डॉ. रुपेश पाटकर -
मेडिकल कॉलेजात गेल्यावर मी पहिल्यांदाच वेश्यांविषयी ‘सेक्स वर्कर’ हा शब्द ऐकला. आणि हे पण शिकलो की त्यांच्यापासून एड्स व गुप्तरोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्याचा उपाय म्हणजे ‘निरोध’ होय. गुप्तरोगापलीकडे त्यांच्या काही समस्या असतात का? त्यांच्या मानसिक आरोग्याचे काही प्रश्न असतात का? हे आम्हाला शिकवले गेले नाही. सायकीअॅट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करताना महिलांचे मानसिक आरोग्य यावर धडा होता, पण वेश्यांचे मानसिक आरोग्य यावर सिलॅबसमध्ये काहीही नव्हते. आणि ते नाही याची कमतरता मला त्या वेळेस जाणवलीही नाही.
माझे बालपण मध्यमवर्गीय घरात गेले, त्यामुळे सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरात ‘वेश्या’ या शब्दावर जशी निरोगी चर्चा ऐकायला मिळत नाही तशी ती माझ्याही घरात ऐकायला मिळाली नाही. पण वेश्या हा शब्द मात्र कानावर पडला. तो शब्द ऐकतानाच त्याबाबत काही विचारणे म्हणजे काहीतरी वाईट असाही अप्रत्यक्ष विचार मिळाला. कालांतराने वेश्या म्हणजे वाया गेलेल्या महिला असतात, त्या पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढतात, त्यांच्यापासून गुप्तरोग होतात अशी माहिती हळूहळू मिळत गेली. पण ती तपासण्याचा कोणताही मार्ग त्या वेळेस माझ्याकडे नव्हता, ना मला त्याची गरज वाटत होती.
त्यानंतर कोण्या एका महामानवाच्या लिखाणात संदर्भ मिळाला की ‘वेश्या’ या घरंदाज महिलांच्या पुढ्यातील ढाली आहेत. त्यांच्यामुळे घरंदाज बायका सुरक्षित आहेत. मला त्याचे हे म्हणणे वाचून जरा बरे वाटले. वेश्यांसाठी ‘वाईट बायका’ यापेक्षा तो वेगळा दृष्टिकोन वाटला. अनेक लोक आजही असे विधान करतात की, वेश्याव्यवसायामुळे बलात्कार कमी होतात. पण असा कोणी तुलनात्मक अभ्यास केलाय का? मग कोणताही अभ्यास नसताना आपण अशी विधाने कोणत्या आधारावर करतो? मला कबूल केले पाहिजे की माझ्याही मनाला हे प्रश्न त्या वेळी सुचले नाहीत.
मेडिकल कॉलेजात गेल्यावर मी पहिल्यांदाच वेश्यांविषयी ‘सेक्स वर्कर’ हा शब्द ऐकला. आणि हे पण शिकलो की त्यांच्यापासून एड्स व गुप्तरोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्याचा उपाय म्हणजे ‘निरोध’ होय. गुप्तरोगापलीकडे त्यांच्या काही समस्या असतात का? त्यांच्या मानसिक आरोग्याचे काही प्रश्न असतात का? हे आम्हाला शिकवले गेले नाही. सायकीअॅट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करताना महिलांचे मानसिक आरोग्य यावर धडा होता, पण वेश्यांचे मानसिक आरोग्य यावर सिलॅबसमध्ये काहीही नव्हते. आणि ते नाही याची कमतरता मला त्या वेळेस जाणवलीही नाही.
