चित्र शिल्पातून दाभोलकर जिवंत!

राहुल थोरात -

सांगलीत कसोटी विवेकाची नरेंद्र दाभोलकर चित्र शिल्प कला प्रदर्शन उत्साहात संपन्न

दिवस पहिला : उद्घाटन सत्र

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रातून, शिल्पातून डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांचा विचार जिवंत ठेवण्याची किमया केली आहे. हे प्रदर्शन विज्ञाननिष्ठा शिकवते. तरुणांपर्यंत विचार पोहोचवायचे असेल तर हे प्रदर्शन ठिकठिकाण भरविले पाहिजे. या शतकातही अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरविल्या जात आहेत. अंधश्रद्धेची बर्लिनची भिंत पाडायचे असेल तर दाभोलकरांसारखे समाजाला जागे करण्याचे कार्य प्रत्येकाने हाती घेतले पाहिजे. कार्यकर्त्यांनी सतत जागृतीचे कार्य सुरू ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

अंनिस सांगली जिल्हा व मराठा समाज संस्थेच्यावतीने येथील मराठा समाज सभागृहात मुंबई येथील जे. जे. स्कूल आर्टस्च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘कसोटी विवेकाची’ नरेंद्र दाभोलकर चित्र शिल्प कला प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. फ्रेंड्स ऑफ दाभोलकर व परिवर्तन संस्थेने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

अध्यक्षपदावरून बोलताना लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, “नरेंद्र दाभोलकर यांनी अखंडपणे सुरू ठेवले. परंतु त्यांचा खून झाला. त्यांच्या खुनाला दहा वर्षेझाली, परंतु अद्याप खुन्याला पकडण्यात यश आले नाही, हे प्रदर्शनात मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये याबद्दल अजूनही उदासीनता आहे. प्रतीकाच्या स्वरुपात प्रदर्शन मांडण्यात आले आहे. ग्रामीण लोकांपेक्षा शहरी लोकांमध्येच अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या दूर करणे आव्हान असते. कारण शहरी लोकांनी अंधश्रद्धेच्याभोवती विज्ञान घेतलेले असते. शहरी लोक झोपेचे सोंग घेतलेले असतात, त्यामुळे त्यांना जागे करणे आव्हान असते. दाभोलकरांचे कार्य अखंडपणे सुरू ठेवण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी सुरू ठेवावे.

या वेळी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, उद्योजक उज्ज्वल साठे, अ‍ॅड. सुभाष पाटील, व्ही. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल थोरात यांनी प्रास्ताविक केले. मराठा समाजाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी स्वागत केले. फारूख गवंडी यांनी सूत्रसंचालन केले. अंनिसचे जिल्हाध्यक्ष बाबुराव जाधव यांनी आभार मानले.

दुसरा दिवस :

अंधश्रद्धा निर्मूलन चित्रकला स्पर्धेस उदंड प्रतिसाद

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली जिल्हा च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेस जवळपास ४० शाळांमधून २७३ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. बाबुराव गुरव यांनी केले. या प्रसंगी विज्ञान लेखक जगदीश काबरे, सामाजिक कार्यकर्ते महेश कराडकर, मराठा समाजचे उपाध्यक्ष ए. डी. पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महावीर अक्कोळे, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे उपस्थित होते.

या वेळी बोलताना विज्ञान लेखक जगदीश काबरे म्हणाले की, या बाल चित्रकारांनी वेगवेगळ्या अंधश्रद्धांवर आधारित चित्रे काढली आहेत. यावरून मुलांच्या मनात अंधश्रद्धा म्हणजे नेमके काय याचा अर्थबोध त्यांना झाला आहे. या चित्रकला स्पर्धेने मुलांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बीज रोवले आहे, हे नक्की. या प्रदर्शनाचे हे सर्वांत मोठे फलित म्हणावे लागेल.

डॉ. बाबुराव गुरव म्हणाले की, ही चित्रे काढणारी मुले वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी नागरिक बनतील अशी आशा आहे.

या वेळी प्रसिद्ध चित्रकार रोहित कबाडे यांनी मुलांसाठी चित्रकला कार्यशाळा घेतली, त्यालाही मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कबाडे यांनी मुलांना आधुनिक पेंटिंग पॅडच्या साहाय्याने कशी चित्रं काढायची याचे खूप सुंदर प्रात्यक्षिक करून दाखवले.

या चित्रकला स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे

मोठा गट : प्रथम क्रमांक कु. ओम नंदकुमार कुंभार ( इ. ९वी, पंचक्रोशी विद्यानिकेतन, निमणी), द्वितीय क्रमांक कु. सिद्धांत शशिकांत सुतार (इ.९वी, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा), तृतीय क्रमांक कु. निनाद गजेंद्र टेके (इ.१० वी, बिसूर हायस्कूल, बिसूर), उत्तेजनार्थ कु. समृद्धी दिगंबर धुमाळ (इ.९ वी, कै. ग. रा. पुरोहित कन्या शाळा, सांगली), साक्षी शैलेंद्र कांबळे (इ. ८ वी, पटवर्धन हायस्कूल, सांगली)

लहान गट

प्रथम क्रमांक – कु. सार्थक नवनाथ पाटील (इ.६ वी, न्यू इंग्लिश स्कूल, बेडग ), द्वितीय क्रमांक – गायत्री श्रीराम भगरे (इ. ७ वी, कै. ग. रा. पुरोहित कन्या शाळा, सांगली), तृतीय क्रमांक – शिवराज प्रसाद फल्ले (इ. ७ वी, इस्लामपूर हायस्कूल, इस्लामपूर), उत्तेजनार्थ – सिद्धि सदाशिव मेलशंकरे (इ.६ वी, सौ. आशालता अण्णासाहेब उपाध्ये गर्ल्स हायस्कूल, कुपवाड), ओम विजय चव्हाण (इ. ७ वी, बाबासाहेब चितळे इंग्लिश मिडीयम स्कूल, भिलवडी)

या स्पर्धेचे परीक्षक सोनाली कांबळे, अपर्णा सूर्यवंशी, रेणू शिंदे, सरिता माने-पाटील यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे संयोजन सांगली शहर अंनिस अध्यक्ष गीता ठाकर, कार्याध्यक्ष आशा धनाले, सचिव डॉ. सविता अक्कोळे, धनश्री साळुंखे, स्वाती वंजाळे, त्रिशला शहा, अमित ठाकर, चंद्रकांत वंजाळे यांनी केले.

