जळतील पापे जन्मांतरीची

ह.भ.प. देवदत्त परुळेकर - 9422055221

तुमच्या वाट्याला हे भोग आले याचे कारण तुमचे पूर्वजन्मीचे पाप, असे सर्वसामान्यांना सातत्याने सांगण्यात आले. विशेषत: जन्माधिष्ठित वर्णाश्रमाचे समर्थन करण्यासाठी याचा खुबीने वापर करण्यात आला. तू शूद्र आणि मी ब्राह्मण का? कारण तुझा जन्म शूद्र आई-बापापोटी, माझा ब्राह्मण आई-बापापोटी? पण माझा जन्म शूद्र आई-बापापोटी यात माझा काय दोष? हा तुझा पूर्वजन्मातील पापाचा परिणाम असे तथाकथित धर्ममार्तंडांनी सांगितले.

पापाचे परिणाम असे जन्मोजन्मी भोगावे लागणार असतील तर आपल्या वाट्याला चांगले दिवस केव्हा आणि कसे यायचे? याकरिता पाप लवकर नष्ट करण्याचा काही मार्ग आहे काय? तथाकथित धर्ममार्तंडानी भोळ्या भाविकांच्या या भीतीचा नेमका फायदा करून घेतलेला दिसतो.

युरोपमध्ये श्रीमंत माणसांना स्वर्गात जाण्याचे पासेस खुद्द चर्चनेच विकले. इकडे पुरोहितशाहीने यज्ञयाग, व्रतवैकल्ये अशा मार्गाने लुटालुटीचे प्रकार चालवले. पुरोहितांना प्रत्येक ठिकाणी गलेलठ्ठ दक्षिणा असेच. पण याखेरीज तुझ्या हातून मागच्या जन्मी मांजर मारले गेले आहे, म्हणून मला सोन्याचे मांजर दान दे! तुझ्या स्वप्नात साप येतो ना, मग मला सोन्याचा साप दान दे! असे असंख्य प्रकार बोकाळले. हे सर्व पापक्षालनार्थ! या सगळ्यातून सर्वसामान्याला बाहेर काढण्यासाठी संतांनी ओरडून सांगितले, खरा धर्म कर्मकांडात, पूजाअर्चेत, व्रत-वैकल्यात नाही तो नैतिक आचरणात आहे. पण रूढींची बेडी तोडणे मोठे अवघड असते. विशेषत: धर्माच्या आधाराने, धर्माच्या नावाखाली पोसलेल्या रूढींना धर्माच्या आधारानेच संतांना छेद द्यायचा होता. ही शस्त्रक्रिया मोठी नाजूक होती.

लोकांना कर्मकांडाचा, व्रत-वैकल्याचा, यज्ञ-यागाचा, आचार-धर्माचार वाटत होता. त्यातच आपले कल्याण आहे. आपल्या पापातून मुक्त होण्याचा तोच एक मार्ग आहे, असे त्यांच्या मनावर हजारो वर्षांच्या परंपरेचे संस्कार होते. यातून माउलींनी मार्ग कसा काढला?

(याबाबत माउलींचा प्रत्यक्ष अनुभव काय होता? ज्ञानेश्वर माउलींच्या आई-वडिलांना तर देहान्त प्रायश्चित्त घेण्याची आज्ञा धर्मपीठाने केली. ते प्रायश्चित्त त्यांनी घेतलेही, पण ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना माफी मिळाली नाही. त्यांच्यावरील बहिष्कार उठला नाही. त्यांना अनेक वर्षे ‘संन्याशाची पोरं’ हणूनच दूर ठेवण्यात आले. मग या दुष्टचक्रातून बाहेर तरी कसे पडावे?)

संतांनी यावर उपाय शोधून काढला तो नामस्मरणात्मक भक्तीचा. केवळ नामस्मरणाने जन्मोजन्मीच्या सर्व पापांचा नाश होतो अशी घोषणा संतांनी केली. ज्ञानेश्वर माऊलींनी यासाठी भगवद्गीतेतील प्रत्यक्ष भगवंताच्या शब्दांचा आधार घेतला.

गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या. यज्ञांमध्ये ‘जपयज्ञ’ ही माझी विभूती आहे असे भगवान सांगतात.

समस्तांही यज्ञांचां पैकी । जपयज्ञु तो मी ये लोकीं ॥

जपयज्ञ ही स्वत: भगवंताची विभूती आहे हे गीतेने व ज्ञानेश्वरीने स्पष्ट केल्यावर या जपयज्ञाचे महत्त्व विशद करणारी माऊलींची प्रसिद्ध ओवी येते. ती अशी –

नामजपयज्ञ तो परम । बाधूं न शके स्नानादि कर्म ।

नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ॥

नामजपयज्ञ हा सर्व यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ व सर्व साधनांपेक्षा सोपा आहे. स्नानादिक बंधनाचा अडसर नामाला नाही. धर्म व अधर्म हे दोन्ही नामस्मरणाने पावन होतात. वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म रूपच ठरते. ज्ञानेश्वरीतील अत्यंत आशयपूर्ण अशी ही एक महत्त्वाची ओवी आहे. माउलींनी मोजक्या शब्दात नामाचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. सुरुवातीलाच सर्व यज्ञांमध्ये नामजपयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे असे माउली सांगतात. स्वर्गभोगासाठी जी यज्ञादी कर्मकांडे केली जातात त्याचा माउलींनी वारंवार निषेध केला आहे. भगवंताची प्राप्ती करून देतो तोच खरा पुण्याचा मार्ग. तोच खरा यज्ञ अशी माउलींची भूमिका आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीत ‘स्वधर्म यज्ञ’ आणि ‘नामजपयज्ञ’ या दोनच यज्ञांना माउलींनी मान्यता दिली आहे. सर्व यज्ञांमध्ये नामजपयज्ञ श्रेष्ठ आहे, हे सांगताना माउलींना काय सांगायचे आहे? माउलींच्या काळी यज्ञादिक कर्मकांडाचे भलतेच स्तोम माजले होते. व्रते, कर्मकांडे, यज्ञ, दक्षिणा यांचा सुळसुळाट झाला होता. धर्माची अधिकारी सूत्रे साधू-संतांच्या हातात असण्याऐवजी आपमतलबी पुरोहितशाहीच्या हातात होती. धर्माच्या नावाखाली जनसामान्यांची लुबाडणूक चालली होती. हेमाडपंथाचा ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ हा हजारो कर्मकांडांनी भरलेला ग्रंथ डोक्यावर घेऊन पुरोहितशाही नाचत होती. हेमाडपंथाला राजाश्रय होता. यादव राजे विलासात व धार्मिक कर्मकांडात गुरफटले होते. यज्ञात सहजतेने पशुहत्या होत होत्या. अशावेळी या सर्व यज्ञांची काही गरज नाही. नामजपयज्ञ हाच सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे हे माउलींचे उद्गार जनसामान्यांना मोठाच आधार देणारे वाटले, यात नवल कोणते?

नामस्मरण करताना ‘बाधूं न शके स्नानादि कर्म।’ असा उद्घोष करून माउलींनी नामसाधनाची सुलभता स्पष्ट केली आहे. नाम घेताना स्नानादिकाचेही बंधन येत नाही.

भगवंताच्या प्राप्तीची चार साधने चार युगांसाठी सांगितली गेली आहेत. कृत युगात ध्यान, त्रेता युगात यजन, द्वापार युगात पूजन आणि कलियुगात नामस्मरण अशी ही साधने आहेत. ही साधने क्रमाक्रमाने जास्त सुलभ आहेत. ज्याचे अंत:करणातून सर्व विकार नष्ट झालेले आहेत त्याला ध्यानाचा अधिकारी म्हणून सांगितले आहे. यज्ञ करण्याकरिता प्रचंड द्रव्याची आवश्यकता आहेच, या खेरीज वेदशास्त्राचे मंत्रांचे ज्ञान हवे. पुन्हा यज्ञयागाचा अधिकार स्त्री, शूद्रांना नाही हे वेगळेच. याखेरीज काही यज्ञांचा अधिकार केवळ ब्राह्मणांना तर काही यज्ञाचा अधिकार क्षत्रियांनाच. अशा अनंत अडचणी विष्णू पूजनही सोपे नाही. आपण आपल्या देहाला जे जे उपचार करतो ते ते सर्व देवाला करणे म्हणजे पूजन असा पूजेचा दंडक आहे. ‘यथा देहे तथा देवे।’ म्हणजे आपण बिछान्यावर झोपत असू तर देवासाठी घरातही बिछाना हवा. हिवाळ्यात आपण गरम पाण्याने आंघोळ करत असू तर देवाला गार पाण्याने अंघोळ घालून चालणार नाही. हे सर्व सांभाळणे सामान्याला शक्य नाही. पुन्हा ध्यान, यज्ञ, पूजन यात मंत्राचाही एक उच्चार चुकला तरी शिक्षा आहेत.

