राजस्थानमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन अभियान चालविणारे आय.पी.एस. किशन सहाय

राहुल थोरात -

आपण दरवर्षी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकामध्ये देशभरातील इतर राज्यात जे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सुरू आहे, त्याचा परिचय वाचकांना करून देत असतो. या आधीच्या वार्षिक अंकातून आपण आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे.

          यावर्षीच्या अंकात आपण राजस्थानमधील ‘मानवतावादी विश्व समाज’ या संघटनेच्या कामाचा परिचय करून देत आहोत. या संस्थेचे संस्थापक आयपीएस किशन सहाय यांची अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात आणि रमेश माने यांनी घेतलेली मुलाखत तसेच या संस्थेच्या कार्यकर्त्या सोबत झालेल्या बैठकीचा वृत्तांत देत आहोत.

          राजस्थानमध्ये असलेल्या विविध अंधश्रद्धा ज्यामध्ये लहान मुलांना डंभा देणे, महिलांची पर्दा पद्धत, दलितांना घोड्यावर बसू न देणे, त्यांना मिशा वाढवण्यास विरोध करणे अशा अमानुष प्रथांचा आढावा आही या लेकात घेतला आहे. त्याचबरोबर भुताचे गाव म्हणून प्रसिद्धीस आलेले ‘कुलधरा’ आणि भारत पाकिस्तान बॉर्डरवर असलेले तनोट माता मंदिरात पाकिस्तानी बॉम्ब न फुटण्याच्या चमत्काराचा खुलासाही या लेखात आम्ही केला आहे. राजस्थानमध्ये २०१५ साली झालेला ‘चेटकीण प्रथा प्रतिबंध कायदा’ याचीही माहिती या लेखात आहे.

          राजस्थानमधील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची सविस्तर माहिती असलेला हा रिपोर्ताज…

            भारतीय पोलीस सेवेतील (IPS) एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले किशन सहाय हे त्यांच्या प्रशासकीय जबाबदार्‍यांबरोबरच त्यांच्या स्पष्ट आणि तर्कशुद्ध विचारांसाठी अधिक ओळखले जातात. राजस्थान केडरचे अधिकारी असूनही, त्यांचे विचार केवळ एका विशिष्ट प्रांतापुरते मर्यादित नसून, त्यांनी भारतातील सामाजिक आणि धार्मिक रूढीवादी विचारधारेला थेट आव्हान दिले आहे. ते सध्या राजस्थान पोलीस दलामध्ये मानव अधिकार विभागाचे आय.जी. म्हणून काम करतात.

अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी मूल्यांची स्थापना, हे त्यांच्या वैचारिक कार्याचे मूळ आहे. या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते ‘मानवतावादी विश्व समाज’ नावाचे वैचारिक संघटन एक मिशन म्हणून चालवतात.

किशन सहाय हे ग्रामीण राजस्थानमधील एका गरीब कुटुंबातून आले असल्यामुळे, त्यांनी लहानपणापासूनच धार्मिक रूढी, अंधश्रद्धा आणि जातिभेदावर आधारित सामाजिक विषमता जवळून अनुभवली आहे. या अनुभवांनीच त्यांना हे पटले आहे की, केवळ कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे पुरेसे नाही, तर लोकांच्या मनात विज्ञान आणि तर्कवादाचे ‘राज्य’ प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, अंधश्रद्धा ही सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीला खतपाणी घालते.

एका उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकार्‍याने ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या संवेदनशील विषयांवर आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीमध्ये जाहीरपणे भाष्य करणे हे सोपे नाही. किशन सहाय यांना त्यांच्या वैचारिक भूमिकेसाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे. प्रशासनात राहून सत्य आणि तर्क मांडण्याचे धाडस दाखवल्यास मोठ्या अडचणी येत असतात, पण त्यावर किशन सहाय यांनी त्यांच्या निर्भीड आणि प्रामाणिक स्वभावामुळे मात केली आहे.

किशन सहाय यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची मुळे त्यांच्या शैक्षणिक आणि व्यतिगत प्रवासात रुजलेली आहेत. त्यांनी जयपूर येथील प्रतिष्ठित मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणातून आलेले हे ज्ञानच त्यांच्या तर्कवादाचा पाया आहे. त्यांना जगातील प्रत्येक घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागली. या वैज्ञानिक विचारांनीच त्यांना प्रशासकीय सेवेत असतानाही, ‘सत्य काय आणि असत्य काय?’ यातील फरक ओळखण्याची क्षमता दिली. त्यांनी आठ वेळा यूपीएससीची मुलाखत दिली. हा त्यांचा संघर्ष केवळ नोकरीसाठी नव्हता, तर समाजाला सेवा देण्यासाठीच्या त्यांच्या आंतरिक तळमळीचा तो पुरावा होता.

जेव्हा किशन सहाय यांनी देव-अल्लाहला काल्पनिक म्हटले, तेव्हा अनेक धार्मिक आणि राजकीय संघटनांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या वतव्यांमुळे ‘धार्मिक भावना दुखावल्या’ गेल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार होतो. अशा विरोधाला न जुमानता त्यांनी आपला तर्कवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार सुरूच ठेवला आहे.

अशा या धाडसी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार पेरणार्‍या पोलीस अधिकार्‍याची मुलाखत घेण्यासाठी आम्ही जयपूर पोलीस मुख्यालय गाठले. तेथे किशन सहाय साहेब मानवाधिकार विभागाचे राज्याचे ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस’ म्हणून काम करतात. त्यांच्या प्रशस्त केबिनमध्ये प्रवेश करताच त्यांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले.

महाराष्ट्रातून आम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे सहकारी आहोत हे माहिती असल्याने त्यांनी आमची आत्मीयतेने चौकशी केली आणि डॉ. दाभोलकरांच्या कार्याविषयी आणि खून खटल्याची माहिती घेतली.

