चिकित्सेची अ‍ॅलर्जी कोणाला?

- पैगंबर शेख -

‘चिकित्सा’ या एका शब्दाने आणि त्यावर आधारित केलेल्या कृतीने बर्‍याच जणांना आपल्या आयुष्यात खूप यातना सोसाव्या लागल्या आहेत. कित्येकांनी या चिकित्सेसाठी स्वतःचे आयुष्यदेखील पणाला लावले आहे. विशेष म्हणजे ज्या धर्माची तत्त्वेच समकालीन चिकित्सेच्या आधारावर उभी राहिली, त्याही धर्मात चिकित्सेला वाव नाही, नावीन्याला स्थान नाही आणि तो धर्म परिपूर्ण आहे, असे ज्यावेळी वारंवार ठसवले जाते त्यावेळी त्या धर्माचा चिकित्सेचा इतिहास, सद्य काळात त्याची परिस्थिती आणि त्यावर आधारित त्याचे भविष्य यावर लिहिणे जास्त गरजेचे वाटते.

इस्लामचा अभ्यास करताना कुराण वाचा असेच सामान्यपणे सांगितले जाते; पण कुठल्याही नवीन व्यक्तीने कुराणपेक्षाही पैगंबर साहेबांचे चरित्र आधी वाचणे मला जास्त योग्य वाटते. ते का? कारण की, पैगंबर साहेबांच्या चरित्रामधून अरबचा इतिहास समजतो. पैगंबर साहेबांच्या आधी अरबची परिस्थिती, तिथल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या गोष्टींचा अभ्यास केल्याखेरीज कुराण पूर्णपणे समजणे कठीण आहे. पैगंबर मोहम्मद साहेबांना मुस्लीम समाज ईश्वराचे प्रेषित मानतो. तशी मुस्लीम समाजाची श्रद्धा आहे. मात्र पैगंबर मोहम्मद साहेबांना मुस्लिमेतरांनीदेखील ईश्वराचे प्रेषित समजावे हा अट्टाहास बाळगणे गरजेचे नाही. असामान्य कर्तृत्व असलेली एक महान व्यक्ती म्हणूनही त्यांचा अभ्यास जर कोणी करत असेल तर त्याचेही मोठ्या प्रमाणात स्वागत मुस्लीम समाजातून होणे गरजेचे आहे. कुराणमध्ये असलेल्या आयातचा (श्लोकाचा) अर्थ आणि त्यावेळी अरबमधील असलेली तत्कालीन परिस्थिती या दोन्ही गोष्टी जोपर्यंत सामान्य माणसांना समजत नाही, तोपर्यंत पैगंबर मोहम्मद साहेबांनी त्यांच्या हयातीत काय क्रांती केली, या प्रश्नाचे उत्तर कधीही आपल्याला मिळणार नाही.

१४०० वर्षांपूर्वी अरब वेगवेगळ्या रूढी-परंपरा आणि अंधश्रद्धेमध्ये अडकलेले होते. त्या काळी मुलीचा जन्म झाला की, त्यांना जिवंत मातीत गाडून मारले जाई. मुलगी जन्माला आली हे सांगायलादेखील लोकांना लाज वाटत असे. एखाद्या पुरुषाने घटस्फोट दिलेल्या महिलेशी अरबमधील पुरुष लग्न करत नसत. नवरा बायकोच्या भांडणात नवर्‍याने बायकोला रागाच्या भरात आईची उपमा दिल्यास त्यांचा घटस्फोट होत असे. हज यात्रेला गेल्यावर ज्या काबागृहाला मुस्लीम बांधव प्रदक्षिणा घालतात, त्या काबागृहात १४०० वर्षांपूर्वी वेगवेगळ्या स्थानिक देवी-देवतांच्या मूर्ती होत्या. महत्त्वाचे म्हणजे त्या देवी-देवतांचा आणि भारतात असलेल्या देवी-देवतांचा दुरान्वये काहीही संबंध नव्हता. हुबल, लात असे देव तर उज्जा नावाची देवी अशा साधारण ३६० पेक्षा जास्त स्थानिक देवी-देवतांच्या मूर्ती काबागृहात होत्या. गुलाम आणि मालकांचा दर्जा समान नव्हता. त्यांना माणसासारखी वागणूक दिली जात नसे. या प्रकारच्या बुरसटलेल्या गोष्टींचा अरबमध्ये प्रभाव होता.