संतांनी या सर्व कर्मकांडाला फाटा देऊन भगवंताचे नाम घ्या असा सोपा, सहज सुंदर भगवद्प्राप्तीचा उपाय सांगितला. नामाचे महत्त्व प्रतिपादन करण्यासाठी माउलींनी सांगितलेला ‘हरिपाठ’ आज लक्षावधी भाविकांची नित्य संध्या आहे. नामाचे सुलभत्व सर्व संतांनी वारंवार सांगितले आहे. हरिपाठात माउली म्हणतात-

ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ ।

नामदेवराय म्हणतात –

नामा म्हणे किती सांगावा निर्धारे । साधन सोपारे नाम एक ॥

तुकोबांचा अभंग प्रसिद्ध आहे –

नामसंकीर्तन साधन पैं सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥

या अभंगात शेवटी तुकोबा नाम साधन सर्वांत सुलभ आहे हे सांगतात.

तुका म्हणे सोपें आहे सर्वाहूनि । शहाणा तो धणी घेतो येथें ॥

पुरोहितशाहीच्या पिळवणुकीतून जनसामान्यांना, भोळ्या भाविकांना वाचवायचे असेल तर ‘पापक्षालनार्थ’ काही सोपा मार्ग त्यांना दाखवणे भाग होते. तुझ्या हातून पाप घडले आहे, म्हणतात ना! असू दे. घाबरू नकोस. नाउमेद होऊ नकोस. हे महागडे यज्ञयाग तुला जमणार नाहीत, असू देत! ही कंबर मोडणारी व्रतवैकल्ये तुला जमणार नाहीत. असू देत! तुझे पाप पुरते नष्ट करण्याचे सोपे मार्ग आहेत, ते सांगतो. देव दयाळू आहे. तो सर्व विश्वाचा कर्ताकरविता, तोच धर्माची मूर्ती आहे. पाप-पुण्य त्याच्या हाती आहे. तुकोबा म्हणतात, देवा,

धर्माची तू मूर्ती । पाप पुण्य तुझे हाती ॥

मज सोडवी दातारा । कर्मा पासोनि दुस्तरा ॥

त्या दयाळू देवाचे नामसंकीर्तन हा पापातून मुक्तीचा सर्वांत सोपा मार्ग आहे. सर्वांत प्रभावी मार्ग आहे. तुझ्या पापाचे कितीही डोंगर असू दे, ते नामाने नष्ट होतील. माउली म्हणतात –

हरि उच्चारणी अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥

तुण आग्नमेळे समरस झाले । तैसे नामें केले जपता हरि ॥

अनंत जन्मातील अनंत पापराशी असू देत, नामस्मरणाने नष्ट होतात. पापाचे नामोनिशाणच शिल्लक राहात नाही. माउलींची ओवी सुप्रसिद्ध आहे –

तरी कीर्तनाचेनि नटनाचें । नाशिलें व्यवसाय प्रायश्चित्तांचे ।

जे नामचि नाहीं पापाचे । ऐसें केलें ॥

त्यांनी नामकीर्तनाच्या माध्यमाद्वारा प्रायश्चित्ताचे, पाप निवारण करण्याचे उद्योग नष्ट केले. कारण त्यांनी पापाचे नावच नाहीसे केले.

लेखक संपर्क : ९४२२० ५५२२१


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]