डॉ. हमीद दाभेालकर -
सुनील देशमुख यांचे दुःखद निधन अगदी अनपेक्षित म्हणावे असे होते. डिसेंबरच्या १० तारखेला त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता, तेव्हा त्यांना सयाटिकाचा थोडा त्रास होता आणि २८ जानेवारीला पुण्यात होणार्या महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार कार्यक्रमाला त्यांना येता येणे अवघड दिसते आहे, असे म्हणाले होते. त्यावेळी आता या पुढे त्यांची कधीच भेट होणार नाही, असा विचारही मनात आला नाही. गेल्या काही वर्षांच्या मध्ये त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी थोड्या वाढल्या होत्या. पण हृदयाचे ठोके अनियमित होणे किंवा कर्करोग यासारख्या कोणाचीही झोप उडवणार्या आजारांचा त्यांनी लीलया सामना केला होता. त्यामुळे सहा आठवड्यांपूर्वी जेव्हा त्यांना Guillain – Barre syndrome (GBS) आजार झाल्याचे निदान झाले, तेव्हा देखील ते त्यामधून बाहेर पडतील, अशीच आशा मनाला होती. पण दहा दिवसांच्या पूर्वी त्यांच्या पत्नी प्रतिभा देशमुख यांचा सुनील सरांची तब्येत खराब झाल्याचा आणि त्यांच्या इच्छेचा मान राखून उपचार थांबवत असल्याचा मेसेज आला तेव्हा मनाला मोठा धक्काच बसला. पण परिस्थिती कितीही अडचणीची असो, त्यामधून शांतपणे मार्ग काढायचा सुनील सरांचा स्वभाव हा मृत्यूविषयी निर्णय घेताना देखील दिसून आला. केवळ जिवंत राहिले म्हणून जिवंत राहणे त्यांना मान्य नसल्याने त्यांनी उपचार थांबवून आपल्या जिवलग लोकांच्या सान्निध्यात जीवनाचा निरोप घेणे पसंत केले.
मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ वर्षांचे होते. अमेरिकेत, जिथे लोक आरामात नव्वद वर्षांच्या पुढे जगतात, तिथे ७४ वर्षांच्या सुनील सरांना अजून बरेच दिवस कृतिशील असणार असेच मनात मी धरून होतो. पण तसे होणे नव्हते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. आजाराबाबत ते कायम विनोदाने बोलायचे आणि हसून विषय बदलायचे. अत्यंत आनंदी, उत्साही, प्रेरक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. हॉस्पिटलमध्येच त्यांना स्ट्रोक आला. मेंदूमधील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया असफल झाली आणि ते कोमात गेले. शेवटचे चार दिवस ते कोमात होते. तिथेच त्यांचे पत्नी-मुले आणि अन्य जवळच्या नातेवाइकांच्या सान्निध्यात शांतपणे निधन झाले.
सुनील देशमुख हे मूळचे सांगलीचे. साने गुरुजींच्या वाङ्मयाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या संस्कारात ते लहानाचे मोठे झाले. मॅट्रिकला ते बोर्डात चौथे आले होते. त्यांनी पुण्याच्या ‘सीओईपी’मधून (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. सत्तरच्या दशकात ते अमेरिकेत गेले.
पुढे त्यांनी अमेरिकेत लॉचे शिक्षण घेतले. एम.बी.ए. केले. ‘वॉल स्ट्रीट’वर मोठ्या पगाराची, मोठ्या पदाची नोकरी स्वीकारली. आयुष्यभरची कमाई त्यांनी ‘वॉल स्ट्रीट’वर तेलाच्या वायदेबाजारात पाच वर्षांत केली. यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना त्यांनी अधिक पैसा मिळवण्याचा ध्यास न धरता ‘वॉल स्ट्रीट’ सोडले आणि समाजासाठी, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काही तरी करायचे ठरवले. त्यातून १९९४ साली स्वतःच्या एक कोटींच्या निधीतून त्यांनी ही ‘साहित्य पुरस्कार योजना’ सुरू केली. त्यानंतर दोनच वर्षांनी त्यांनी आणखी एक कोटींची भर घालून सामाजिक कार्य करणार्यांसाठी ‘समाजकार्य पुरस्कार योजना’ जाहीर केली. स्वतःच्या नावाचा आग्रह न धरता ती अमेरिकेच्या ‘महाराष्ट्र फौंडेशन’तर्फे ती कार्यान्वित केली. महाराष्ट्रात त्यांच्याबरोबर त्यावेळी केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या मृणालताई गोरे होत्या. त्यांचे कार्यकर्तेहोते. लोकवाङ्मय गृहाचे प्रकाश विश्वासराव, सतीश काळसेकर ही मंडळी होती. अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. दिगंबर पाध्ये आणि चंद्रकांत केळकर यांचाही या कार्यात सक्रिय सहभाग होता.
महाराष्ट्रातल्या इतर पुरस्कार योजनांपेक्षा पुरस्कारांची रक्कम खूपच जास्त होती. लेखकांच्या मान-सन्मानाला साजेसा शानदार समारंभ पहिल्या वर्षी झाला. काही अभ्यासवृत्तीही देण्यात आल्या. या पुरस्कारांसाठी अर्ज मागवायचे नाहीत, जाणकारांकडून शिफारशी मागवायच्या हे ठरलेलेच होते. पुरस्कारांचे निकष, निवडीची पद्धत ही लोकशाही निकषांवर आधारित आणि निःपक्षपाती अशीच होती.