या सर्व परिस्थितीत पैगंबर साहेबांनी निराकार एकेश्वरवादाचा पुरोगामी आणि सुधारणावादी विचार अरब विश्वात मांडला आणि याच्याच जोरावर अरबमधील वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये होणारे युद्धदेखील थांबवायला त्यांना त्या काळी यश मिळाले. गुलाम आणि मालक ईश्वरासमोर एकसमान आहेत. गुलामांनादेखील तुम्ही परिधान करत असलेले कपडे द्या. तुम्ही खात असलेले जेवण त्यांना द्या. हा प्रागतिक विचार पैगंबर साहेबांनी मांडला. एवढंच नाही तर अनेक गुलामांनादेखील त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये मुक्त केले. गुलाम पद्धत त्यांच्या हयातीत पूर्णपणे बंद झाली नाही. मात्र गुलामांना समान दर्जा मिळाला हेदेखील तितकेच खरे. हजरत बिलाल- ज्यांनी पहिली अजाण दिली, तेदेखील एक गुलाम होते; ज्यांना काबागृहावर जाण्यासाठी पैगंबर साहेबांनी आपल्या खांद्यावर पाय ठेवून जाण्यास दिले होते. याचाही उल्लेख या ठिकाणी करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला मुलगी झाली आणि त्याने तिचे पालन-पोषण करून ती वयात आल्यावर तिचे लग्न लावून दिले, तर त्या माणसाला जन्नतमध्ये जागा मिळेल हा नवीन विचार तत्कालीन समाजाला समजेल आणि त्यांच्यात बदल घडेल या उद्देशाने त्यांनी रुजवला. नवरा बायकोच्या भांडणात बायकोला आईचा दर्जा दिल्यावर घटस्फोट होतो ही प्रथा मोडून काढली. या परिस्थितीत घटस्फोट न होता पुरुषाला चाबकाचे फटके देण्याची शिक्षा देण्याची तरतूद पैगंबर साहेबांनी केली. म्हणजे शिक्षेच्या भीतीने एखादा नवरा आपल्या बायकोला आईचा दर्जा देणार नाही आणि दिला तरीही घटस्फोट होणार नाही. एका घटस्फोटित महिलेशी स्वतः लग्न करून घटस्फोटित महिलेशी लग्न करू शकत नाही, ही अरबमधील तत्कालीन चुकीची प्रथा त्यांनी मोडून काढली. महिलांना संपत्तीमध्ये अधिकृत वाटा त्यांनी दिला. त्याकाळी शिक्षणाचे स्वरूप हे आत्ताच्या शिक्षणाप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आणि विभागलेले नसले तरीही मानवी मूल्यांचे शिक्षण कुराणच्या माध्यमातून कुठल्याही महिलेला घेण्यास आणि ते इतरांना देण्यासदेखील कसलेही निर्बंध न्हवते. १४०० वर्षांपूर्वी अरबमधील महिला लिहिता आणि वाचता येणार्‍या होत्या. सोबतच त्यांना मिळालेले शिक्षण त्या इतरांनाही देऊ शकत होत्या. याचाच परिपाक म्हणजे हजरत आयेशा यांनी साधारण २२१० हादिस त्यांच्या जीवनकळात कथन केल्याचे अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत. याला कुठलाही मुस्लीम नाकारू शकत नाही.

