-
अंधश्रद्धा दूर करायची असेल तर संतांचे विचार वाचणे आवश्यक – डॉ.प्रसन्न दाभोलकर
सध्या ज्ञानापासून समाजाची नाळ तुटत आहे. अशाने समाज पुढे जाणार नाही. सातशे-आठशे वर्षांपूर्वी आपल्या संतांनी दिलेले विचार टिकणे व ते रुजवणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा दूर करायची असेल, तर आपण आत्मनिर्भय झाले पाहिजे. यासाठी संतांचे विचार वाचणे आवश्यक आहे.’ असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्न दाभोलकर यांनी व्यक्त केले.
जीवनात जगायचे कसे? याचे मार्गदर्शन पुस्तकेच करतात. पुस्तके ही मुलांच्या हातात गेली पाहिजेत. तरच ती विचार करायला लागतील अन् विचार करायला सुरुवात झाली की, विवेक जागृत होतो, याची सुरुवात स्वत:पासून करावी. काही लोक पुस्तके न वाचताच टीका-टिप्पणी करतात. धमक्या देतात. त्यांनी प्रथम पुस्तके वाचावीत, असे आवाहन या वेळी डॉ. प्रसन्न दाभोलकर यांनी केले.
सातार्यातील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा आयोजित व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रकाशित संत विचाराचे अभ्यासक अॅड. देवदत्त परूळेकर लिखित वारकरी संतांची अंधश्रद्धा निर्मूलनावरील विवेकी ग्रंथमालेचा लोकार्पण सोहळा लेखिका प्राचार्या डॉ. शैलजा माने यांच्या हस्ते रविवारी सातारा शहरातील भाऊसाहेब सोमण सभागृहात पार पडला. या वेळी ते बोलत होते. राज्य अंनिस अध्यक्ष प्राचार्या प्रमोदिनी मंडपे, डॉ. राजेंद्र माने, अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र झूटिंग उपस्थित होते. डॉ. शैलजा माने म्हणाल्या, ‘जे मनाने खचले-पिचले आहेत असेच लोक बुवा-बाबांच्या नादी लागतात. यात महिलांचे प्रमाण अधिक असले, तरी त्यांना तेथे पोहोचवणारे पुरुषच असतात. महिलांनी याकडे डोळसपणे पाहायला हवे.’
प्राचार्या प्रमोदिनी मंडपे म्हणाल्या, “आजही लोक भोंदूबाबाच्या नादाला लागतात. खरे साधू कोण हे आपणाला ओळखता आले पाहिजे. महिलांनी आत्मनिर्भय झाले पाहिजे.” या वेळी दत्तात्रय मोहिते, डॉ. मोहन सुखटणकर, डॉ. नीला उत्तेकर, शीला जाधव, प्रदीप कांबळे, गौतम भोसले, प्रकाश खटावकर, वसंती घाडगे, सुधाकर शिंदे, निलेश पवार, भगवान रणदिवे, डॉ. श्यामला माने, दीपक माने, अंकुश शेलार, आर. बी. विसापुरे, ओंकार पाटील, सत्यवती भोसले, विजय पवार, कुंदप उपस्थित होते. उदय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय मोहिते यांनी आभार मानले.
