अंनिवा -

‘अंनिवा’च्या डॉ. आंबेडकर विशेषांकचे प्रकाशन
बुद्धीवर आधारित सांस्कृतिक आणि सामाजिक लोकशाही देणारे आणि प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा हक्क, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देणारे संविधान हाच खरा देशाचा धर्मग्रंथ असून हीच आपली खरी जीवनप्रणाली असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केले. ते महात्मा फुले जयंतीदिनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन’ विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन करताना बोलत होते. त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेण्याचा माझा प्रवास’ या विषयावर आपले विचार मांडले.
आपल्या भाषणात डॉ. पटेल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रथम माहितीपट आणि नंतर चित्रपट बनविताना बाबासाहेबाना प्रत्यक्ष भेटलेल्या, त्यांचा सहवास लाभलेल्या व त्यांच्यासमवेत कार्य केलेल्या व्यक्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण विविध अंगांनी सांगितले. तसेच प्रत्यक्ष शूटिंग करताना सर्वसामान्य आंबेडकरी जनतेचे आपल्या नेत्यावरील अलोट प्रेम व उत्साह अनुभवल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धिमत्ता असणार्या माणसाचे मोठेपण लक्षात येते. ते पुढे म्हणाले की, सर्वप्रथम महिलांना बाळंतपणाची रजा देणारे, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज निर्माण करणारे, मजुरांना किमान वेतनासाठी आग्रह धरणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे काळाच्याही पुढे असणारे व्यक्तिमत्त्व होते. चित्रपटनिर्मिती करताना भेटलेल्या असंख्य माणसांचे बाबासाहेबांविषयी अनुभव डॉ. पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविधांगी विचारांचा परामर्ष घेणार्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल 2021 च्या अंकात महाराष्ट्रातील नामवंत लेखक, पत्रकार, कलावंत, डॉ. नागनाथ कोतापल्ले, अजय कांडर, डॉ. शरद भुताडिया, राजकुमार तांगडे, अलका धूपकर, भरत यादव, नरेंद्र लांजेवार आदींचे ‘माझ्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव’, ‘डॉ. आंबेडकर मला असे भेटले…’ या विषयांवरील विशेष लेखन वार्तापत्राच्या या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात विशेषांकाबाबत सविस्तर माहिती वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी दिली. व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी स्वागत करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या ऑनलाईन प्रकाशन समारंभात विशेषांकात लेखन केलेल्या लेखकांसह वार्तापत्राचे सर्व संपादकीय मंडळ, ‘महाराष्ट्र अंनिस’ ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मुक्ता दाभोलकर, व्ही. टी. जाधव, प्रा. प्रवीण देशमुख, अण्णा कडलासकर, निशा भोसले, गणेश चिंचोले, प्रभा पुरोहित, किरण जाधव यांच्यासह ‘महाराष्ट्र अंनिस’चे विविध जिल्ह्यांतील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.