मृण्मयी उदय चव्हाण -
माझा जन्म अशा कुटुंबात झाला की जिथे बाळांना समजायला लागल्यावर देवबाप्पा करा, असं सांगितलं जातं ते माझ्या कुटुंबात कधीच ऐकायला मिळालं नाही. पण हसत खेळत संस्कार मात्र झाले आणि मग विवेकी पद्धतीने घडत गेले. दोन्हीकडच्या आजी (दोन्हीकडच्या आजोबांना मी पाहिलंही नाही) थोड्या पारंपरिक विचाराच्या होत्या, पण अगदी दैववादी नव्हत्या. त्यांनीही आमच्यावर कधी बंधने घातली नव्हती. कदाचित आई-वडिलांचे विचार त्यांना पटले असावेत म्हणूनच त्यांनी तसा आग्रह केला नसावा असे मला वाटते. माझ्या किंवा छोट्या बहिणीच्या विचारांमध्ये विवेकी विचारांची बिजे तेव्हापासून रुजत गेली.
लहानपणी मला वाईट वाटायचं की सगळ्यांपेक्षा आपण वेगळ्या विचारांचे का बरं? जसे विसर्जित गणपती दान करा मोहिमेच्या वेळी दीड किंवा पाच दिवसांनी जाणारे गणपती ज्यांना तळ्यावर किंवा नदीवर जाणे शक्य नाही ते आमच्या घरी आणून द्यायचे. तेव्हा वाटायचं, आपणही घरात गणपती बसवावा. पण जसं कळत गेलं तसा तो विचार परत मनात आला नाही. मी आणि माझी बहीण तन्मयी, डॉ. दाभोलकरांना आजोबा म्हणायचो. मी लहान असताना बाबांकडे ते काही कामासाठी आले की ते मला त्यांच्या स्कूटरवरून एक फेरी मारून आणायचेच. (तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती.) त्यानंतर मी मोठी होत गेल्यावर जेव्हा ते घरी यायचे तेव्हा मला आपल्या घरी कोणीतरी मोठे सेलिब्रिटी आल्याचा आनंद व्हायचा. मी दहावीत असताना मे २०१३ मध्ये असेच एकदा ते घरी आले होते. मला बघून त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले की, ‘अरेच्या इतकी मोठी झाली पण पटकन…’ मला असं वाटतंय की, काल परवाच मी उदय-संगीताचं लग्न लावलंय. (त्यांनीच माझ्या आई-बाबांचे लग्न कुटुंबप्रमुखासारखं पुढं बघून केलेले आहे.) मला वाटतं, तीच त्यांची आणि माझी शेवटची भेट होती. डॉक्टरांचा खून झाल्यानंतर पुढे काही दिवसात गणपती होते आणि गणेशोत्सव कार्यक्रमांमध्ये बाबा चमत्काराचा कार्यक्रम करण्यासाठी चालले होते. कार्यक्रमाची बॅग घेऊन बाहेर पडत होते तेव्हा छोटी बहीण तन्मयी म्हणाली, “कुठे चाललाय?”
बाबा म्हणाले, “कार्यक्रमाला.”
ती पटकन म्हणाली,” डॉक्टर आजोबांचे काम आपल्याला करायचेय ना, मग जा!”
तेव्हा तर ती चार वर्षांची होती. म्हणजेच आपले बाबा काहीतरी चांगले काम करतायत हे तिलाही जाणवत होते. मी बालवाडीत असताना आमच्या मैत्रिणींमधला संवाद आठवतो, की जो नंतर मला एकदा बाबांनी सांगितला होता. तो असा की त्या मैत्रिणी म्हणायच्या, ‘देव आहे!’ आणि मला प्रश्न पडला, ‘तो कुठे आहे?’ म्हणून मी घरी येऊन बाबांना विचारले की, ‘बाबा, मैत्रिणी म्हणतात देव आहे तर मी त्यांना काय सांगू?’ आई-बाबांनी हसत हसत उत्तर दिले की ‘माणसात देव आहे असे सांगायचे!’