त्यांच्या केबिनमध्ये मागे भिंतीवर ‘मानवतावादी विश्व समाज’चा बोर्ड लावला होता आणि त्या बोर्डवर लिहिले होते…

मानवतावादी विश्व समाज
"अंधविश्वास मुत, वैज्ञानिक दृष्टिकोनयुत, परंपरागत धर्मविहीन, जातिविहीन, नस्लभेद मुत, साहसी, शिक्षित, स्वस्थ और उच्च नैतिक मूल्योंवाले मानवतावादी विश्व समाज का निर्माण करना अपना प्रमुख लक्ष्य होना चाहिए।”
- किशन सहाय IPS
मो. ९४६०९२८७३७

जय मानवता, जय नैतिकता, जय विज्ञान ।

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकासाठी त्यांची मुलाखत आम्ही त्यांचा वैयतिक परिचयाच्या प्रश्नाने सुरू केली.

प्रश्न : नमस्कार सहायसाहेब, मुलाखतीची सुरुवात तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि बालपणाबद्दल माहिती सांगून करावी.

किशन सहाय : माझा जन्म अलवर जिल्ह्यातील एका छोट्या गावी झाला. प्राथमिक शिक्षण बाजूच्या गावात झालं. शाळेला पायी चालत जावे लागे. आमचे कुटुंब गावातील गरीब कुटुंबांपैकी धार्मिक विचाराचे एक एकत्रित कुटुंब होते. त्यामुळे आठवीपर्यंत पायात चप्पल नसायची. माझे वडील पल्लेदारी म्हणजे ओझे उचलण्याचे काम करायचे.

माझा मोठा भाऊ ३१ वर्षांचा झाला, तरी ‘जमीन कमी आहे व नोकरी नाही’ म्हणून त्याचे लग्न होत नव्हते. म्हणून गावातील भगत ज्याला राजस्थानमध्ये ‘श्याना’ किंवा ‘भोपा’ असे म्हणतात, त्याचा कुटुंबीयांनी सल्ला घेतला. त्याने सात शनिवार नियमित पुंगी वाजवली तर त्याचे लग्न होईल, असे सांगितले. अशा अनेक प्रथा राजस्थानमधील गावागावांत आहेत. यावर माझा विश्वास नसायचा. हे सर्व मी लहानपणी पहात होतो.

प्रश्न : अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आपल्या मनात कसा रुजला?

किशन सहाय : मी लहानपणापासूनच आजूबाजूला घडणार्‍या घटनांचे निरीक्षण करत होतो. माझ्या मनात जिज्ञासू वृत्ती होती. माझ्या गावच्या बाजूच्या गावातून एक दलित महिला त्या काळी आमच्या गावात मैला वाहून नेण्याचे काम करायला येत असे. तिला शिवाशिव केली तर तिच्यासारखेच आपण बनतो व आपणालाही हे मैला वाहून नेण्याचे काम करावे लागते अशी एक अंधश्रद्धा त्या काळात होती. त्यामुळे त्या काळात मोठ्या प्रमाणात स्पर्शास्पर्श भेद होता. याचे संस्कार माझ्या बालमनावर होत होते. पण मला त्या वेळी प्रश्न पडायचा की, ती महिला पण माणूसच आहे, तिला जर आपण स्पर्श केला तर तिच्यासारखे आपण कसे होऊ? ही लोकांनी पसरवलेली एका जाती विषयीची अंधश्रद्धा आहे, हे मला त्या वेळी जाणवत होते. हाच माझ्या मनात रुजलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा पहिला विचार होता.

प्रश्न : तरुणपणी तुम्ही कोणत्या प्रकारचे वाचन केले, तुमच्या व्यतिमत्त्वाला आकार देण्यास कोण कारणीभूत ठरले?

किशन सहाय : मी स्वतःच विचार करत होतो. त्यामुळे माझ्यावर त्या कालखंडातल्या कोणाचाही प्रभाव नाही. मात्र, या कालखंडामध्ये मी वेगवेगळ्या धर्मग्रंथांचे वाचन केले. माझ्या मनात नेहमी हे विचार असायचे की, जे श्रीराम करू शकतात, जे बुद्ध करू शकतात, जे हजरत मोहम्मद करू शकतात ते आपण का करू शकत नाही? महाराणा प्रताप यांच्यासारखा विचार मी करायचो. माझ्या मनात फार काही वाचून विचार बदललेत असे नाही तर माझ्या स्वतःचाच विचार सुरुवातीपासून वेगळ्या धाटणीचा होता.

महाविद्यालयीन जीवनात बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स केले. हे शिक्षण घेत असतानाच ईश्वर, प्रेषित, अल्ला या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत, हा विचार त्या काळात माझ्या मनात दृढ झाला. या व्यती होत्या व या व्यतींचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे या आता काल्पनिक बनलेल्या आहेत. त्यामुळे आता या काल्पनिक गोष्टी काहीही बदल करू शकत नाहीत. त्यांच्या मूर्ती बनवा किंवा त्याचे धार्मिक स्थळ बनवा, त्याच्यापासून फारसा फायदा होणार नाही.

प्रश्न : याच काळात तुमच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार दृढ झाला का?

किशन सहाय : महाविद्यालयीन काळात मी वेगवेगळे विचार वाचत होतो. याच काळात मी कन्फ्युशियस, प्लेटो अशा अनेक जागतिक व्यतींच्या चरित्रांचे वाचन केले.

भारतीयांचं दीर्घकालीन पारतंत्र्य, स्त्रियांवरील अत्याचार, वर्तमान काळातही ही परिस्थिती फारशी बदललेली नव्हती. मूळ प्रश्न तर तसेच होते. त्या प्रश्नाचे उत्तरे मात्र सापडत नव्हती. दीर्घकालीन पारतंत्र्यात राहूनही त्यातून आम्ही काही शिकलो नाही. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागणी झाली, पण एकतेची शिकवण आम्ही घेतली नाही. अंधश्रद्धेमध्ये गुरफटून गेल्यामुळे नवीन विचार आला नाही. नवीन शास्त्र आम्ही हाती घेतलं नाही.

