28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञानदिनी काही अपेक्षा..

अनिल चव्हाण - 9764147483

28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन मानला जातो. यादिवशी (तरी) विज्ञानासंबंधी माहिती घ्यावी, विचार करावा, अशी अपेक्षा असते.

आज विज्ञानाचे महत्त्व सांगण्याची गरज नाही. विज्ञानाने तयार केलेल्या वस्तूंचा आपण पदोपदी वापर करतो आहोत; त्यामुळे या युगाला विज्ञानयुग म्हणतात.

विज्ञान म्हणजे ज्ञानाचा शोध, बोध व रचना असा अर्थ घेतला जातो. विज्ञान म्हणजे ज्ञानाची रचना तर आहेच; पण त्याचबरोबर ज्ञान मिळविण्याची पद्धतीही होय.

आपण पाहतो, वापरतो त्या वस्तू म्हणजे विज्ञान सृष्टी आहे. या वस्तू शोधल्या, त्या विज्ञान दृष्टीने! त्यालाच वैज्ञानिक पद्धती, वैज्ञानिक द़ृष्टिकोन असेही म्हणतात.

समस्या, तिची व्याख्या, निरीक्षण, नोंद, विश्लेषण, वर्गीकरण, नियोजन, निराकरण, सिद्धांत, कल्पना, सामान्यीकरण, परीक्षण व स्पष्टीकरण या क्रमाने वैज्ञानिक संशोधन केले जाते.

विज्ञान युगाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे गॅलिलिओचे संशोधन! गॅलिलिओने सर्वांत प्रथम दुर्बिणीतून ग्रह-तार्‍यांचा वेध घेतला. सर्व ग्रह-तारे, विश्व, पृथ्वीभोवती फिरते, असा त्या वेळेपर्यंत समज होता; पण त्याला वेगळेच दिसले. त्याने पुन्हा-पुन्हा निरीक्षण केले, अनुमान काढले आणि आपले निष्कर्ष निर्भयपणे समाजासमोर मांडले.

त्याबद्दल धर्मगुरूंनी त्याला पाखंडी ठरवले आणि तुरुंगात टाकले; पण त्यामुळेही सत्य बदलले नाही.

या घटनेवरून वैज्ञानिक दृष्टिकोन, शास्त्रज्ञांचा त्याग, कष्ट, गुण आणि हितसंबंधियांचे वर्तन अशा विविध गोष्टी स्पष्ट होतात.

आपल्या देशात गावापर्यंत सडका गेल्या आहेत. आधुनिक बी-बियाणे, खते, औषधे, अवजारे, ट्रॅक्टर, टू व्हीलर, टी.व्ही., मोबाईल, इंटरनेट अशा अनेक वस्तूंमधून विज्ञान पोचले आहे. शेतकरी आधुनिक शेती करत आहेत. तरीही गावोगाव लाखो लोक जत्रेला जातात. त्यातील हजारो नवस फेडण्यासाठी आणि बोलण्यासाठी आलेले असतात.

अत्याधुनिक संगणकाचे उद्घाटन नारळ फोडून आणि उदबत्ती लावून होते.

आपणही विज्ञानाची सृष्टी घेतली, दृष्टी नाही.

1976 साली आपल्या देशाच्या घटनेमध्ये नागरिकांच्या हक्काप्रमाणे कर्तव्यांचाही समावेश करण्यात आला. त्यातील एक महत्त्वाचे कर्तव्य – “प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य आहे की, तो वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी आणि मानवतावाद यांचा प्रसार करेल.”

त्यानंतरच्या, नवीन शैक्षणिक धोरणाच्या गाभा, घटकामध्ये वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती, हा एक महत्त्वाचा घटक आहे. रोजच्या जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हवा म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती प्रत्येक नागरिकास हवी.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचे उपघटक पुढीलप्रमाणे सांगता येतील.

1) अपुर्‍या माहितीवरून निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. मुस्लिम द्वेषातून काही मंडळींनी ‘हम पाँच हमारे पचीस’ अशी घोषणा तयार केली. त्यांनी एखादे उदाहरण दिले असायचे; पण सरकारी आकडेवारी पाहिली असता, हा प्रचार पूर्णपणे खोडसाळ असल्याचे सिद्ध झाले.

नियमाचे स्वरूप येण्यापूर्वी संशोधक आपले निष्कर्ष सार्वत्रिक करतो. जगभर ते तपासले जातात, मगच त्यांना नियम म्हणून मान्यता मिळते. तरीही ते पुन:पुन्हा तपासले जातात. एखादे औषध उपयोगी आहे का, हे तपासण्यासाठी पुन:पुन्हा अनेक चाचण्या घेतल्या जातात, घाई केली जात नाही.

