वरून कीर्तन, आतून तमाशा

दीपक राजाध्यक्ष -

भारतीय लोकशाहीचा दर पाच वर्षांनी साजरा होणारा ‘उत्सव’ म्हणवल्या जाणार्‍या लोकसभा आणि काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाचा निकाल लागला आणि निवडणुकांच्या उत्सवाचा झालेल्या तमाशाप्रमाणेच या निकालाद्वारे न्यायप्रक्रियेचा ‘निकाल’ लागल्याचं पाहून अधिक हताश वाटू लागलं आहे.

मूलत: या निकालास अकरा वर्षं लागली हाच मोठा अन्याय…त्यात दोन आरोपींना शिक्षा, तीन निर्दोष मुक्त आणि मूळ सूत्रधाराचा तर अद्याप मागमूसही नाही असा अर्धवट निकाल लागला. किंबहुना, निकाल ‘लावला गेला’ आहे; त्यामुळेच हा केवळ निकाल आहे, न्याय नव्हे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

ही प्रक्रिया म्हणजे वरून कीर्तन, आतून तमाशा याहून वेगळी नाही. अलीकडे भारतात विविध न्यायालयांकडून लागलेले निकाल विशेषत: सर्वोच्च न्यायालयाकडून लागलेले विविध मुद्यांवरचे निकाल हे ‘न्याय’ तत्त्वाचा किती पाठपुरावा करतात याबद्दल कुठच्याही विवेकी व्यक्तीस शंका उत्पन्न करणारे आहेत. उदा. बिल्कीस बानो आणि तिच्या कुटुंबीयांवर अत्याचार करणार्‍या आणि त्यातील अनेकांच्या हत्या करणार्‍या आरोपींना ते ब्राह्मण आहेत आणि त्यांचं तुरुंगातलं वर्तन चांगलं होतं, म्हणून गुजरात उच्च न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा असलेल्या आरोपींना शिक्षेतून मुक्त केलं… या किळसवाण्या प्रकाराने पुढे त्यांचे सत्कार, जंगी (विजयी!!!) मिरवणुका असा एकेका पायरीने कळस गाठला. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर पुन्हा त्यांना तुरुंगात शरण जावं लागलं.

डॉ. दाभोलकर हे अशा परंपरेचे पाईक होते जी संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम ते पुढे संत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, सुधारक गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे या आणि अशा अनेकांनी समृद्ध केली.

कुठच्याही धर्मातील श्रद्धेवर यापैकी कुणाचाही आक्षेप नव्हता, पण अंधश्रद्धा माणसांचं आणि पर्यायाने समाज, देशाचं मोठं नुकसान करतात. ते थांबवण्यासाठी या सगळ्यांनी जिवाचं रान केलं.

डॉ. दाभोलकर यांनी स्थापन केलेली ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ आणि तिचं सातत्यपूर्ण कार्य हा आधुनिक भारतातील या विषयातला महत्त्वाचा टप्पा.

संत परंपरा जशी आणि जितकी शांत, मृदू आणि आध्यात्मिक तितकीच बंडखोर. या परंपरेत सगळ्याच स्त्री- पुरुष संतांनी तत्कालीन व्यवस्थेला जाब विचारत समाजाला स्फूर्ती, प्रेरणा देत सभ्य, विवेकी, सुसंस्कृत जगण्याचा मार्ग दाखवला आहे.

जात-धर्म-पंथ-वंश या विखारी साखळीतून आणि त्यातील अंधश्रद्धांमधून बाहेर पडल्याशिवाय गती नाही, हे स्वत:च्या जगण्यातून सिद्ध करत आदर्श घालून दिला आहे. त्या काळात त्यांना आणि अर्वाचीन काळात अलीकडच्या सुधारकांना प्रखर विरोध झाला.

शिक्षणाने विवेकी विचार घडत जातो, त्यातून प्रश्न पडू लागतात आणि मग उत्तर शोधण्याची निकड निर्माण होते… डॉ. दाभोलकर आणि समिती हाच विचार सप्रमाण सातत्याने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.

राजकीय वरदहस्त मिळवत एकेकाचं स्तोम माजतं, हल्ली अशिक्षित माणसांच्या बरोबरीने किंवा त्याहून अधिक शिक्षित माणसांचा भरणा वाढता वाढता वाढे…असा आहे. या सगळ्यातून होणारे गुन्हे भयावह आहेत आणि ते वाढत चालले आहेत, नको तिकडे नको तितका पैसा खर्च करूनही शून्य फायदा होतोय, पण ऐकतो कोण…

अशा बधिर समाजाला जागृत करत, खुनाच्या धमक्या धुडकावून लावत डॉ. दाभोलकर त्यांच्या सहकार्‍यांसह फिरत होते… पण आपली दुकानं बंद होतील या भीतीने त्यांचा खून केला गेला. संत परंपरेपासून महात्मा गांधी मार्गे विचार न पटलेल्या माणसांना संपवून टाकण्याची ही हिंदुत्ववादी परंपराही डॉ. दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशी सुरूच आहे आणि त्यांच्या जयंती/पुण्यतिथी दिनी त्यांना अभिवादन केलं की आपण आपलं कर्तव्य पार पाडलं असं मानून घेत, स्वस्थ बसत आपणच आपल्या हिंदू धर्मातली ही कर्मदरिद्रताही जोपासत आहोत.

रामायण, महाभारत या महाकाव्यांना हिंदू धर्मग्रंथ मानणारे जोवर सजग होत नाहीत तोवर न्यायाऐवजी मिळणारे निकाल केवळ सुनावण्याच होत चालल्या आहेत हे समजल्याशिवाय ना न्यायव्यवस्था सुधारेल ना सरकार जागं होईल!

झिंदाबाद आहेच!

दीपक राजाध्यक्ष

प्रसिद्ध दिग्दर्शक


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]