भारतामध्ये अशी विचारधाराच निर्माण झालेली नव्हती की, सर्व प्रश्नांची उत्तरे तेथे मिळतील. म्हणून मग आम्ही ‘मानवतावादी विचारधारा’ निर्माण केली. ही आपल्या देशासाठी व जगासाठीही योग्य आहे. ही प्रतिक्रियावादी विचारधारा आहे. आपण पाहिले तर ‘आरएसएस’ची विचारधारा इस्लामच्या प्रतिक्रियावादी भूमिकेवर उभी आहे. इस्लामची कट्टरवादी विचारधारा तर हिंदू कट्टरवादी भूमिकेवर प्रतिक्रियावादी म्हणून तयार झाली. मनुवादी विचारधारेच्या प्रतिक्रियास्वरूप आंबेडकरवाद उभा आहे. ही प्रतिक्रिया अभिवादनामध्ये सुद्धा आली. तुम्ही ‘राम राम’ म्हणाल, तर आम्ही ‘जय भीम’ म्हणू, तुम्ही राम राम म्हणा तर आम्ही ‘सलाम वालेकुम’ म्हणू. यामुळे माझे असे मत आहे की, जाती-धर्मावर आधारित शब्दच यातून काढून टाकावेत आणि नमस्कार, प्रणाम गुड मॉर्निंग, सलाम, जय विज्ञान, जय मानवता असे निष्पक्ष शब्द असावेत.

प्रश्न : आपण पोलीस सेवेमध्ये आहात, या सेवेमध्ये आपल्याला अंधश्रद्धेच्या काही केसेस हाताळाव्या लागल्या का?

किशन सहाय : होय, अशा काही अंधश्रद्धेच्या केसेस मी हाताळलेल्या होत्या. एका गावातील वृद्ध महिलेला ‘डाकन’ समजून तिची बदनामी केली जात होती. एका व्यतीचा बैल मेल्यामुळे ‘या डाकिणीने माझा बैल खाल्ला, मी तिला सोडणार नाही’ अशी धमकी देत तो व्यती तिच्या मागे कुर्‍हाड घेऊन लागला. ती भीत भीत आमच्या पोलीस स्टेशनला आली. आम्ही त्या व्यतीला पकडून आणून पोलिसी खाक्या दाखवला.

राजस्थानमध्ये ग्रामीण भागातील मांत्रिकांना ‘घोडला’ किंवा ‘भोपा’ म्हणतात. एका भोप्याच्या अंगात देवता यायची व लोक त्याचा जयजयकार करायचे. त्याचा गावात मोठा दरबार भरायचा. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी प्रत्यक्ष त्याच्या दरबारात गेलो व त्याला ‘तुझे हे नाटक बंद कर नाही तर तुला मी उचलून लॉकअप मध्ये टाकीन’ असे म्हणताच तो एका क्षणात शांत झाला व त्याने माफी मागायला सुरुवात केली आणि हात जोडू लागला. तेव्हा त्याच्या भक्त लोकांच्या लक्षात आले की, याच्या अंगात देव-देवता वगैरे काही येत नाही.

मी राजस्थानमधील बारा जिल्ह्यात काम करत होतो, तेव्हा एका गावात एक मुस्लीम तांत्रिक होता. जो स्वतः विविध आजारांवर उपचारही करायचा. त्यासाठी त्याला ‘जिन्न’ असे म्हटले जायचे. तो हातचलाखी करून काही वस्तू निर्माण करायचा व तो इतरांना खायला द्यायचा. त्याचीच भाची माझ्या कार्यालयामध्ये पोलीस कर्मचारी होती. त्यामुळे मला त्याचा भांडाफोड सहजासहजी करायला जमले.

त्याच जिल्ह्यात दुसरी एक घटना घडली होती की, दलित लोकांना गावातील मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. मंदिरात प्रवेश केला जाऊ नये म्हणून गावातील सर्व लोक एका बाजूला व दलित लोक एका बाजूला असा मोठा जमाव जमा झालेला होता. त्या ठिकाणी मी खूप मोठे प्रबोधन करून ही प्रथा बंद करायला लावली. ही एक राजस्थानमधली अत्यंत भयानक अमानवी प्रथा आहे.

एका गावातील मंदिरासमोर एक पवित्र झाड होते. त्या झाडाची फांदी जर कोणी कापली, तर त्याचा मृत्यू होतो अशी अंधश्रद्धा त्या गावांमध्ये होती. त्या झाडाची फांदी सर्वांसमोर मी स्वतः कापून आणली व मला काहीही झाले नाही हे लोकांना प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.

प्रश्न : ‘मानवतावादी विश्व समाज’ या आपल्या मिशनची काय भूमिका आहे? याविषयी आम्हास आपण सांगावे.

किशन सहाय : ‘मानवतावादी विश्व समाज’ हे एक आमचे वैचारिक मिशन आहे. आमच्या मानवतावादी विश्व समाज या मिशनद्वारे आम्ही एक असा समाज निर्माण करु इच्छितो, जो अंधश्रद्धा मुत असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त असेल. तसेच परंपरा व श्रद्धाविहीन, जातीविहीन, नस्लभेद मुत, शिक्षित, स्वास्थ्य आणि उच्च नैतिक मूल्यं असणारा समाज अशा मानवतावादी विश्व समाजाची स्थापना करणे किंवा निर्मिती करणे हे आमच्या मिशनचे प्रमुख लक्ष्य आहे.

आजपर्यंत हिंदू, शीख, इसाई जैन, बौद्ध, पारशी ही सुद्धा एक विचारधाराच आहे. पण या विचारधारा अंधश्रद्धेवर आधारित आहेत. यामध्ये व्यतिकेंद्रितता आहे. व्यतिपूजा आहे. एका व्यतीला मोठेपणा देणे, त्याच्याबद्दल पूजापाठ करत बसणे हे सर्व या विचारधारेमध्ये आहे. समाजाची विभागणी ही धर्म आणि जातीच्या आधारे होत आहे. मानवतावादी विश्व समाजाने हा विचार केलेला आहे की, ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या समस्येचे समाधान कसे करावे. धर्मयुद्धंही खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. धर्माच्या नावावर रतपात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आजही इस्रायल-हमासचे युद्ध चालू आहे. पहेलगाममध्ये जी घटना घडली ती सुद्धा धर्माच्या आधारावरच घडलेली आहे. या सर्व गोष्टींचे समाधान मानवतावादी विचारांमध्ये आहे.