2) भोळसर समजुतींवर विश्वास ठेवू नये – मांजर आडवे जाणे, डोळा लवणे, पाल चुकचुकणे, यावर शकून-अपशकून ठरवणारे पूर्वीपासून आहेत; पण नुकतेच एका कट्टर ब्राह्मण्यवादी खासदाराने नोटेवर लक्ष्मीचा फोटो छापल्यास रुपया वधारेल, असाही उपाय सुचवला आहे. राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू चिरडणारे संरक्षण मंत्री सर्वांच्या चेष्टेचा विषय झाले. पण ही त्यांची हुशारी होती. पाचशे कोटीचे विमान पंधराशे कोटीला का खरेदी केले, ही चर्चा श्रद्धा-अंधश्रद्धा यावर थांबली. भोळसर समजुतींचा असाही वापर केला जातो.

3) पूर्वग्रहदूषित दृष्टी न ठेवता नवीन कल्पनांचा विचार करावा – हलक्या वस्तूपेक्षा जड वस्तू वरून लवकर खाली पडेल, असे सार्वत्रिक मत होते. पण गॅलिलिओने पिसाच्या मनोर्‍यावरून दोन गोळे एकाच वेळी खाली सोडून हे मत चूक असल्याचे सिद्ध केले. पुरुषांपेक्षा स्त्रियांना दात कमी असतात, हे मत दोन हजार वर्षे तपासलेच गेले नाही. जुन्या मतांचा प्रभाव सर्वत्र दिसतो. आर्य श्रेष्ठत्वाचा प्रचार जर्मन जनतेने न तपासता सत्य मानला आणि हिटलरचा उदय सोपा झाला.

4) प्रयोगाने सिद्ध झाल्यास आपली मते बदलण्याची तयारी हवी. माझेच खरे म्हणू नका, खरे ते माझे म्हणा. शास्त्रज्ञ आपले निष्कर्ष पुन:पुन्हा तपासतात, सत्य सिद्ध झाले, तरच स्वीकारतात. यातूनच विज्ञान पुढे जाते. रोजच्या जीवनातही आपली मते वारंवार तपासून गरज भासल्यास बदलणारेच थोर पदाला पोचतात. आपण थोर समजतो, त्यांची मते अनुभवाने विकसित झालेली, बदललेली उदाहरणे दिसतात.

5) पुरेसा आधार नसेल, तर मोठ्या व्यक्तीचे मतही स्वीकारू नये. ग्रंथात सांगितले आहे, थोर पुरुषांनी सांगितले, मोठ्या पदावरील व्यक्ती सांगते आहे, म्हणून खूपदा विश्वास ठेवला जातो. त्याला ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, बाबा वाक्यं प्रमाण्म म्हणतात. कितीही मोठी व्यक्ती असली, तरी त्यांना काळाच्या मर्यादा असतात; मानवी मर्यादा असतात; पण महापुरुषांच्या विचारांची चिकित्सा करायला आजही अनुयायी तयार होत नाहीत. त्यांना त्यामध्ये आपल्या नेत्याचा अपमान वाटतो. हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरुद्ध आहे.

6) वैज्ञानिक पद्धतीने मिळालेल्या निष्कर्षावर विश्वास ठेवावा.

7) घटनेचा अभ्यास करताना कार्यकारणभावाचा संबंध शोधावा. मुलाच्या किंवा बायकोच्या पायगुणाने नोकरीत बढती मिळाली, कावळा ओरडला आणि पाहुणे आले, मांजर आडवे केले आणि काम फसले. तीन तिघाडा – काम बिघाडा, असे बादरायणी संबंध लावू नयेत.

8) आपली मते वारंवार तपासून पाहावीत, पडताळावीत, चूक असल्यास बदलावीत.

9) समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकावे. मगच आपले मत बनवावे.

10) जेवढा पुरावा तेवढाच विश्वास – भूत आहे का? विहीर खोल आहे का? यावर एखाद्याने मित्राच्या मित्राचा ऐकीव अनुभव सांगितला. दुसर्‍याने वडिलांचा अनुभव सांगितला. तिसर्‍याने स्वत:चा अनुभव सांगितला, तर विश्वासार्ह अनुभव तिसर्‍याचा होय.

11) वैज्ञानिक विचार पद्धती – पुरावा तपासण्यासाठी ही पद्धत वापरतात. त्याचे निरीक्षण, तर्क, अनुमान आणि प्रचिती असे चार भाग आहेत.