२००७ ला मी गोव्यातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायकीअॅट्री अँड ह्यूमन बिहेविअर’ या संस्थेत सिनियर रेसिडंट म्हणून काम करत असताना अनेक एनजीओंचे कार्यकर्ते, ते मदत करत असलेल्या मानसिक समस्याग्रस्त व्यतींना घेऊन ओपीडीत भेटत असत. त्यापैकी एक संस्था होती, अर्ज (अन्याय रहित जिंदगी)! ही संस्था देहविक्रयात अडकलेल्या महिलांसाठी काम करत होती. एक दिवस त्या संस्थेची कार्यकर्ती त्यांच्या संस्थेचे एक कार्ड घेऊन आली. त्या कार्डवर कॉन्ट्रिब्युटर्सच्या यादीत माझे नाव होते. मला आश्चर्य वाटले. मी म्हटले, “मी सरकारी नोकर आहे. मी काही फुकट तपासत नाही. मला पगार मिळतो.” त्यावर ती कार्यकर्ती म्हणाली, “तुम्ही आमच्या मुलींशी कधीही पूर्वग्रहदूषित बोलत नाही.” मला वाटले, माझे सहकारी कदाचित माझ्यासारखे बोलके नसतील, पण उपचार देण्यात काही कमीजास्त करणार नाहीत. त्यावर तिने गायनॅक ओपीडीतला अनुभव सांगितला. एका महिलेला ती गायनॅक ओपीडीत घेऊन गेली होती. तपासणारा गायनॅकॉलॉजिस्ट पुरुष होता. तिला पुरुष डॉक्टरकडून तपासून घ्यायला ऑकवर्ड वाटत होते. त्यावर डॉक्टर म्हणाला, “इतने लोगों के साथ सोते हुए शरम नही आयी? अब क्यों शरमाती हो?” डॉक्टरच्या तोंडून अशी भाषा माझ्यासाठी धकादायक होती.
काही काळाने मी सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस ‘अर्ज’ने मला त्यांच्या संस्थेसाठी काम करण्याची विनंती केली. मी आठवड्यातून दोनदा त्यांच्याकडे जाऊ लागलो. तिथे जाऊ लागल्यावर माझ्या लक्षात आले की, हे काम माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच कठीण आहे. या महिला इतक्या भयानक मानसिक आघातातून गेल्या आहेत ज्याची मी यापूर्वी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या झोपेच्या वेळा, बोलण्याची शैली, खाण्यापिण्याच्या पद्धती यावर त्यांच्या पूर्वायुष्याचा खूप परिणाम झाला आहे. अनेकींना दारूचे व्यसन लागले आहे.
मला एक केस आठवते. तिचे लग्न झाले होते. पण तिचा नवरा दारुडा होता. तो खूप मारझोड करायचा. कंटाळून ती माहेरी आली. पण लवकरच तिची आई वारली. भाऊ-भावजयीशी खटके उडू लागले. म्हणून ती तालुक्याच्या ठिकाणी जाऊन एका हॉटेलात स्वयंपाकाचे काम करू लागली. काही महिन्यांनी तिच्या शेजारच्या खोलीत एक मध्यमवयीन बाई राहायला आली. त्या बाईने हिच्याशी मैत्री केली. दोन-तीन महिन्यांनी ती बाई गावी जायला निघाली. तिने हिला सोबत फिरायला येतेस का विचारले. हिने हॉटेलमधून सुटी काढली. त्या बाईसोबत ती दोन-तीन दिवसांसाठी फिरायला म्हणून गेली. त्या बाईने हिला पुण्यातील बुधवार पेठ या रेडलाईट एरियात नेऊन विकले. तिथे तिने प्रतिरोध केला, पण शेवटी तिला शरणागती पत्करण्याशिवाय मार्ग उरला नाही. तिथे तिला एखादं वर्ष झाले असेल, तिच्याकडे एक गिर्हाईक येऊ लागले. जे नंतर नुसतेच गप्पा करे. त्याने एक दिवस तिला लग्नाबाबत विचारले. तिचा त्याच्या घरी स्वीकार होईल का, शिवाय तिला दहा हजाराला विकले होते, ते पैसे तो घरवालीला देऊ शकेल का या तिच्या प्रश्नांना त्याने होकारार्थी उत्तर दिले. दहा हजार रुपये देऊन तो तिला घेऊन घरी जायच्या निमित्ताने पुण्यातून निघाला आणि गोव्यात आला. त्याने तिला गोव्यातील त्या काळच्या बायना या रेडलाईट वस्तीत आणून विकले. दोनदा नातेसंबंधात विश्वासघात अनुभवलेल्या माणसाला पुन्हा निरोगी नातेसंबंध उभे करणे किती अवघड गोष्ट होती.