पारंपरिक जे धर्म आहेत या धर्माची गरज आता या वैज्ञानिक काळात नाही. कारण, या पारंपरिक धर्मामध्ये खूप मोठ्या अंधश्रद्धा आहेत. ईश्वर, अल्ला, गॉड यांच्याकडून मुती मिळेल ही अंधश्रद्धा आहे. अल्ला, गॉड, ईश्वर, जन्नत, जहन्नम, स्वर्ग, नरक या काल्पनिक गोष्टी आहेत, अंधश्रद्धा आहेत. देव-देवता, फरिश्ते, भूत-प्रेत, मोक्ष, न्यायाचा दिवस, अवतार या सगळ्या फसव्या कल्पना आहेत. शुभ-अशुभ, पवित्र-अपवित्र अशी काही गोष्ट नसते. ह्या सगळ्याला आपण ‘अंधश्रद्धा’ म्हटले आहे.

धर्म म्हणजे अनेक गट. देश ही एक गट आहेच. धर्म हे वेगळे गट उभे करतात. जसे इस्लाम एक गट बनला, हिंदू एक गट, जैन एक गट, बौद्ध एक गट, ख्रिस्ती एक गट, पारसी एक गट हे गट माणसांमध्ये विभाजन आणि वाद निर्माण करतात. अंधश्रद्धेचे अनेक स्रोतही हेच धर्म आहेत. धर्मग्रंथांमधूनच अनेक अंधश्रद्धा आणि भेदभाव निर्माण होतात. लिंगभेद हा बहुतेक धर्मग्रंथांमधून येतो; स्त्रियांना कमी बुद्धिमान समजले जाते, त्यांना घुंगटमध्ये ठेवायला हवे, बुरखा घालायला हवा, त्यांना एकटे सोडू नये, त्यांना मारहाण करावी असे विचारही काही धर्मग्रंथांत आढळतात. अशा प्रकारचे धर्म असायलाच नकोत.

इस्लामचा माणूस असेल तर तो कुराणाच्या नियमांप्रमाणे जगेल, हिंदू असेल तर हिंदू धर्मग्रंथानुसार वागेल, बौद्ध असेल तर बौद्ध धर्मग्रंथानुसार चालेल. पण धर्माच्या बाहेर कितीही चांगल्या गोष्टी असल्या, तरी त्या आपल्या जीवनात उतरवणार नाही. म्हणूनच आपण म्हणतो की धर्माची गरज नाही. जेव्हा गरजच नाही, तर आपण त्याबद्दल फुकट विचार का करू?

प्रश्न : आपण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राजस्थानमध्ये काय उपक्रम करत आहात?

किशन सहाय : पहा, मी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आजपर्यंत हजारो सभा घेतल्या आहेत. शाळा, महाविद्यालयं, गावं, खेडी, कोचिंग सेंटर, मोहल्ले अशा सर्व ठिकाणी. मानवतावादी विश्व समाज यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. मानवतावादी विश्व समाज एक असा विचार आहे. या समाजात कोणत्याही जाति-धर्मातील मुले-माणसं सहभागी होऊ शकतात, हे सर्वांसाठी खुले आहे. मानवतावादी विश्व समाजात फक्त अंधश्रद्धा निर्मूलनच नाही, तर जातव्यवस्था संपवण्याची, शिक्षणाचा प्रसार करण्याची, खेळ-क्रीडा आणि संपूर्ण जीवन जगण्याच्या मार्गाचीही चर्चा होते.

राजस्थानमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार रुजावा यासाठी मानवतावादी विश्व समाजाचं संमेलन जयपूरमध्ये २०२३ आणि २०२५ मध्ये आम्ही दोन वेळा घेतलं. त्याला हजारो लोक आले होते.

या संमेलनामुळे काय साध्य झालं तर, सोशल मीडियावर जे लोक या विचाराचे आहेत ते प्रत्यक्ष भेटायला येतात, त्यामुळे लोकांचा विश्वास वाढतो. यातून हेही कळतं की आपली विचारधारा कुठपर्यंत पोहोचली आहे. या संमेलनात पंजाबच्या तर्कशील सोसायटीचे मेघराज मित्रही आले होते, तसेच उत्तर प्रदेश आणि हरियाणामधूनही लोक आले होते.

राजस्थानमध्ये महिलांसाठी अजूनही घुंगटप्रथा आहे. महिलांना निर्भय करण्यासाठी मी माझ्या गावी महिलांची भव्य कुस्ती स्पर्धा घेतली होती. ती राजस्थानमधील पहिलीच महिला कुस्ती स्पर्धा होती. मानवतावादी विश्व समाजाची विचारधारा ही एक क्रांतिकारी विचारधारा आहे आणि ती पसरवण्यासाठी अशा उपक्रमांची नकीच गरज आहे.

प्रश्न : आपल्या मानवतावादी मिशनचे प्रमुख उद्दिष्ट असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्याने लोकांना काय फायदा होईल?

किशन सहाय : वैज्ञानिक दृष्टिकोन ही एक विचार करण्याची पद्धत आहे. निसर्गात घडणार्‍या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते. जसे की पाऊस पडला तर त्यामागे काही कारण असते. म्हणजेच सर्व काही कारणांनुसार घडते. यात कोणतेही देव, देवी, देवता येऊन भविष्यवाणी करतात अशी कोणतीही पद्धत नाही.

निसर्गात जितक्या घटना घडतात त्या सगळ्यांमागे काही कारण असते. भगवान, अल्ला किंवा गॉड कोणतीही घटना घडवत नाहीत.

वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला माणूस जिज्ञासू स्वभावाचा असतो. तो प्रत्येक घटनेचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. हे असं का घडतंय? असा प्रश्न तो विचारतो. धार्मिक माणूस मात्र म्हणतो हे सर्व भगवानची मर्जी आहे, आपल्याला काही जाणून घेण्याची गरज नाही.

उदाहरणार्थ, एखादा डोंगर आहे तर धार्मिक माणूस म्हणेल, हनुमानजींनी फेकलेला आहे. पण वैज्ञानिक विचार करणारा माणूस म्हणेल, हा डोंगर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किंवा भूकंपामुळे तयार झाला असेल.