न्यूटनने झाडावरून सफरचंद खाली पडताना निरीक्षण केले, त्यावरून दोन वस्तुमानामधील आकर्षणाचा तर्क केला. अनेक उदाहरणांवरून अनुमान काढले व त्याची पुन:पुन्हा प्रचिती घेतली, मगच गुरुत्वाकर्षणाचा नियम तयार झाला.

अनेक वर्षे सूर्य पहाटे सहा ते सातच्या दरम्यान उगवतो याचे निरीक्षण केल्यामुळे उद्याही सूर्य त्याच वेळेत उगवेल असा तर्क करून आपण अनुमान काढतो.

अग्नीमुळे हात भाजतो, याची आपण प्रचिती घेतो. अंगठी किंवा ताईत वापरल्याने नोकरी मिळते, हा निष्कर्ष काढायचा, तर एकाच्या प्रचितीवर चालणार नाही. अनेकांना ती प्रचिती आली पाहिजे आणि त्याची प्रचिती जगात कोठेही आली पाहिजे. म्हणजे प्रचिती, वारंवार आली पाहिजे आणि सार्वत्रिक असली पाहिजे.

12) स्वायत्तता – विज्ञान मानते की, विश्व स्वायत्त आहे. नियम व कार्यकारणभावाने बद्ध आहे. प्रत्येक घटनेमागे कारण असते आणि प्रत्येक कारणाचा परिणाम होतो. कार्यकारणभाव शोधून काढता येतो.

13) निर्भयता – आपल्याला सापडलेले सत्य अनेक वेळा हितसंबंधियांना राग आणणारे असते. अशा वेळी निर्भयता आवश्यक असते. अनेक शास्त्रज्ञांना सत्य सांगितल्याबद्दल रोषाला बळी पडावे लागले आहे.

14) नम्रता – विज्ञान नेहमी नम्र असते. आजपर्यंतच्या संशोधनानुसार हा नियम आहे. उद्या तो कदाचित बदलू शकतो, अशी त्याची भूमिका असते. त्याउलट तथाकथित धर्मवादी आणि त्यांचे भक्त आपल्याला सर्व समजले आहे, असा हट्ट धरतात.

15) प्रश्न विचारणे – विज्ञान म्हणते – ‘प्रत्येक गोष्टीबद्दल शंका घ्या’ या मार्गानेच सत्य सापडू शकते. शाळांमधूनही आता प्रश्न विचारण्यास, उत्तरे स्वत: शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाते. ही सवय रोजच्या जीवनातही लावली पाहिजे. चिकित्सक वृत्तीतून शोध लागले आहेत.

वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या उपघटकांची यादी अजूनही वाढवता येईल. त्यांचा वापर केला, तर दैनंदिन जीवनामधील अनेक समस्या सुटतात.

इतिहासाचा वापर करून राजकारण केले जाते. चिकित्सक वृत्ती असेल, तर आपण त्याला बळी पडणार नाही. महापुरुषांचे दैवतीकरण आणि प्रतिमाभंजन दोन्हीला आळा बसेल.

पुराणकाळी विज्ञान होते. अणूशक्ती, मंत्रसामर्थ्य, टेस्ट ट्यूबबेबी, पशूचे डोके मानवास जोडण्याचे शल्यकौशल्य अस्तित्वात होते; इत्यादी दावे केले जातात. पुराणकाळी ‘एक टाचणी होती’ एवढे सिद्ध करायचे, तर पोलाद शुद्धीकरण भट्टी, टाचणी करणारे मशीन, हे मशीन करणारे यंत्र, त्यासाठी विज्ञानाचे शोध, अभ्यास, यंत्र चालवणारे कामगार, तशी समाजव्यवस्था इत्यादी गोष्टी सिद्ध कराव्या लागतील. उत्खननामध्ये, साहित्यामध्ये यांचे अस्तित्व दिसावे लागेल.

भरमसाठ आश्वासने देणारे राजकारणी जनतेमध्ये चिकित्सक वृत्ती असेल, तर फसवू शकणार नाहीत. असाध्य रोग दूर करण्याच्या, फसव्या उपचार पद्धती रुग्णांना अडचणीत आणताना दिसतात. त्यामागे काही तरी चमत्कार होईल ही मानसिकता आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव असतो. मित्र, सहकारी, नातेवाईकांमधील तंटे खूप वेळा गैरसमजावर आधारित असतात. पुराव्याशिवाय विश्वास ठेवल्याने, आपले मत न तपासल्याने शांंतपणे ऐकून न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे तंटे वाढतात. इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सहकार्‍यांशी भांडणारे दिसून येतात. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारल्यास रोजचे जीवनही सुकर होते.