यातील बहुसंख्य महिला अठरा वर्षांच्या आधीच धंद्यात ओढल्या गेल्या होत्या. बालपणी त्यांच्यावर झालेल्या बलात्काराचे प्रसंग ‘पोस्ट ट्रॉमेटीक स्ट्रेस डिसऑर्डर’ च्या रूपात त्यांना छळत होते.
मला स्वतःला आव्हान देणारा एक प्रसंग आठवतो. मी ‘अर्ज’ च्या पुनर्वसन प्रकल्पाच्या ‘स्विफ्टवॉश’ लॉन्ड्रीत सकाळच्या वेळेत जात असे आणि दुपारच्या वेळेत बायना वस्तीतील ऑफिसात जात असे. तिथे एक पंचविशीचा मुलगा सहज गप्पा करायला येई. एक दिवस ऑफिसात तो, मी आणि सोशल वर्कर असे तिघेच होतो. तो मला म्हणाला, “डॉक्टरसाब, आप यहाँ आते हो, हमारे साथ बाते करते हो, अच्छा लगता है| मैं आपको एक सवाल पुछू? गुस्सा तो नही होंगे?”
“पुछो ना”, मी म्हणालो.
“यदी आपको कोई ऐसा बोले की आपकी माँ रंडी है, या आपकी बहन रंडी है, तो आपको कैसा लगेगा?” त्याने विचारले. ‘रंडी’ या शब्दानेच मला शिसारी आली. मी काहीच बोलू शकलो नाही.
तोच पुढे म्हणाला, “जो आपकी गाली है, वो मेरी पहचान है | रंडी का बच्चा सुनते सुनते मै बडा हुआ हूँ|”
मी स्वतःला कामगार म्हणवून घ्यायला कधी लाजलो नाही, शेतकरी म्हणवून घ्यायला कधी लाजलो नाही, अस्पृश्य म्हणवून घ्यायला कधी लाजलो नाही, पण स्वतःला वेश्येचा नातेवाईक म्हणवून घेण्याचे धैर्य माझ्यात नव्हते. याचा अर्थ, तो मुलगा प्रश्न विचारेपर्यंत माझ्या मनात वेश्येबाबत समतेचा भाव नव्हता. माझे वर्तन वरकरणी पूर्वग्रहदूषित दिसत नव्हते, पण माझ्या मनात पूर्वग्रह असल्याची जाणीव मला त्याच्या प्रश्नाने झाली. ‘अर्ज’सोबत काम करताना माझ्यापासून त्या महिलांना काही मदत झाली की नाही हे मला सांगता येणार नाही. पण माझ्या माणूस बनण्याच्या प्रवासात त्यांचे योगदान मोलाचे ठरले.