वैज्ञानिक दृष्टिकोन हीच ती पायाभूत गोष्ट आहे, ज्यावर विज्ञानवाद उभा आहे. उदाहरणार्थ, जेम्स वॉट पाणी गरम करत होता. पाणी गरम करताना भांड्याचं झाकण थोडंसं वर उचललं गेलं. त्याने पाहिलं की भांड्यात वाफ तयार झाली आहे आणि त्या वाफेमध्ये शक्ती आहे. त्या निरीक्षणावरून त्याने विचार केला, निष्कर्ष काढला आणि शेवटी वाफेचं इंजीन तयार केलं. त्या शोधामुळे औद्योगिक क्रांती घडून आली. यात तर्क, निरीक्षण आणि अनुमान यांचा उपयोग झाला हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.

अनेक लोक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्म या दोन्ही गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात सुसंवाद साधता येत नाही. कारण, धर्म सांगतो. सगळं भगवान, अल्ला, गॉड करतो. त्यामुळे माणसाची जाणून घेण्याची जिज्ञासा संपते. सगळं देव करतोय असं मानल्यावर माणूस शोध घेणं थांबवतो.

पण विज्ञान एका रस्त्यासारखं आहे. त्या मार्गावर नवनवीन गोष्टी सापडत जातात. निसर्गातील जितकेही रहस्ये उकलली आहेत, ती विज्ञानामुळेच उलगडली आहेत आणि जी शिल्लक आहेत तीही विज्ञानामुळेच उलगडतील. प्रत्येक रहस्यामागे वैज्ञानिक कारण असतं.

विज्ञानाला कधीही अंतिम सीमा नाही. अजून असंख्य रहस्ये उलगडायची आहेत आणि तीही विज्ञानामुळेच उघड होतील. धर्मग्रंथांमधून काहीही नवं सापडणार नाही. धर्मग्रंथ, मजहबी पुस्तकं फक्त सांगतात, ईश्वराला नमस्कार करा, पूजा करा, पठण करा. पण ते नवे निष्कर्ष देत नाहीत.

म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्याने माणूस विचारशील, जिज्ञासू, तर्कशुद्ध आणि प्रगत बनतो. हा त्याचा सर्वांत मोठा फायदा आहे.

प्रश्न : सद्या समाजात बुवा-बाबांचे मोठे पंथ तयार होत आहेत, याबद्दल तुमचे काय मत आहे?

किशन सहाय : हा जो ट्रेंड सुरू झाला आहे, तो प्रत्यक्षात तेराव्या-चौदाव्या शतकातच सुरू झाला होता.

त्यांनी काय सांगितले? की सर्वांत वरती ‘गुरुजी’ असतात, दुसर्‍या क्रमांकावर ‘ईश्वर’ किंवा ‘अल्ला’ आणि तिसर्‍या क्रमांकावर ‘बाबा.’

आम्ही म्हणतो, धर्मगुरूंची काही गरजच नाही. ईश्वर, अल्ला, भगवान हे सगळे काल्पनिक आहेत आणि ते म्हणतात, गुरुजी तुम्हाला भगवान, अल्ला यांच्याशी जोडतील. पण आम्ही म्हणतो जेव्हा ईश्वरच नाही, तर कोणाशी जोडणार?

लोक मात्र त्यांच्या मागे जातात. ते म्हणतात, गुरुची स्तुती केली तर लोकांच्या सगळ्या समस्या गुरु सोडवतील. पण आम्ही म्हणतो, हे धर्मगुरूही आपल्या सारखेच माणूस आहेत, मग तुम्ही त्यांची अधीनता का स्वीकारता?

आपल्याला धर्मगुरूंची नव्हे, तर शिक्षकांची गरज आहे. शिक्षक गणित शिकवतात, भूगोल शिकवतात, विज्ञान शिकवतात तर धर्मगुरू अंधश्रद्धा पसरवतात.

त्यांनी ‘गुरुचे महत्त्व’ वाढवले आणि लिहिले की, ‘सच्चा गुरु मिळाला तरच मोक्ष मिळेल’ आणि अशा प्रकारे त्यांनी धर्मगुरूंची परंपरा निर्माण केली, ज्याची प्रत्यक्षात काहीही गरज नव्हती.

प्रश्न : आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार रुजवण्यासाठी सोशल मीडियावर इतके सक्रिय आहात, तर तुम्हाला पोलीस विभागामुळे किंवा वरिष्ठ अधिकार्‍यांमुळे काही अडचण तर होत नाही ना?

किशन सहाय : पोलीस प्रशासनाविषयी किंवा विभागाविषयी मी काही बोलणार नाही आणि बोलणे योग्यही नाही. पण एक गोष्ट नकी आहे, आपण निष्पक्ष आहोत. आपण कोणाचाही पक्ष घेत नाही; सगळ्यांशी समान वागणूक ठेवतो. मी संपूर्ण पोलीस सेवेत निष्पक्षता राखली आहे. त्यामुळे मला कधी अडचण आली नाही.

वैज्ञानिक दृष्टिकोन हीच सर्वांत मोठी विचारसरणी आहे. त्यानंतर येते नैतिकता. ज्या व्यतीत नैतिकता असते, तो भ्रष्टाचारालाही प्रोत्साहन देत नाही. ही सर्व लक्षणे नेतृत्व करणार्‍या व्यतीकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. ही सर्व गुणवैशिष्ट्ये आपल्या विचारधारेत असली पाहिजेत मग तो एस. पी. असो, डी.जी. असो, आय.जी. असो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो. जर नेतृत्व करणार्‍या व्यतीकडे ही लक्षणे असतील, तर संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल. प्रत्येक नेतृत्वात ही गुणवैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे. आणि उच्च नैतिक मूल्ये असलेला, जात धर्माच्या पलीकडे गेलेला, निरोगी विचारांचा नेता समाजात विचारप्रवाह निर्माण करेल आणि अशी विचारसरणी समाजात पसरली पाहिजे, हे अत्यंत गरजेचे आहे.

प्रश्न : वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात स्थापित करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाची काय भूमिका असावी असे तुम्हाला वाटते?

