अंनिसचा कोरोना योद्धा राजेंद्र निरभवणे यांचे दु:खद निधन

नंदकिशोर तळाशिलकर -

प्रिय राजू,

“तू, आम्हांस सोडून गेलास हे मन मान्य करीत नाही. तू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे सामाजिक काम आजही आमच्या सोबत आहे. नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे असणार आहे.

राजू, तुझी-माझी ओळख पार्ल्यापासूनच. राजू तू जैन ट्रस्ट मेडिकल सेंटर, पार्ले येथे पहिल्यांदा कामाला होतास. तुझ्या सेवाभावी स्वभावामुळे तू गरिबांना औषधपाणी, आरोग्याची तपासणी, चाचणी इत्यादीमध्ये नेहमी मदत करायचा. चार वर्षांपासून बदलापूरला गेल्यावर तू ही नोकरी सोडली. पण पार्ले उपनगरासोबतची तुझी असलेली नाळ कधी तुटली नाही. तू कधीही पार्ल्यात आलास की भाजीवाले, फळवाले तुला नेहमी सलाम ठोकतात, तुझ्या कामाचे कौतुक करतात. तू त्यांना केलेल्या मदतीची आठवण काढतात. अगदी गरिबातल्या गरीब ते श्रीमंत लोकांशी तुझे वागणे आपुलकीचे व सामंजस्याचे असायचे.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या लढाईत तुझा वाटा मोठा आहे. दर अर्थसंकल्पीय, पावसाळी अधिवेशनापूर्वी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा फोन यायचा. डॉक्टर आपल्याला आंदोलनाची तारीख सांगायचे, मग मुंबई टीमचे काम सुरू – पोलिस परवानगी, आझाद मैदानातील मंडप, त्यासाठी मोक्याची जागा निवड, मंडपातील बॅनर, व्यवस्था, कार्यकर्त्यांचे पाणी, नाश्ता, भोजन यांची व्यवस्था यामध्ये जे काही कार्यकर्ते सहभागी असायचे, त्यातील तू एक होतास.

अंधश्रद्धाविरोधी विचारांचा पुस्तकातून प्रसार, प्रचार होतो, याची तुला जाण होती. मुंबईत पुस्तकाचा स्टॉल जिथे असायचा, तिथे तुझा सहभाग हमखास असायचाच. 6 डिसेबरचा चैत्यभूमीच्या स्टॉलवर तर तू आमच्यासोबत शेवटपर्यंत असायचा. याचा फटकाही तू सोसलास. पोलिस स्टेशनही त्यासाठी बघितले. विर्लेपार्ले रेल्वे स्टेशनवर पुस्तक स्टॉलवरील हिंदुत्ववादी संघटनेच्या हल्ल्यात आपल्यावर (राजू, मी व स्वप्नील) अंधेरी रेल्वे पोलिस स्टेशनवर तक्रार केली होती. आपण रात्री तीन तास बसून होतो. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आपण अलका चाफेकर सोबत पोलिस स्टेशनवर आपले म्हणणे मांडले व परवानगी दाखवल्यावर आपली त्यातून निर्दोष सुटका झाली. त्यासाठी आपले अध्यक्ष एन. डी. सरांचा पोलिस स्टेशनला फोन व पोलिस निरीक्षकाला जाब. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणार्‍या कार्यकर्त्यांवर तुम्ही कुठल्या कायद्याने कारवाई करणार ते सांगा. त्यानंतर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे आपल्या तिघांना आलेले कौतुकाचे फोन. डॉक्टरांनी ही घटना वार्तापत्रामध्ये लिहून आपले फोन नंबर दिले. त्यावरून आपल्याला महाराष्ट्रातून येणारे अभिनंदनाचे फोन या सर्व गोष्टींची आठवण येत राहते.

चमत्कार सादरीकरण असो, वार्तापत्र अंकासाठी जाहिरात गोळा करणे असो, राजू तू सोबत असणारच. सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या प्रचार यात्रेत तू गाडी पण माफक दरात दिलीस; सोबत तूही सारथी, साथी म्हणून काम केलेस. त्रिदशपूर्तीमध्ये तर आपलाच कार्यक्रम; मग भाडे कसले? फक्त डिझेल व ड्रायव्हरचा खर्च एवढ्यावर तीन दिवस तुझी गाडी उपलब्ध करून दिली होतीस.

डॉक्टर गेल्यापासून 20 ऑगस्टला आपण ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ सर्व समविचारींना घेऊन दादर प्लाझा ते चैत्यभूमी भव्य रॅली काढतो. त्यास पोलिस परवानगी ते नियोजन अशा संयोजनात तू नेहमीच असायचा.

सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा मुंबईतील पहिलाच गुन्हा. शिवाजी पार्क पोलिस स्टेशनवर तक्रार देऊनही पोलिस अधिकारी कृती करत नव्हते, त्यावेळी चार तास पोलिसांचे प्रबोधन तू, मी, नरेंद्र राणे, विजय परब हे सर्व कायद्याबाबत करत होतो. त्यानंतर पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला. या सर्व लढाईत तू योध्द्याप्रमाणेच लढत होता.

आता आलेल्या कोरोना लढाईतही तू योध्द्यासारखा लढलास रे. तुला धोका माहीत होता. पण या लढाईत लागणार्‍या पोलीस, नर्स, आरोग्य सेवक यांची ने-आण बदलापूर ते मुंबई अशी तू करत राहिलास. यात तुझे सामाजिक भान सतत जागृत होते. राजूने काही काळ ‘पोलिस टाईम्स’मध्ये पत्रकारिता केली होती. मानवाधिकाराचे कामही करायचा.

असा हा राजेंद्र निरभवणे – आमचा राजू – नेहमी हसतमुख चेहरा, कोणाशीही लगेच मैत्री करणारा, आम्हाला 23 जूनला सोडून गेला. हा आमच्यावर मोठा आघात आहे. सुरेखा वहिनी, लाडकी लेक मानसी व परिवाराला जे दुःख झाले, त्यात आम्ही ‘महाराष्ट्र अंनिस’ साथी सहभागी आहोत, कुटुंबासोबत आहोत.

तुझाच साथी

नंदकिशोर तळाशिलकर राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अं.नि.स.