजपर्यंत तुम्ही केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर सामाजिक कामांकडे मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटते?

– शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणाले होते, की अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम काही दशकांचे नसून काही शतकांचे आहे. तेव्हा आपले जे काम चालले आहे, त्याची दिशा बरोबर आहे, अंधश्रद्धा निर्मूलन हे ध्येयही बरोबर आहे, जो मार्ग आपण सर्वांनी विचारपूर्वक निवडला आहे, तोही बरोबर आहे, एवढं मात्र नक्की. आधी महात्मा गांधींचा खून आणि आता डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून. हा भयंकर मोठा धक्का पचवून महाराष्ट्रामध्ये दोन सामाजिक कल्याणाचे कायदे (जादूटोणाविरोधी कायदा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा) आपण करून घेऊ शकलो. तो आपल्या छोट्या लढाईतील विजय म्हणून आनंद आहेच; पण खरे समाधान अद्यापही मिळालेले नाही.

डॉ. अरुण बुरांडे, भोर, जि. पुणे

संपर्क:९८५०७ ३७५९०

संवादक: धनंजय शांताराम कोठावळे, भोर

संपर्क:९५२७२ ६९९८८


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]