किशन सहाय : ब्युरोक्रसीची भूमिका अतिशय लहान असते. मोठी भूमिका तर सरकारचीच असते. ब्युरोक्रॅट्स हे सरकारच्या निर्देशांवरच चालतात. सरकार चालवणारे जर वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले असतील, तर ते महत्त्वाच्या पदांवर अशा लोकांची नियुक्ती करतील जे वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देतील. धार्मिक आणि अंधश्रद्धा पसरवणार्‍यांना मात्र ते बाजूला ठेवतील.

नेतृत्व करणारे जर वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले असतील, तर लोकही त्यांच्याकडून प्रेरित होऊन सुधारतील. म्हणून सरकारमध्ये जो मुख्य प्रमुख असतो जसे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री त्यांची भूमिका सर्वांत महत्त्वाची आणि निर्णायक असते.

वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवणे हे भारतीय राज्यघटनेत कर्तव्य सांगितले आहे ते प्रशासनाने आणि सरकारने पार पाडावे.

प्रश्न : मानवतावादी विश्व समाज ही विचारधारा आपण चालवता. आपण सरकारी सेवेत आहात आणि राज्याच्या मानवाधिकार आयोगाचेही प्रमुख आहात. तेव्हा मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ नये यासाठी आपण काही आदेश वगैरे काढले आहेत का?

किशन सहाय : मी सोशल मीडियावर सक्रिय आहे. मी फेसबुकवर एक पोस्ट अस्पृश्यतेच्या विरोधात आणि जातिभेद नष्ट करण्यासाठी लिहिली होती. आधी अस्पृश्यता संपवणे आवश्यक आहे, कारण अस्पृश्यतेमुळे जातीयवादाला चालना मिळते. मी केस कापण्याची (हेअर सलून) दुकाने सर्वसामान्य जनतेसाठी आहेत, असे लिहिले होते. एका गावात दलितांचे केस काही हेअर सलूनमध्ये कापले जात नाहीत, अशी तक्रार माझ्याकडे आली. माझ्याकडे आलेल्या या तक्रारीच्या आधारे मी एक आदेश काढला होता. दलितांचे केस कापण्यामध्ये जे सलून मालक भेदभाव करतील, त्यांच्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. मी माझ्या सर्व अधिकार्‍यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व केसकर्तन दुकानदारांना लेखी नोटिसा द्याव्यात असा आदेश दिला. यामुळे मोठा फरक पडला. भारतात आडनावावरून जात शोधली जाते. त्यामुळे मी माझ्या नावामध्ये आडनाव लावत नाही. माझ्याकडे येणार्‍या सर्व प्रस्तावांमध्ये कर्मचार्‍यांच्या आडनावाचा उल्लेख करू नका, अशा मी सूचना दिल्या आहेत.

प्रश्न : आपल्या मानवतावादी विश्व समाजामध्ये ‘जातिविहीन समाज’ ही संकल्पना मांडली आहे, ती नक्की काय आहे?

किशन सहाय – मानवतावादी विश्व समाजात आम्ही जातिविहीन समाज असा उल्लेख केला आहे. जसे आपल्याला धर्माची गरज नाही, तसेच आपल्याला जातीचीही गरज नाही. या जातिव्यवस्थेने भारतीय हिंदू समाजाला विभागले आहे. जातीयवाद हा गुलामीचे एक कारण राहिले आहे, कारण समाज जातींमध्ये विभागलेला असल्याने एकोपा नव्हता. एक जात राजघराण्यातली आणि दुसरी प्रजा असे विभाजन होते. त्यामुळे प्रजेला राजाशी आपलेपणा वाटत नव्हता. कोणीही येऊन राजाला पराजित केले, तरी प्रजेला फरक पडत नसे. हे गुलामीचे एक कारण होते.

आता परिस्थिती बदलली आहे. आज जाती संपवणे शक्य आहे. यात शिक्षण व्यवस्थेची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. आता पहा, सर्व धर्मांची मुले एकाच शाळेत शिकतात, शिक्षक सर्व धर्मांचे असतात. आपल्या अभ्यासक्रमातही जातिव्यवस्थेला कुठेही प्रोत्साहन दिलेले नाही, ती एक सामाजिक वाईट प्रथा म्हणूनच मांडली आहे.

शिक्षणव्यवस्था आपल्याला एकत्र राहण्याची प्रेरणा देते. प्रशासनिक व्यवस्था देखील एकतेसाठी प्रेरित करते. प्रशासनात अधिकारी-कर्मचारी सर्व धर्मांचे आहेत. आपली लोकशाही व्यवस्था सर्वांना एक राहण्यास सांगते. नेतेही सर्व जाती-धर्मांचे असतात. विज्ञानाचे ज्ञानसुद्धा आपल्याला एकतेचा संदेश देते. कोणत्याही जातीचा वेगळा रक्तगट नसतो. विज्ञानात असे कुठेही नाही की, ही जात या ब्लड ग्रुपची किंवा ती जात त्या ब्लड ग्रुपची. एकाचे रत दुसर्‍याला चालू शकते, लग्न झाले तर मूल जन्माला येते. मग जातीची गरज काय?

आता तुम्हाला विश्वासाच्या पातळीवर ज्ञान झाले आहे. जातिव्यवस्था इतर कोणत्याही देशात नाही. चीन, रशिया या देशांमध्येही नाही. मग आपण ही वाईट प्रथा का टिकवून ठेवतो? त्यामुळे आपलीच बदनामी होते. संयुत राष्ट्रसंघात (UNO) आणि कॅलिफोर्निया इ. ठिकाणी अनेक वेळा या विषयावर नियम बनवावे लागले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली प्रतिमा खराब होते. लोकांना वाटते की, भारतातले लोक अजूनही जातीवरून भांडतात.

या व्यवस्थेत फक्त विभागणीच नाही, तर द्वेषही आहे. कोणी स्वतःला श्रेष्ठ मानतो, कोणी इतरांना नीच मानतो. ही उंच-नीच भावना देखील निरर्थक आहे.

आज कुणीही शांत चेहर्‍याकडे पाहून सांगू शकत नाही की, हा माणूस कोणत्या जातीचा आहे. म्हणूनच आपल्याला जातिव्यवस्थेची गरज नाही.