ज्यांचे उत्पन्न वेश्याव्यवसायात असताना महिना पंचवीस हजारांच्या आसपास होते, त्या महिला दोन अडीच हजार रुपये महिना पगारावर अर्जच्या लॉन्ड्रीत काम करताना दिसत होत्या. माझ्या पूर्वग्रहांना एकेक छेद मिळत होता. एकदा बोलता बोलता एक महिला म्हणाली, “जब लोग बोलते है की ये लडकीयाँ मजे के लिए धंदा करती है, तब बहुत बुरा लगता है| कमरे के बाहर सब मजा होता है, कमरे के अंदर सजा होता हे| जो चीज वो अपनी बीबी के साथ नही कर सकता, वो करने के लिए हमारे पास आता है| जिसके मुह से बांस आती हो, जिसके बदन से बदबू आती हो, उसके साथ सोना आसान नही है|’
त्यांच्यासोबत काम करताना माझ्या लक्षात आले की, या महिला तीन मानसिक अवस्थांतून जातात. पहिली मानसिक अवस्था असते प्रतिरोधाची (Resistance). या काळात तिचा प्रतिरोध शारीरिक-मानसिक छळ करून मोडून काढला जातो. दुसरी मानसिक अवस्था असते, जुळवून घेण्याची (Adaptation). प्रतिरोधाचा उपयोग होत नाहीये, हे लक्षात यायला लागल्यावर या महिला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू जुळवून घेता घेता त्या स्वीकाराच्या अवस्थेत (Acceptance) पोचतात. त्यांच्या लक्षात येते की, मुख्य प्रवाहात परत जाण्याचे आपले मार्ग तुटलेले आहेत. आता हेच आपले प्रारब्ध आहे, हे जाणवू लागताच त्या म्हणतात, “होय. आम्ही वेश्या आहोत. आम्हाला हकाने जगू द्या.” जर या महिलांची सुटका पहिल्या अवस्थेत असताना झाली तर सुटका करणारा त्यांच्यासाठी देव असतो. पण स्वीकार अवस्थेत पोचल्यावर त्यांच्यात स्टॉकहोम सिंड्रोम दिसू लागतो. त्यांना त्यांचे शोषण करणारे शुभचिंतक वाटतात. अशा महिलांना पुढे करून हा धंदा कायदेशीर करा असे म्हणणारा एक गट उभा राहिलाय. गंमत म्हणजे ते काय कायदेशीर करा म्हणताहेत? १९५६ चा अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा बारकाईने अभ्यासला तर लक्षात येईल की ही मंडळी भडवेगिरी कायदेशीर करा असे म्हणत आहेत. कारण हा कायदा कोणाही व्यतीला वेश्याव्यवसाय करण्यापासून अडवत नाही. पण वेश्याव्यवसायातील तिच्या कमाईवर जगणार्या ती सोडून इतर सर्वांना कायदा तस्कर समजतो. तिचे अठरा वर्षांपेक्षा मोठे मूलदेखील आईच्या वेश्याव्यवसायातील कमाईवर जगत असेल तर तेदेखील तस्कर ठरते. या तस्करांना कायदेशीर स्थान द्या, असे त्यांचे म्हणणे आहे.
काही लोक मला असेही भेटले की, ज्यांचे म्हणणे होते की, वेश्याव्यवसाय हे श्रम आहेत. जसे टायपिस्ट आपली बोटे वापरते, तसे आम्ही आमचे लैंगिक अवयव वापरतो. हा युतिवाद वरकरणी योग्य वाटतो. पण त्यातील फोलपणा लक्षात येण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. गांधी जयंतीला आपण श्रमांची प्रतिष्ठा व्यत करायला श्रमदान करतो. माझ्यासारखा डॉक्टर जाऊन कचरा काढतो, संडास साफ करतो. माझ्यासारखी एखादी डॉक्टर श्रमदान म्हणून गांधीजयंतीला वेश्याव्यवसाय करेल काय? नाही ना करणार. म्हणजे हे श्रम नाहीत, हे शोषण आहे. सर्वांत जुन्या प्रकारचे शोषण आहे! त्यामुळे त्यांना ‘वर्कर’ म्हणणे म्हणजे गुलामगिरीच्या बेड्या सोन्याच्या आहेत असे दाखवणे आहे. गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव होऊ नये यासाठी पद्धतशीर प्रयत्न करणे आहे.
माझ्याकडून ही माहिती ऐकून देखील माझ्या एका स्नेह्याने मला म्हटले की ‘पण समाजाची ती गरज आहे ना? अलीकडे मुलांची लग्नेदेखील वेळेवर होत नाहीत.’ मला त्याच्या ‘समाजाची गरज’ या शब्दांचा राग आला. मी म्हणालो, “समाजाची ती गरज असेल तर तुम्ही तुमची मुलगी समाजाच्या गरजपूर्तीसाठी पाठवाल का? सैनिक होण्यासाठी शहीद होण्याची शक्यता असताना मुलगा सैन्यात पाठवता तशी मुलगी देहविक्रयात पाठवाल का?”
