संदीप पवार -

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य म्हणजे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून धर्मातील कर्मकांडांना दूर करणे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कर्मकांड आणि भोंदूगिरीवर नेहमीच प्रहार केला आहे. धर्माचा विळखा गडद झाला की, समाज भ्रामक कल्पनेत अडकतो. अशा दैवी कल्पनांच्या विळख्यातून माणसांना बाहेर काढून त्यांना माणूस म्हणून आनंददायी विचार करायला लावण्याचे फारच मोठे कार्य डॉ. दाभोलकरांनी केले आहे. एका भयमुक्त विज्ञानवादी आणि विवेकी समाजाचे स्वप्न घेऊन अंनिस कार्य करते आहे. परिवर्तनवादी कार्य करणार्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे डॉ. दाभोलकर हे आयडॉल आहेत. माझ्यासाठी अंनिसचा सारा परिवार ऊर्जा देणारा आहे.
मी अंनिसकडे आकर्षित होण्याचे कारणही तसेच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावांतील मी तरुण, मोलमजुरी करण्यासाठी मुंबईत गेलो. कोकणातील जातपंचायतीचा मी बळी ठरलो. बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे. धम्म म्हणजे जीवन मार्ग. माणसाचे जीवन आनंददायी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला; पण त्याच बौद्ध धम्मातील लोक त्यांच्याच धम्मातील लोकांना बहिष्कृत करतात! हे करत असताना त्यांच्या मनात कुठेही बुद्धाची करुणा जागी होत नाही. त्याची काही जिवंत उदाहरणे मी पुढे देत आहे. आमच्या बौद्धवाडीतील विकास विजय कदम यांनी त्यांच्या सख्ख्या बहिणीच्या लग्नामध्ये सहभागी व्हायचं नाही असा खेरशेतच्या भावकीने आदेश काढला. त्याचे आई-वडील हे भावकी संघटनेत बसतात, परंतु हा भावकी संघटनेत बसत नाही म्हणून त्याने त्याच्या सख्ख्या बहिणीच्या लग्नामध्ये सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला. भावकी संघटनेचे आजीवन सभासद असणार्या सुभाष रामचंद्र कदम यांनी मुलीच्या लग्नाला जाताना गावच्या सीमेजवळ नारळ फोडला म्हणून भावकी संघटनेने त्यांना वर्हाडाच्या ट्रकातून खाली उतरवले व स्वतःच वधूचे लग्न लावून आले; सख्ख्या बापाला मुलीच्या लग्नात सहभागी होऊ दिले नाही. मृत्यूनंतर स्मशानभूमीमध्ये शोकसभेची तारीख ठरवली जाते. सीताराम यशवंत कदम यांच्या मृत्यूसमयी, त्यांचा मुलगा भावकीत बसत नाही म्हणून भावकी संघटनेने शोकसभेची तारीख जाहीर केली नाही. नंतर मीटिंग घेऊन शोकसभेला जायचं; पण आपला विरोध दाखवण्यासाठी तिथे जेवायचं नाही असं भावकी संघटनेने एकमताने ठरवलं. हा निर्णय घेताना ज्या शिक्षकांनी समाजाला घडवायचे त्या शिक्षकांचा यात जास्त सहभाग आहे.
या भावकी संघटनेला आपल्याच वाडीतील असंघटित कामगारांच्या प्रश्नांबद्दल संघटित होऊन काही करावं असं वाटत नाही, किंबहुना त्यांना या प्रश्नाबद्दल काही देणं घेणंदेखील नसतं. आर्थिक स्थैर्य असलेले हे लोक भावकी संघटनेचा उपयोग समाजाच्या व्यापक हितासाठी करत नाहीत. भावकी संघटनेच्या नावे जाचक नियम पाळले जावेत, कोणीही प्रश्न विचारू नयेत, स्वतंत्र बुद्धीने विचार करू नये व आपले पुढारपण अबाधित राहावे यासाठी ते सामाजिक बहिष्काराचे हत्यार वापरतात.
आम्ही याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा प्रबोधन अभियान’ गावात राबवले. त्याचबरोबर ‘संविधान जागर यात्रा’ काढली. गावच्या ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढवली. गावात सातत्याने प्रबोधनाचे कार्यक्रम करत राहिलो. आता गावातील इतर वाड्यातील लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. गावातील इतर तरुण वर्ग आमच्याकडे मोठ्या अपेक्षेने आणि आशेने बघत आहे. नुकतेच आम्ही सिटू या लढाऊ कामगार संघटनेच्या ऑफिसचे उद्घाटन केले आहे. त्या माध्यमातून आम्ही संघटित-असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवत आहोत; परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही सातत्याने करत असताना आमच्या भावकी संघटनेच्या पदाधिकार्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल अथवा आपण केलेल्या गोष्टींचा पश्चात्ताप झालेला दिसत नाही. आजही ते त्याच मानसिकतेतून भावकीच्या माध्यमातून व्यवहार करतात आणि हे करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं वैषम्य वाटत नाही. शेवटी कधीतरी त्यांच्यामध्ये बुद्धाची करुणा जागी होईल या अपेक्षेने आम्ही त्यांच्याशी वर्तन आणि व्यवहार करायचे ठरवले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रश्न पडतो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बौद्ध धर्म आम्ही समजून घेतला आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, माझा मूर्तिपूजेवर विश्वास नाही; परंतु आजही आम्ही मोठ्या प्रमाणात बुद्धाच्या मूर्तीची पूजा करीत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, दुःख निवारण्याचा मार्ग दाखवणे हे बौद्ध धम्माचे अंतिम ध्येय आहे. असे असताना, आपल्या हक्काचा अपहार केला असता त्याच्या रक्षणासाठी दक्ष असणे, प्रतिकूल लोकमताला घाबरून न जाता दुसर्याच्या हातातले बाहुले न होता स्वतंत्र विचार करणे म्हणजेच बुद्ध विचार आहे! धम्म नवनवीन आधुनिक गोष्टी शिकवतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला बुद्ध हा केवळ बुद्धवंदनेपुरता मर्यादित नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बुद्ध क्रांतीची भाषा करतो, माणसाच्या प्रगतीसाठी संघर्षाची भाषा करतो. जागतिकीकरणामध्ये बुद्धाचे महत्त्व कशा पद्धतीने अधोरेखित करता येईल? भांडवलशाहीच्या युगात बुद्ध कसा महत्त्वाचा आहे! याबाबत चर्चा न करता केवळ बुद्धवंदना, वर्षावास या उपक्रमात सहभागी होऊन बाबासाहेबांना अपेक्षित असलेला बुद्ध किंवा बुद्धाने पाहिलेल्या आदर्श समाजाचे स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाही.
– संदीप पवार, खेरशेत, चिपळूण
लेखक संपर्क : ९९३०१ ०४१०३