खालच्या जातीतील लोक आम्हाला कमी लेखतात म्हणून त्रस्त आहेत आणि उच्च जातीतील लोक आरक्षणामुळे आम्हाला अन्याय होतो, म्हणून त्रस्त आहेत. म्हणून जातीयवाद संपवला, तर सर्व समस्या संपतील.

आमच्या राजस्थानमध्ये समस्या आहे की, एखादा दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून विरोध केला जातो. पण असा भेदभाव करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्याच्यावर कठोर कारवाई होते. त्यासाठी आधीपासूनच कायदा आहे. पण एक गोष्ट अशी आहे की, व्यतिगत मानवाधिकारांचे उल्लंघन हा एक भाग आहे, परंतु मोठा मानवाधिकार उल्लंघन, जातिप्रथा आणि धर्मप्रथा यांच्यामध्ये आहे. लिंगभेदामुळे महिलांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होते. धर्माच्या आधारे उच्च-नीचता निर्माण होते. कधी कधी गायीच्या नावाखाली लोकांची हत्या केली जाते. हे सर्व संस्थात्मक स्वरूपात मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे मोठे स्रोत आहेत.

या सर्व गोष्टींसाठी आम्ही जनजागृती केली आहे. लग्नामध्ये वेगवेगळे मंडप लावणे, वेगवेगळ्या जातींच्या पंगती बसवणे हे चुकीचे आहे. शाळेमध्ये पाणी पिण्यासाठी वेगळे भांडे ठेवणे हेही चुकीचे आहे. यासाठी आपल्या विचारधारेची संख्या वाढवावी लागेल. मगच मेरी आवाज म्हणजे मानवाधिकारांसाठी खरा संघर्ष होईल.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार जेव्हा समाजात येईल, तेव्हा रीतीरिवाजांमधले जुने विचार निरर्थक वाटू लागतील. हे विचार स्वतःलाच निरर्थक वाटायला हवेत. आपण बदल घडवू इच्छितो, जनतेमध्ये बहुमताने आपले विचार पोहोचवू इच्छितो. आपल्या विचारधारेचे लोक सरकारमध्ये गेले, नेतृत्व केले, तर देशात मोठा बदल होईल. आधी विचार बदलायला हवा. ज्या रीतीरिवाजांमध्ये अंधश्रद्धा आहे, त्या काढून टाकायला हव्यात. आम्ही जनतेत राहून त्यात सुधारणा करू इच्छितो.

प्रश्न : आजच्या तरुणाईला काय संदेश द्याल?

किशन सहाय : तरुणांना माझे सांगणे आहे की, सामाजिक रूढींचे मूळ शोधण्यासाठी इतिहासाचा आणि विज्ञानाचा अभ्यास करा. कोणत्याही परंपरेला किंवा माहितीला स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासा. ‘भयमुत जीवन जगा,’ देव, धर्म, स्वर्ग, नरक, भूत-प्रेत या सर्वांची भीती सोडून द्या. कारण, ही भीतीच माणसाला कमकुवत बनवते आणि अंधश्रद्धेकडे नेते. निर्भीडपणे जगा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.

***

किशन सहाय यांना तरुणाईतून आणि तर्कवाद्यांचा प्रचंड पाठिंबा मिळतो. अनेक विद्यार्थी, विशेषतः यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, त्यांना प्रेरणा मानतात. ते केवळ एक ‘पोलीस अधिकारी’ नसून, ‘सत्याचा आधार घेणारा मार्गदर्शक’ आहेत, असे हे तरुण मानतात. त्यांचे व्हिडिओ आणि मुलाखती सोशल मीडियावर ‘वैज्ञानिक विचार आणि तर्कवादाचे प्रतीक’ म्हणून पाहिले जातात. सोशल मीडियामध्ये त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर लिहिलेल्या पोस्ट प्रचंड प्रमाणात वाचल्या जातात, व्हायरल होतात.

किशन सहाय यांची अंधश्रद्धा निर्मूलनाची भूमिका पाहिल्यानंतर आपल्याला त्यात तीन मुख्य विचार दिसतात, ते म्हणजे १. तर्कवाद, २. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ३. मानवतावाद.

तर्कवाद : परमेश्वराच्या अस्तित्वाला आव्हान. किशन सहाय यांच्या विचारांचा सर्वांत धाडसी विचार म्हणजे, परमेश्वराच्या अस्तित्वाला थेट आव्हान देणे. त्यांचे स्पष्ट मत आहे की, ‘देव, अल्लाह, गॉड, वाहे गुरु किंवा फरिश्ते’ यांसारख्या सर्व धार्मिक संकल्पना केवळ मानवी कल्पनाशतीतून आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या कथांमधून निर्माण झाल्या आहेत.

ते म्हणतात की,”धार्मिकता हे अंधविश्वासाचे मूळ आहे.” त्यांच्या मते, जेव्हा माणूस तर्क करणे थांबवतो आणि प्रत्येक घटनेमागे दैवी शतीचा हात पाहतो, तेव्हा तो आत्मविकासाचा मार्ग थांबवतो.

“जर देव-अल्लाह खरोखरच सर्वशतिमान असते, तर भारतीयांना शेकडो वर्षे परकीयांची गुलामगिरी करावी लागली नसती.” या विधानाद्वारे ते धार्मिक श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उभे करतात. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याऐवजी, लोकांनी स्वतःच्या सामर्थ्यावर आणि कृतीवर विश्वास ठेवावा, असा त्यांचा आग्रह आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले आहे. किशन सहाय आपल्या भाषणांमधून आणि सोशल मीडिया पोस्टस्मधून याच मूल्यांवर भर देतात.

किशन सहाय हे तरुणांना सांगतात की, कोणतीही गोष्ट ‘मान्य’ करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा. प्रत्येक रूढी, परंपरा आणि चमत्कारावर ‘का?’ (Why?) हा प्रश्न विचारा.किशन सहाय म्हणतात की, आजच्या मानवी जीवनातील सर्व सुविधा, प्रगती आणि सुख-समृद्धी ही कोणत्याही दैवी शतीची नाही, तर केवळ वैज्ञानिक शोध आणि मानवी बुद्धीची देणगी आहे.