पुरस्काराचे केंद्र मुंबईतून पुण्यात हलवण्यात आले. दहा वर्षे साधना ट्रस्ट, परिवर्तन संस्था यांच्या सहयोगाने आणि आता महिला सर्वांगीण उत्कर्ष समिती (‘मासूम’)च्या सहयोगाने या पुरस्कार योजनेची कार्यवाही होते. महाराष्ट्रातले कानाकोपर्यातले गुणी साहित्यिक आणि कार्यकर्ते यांचा शोध घेऊन महाराष्ट्र फौंडेशन त्यांच्यापर्यंत जाते. त्यांचा सन्मान करते. आजवर एकूण ३५० ‘साहित्य पुरस्कार’ आणि ‘सामाजिक कार्यकर्ते’ पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
सुनील देशमुखांनी अमेरिकेत पर्यावरणाच्या क्षेत्रातही अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल् गोर यांच्याबरोबर कार्य केलेले आहे. अमेरिकेतले सर्वांत वरचे दहा उद्योगपती घेतले तर त्यांनी आपली ९९ टक्के संपत्ती सामाजिक कार्याला दिलेली आहे. वॉरन बफे, बिल गेट्स, जॉर्ज सोरॉस अशांचा आदर्श देशमुखांनी आपल्यासमोर ठेवलेला होता. त्यांचे उदाहरण देऊन सुनील देशमुख म्हणायचे, सामाजिक बांधिलकीची ही जाणीव अमेरिकन उद्योगपतींत दिसते, पण भारतातल्या उद्योगपतींत का दिसत नाही? ही सुनील देशमुखांची खंत होती
सुनील देशमुख यांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर विशेष प्रेम होते. त्यांचा भक्कम पाठिंबा अंनिसच्या कामाला होता. डॉ. दाभोलकर यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्र फौंडेशनचा पहिला सामाजिक कार्य पुरस्कार महाराष्ट्र अंनिसला देण्यात आला होता. त्यानंतर दशकातला सर्वोत्तम कार्यकर्ता हा पुरस्कार (रुपये १० लाख) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना महाराष्ट्र फौंडेशन, अमेरिका यांच्यावतीने अमेरिका येथे बोलवून दिला होता. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाच्या नंतर देखील ते तितक्याच खंबीरपणाने अंनिसच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्याच पुढाकाराने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार महाराष्ट्र फौंडेशनने सुरू केला. त्या पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. महाराष्ट्रातील १६ हजार शाळांना ‘अंनिवा’ चालू करण्याच्या उपक्रमाचे प्रयोजकत्व देखील त्यांनी केले होते. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे समवयस्क आणि मित्र असले तरी कोणत्याही व्यक्तीशी चटकन मैत्री करण्याची त्यांच्याकडे कला होती. अंनिसच्या महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखत असत. परदेशात राहून देखील आपल्या मायदेशातील समाज आणि साहित्य यांच्याविषयी एवढे ममत्व राखणारा माणूस विरळा. बहुतांश न्यूज पोर्टल रात्री ज्या बातम्या, लेख upload करतात, ते लेख सुनील सरांनी मियामीमध्ये दिवस असल्याने आपण सगळे झोपेत असतानाच वाचलेले असत. महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींची इत्यंभूत माहिती आपल्या आधी बारा तास त्यांना असायची. डॉ. नरेंद्र दाभोलकर जेव्हा ‘साधना’चे संपादक झाले, तेव्हा सुनील सरांनी ‘शबनम’ आणि ‘चोपडीपलीकडे’ हा लेख ‘साधने’साठी लिहिला होता. सामाजिक चळवळीची परखड परीक्षा त्या लेखात केली होती. सामाजिक चळवळींनी आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान यांची कास धरणे किती आवश्यक आहे, याविषयी ते सुरुवातीपासून आग्रही होते. धर्माच्या नावाने केल्या जाणार्या राजकारणाला त्यांचा ठाम विरोध होता. विवेकवाद हा त्यांच्या जगण्याचा श्वास होता. अमेरिकेतील विवेकवादी चळवळीचा त्यांचा विशेष अभ्यास होता आणि त्या मधल्या अनेक लोकांशी त्यांचा व्यक्तिगत संपर्क होता. भारतातील विवेकवादी परंपरेचा अभ्यास करून त्याविषयी लेखन करण्याचा त्यांचा एक महत्त्वाकाक्षी प्रकल्प गेली काही वर्षे त्यांनी हाती घेतला होता.
आपल्या मृत्यूनंतर लोकांनी शोक करत बसू नये, यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच इच्छेनुसार फ्लोरिडा येथे पार्टीचे आयोजन केलेले आहे. सुनील देशमुख आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे हे कार्य आपण सर्वांनी आपले मानून पुढे नेण्याची गरज आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते त्यांना विनम्र अभिवादन करीत आहेत.
–डॉ. हमीद दाभेालकर