स्त्री अंधश्रद्धेची वाहक आहे असे म्हटले जाते. पुरुष जरी वेगळ्या विचारधारेचा असला तरी त्याची पत्नी किंवा घरातील स्त्री तशी असेलच असे नाही. पण माझी आई कोणत्याही प्रकारची कर्मकांडे घरात करत नाही, उलट तिच्या महाविद्यालयातील विद्यार्थी या अंधश्रद्धेच्या कर्मकांडात अडकू नयेत म्हणून ‘विवेक वाहिनी’सारखे उपक्रम राबवून या कामाचा प्रसार करत असते किंवा जेव्हा कुणी इतर महिला भेटतील तेव्हा कर्मकांडांना फाटा देऊन नवीन पर्याय सुचवत राहते. याचाही प्रभाव आमच्यावर पडत राहिला आहे.
लहान असताना लक्षात येऊ लागले, सगळ्यांपेक्षा आपण वेगळ्या विचारांचे का बरं? मैत्रिणींच्या घरी सगळे सण असायचे. माझ्या घरी सणाला गोडधोड व्हायचं, पण अगदी त्याच दिवशी केले जायचे असे नाही. कधी संध्याकाळी किंवा सुट्टीच्या म्हणजे आमच्या सोयीच्या दिवशी केले जायचे. मैत्रिणींना आश्चर्य वाटायचं की यांच्या घरात देवाधर्माचं कसं काहीच करत नाहीत? पण आई-बाबांबरोबर समितीच्या किंवा इतर समविचारी कार्यक्रमाला गेल्यावर तिथे डॉ. दाभोलकरांची किंवा बाबांची किंवा इतर कार्यकर्त्यांची व्याख्याने ऐकल्यावर कळत गेलं की आपण विवेकी विचाराचं असणं का महत्त्वाचं आहे ते. आणि असे आपण आहोत असा विचार करून आपण तसे असल्याचा अभिमान वाटत गेला. मी माझे विचार एखाद्याला ठामपणे सांगू शकते इतका आत्मविश्वास आता माझ्यामध्ये आलेला आहे. मला आजवर जे यश मिळाले आहे ते कुठल्याही देवाधर्माचा आधार न घेता मिळालं आहे. त्यामुळे उपवास करून, रोज पूजा करून यश मिळतं यावर माझा विश्वास नाही. उलट त्यातून बराच वेळ व पैसा वाचतो, हे माझ्या अनुभवावरून मी माझं मत ठरवत आले आहे.
सध्या मी नोकरीच्या निमित्ताने एक महिन्यापूर्वी जपानला आली आहे. माझे ज्येष्ठ सहकारी जे माझ्या आधी इथे आले आहेत तेव्हा इकडे येण्यापूर्वी त्यांनी घरात पूजा करणे, देवदर्शनाला जाणे हे केलं होतं, कारण परदेशात सगळं नीटनेटकं व्हावं यासाठी त्यांनी हे केलं होतं. पण मी येताना यातलं काहीच केलं नाही. माझ्यासाठी कामातला प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे व तो असेल तर यश नकी मिळेल ही भावना ठेवून मी इकडे आले. इथले लोकही कामात प्रामाणिक आहेत.
स्त्री-पुरुष समानता यावर चालणारे घर मी स्वतः पाहिलं आहे. त्यामुळे पुरुषांची कामे, स्त्रीची कामे असा विचार माझ्या मनात जराही येत नाही. मला माझं कुटुंबसुद्धा असंच घडवायचं आहे. आई नोकरी करते. (म्हणजे बाबा सामाजिक कामात आहेत तर आर्थिक बाजू ती सांभाळते.) सकाळी जाण्याची गडबड, बाबा तिला घरकामात मदत करत असल्याने तिचा बराच भार कमी होताना मी पाहिलाय. त्यामुळे संसार आणि सहजीवन यातील फरक मी नकीच जाणते. लग्नामध्ये फार पैसा खर्च न करता तोच पैसा भविष्यासाठी तरतूद म्हणून वापरता येऊ शकतो अशा मताची मी आहे.
हा विवेकाचा आवाज बुलंद करायचा हा संकल्प आहे.
(मृण्मयी ही जपान येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.)