अलिकडे सोशल मीडिया आणि मेन मीडियामधून खूप माहिती मिळते; पण एकाच उद्योगपतीने अनेक चॅनल्स विकत घेतली असून समाजमन घडवण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे माहिती तपासून घेणे आवश्यक बनले आहे. कितीही मोठ्या माणसाने सांगितले तरी ते तपासल्याशिवाय स्वीकारू नका, हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा भाग आहे. गौतम बुद्धांच्या उपदेशातही तो पाहायला मिळतो.

एखादे मोठ्या माणसाने सांगितले असेल, तर लगेच स्वीकारले जाते आणि छोट्या माणसाने किंवा विरोधकाने सांगितले असेल, तर नाकारले जाते. पैगंबरांचे जावई अलि अहमद म्हणतात – “कोण बोलतो यापेक्षा काय सांगितले जाते, हे महत्त्वाचे.”

चार्वाकांनीही प्रत्यक्ष अनुभवाला सर्वांत जास्त महत्त्व दिले आहे. संत कबीर, संत रोहिदास वारकरी पंथातील संत यांनी समाजाला शहाणे करण्यासाठी अभंग रचना केली. त्यातून वैज्ञानिक द़ृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला दिसतो.

– ‘जाती न पुछो साधूकी। पुछ लिजिए ज्ञान।

मोल करो तलवार का। पडा रहन दो म्यान॥

– ‘नवसे कन्या पुत्र होती, तर का करणे लागे पती?’

अशी अनेक उदाहरणे संत वाङ्मयात मिळतात.

यावरून वैज्ञानिक दृष्टिकोन हा भारतीय परंपरेत पूर्वीपासून असल्याचे दिसते, तो परदेशातून आयात केलेला नाही. इतिहास संशोधक, पुराणकथांमधूनही इतिहास शोधतात. रामकथा सत्य की काल्पनिक यावर वाद आहेत. पण या कथेतून त्या काळचा समाज समजतो, हे खरे आहे. कथा लिहिली त्या काळी राजे लोक रथ वापरत; राज्ये छोटी-छोटी होती; धनुष्यबाणाने व गदेच्या सहाय्याने लढाया होत; स्त्री सत्ताक राज्ये होती; पुरुषसत्ताक राज्येही होती. त्यांच्या चालीरीती, संस्कृती भिन्न-भिन्न होती; लोक वल्कले नेसत; उत्तरिय वस्त्र वापरत; पण अजून कपडे शिवण्याची कला अवगत झालेली नव्हती, हे लक्षात येते. प्राचीन मंदिरामधील देवदेवतांच्या मूर्ती पाहून त्याकाळची वस्त्र प्रावरणे, शस्त्रे, भांडी इत्यादींचा अंदाज करता येतो.

वैज्ञानिक दृष्टिकोन असा सार्वत्रिक उपयोगी आहे. विज्ञान दिनानिमित्त त्याची आठवण करावी. आधुनिक मानवावर विश्वास व्यक्त करताना शहीद भगतसिंग म्हणतात – “माझा माझ्या देशाच्या भवितव्यावर विश्वास आहे. मी विश्वाच्या मानवतेला नव्या युगाकडे वळताना पाहतो आहे. माझा मानवाच्या शौर्यावर त्याच्या बाहुबलावर विश्वास आहे. ”

“प्रेषितांविषयी बोलावयाचे झाल्यास, जर त्यांनी पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता, तर जगाची आज अशी दुर्दशा दिसली नसती. त्यांनी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याऐवजी आकाशात स्वर्ग दाखविला. म्हणून ते निर्माते होऊ शकत नाहीत. आजचा नवा मानव हवेत महाल बांधू इच्छित नाही. त्याने आपल्या स्वर्गाचा पाया पृथ्वीच्या याच भक्कम जमिनीवर खणण्यास सुरुवात केली आहे. आजचा प्रत्येक मानव प्रेषित आहे. म्हणून माझा मानवावर विश्वास आहे.”

प्रधान सेवकांचे विज्ञान आणि विज्ञान दिन

1देशात नवे युग अवतरल्यापासून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या. देश महासत्ता होणार आहे. अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनला पोचणार आहे. तत्पूर्वी काही विषयांना फारच महत्त्व आले. त्यातील एक म्हणजे विज्ञान. काही हुशार लोकप्रतिनिधी तर विज्ञानाच्या मागे हात धुऊन – गोमूत्राने हात धुऊन लागले आहेत.

मंत्री दिलीप घोष म्हणाले – “गायीच्या दुधात सोने असते, त्यामुळे ते पिवळे दिसते” हे ऐकल्यावर काही गुराखी गाय घेऊन बँकेत असते. त्यांचे म्हणणे “सोने तारणावर कर्ज देताय ना! मग आम्हाला दूध तारण ठेवून कर्ज द्या.”