तिसरा दिवस :

नरेंद्र दाभोलकर चित्र शिल्प प्रदर्शनाची सांगता

मानव मुक्तीच्या विचाराने भारलेली कला श्रेष्ठ!

प्रा. गौतमीपुत्र कांबळे

आपल्या देशातील केवळ शब्द नव्हे तर रंग, रेषा, सूर आणि नृत्यमुद्राही इथल्या प्रतिगामी संस्कृतीने भ्रष्ट केली आहे, त्यांना पुन्हा मुक्त करणे ही विवेकवाद्यांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन सेक्युलर आर्ट मूव्हमेंटचे राज्याध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले. ते नरेंद्र दाभोलकर चित्र शिल्प प्रदर्शनाच्या सांगता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

प्रा. कांबळे पुढे म्हणाले की, ‘कलावंत जन्माला यावा लागतो. कला ही निर्हेतुक असावी, कलेमध्ये हेतू विचार आणला की त्याचे कला मूल्य कमी होते’ अशा कुविचारांची मांडणी सध्या कलाक्षेत्रात केली जात आहे, हे खूप धोकादायक आहे. खरेतर कला ही मानवमुक्तीच्या विचाराने भारलेली असेल तर ती श्रेष्ठ कला ठरते. कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून क्रांतीच्या बाजूने आणि प्रतिक्रांतीच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे अशी अपेक्षा प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी व्यक्त केली.

देशामध्ये सध्या इतके दूषित वातावरण निर्माण केले आहे की, उद्या चित्रकारांनी अमुक रंग वापरला म्हणून, किंवा अमुक रंग का वापरला नाही? म्हणून प्रतिगामी त्यांचेवर हल्ले करतील, तेव्हा चित्रकारांनी त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे की, रंगावर पहिला हक्क आमचा आहे. रंगाच्या राजकारणाविरोधात चित्रकारांनी आणि पुरोगामी कार्यकर्त्यांनी कृतिशील भूमिका घ्यायची वेळ आली आहे, असे मत प्रा. कांबळे यांनी व्यक्त केली.

अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील म्हणाले की, कला आणि विज्ञान या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, तर त्या एकच आहेत. कलेचा पाया विज्ञान आहे. बुद्धिप्रामाण्यवादी लोक अरसिक असतात असा अपप्रचार केला जातो, पण जगातील महान कलाकार हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, संकुचित विचाराने कलेचा विकास होत नाही. कला ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचे रूप घेऊन पुढे येऊ शकते, हे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून सिद्ध केले आहे. मानवी मूल्यांसाठी चित्र काढणारे चित्रकार हे आमच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहेत.

डॉ. अनिल मडके यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विवेकवाद कलेच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी या कला प्रदर्शनाची मोठी मदत झाली आहे असे मत व्यक्त केले. फ्रेंड्स ऑफ दाभोलकर ग्रुपचे समन्वय पत्रकार सुहास जोशी यांचा सत्कार प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल थोरात यांनी केले तर आभार डॉ. सविता अक्कोळे यांनी मांडले. या सांगता कार्यक्रमाची सुरुवात आज महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘मराठा समाज’चे वॉचमन बाळकृष्ण नलवडे यांचे हस्ते म. गांधीच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली.

या कार्यक्रमास प्रा. अमित ठाकर, ‘मराठा समाज’चे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण, धोंडिराम पाटील, राजीव देशपांडे, सुहास पवार, सुहास यरोडकर, संजय गलगले उपस्थित होते.

या प्रदर्शनास तीन दिवसात सांगली जिल्ह्यातील हजारो कलाप्रेमी नागरिक, पुरोगामी कार्यकर्ते, लेखक, पत्रकार, पोलीस अधिकारी, कबड्डी खेळाडू, सहा शाळांतील विद्यार्थी शिक्षक, चार महाविद्यालय विद्यार्थी प्राध्यापक, अनाथ आश्रमातील विद्यार्थिनी, महिला मंडळे, रोटरी, जायंट्स सदस्य, पर्यावरणवादी यांनी भेट दिली. सांगली जिल्ह्यातील हितचिंतकांनी देणगी देऊन या प्रदर्शनाचा आर्थिक भार उचलला.

प्रदर्शनासाठी मदत करणारे देणगीदार : डॉ. अनिल मगदूम, प्रा. अमित ठाकर, आर्कि. प्रमोद चौगुले, डॉ. अनिल मडके, डॉ. संजय निटवे, जगदीश काबरे, सचिन सरगर, सिद्धनाथ ज्वेलर्स, डॉ. नामदेव कस्तुरे, प्रा. दादासाहेब ढेरे, डॉ. सुधीर कोलप, प्रा. आर. बी. शिंदे, इंजि. कबीर मुलाणी, सचिन काटे, कुंदन सावंत, नंदकुमार चौगुले


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]