एका विद्वानाची शाई, एका शहिदाच्या रक्तापेक्षाही पवित्र आहे. हा विचार मांडून पैगंबर मोहम्मद साहेबांनी विद्वान आणि ज्ञानी माणसाला किती प्रतिष्ठा दिली हे समजते. विद्वान आणि ज्ञानी असणे म्हणजे फक्त इस्लामचे ज्ञान, त्याची नीतिमूल्ये माहिती असणे, असे होते का? तर नाही. ‘ज्ञानप्राप्तीसाठी तुम्हाला चीनपर्यंतदेखील जावे लागले तर जा’ हा देखील प्रागतिक विचार पैगंबर साहेबांनी मांडला. चीन त्याही काळात तांत्रिकदृष्ट्या प्रगत होते. तिथे धार्मिक ज्ञान घेण्यासाठी जायचे होते का? तर नाही. ज्या ज्या आधुनिक गोष्टींचा शोध लागत आहे त्या सर्व गोष्टींचे ज्ञान घ्या, हा दूरदृष्टिकोन पैगंबर साहेबांनी दिला. चिकित्सेची आणि सुधारणेची एवढी समृद्ध परंपरा इस्लामच्या माध्यमातून पैगंबर साहेबांनी दिली. मात्र ती परंपरा तेवढ्याच काळापुरती मर्यादित ठेवायची होती का? हा खूप मोठा प्रश्न जगभरातील मुस्लिमांसमोर आहे. कारण ही चिकित्सेची परंपरा पैगंबर साहेबांच्या काळात परिपूर्ण झाली. आता चिकित्सेची आवश्यकता नाही, सुधारणेची गरज नाही आणि आम्ही परिपूर्ण आहोत, ही अंधश्रद्धा मुस्लिमांमध्ये रूढ केली गेली आणि एका चौकटीत मुस्लिमांना बंदिस्त केले गेले. याला जबाबदार स्वतः मुस्लीम समाज आहे. ज्यांना इस्लामिक क्रांती समजली नाही, ना ती समजून घेण्याऐवढी उदार मानसिकता अजूनही समाजात निर्माण केली जात आहे.

बुरसटलेल्या या मानसिकतेच्या विरोधात कित्येक व्यक्तींनी कामे केली, ज्यांनी भविष्य ओळखून मुस्लीम समाजाला दिशा देण्याचे काम केले. यात भारतातील स्वातंत्रपूर्व काळातील नाव घ्यायचे झाले तर, सर सय्यद अहमद खान यांचे नाव घ्यावे लागेल. ज्यांच्यामुळे मुस्लीम समाजात १८ व्या शतकात इंग्रजी भाषेचा प्रसार झाला. ज्यांच्यामुळे आज अलिगढ मुस्लीम विद्यापीठ उभे आहे. त्यांनाही या गोष्टी करताना तत्कालीन मुस्लिमांनी मोठा विरोध केला. मात्र आज त्यांचीच पुढची पिढी या विद्यापीठात शिकत आहे. त्यानंतर सईद मुमताज अली ज्यांना मौलाना मुमताज अली देखील म्हणतात त्यांचेही नाव विशेष करून घ्यावे लागेल. ज्यांनी १८९८ मध्ये तहजीब-ए-निःस्वान नावाचे साप्ताहिक काढले होते. ज्यामधून ते इस्लाममध्ये महिलांचे अधिकार यावर लिहीत असत. सोबतच तत्कालीन स्त्रीवादी भूमिकादेखील या साप्ताहिकामधून त्याकाळी मांडल्या जायच्या. मुमताज अली यांच्या पत्नी मुहम्मदी बेगम या तहजीब-ए-निःस्वान साप्ताहिकाच्या संपादक होत्या- ज्या भारतातील पहिल्या मुस्लीम स्त्रीवादी लेखिका म्हणूनही गणल्या गेल्या. मुहम्मदी बेगम यांनी घटस्फोटानंतर महिलेला पोटगी मिळावी हा विचार आजपासून १२५ वर्षांपूर्वी त्यांच्या साप्ताहिकामधून मांडला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुहम्मदी बेगम यांनी पडदा प्रथेला विरोध केला. सोबतच बहुविवाहाच्या विरोधातदेखील त्यांनी आपल्या साप्ताहिकामधून लेखन केले. स्त्री आणि पुरुष समान आहेत. पुरुषाला स्त्रीपेक्षा वरचा दर्जा नाही, असा सुधारणावादी विचार तहजीब-ए-निःस्वान या साप्ताहिकामधून त्याकाळी मांडला गेला. ही बाब छोटी नव्हे. विशेष म्हणजे हे सर्व करणार्‍या मुहम्मदी बेगम या ‘हाफिज-ए-कुराण’ म्हणजे कुराण तोंडपाठ असलेल्या महिला होत्या. अशा एखाद्या हाफिज महिलेकडून सध्याच्या काळात तरी एवढे प्रभावी विचार मांडले जाऊ शकतात का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मुहम्मदी बेगम या फक्त ३० वर्षे जगल्या. एवढ्या कमी वयात आणि अल्प काळात त्यांनी खूपच प्रागतिक विचार मांडले होते. तहजीब-ए-निःस्वान हे साप्ताहिक १९४९ पर्यंत सुरू होते. तब्बल ५१ वर्ष या साप्ताहिकाने स्त्रीवादी भूमिका मांडली. आजही मुस्लीम स्त्रियांना या प्रकारच्या साप्ताहिकाची खूप आवश्यकता आहे; पण सद्यकाळात ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याऐवढी सक्षम हाफिज आणि आलीम महिला मला तरी दिसत नाही.