अंधश्रद्धा ही मानवी प्रगतीतील मोठा अडथळा आहे. त्यांच्या मते, भूत-प्रेत, जन्नत-जहन्नम, ग्रह-नक्षत्रांचे दोष यांसारख्या अंधश्रद्धांमुळे लोक त्यांच्या समस्यांचे मूळ कारण शोधण्याऐवजी, काल्पनिक उपायांमध्ये वेळ आणि पैसा वाया घालवतात.

मानवतावाद

किशन सहाय म्हणतात की, अंधश्रद्धा निर्मूलन हे केवळ धार्मिक कर्मकांडांवर टीका करणे नाही, तर मानवतावादी समाज निर्माण करण्याचे साधन आहे. त्यांच्या मते, धार्मिक रूढीवादी विचार अनेकदा मानवी हकांचे उल्लंघन करतात, विशेषतः मागासलेल्या आणि दुर्बल घटकांचे. अंधश्रद्धा दूर झाली तर प्रत्येक व्यतीला माणूस म्हणून समान सन्मान मिळेल.

किशन सहाय हे जातिभेदाला सामाजिक अंधश्रद्धा मानतात. धार्मिक ग्रंथांमध्ये आणि रूढींमध्ये जातिव्यवस्था खोलवर रुजलेली आहे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे अंधश्रद्धा नष्ट करणे म्हणजे जातिवादाच्या मुळावर घाव घालणे आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

किशन सहाय केवळ अंधश्रद्धांवर टीका करत नाहीत, तर ते त्याचे स्वरूप आणि त्याचे समाजावर होणारे गंभीर परिणाम विशद करतात. त्यांच्या मते, धार्मिक कर्मकांड, यात्रा, दानधर्म (जे केवळ पुजार्‍यांच्या किंवा संस्थांच्या तिजोरीत जातात) आणि तथाकथित ‘चमत्कारिक’ बाबांच्या उपायांना निव्वळ ‘आर्थिक शोषण’ मानतात. गरिबी आणि समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तीला तर्काऐवजी तत्काळ दिलासा हवा असतो आणि याचा गैरफायदा अंधश्रद्धेचे व्यापारी घेतात. ते या ‘अंधश्रद्धेच्या बाजारा’वर कठोर टीका करतात.

भारतीय समाजात अनेकदा धार्मिक रूढी आणि अंधश्रद्धांचे मोठे ओझे महिलांवर असते. व्रत-वैकल्ये, उपवास आणि विशिष्ट कर्मकांडे पाळण्याची जबाबदारी मुख्यतः महिलांवर टाकली जाते. किशन सहाय हे त्यांच्या विचारांमधून या रूढीवादी बंधनांवर टीका करतात, ज्यामुळे महिलांचा वेळ, श्रम आणि स्वातंत्र्य धोक्यात येते. अंधश्रद्धा निर्मूलनातूनच महिलांना मानसिक आणि सामाजिक स्तरावर स्वातंत्र्य मिळू शकते, असे त्यांचे मत आहे.

किशन सहाय हे पोलीस दलात उच्चपदस्थ अधिकारी असल्याने, त्यांना गुन्हेगारी जगतातील आणि कायदा-सुव्यवस्थेतील अनेक समस्या अंधश्रद्धेशी कशा जोडलेल्या आहेत, हे माहीत आहे. उदा. जादूटोणा, भूतबाधा किंवा ‘डाकीण’(चुडैल) म्हणून एखाद्या महिलेला मारहाण करणे. अशा घटनांमध्ये अंधश्रद्धा हेच गुन्ह्याचे मूळ कारण असते. त्यामुळे, अंधश्रद्धा निर्मूलन हे केवळ सामाजिक कार्य नसून, ते ‘चांगल्या शासना’साठी (Good Governance) आणि ‘गुन्हेगारी प्रतिबंधा’साठी (Crime Prevention) देखील आवश्यक आहे, अशी त्यांची भूमिका आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी मूल्यांची स्थापना हे त्यांच्या वैचारिक कार्याचे मूळ आधारस्तंभ आहेत. भारतीय संविधानाच्या कलम ५१ अ (एच) नुसार प्रत्येक नागरिकावर वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चौकस बुद्धी विकसित करण्याची जबाबदारी आहे आणि किशन सहाय यांनी प्रशासकीय सेवेत असूनही याच जबाबदारीचे पालन करण्याचा जणू वसा घेतला आहे.

किशन सहाय हे भारतीय सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे उदाहरण आहेत, जे हे सिद्ध करतात की प्रशासकीय सेवेत राहूनही सामाजिक सुधारणा आणि वैचारिक क्रांतीचे कार्य केले जाऊ शकते. अंधश्रद्धा निर्मूलनावरील त्यांची कठोर, स्पष्ट आणि विज्ञाननिष्ठ भूमिका वादग्रस्त वाटत असली, तरी ती आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.

किशन सहाय एकीकडे कायद्याचे राज्य सांभाळत आहेत, तर दुसरीकडे ते लोकांच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी तर्क आणि विज्ञानाची मशाल घेऊन उभे आहेत. धार्मिक रूढीवाद आणि अंधविश्वासाच्या खोलवर रुजलेल्या समाजात, किशन सहाय यांचे विचार हे एका नवीन, तर्कशुद्ध आणि मानवतावादी युगाच्या आगमनाची हाक देत आहेत. त्यांचा संघर्ष हा केवळ एका व्यतीचा नाही, तर एका प्रगतीशील राष्ट्राच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या वैचारिक लढाईचा भाग आहे. त्यांची ही भूमिका भारतीय समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे घेऊन जाणारी एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे यात शंका नाही.

किशन सहाय यांचे विचार हे राजस्थानमधील एका तर्कशुद्ध आणि मानवतावादी युगाच्या आगमनाची हाक देत आहेत. राजस्थानमध्ये त्यांचा हा मानवतावादी विचार लवकर रुजो! अशा सदिच्छा व्यक्त करून आम्ही त्यांचा निरोप घेतला.

– राहुल थोरात, रमेश माने


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]