अलीकडेच एका कार्यशाळेत मी म्हणालो की, देहविक्रयाचा बाजार हा पुरुषांनी निर्माण केलेल्या मागणीवर उभा आहे. त्यामुळे तो थांबवायचा असेल तर आपल्या घरातील मुलगा कोणा मुलीला विकत घ्यायला जाणार नाही असे संस्कार आपण दिले पाहिजेत. जो माणूस वेश्येला खरेदी करायला जातो त्याला लैंगिक गुन्हेगार म्हटले पाहिजे. त्यावर एका संस्थेचा प्रतिनिधी वेश्येचे गिर्हाईक बनण्याचे वर्तन कशी नॉर्मल गोष्ट आहे, याबाबत युतिवाद करू लागला. त्याचा युतिवाद ऐकून मला मनोविकारशास्त्रात अभ्यासलेले एरिक फ्रॉम आठवले. एरिक फ्रॉम हे सिग्मड फ्रॉईडनंतरचे जगप्रसिद्ध मनोविश्लेषक. त्यांनी ‘टू हॅव ऑर टू बी,’ ‘मॅन फॉर हिमसेल्फ’, ‘आर्ट ऑफ लव्हिंग’, ‘फिअर ऑफ फ्रीडम’ वगैरे सारखी पुस्तके लिहून मानसशास्त्रात मूलभूत भर घातली आहे. त्यांनी ‘नॉर्मल’ कशाला म्हणावे याची बारकाईने चिकित्सा केली आहे. आजच्या विकृत व्यवस्थेला जुळवून घेणारी व्यती मानसिक अस्वास्थ्याची चिन्हे दाखवत नाही, म्हणून तिला ‘नॉर्मल’ म्हणता येईल का? व्यवस्थाच जर विकृत असेल तर अशा विकृत व्यवस्थेला जुळवून घेणारा नॉर्मल कसा असू शकेल? असा मूलभूत प्रश्न फ्रॉमसाहेब उपस्थित करतात. माणसाच्या मानसिकतेवर समाजव्यवस्थेचा प्रभाव पडत असतो. आज बाजाराच्या मूल्यव्यवस्थेने मानवी जीवन व्यापून टाकले आहे. कोणतीही गोष्ट (अगदी मानवी नातीदेखील) विक्रीजन्य ठरवणे बाजारु दृष्टीने बघणार्याला ‘नॉर्मल’ वाटेल, पण मानसिक समृद्धीच्या नजरेतून ते नॉर्मल ठरेल काय? माणसाला एखाद्या गोष्टीची वासना वाटते, एवढ्याच कारणासाठी त्या वासनेची पूर्तता करण्याला योग्य ठरवणे, शास्त्रीय म्हणता येईल का? माणसा-माणसातले संबंध हे कसे असावेत? वस्तू व माणूस यांच्यातील संबंधांसारखे असावेत काय? लैंगिक संबंध ही फक्त लैंगिक अवयवांची खाज शमवणे आहे की, एकटेपणाच्या पिंजर्यावर मात करत दुसर्याला जोडले जाणे आहे? प्रेमाने दुसर्या व्यतीशी जोडले जाण्याच्या कलेत अपयशी ठरल्यामुळे जोडणे विकत घेण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? माणूस हे आपली चतुराई वापरून सर्वांत जास्त उपभोग पदरात पाडून घेणारे श्वापद आहे की अविकसित बुद्ध आहे, याचा शांतपणे विचार करण्याचा सल्ला फ्रॉमसाहेबांनी दिला आहे. अविकसित बुद्ध ही प्रत्येक माणसाची खरी ओळख असेल तर त्याने बुद्धत्वाच्या दिशेने स्वतःला विकसित करणे हे प्रत्येक माणसाचे ध्येय असले पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याने जीवनाच्या प्रत्येक आयामात प्रयत्न केले पाहिजेत, असे फ्रॉमसाहेब सुचवतात.
– डॉ. रुपेश पाटकर
(लेखक मनोविकारतज्ज्ञ असून गोव्यातील ‘अन्याय रहित जिंदगी’ या संस्थेसोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करतात.)
संपर्क : ९६२३६ ६५३२१