सुधारणावादी विषयावर बोलताना हमीद दलवाईंचे नाव बर्‍याच ठिकाणी घेतले जाते. किंवा तो घास मुस्लिमांना जबरदस्तीने भरवलाच जातो अशी एकूण परिस्थिती आहे. ज्यांना हमीद दलवाईंचे विचार, लेखन माहिती नाही तेही लोक ‘आमचे समर्थन हमीद दलवाईंना आहे’ असे म्हणताना दिसतात आणि त्यांचा विरोध करणार्‍या मुस्लिमांची पण वेगळी अवस्था नाही. त्यांनीही हमीद दलवाई कधी वाचले नाहीत. तरीही विना आधाराचा विरोध त्यांच्याकडून कायमच सुरू असतो. मुस्लिमांच्या सुधारणावादी इतिहासात अनेकानेक व्यक्तींचे योगदान आहे. यात खूप व्हरायटी आहे. यात काही आस्तिक आणि धार्मिक आहेत तर काही नास्तिक आहेत. या कार्यात ज्याला जे आदर्श वाटतात ते त्यांनी घ्यावेत आणि सुधारणावादी परंपरा पुढे चालवावी. अमुक एखादी व्यक्तीच आदर्श म्हणून स्वीकारावी हा अट्टाहासदेखील नको. नाहीतर मुल्ला मौलवी आणि आपल्यात काहीही फरक राहणार नाही. ते ग्रंथप्रामाण्यवादी असतात. तेच परिपूर्ण आहे असे त्यांना वाटते. आपण व्यक्तीप्रामाण्यवादी झालो आहोत. आपल्याला अमुक एखादी व्यक्तीच प्रमाण वाटते. मला हे दोन्हीही चुकीचे वाटतात. आपण मध्यम मार्गावर आले पाहिजे. हमीद दलवाईंच्या ट्रिपल तलाक विरोधातील भूमिका, त्यासाठी त्यांनी केलेली कृती, महिलांना पोटगी मिळावी म्हणून त्यांनी उभा केलेला लढा, मुस्लीम महिलांचे मांडलेले प्रश्न या सर्व गोष्टी या काळातही महत्त्वााच्या आहेत. ते विषय हमीद दलवाई यांनी उचलले म्हणून फक्त महत्त्वाचे नाहीत तर, ती समाजाची एक काळी बाजू आहे ज्यामुळे मुस्लिमांचे बरेच नुकसान झाले. ती काळी बाजू हमीद दलवाई यांनी समाजाला दाखवली त्याबद्दल त्यांचे आभार मानावेच लागतील.