पिवळ्या रंगात सोने असते हे कळल्यावर काही भक्तांनी दात घासायचे बंद केले. आता ते पिवळ्या दातात सोने मिळते का पाहत आहेत. या गोबर महाविद्यालयाच्या प्राचार्या शोभतील साध्वी प्रज्ञासिंग. त्यांनी गोबर आणि गोमूत्राने स्वत:चा कॅन्सर बरा केल्याचा पुरावाच सादर केला. टी.व्ही.वरील चर्चेत सांबा किंंचाळले – ‘गायीचे शेण हिर्‍यापेक्षाही श्रेष्ठ आहे.’

शेणात हिरा, मुताने कॅन्सर बरा, दुधात सोने… वा! वाव!

नव्या भारतात असे अलौकिक प्राणी अजूनही आहेत. राजस्थानमध्ये एका जज्ज साहेबांनी माहिती दिली. ‘मोर मोरनी सोबत कधी सेक्स करत नाही. मोर अश्रू ढाळतो, ते पिऊन लांडोर गर्भवती राहते’ वा! क्या बात है!

महाराष्ट्रात भिडेचा आंबा खाऊन मुले झाल्याचे ऐकले होते. राजस्थान त्याच्याही पुढे गेला.

बिपल देव म्हणतात – ‘महाभारत काळी भारतात इंटरनेट हेते, अंध धृतराष्ट्राला इंटरनेटच्या सहाय्याने, संजयने युद्धाची धावती कॉमेंट्री सांगितली. त्याकाळी नेटपॅक किती सुवर्ण मोहरांचा असे. याबद्दल ते काही बोलले नाहीत.

इंडियन सायन्स काँग्रेस तरी मागे कशी राहील? तिथे विज्ञानाचे प्रा. नागेश्वर राव यांनी रामायण काळात वेगवेगळ्या कपॅसिटीची चोवीस विमाने आणि लंकेत त्यासाठी एअरपोर्टही होते, असे संशोधन सादर केले.

पीयूष गोयलनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात गुरूत्वाकर्षणाचा शोध आइन्स्टाइनच्या नावे करून टाकला. आता न्यूटन रिकामाच आहे.

मंत्री सत्यपालजींनी डार्विनला चॅलेंज केले. ते म्हणतात – “डार्विनने जो थिअरी दी है, वो वैज्ञानिक रुपसे गलत है, उसे चॅलेंज है। जबसे धरती बनी है, शुरूसेही आदमी है और आदमी रहेगा। बंदरसे इन्सान बनते किसीने आज तक देखा नहीं।”

शेतात पीक चांगले यावे म्हणून विजय देसाई यांनी मंत्राचा वापर करण्याचा सल्ला दिला. ते म्हणतात – “रोम रोम जुंक्सा” मंत्र म्हणा; पिकं उत्तम येतात.”

यापूर्वी हत्तीचे डोके मुलाच्या धडावर बसवण्याची शस्त्रक्रिया भारतात होती, याचा निर्वाळा प्रत्यक्ष प्रधान सेवकांनी दिला होता, आता त्यांनी युद्धशास्त्र आणि विज्ञानशास्त्रातही मोलाची भर घातली. रडारला चुकविण्यासाठी त्यांनी ढगांचा उपयोग करण्याचा यशस्वी सल्ला लष्काराला दिला. “इतना क्लाऊड है, बारीश है, तो रडारसे बचने के लिए क्यूं न इतका फायदा उठाएं?”

विज्ञानाचे एवढे अगाध ज्ञान शाळेबाहेर मिळाल्यावर, कोणता पालक, दहा किलोच्या मुलाच्या पाठीवर वीस किलोचा पुस्तकांचा बोजा देऊन शाळेत पाठवेल?

पण काळजी नको. तिथे आता ज्योतिषशास्त्र शिकवायचे आहे. एक मंत्री म्हणतात – “ज्योतिषका तो श्रीमान, लाखों वर्ष का इतिहास है। विज्ञान तो इसके सामने बोना है।”

राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू चिरडणारे संरक्षणमंत्री असल्यावर शत्रूची भीती कसली? सत्तर वर्षे याचा पत्ताच नाही.

देश महासत्ता होणार यात काही शंकाच नाही, असे विज्ञानाच्या सर्व शाखांचे ज्ञान सर्वांना स्फुरावे म्हणून कमी दरात गांजा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भक्तांनी करावी, ही विज्ञानदिनी विनंती.

अनिल चव्हाण


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]