मुस्लिमांमध्ये सुधारणेला वाव नाही, हा खूप मोठा गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे. हा गैरसमज मुस्लिमेतर बांधवांमध्ये प्रसार माध्यमांमधून पसवरलेला आहेच. त्या माध्यमातून मुस्लीम समाजाचे राजकीय हेतूने मोठ्या प्रमाणात राक्षसीकरण केले जाते; पण मुस्लीम समाजातदेखील हा गैरसमज मोठ्या प्रमाणात आहे की, मुस्लीम समाज बदल स्वीकारत नाही. हा गैरसमज दूर करण्यात गेल्या काही वर्षांत आपल्याला बरेच यश मिळाले आहे असे म्हणालो तर, वावगे ठरणार नाही. यातील सर्वात महत्त्वाचा भाग किंवा ज्यापासून आपण सुधारणेला सुरुवात केली तो म्हणजे आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी. कुर्बानी ही प्रतीकात्मक आहे. ती तुम्ही कशाही स्वरूपात देऊ शकता. प्राण्यांची कुर्बानी देण्यापेक्षा त्याच पैशाने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करा या आवाहनाला मुस्लिम समाजातून बराच प्रतिसाद मिळाला. गेल्या ११ वर्षात प्रत्येक वर्षी या उपक्रमात सामील होणार्‍या मुस्लिमांची संख्या वाढत आहे. ही आनंददायी बाब आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक स्वरूपात आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी देणार्‍यांचे प्रमाण देखील प्रत्येक वर्षी वाढत आहे. पण खरेतर हा विचार ज्यादिवशी मशिदींमधून सांगितला जाईल तो आनंदाचा दिवस असेल. कुर्बानीच्या माध्यमातून देशभर साधारणपणे २० हजार कोटींची प्रत्येक वर्षी उलाढाल होते. एवढ्या पैशामध्ये किती विद्यापीठे, किती हॉस्पिटल, किती शाळा निर्माण होऊ शकतील? किती मशिदींचे, मदरशांचे आधुनिकीकरण होऊ शकते याचा विचार समाज करेल का? की गरीब कुटुंबाला वर्षातून एकदा पावशेर मटण वाटून आपली जबाबदारी झटकून मोकळे होणार आहेत?

जकातचे पैसे या सर्व कामांसाठी आहेत, असेही काहींचे म्हणणे असते. रमजानमध्ये मुस्लीम समाजातून मोठ्या प्रमाणात जकातची रक्कम जमा केली जाते. मात्र जकातच्या पैशातून जकातचे पैसे घेणार्‍या लोकांनी काय दिवे लावले? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. देशभर प्रत्येक वर्षी मुस्लीम समाजाकडून साधारणपणे ७५०० ते ८००० कोटी जकातची रक्कम जमा होते. एकट्या मुंबईत ८०० कोटी जकातची रक्कम जमा होते अशी माहिती आहे. हा सर्व पैसा जातो कुठे? या पैशाने प्रत्येक वर्षी नवनवीन विद्यापीठ, हॉस्पिटल्स, शाळा का उभ्या राहत नाहीत? हा पैसा तर धर्माच्या ठेकेदारांकडेच जातो ना? मग याची जबाबदारी सार्वजनिकरीत्या घेताना ते दिसतात का? यासाठीच आपण जकात शिक्षणासाठी उपक्रमदेखील सुरू केला आणि हे जकातचे पैसेदेखील आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी वापरले. यातून काही विद्यार्थ्यांचे वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले, काही विद्यार्थ्यांचे इंजिनीअरिंग पूर्ण झाले तर काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. जकात शिक्षणासाठी आणि आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी या माध्यमातून पाच हजार पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक मदत आत्तापर्यंत करू शकलो आहोत. यातील पन्नास टक्के विद्यार्थी जरी पुढे हा उपक्रम घेऊन गेले तरीही समाजात मोठा बदल घडेल.

स्वातंत्र्याच्या व्याख्या या काळाप्रमाणे बदलत असतात. एक काळ होता ज्या काळात महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे. चूल आणि मूल इथपर्यंतच महिलांची मजल होती. त्याविरोधात मोठ्या प्रमाणात सुधारणावादी विचार मांडले गेले आणि आज करोडो महिला शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवत आहेत. एकीकडे हे होत असताना मुलींना बुरखा आणि हिजाबची सक्ती करणे या गोष्टी मागासलेपणाचे लक्षण राहील. आजपासून साधारण २० ते २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील ग्रामीणच नाहीतर शहरी भागातदेखील बुरखा वापरणार्‍या महिलांचे प्रमाण नगण्य होते. ग्रामीण भागात तर बुरखा म्हणजे काय? हेदेखील महिलांना माहिती नसल्यात जमा होते. आत्ताही ग्रामीण भागात एक पिढी मागे जाल तर त्या महिला अजिबात बुरखा परिधान करत नाहीत. मात्र त्यांची पुढची पिढी बुरखा परिधान करते. पोशाखात हा बदल कसा काय झाला असेल? एकाच घरात आई बुरखा परिधान करत नाही मात्र मुलगी किंवा सून बुरखा परिधान करते. हे कसं काय घडलं असेल? याचा विचार कधी केलाय का? नसेल केला तर तो करायला हवा. तुमची स्थानिक संस्कृती आणि धर्म या दोन गोष्टी वेगळ्या असतात. तुमचा पोशाख हा तुमच्या स्थानिक संस्कृतीचा भाग असतो. मात्र या दोन गोष्टीत फरक असतो हे सांगण्यात इथले मौलाना लोक सपशेल फेल ठरले, असे खेदाने सांगावे लागत आहे. जिथे मुस्लीम पुरुष कधी पायजामा कुर्ता आणि गांधी टोपी घातलेला असायचा तिथेच त्याला धर्माचे डोस देऊन पठाणी वर यायला लावले गेले. ही वेगळी ओळख मुस्लीम पुरुषांनी स्वतःची स्वतः जपलीच; पण त्यात भरीस भर म्हणून महिलांनादेखील बुरख्यात अडकवले. हा सर्व बदल गेल्या २० ते २५ वर्षांत महाराष्ट्रात घडला आहे. अगदी मी आणि माझे बहीण भाऊ ज्या मराठी शाळेत शिकले त्या मराठी शाळेत कधी हिजाब घालून जावे, असे आम्हाला वाटले नाही; पण आज त्याच शाळेत एखादी मुस्लीम मुलगी हिजाब परिधान करून जाते. हीच परिस्थिती महाराष्ट्रातील बहुतांश शाळा-कॉलेजमध्ये आहे. याला कोण कारणीभूत असेल?

आम्ही बुरखा आणि हिजाबची सक्ती करत नाही. मुली स्वतःहून ते परिधान करतात असे उलेमा-ए-हिंदचे मेहमूद मदनी साहेब एका मुलाखतीत बोलताना मी ऐकले होते आणि बुरखा हिजाब वर बोलल्यावर बहुतांश मुस्लिमांच्या याच प्रतिक्रिया असतात. माझं त्या सर्वांना एक विशेष आवाहन आहे- हे सर्व मशिदीतून मौलाना का बोलत नाहीत? की आमच्याकडून बुरख्याची कुठलीही सक्ती नाहीये. ज्या महिला मुलींना बुरखा परिधान करायचा आहे त्यांनी करावा. ज्यांना बुरखा परिधान नाही करायचा त्यांनी करू नका. असे ते करतील का? जर नसतील करणार तर मुस्लिमेतरांच्या मंचावर येऊन आम्ही बुरख्याची सक्ती करत नाही, असे बोलण्यात अर्थ नाही. ही कृतिशून्य भूमिका राहील.

जग वेगाने बदलत आहे. इस्लामिक देशदेखील सुधारणेकडे प्रवास करत आहेत. सौदी अरबमध्ये महिलांना नोकरीची संधी, वाहन चालवण्याचा परवाना मिळणे हे बदल घडले आहेत. सौदी अरबच्या महिला अगदी मिस युनिव्हर्समध्येदेखील भाग घेत आहेत. काझेकिस्तान, ताझेंकिस्तान यांसारख्या मुस्लीमबहुल देशातदेखील हिजाब आणि बुरखा बंद केला आहे. मात्र भारतासारख्या देशात बुरख्याची साथ वेगाने पसरत आहे. यावर प्रत्येक सुधारणावादी व्यक्तीने प्रबोधनाची लस वेळोवेळी देणे गरजेचे आहे. बुरखा, हिजाब हे विशेष करून शासकीय आणि इतर बर्‍याच क्षेत्रात अडसर ठरताना दिसत आहे. त्यामुळे तो प्रबोधनाने बंद करणे गरजेचे आहे. आपल्या माध्यमातून बर्‍याच मुली आणि महिलांचे बुरखे प्रबोधन करून स्वेच्छेने बंद झाले हे सांगताना मनस्वी आनंद होतो. त्यातील काही मुलींचे अनुभव हमीद दाभोलकर सरांशी देखील वेळोवेळी शेअर केले आहेत. अगदी काझेकिस्तानमध्ये बुरखा हिजाब बंद झाल्याचा आनंद मुस्लीम महिलांनी माझ्यासमोर व्यक्त केला, त्यांनी मला त्या लायक समजले याचाही मला मनस्वी आनंद होतो. पुढे आणखीन किती महिलांचे बुरखे बंद होतील मला माहिती नाही; पण बुरखा बंद झालेल्या माता भगिनींनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून माझी ऊर्जा प्रचंड वाढली. हे काही कमी नाही…

भारतीय मुस्लिमांचे अर्धे आयुष्य देशभक्त की देशप्रेमी हे सिद्ध करण्यात जाते तर, अर्धे आयुष्य हराम हलाल करण्यात जाते. भारतीय मुस्लिमांना जेवढा त्रास राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांच्याविरुद्ध द्वेष पसरवणार्‍यांचा आहे, त्याच्यापेक्षाही जास्त त्रास त्यांना धर्माच्या नावे निरर्थक लगाम घालणार्‍या आणि त्यांच्या भौतिक प्रगतीच्या आड येणार्‍या धर्माच्या ठेकेदारांचा आहे. धर्माच्या ठेकेदारांनी चिकित्सेच्या कक्षा मर्यादित ठेवल्या. त्यापुढे समाजाला विचार करू दिला नाही. कोणी सुधारणावादी विचार केला की, इस्लाम धोक्यात आहे अशी आरोळी ठोकण्यात धर्मांध कायम पुढे असतात. खरेतर धर्म हा धर्मांधांमुळेच धोक्यात येत असतो. जे सुधारणेला कायम विरोध करत असतात ते खरे धर्माचे शत्रू असतात आणि जे धर्मात आधुनिकता आणि सुधारणा आणतात, ते खरे धर्माभिमानी आणि धर्मप्रेमी असतात. परिपूर्ण चिकित्सेवर उभ्या राहिलेल्या इस्लामची आणि तो धर्म मानणार्‍या मुस्लिमांची डोळ्यावर पट्टी बांधलेली आणि मागासलेली अवस्था, ही त्या धर्माच्या दलालांनी आणि धर्मांधांनी केलेली आहे आणि ते त्याची थोडीही जबाबदारी घ्यायला अजूनदेखील तयार नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. भारतात सध्या मुस्लिमांची जी परिस्थिती आहे तशी जगभरात कुठेही सध्या नाहीये. एकीकडे मुस्लिमांविषयी प्रचंड द्वेष राजकीय हेतूने पसरवला जातोय, त्यांच्याकडून खरेदी करू नका, त्यांना घर देऊ नका, सामाजिक बहिष्कार, आर्थिक बहिष्कार या विवंचनेत समाज अडकला आहे तर, दुसरीकडे त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून न देता अजून मूलतत्त्ववादाकडे कसे झुकवता येईल हे मुल्ला मौलवींकडून पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत न डगमगता सुधारणावादी विचारांची मशाल घेऊन चालत राहण्याशिवाय पर्याय नाही. जी मशाल दोन्हीकडील अंधारगृहात प्रकाश पोहोचवण्याचे काम करेल; फक्त एकीकडे नाही. समजलं तर ठीक!

पैगंबर शेख, पुणे, महाराष्ट्र

संपर्क : ९९७००७०७०५


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]