बडूरच्या तलवारबाबाची अंनिसवर ‘तलवारबाजी’

कमलाकर जमदडे -

बडूरच्या डोंगरावरचा ‘तलवार बाबा’ : अंधश्रद्धेच्या धुक्यातून सत्याचा उदय

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बडूर हे साधंसुधं गाव. गावालगतच्या डोंगरावर बिरोबा देवाचे प्राचीन मंदिर. श्रद्धा, नवस, गार्‍हाणी आणि ग्रामस्थांचा भावविश्व यांचं केंद्रस्थान. अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी ज्ञानेश्वर करडे यांचे आजोबा अगरबत्तीच्या सहाय्याने गार्‍हाणे ऐकून लोकांना मार्गदर्शन करत असत, अशी गावकर्‍यांत समजूत होती. त्या पारंपरिक श्रद्धेच्या धाग्यावरच पुढे नव्या अध्यायाची सुरुवात झाली.

ज्ञानेश्वर करडे हा उच्चशिक्षित तरुण. धार्मिक संघटनांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलेला. विविध उद्योग-व्यवहार, एमएलएम व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांत प्रयत्न केलेले; मात्र अपेक्षित आर्थिक यश न मिळाल्याने तो अस्थिर अवस्थेत होता, असे गावकर्‍यांचे म्हणणे. आणि अचानक एके दिवशी त्याने स्वतःला दैवी शक्तीचा अवतार म्हणून घोषित केले. वडिलोपार्जित परंपरा स्वीकारल्याचे सांगत त्याने बिरोबा देवाच्या नावाने स्वतःचा दरबार सुरू केला.

प्रत्येक रविवारी ठराविक वेळी मंदिरात दरबार भरू लागला. सुरुवातीला मंदिराचे दार बंद करून त्याला घोंगडी बांधली जाई. तासभर पूजा-अर्चा सुरू असल्याचा आव आणला जाई. त्यानंतर ज्ञानेश्वर करडे स्वतःच्या अंगाला हळद माखून, हातात तलवार घेऊन बाहेर येई. तलवारीच्या टोकाला लिंबू खोचलेले असे. कमरेला लुंगीप्रमाणे वस्त्र, चेहर्‍यावर ताणलेला आवेश आणि अंगात देव आला असल्याचा अभिनय.

यानंतर सुरू होत असे तथाकथित दैवी नृत्य. तलवारीचे टोक स्वतःच्या पोटावर हलके धक्के देत, थरथरत, डोलत तो लोकांसमोर येई. गर्दीतून प्रत्येकाला एकेक करून बोलावले जाई. कुणाच्या संसारात अडचण, कुणाच्या तब्येतीची चिंता, कुणाच्या शेतीचा प्रश्न, कुणाच्या नोकरीची धास्ती‡लोक आपली व्यथा मांडत आणि बाबा त्यावर तोडगे सांगत असे. लिंबू कापून फेकणे, वार्‍या करायला भाग पाडणे, न केल्यास देव कोपेल अशी भीती दाखवणे, असे प्रकार नियमित घडू लागले.

लोकांच्या अडचणी, भीती आणि आशा यांचा वापर करून विश्वासाचं जाळं विणलं जात होतं. लाभ झाला तर मंदिर उभारणीस स्वेच्छा मदत करा अशी मागणीही केली जाई. काहींना योगायोगाने कामे जुळली, काहींना मानसिक आधार मिळाला; आणि त्यातून बाबा खरे आहेत अशी हवा तयार झाली. पाहता पाहता गावाबाहेरूनही लोक येऊ लागले.

मात्र गावातील सुजाण नागरिकांनी हा प्रकार ओळखला. अनेकदा समजावून सांगितले. हा अंधश्रद्धेचा खेळ थांबवा, अशी विनंती केली. पण उत्तर एकच‡दैवी आदेश आहे. लोकांच्या भावनांवर स्वार झालेला हा खेळ वाढतच राहिला.

अखेर काही जागरूक ग्रामस्थांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. मारुती भदरगे, बालाजी यलगंदरे, माधव पटणे आदी कार्यकर्त्यांनी राज्य बुवाबाजी निर्मूलन समितीचे कमलाकर जमदडे यांच्या सोबतीने प्रथम प्रत्यक्ष माहिती घेतली, व्हिडिओ पुरावे तपासले आणि सत्यता पडताळली. माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी सलग दोन रविवार पाळत ठेवून पुरावे गोळा केले. उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात कारवाईचा सापळा रचण्यात आला. प्रत्यक्ष फिल्डवर पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश तोटेवाड यांनी विशेष दक्षता घेत महत्त्वाची भूमिका बजावली. तिसर्‍या रविवारी ज्ञानेश्वर करडे उर्फ तलवार बाबा याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाई दरम्यान काही समर्थकांनी पोलीस ठाण्यात गर्दी करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काहींनी हुज्जत घातली. मात्र पोलिसांनी कायद्याने ठाम भूमिका घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील शासकीय कामात अडथळा आणण्यासंबंधी कलमे तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ही घटना केवळ एका व्यक्तीच्या कारवाईपुरती मर्यादित नाही. ती आपल्या समाजासमोर आरसा धरते. बेरोजगारी, आर्थिक ताण, आरोग्यविषयक समस्या, कौटुंबिक तणाव आणि भविष्यातील असुरक्षितता‡या सगळ्यांतून माणूस झटपट उपाय शोधतो. विज्ञान, कायदा, वैद्यकीय उपचार आणि तर्कशक्ती बाजूला पडते. अशावेळी दैवी शक्तीचा मुखवटा घालून अनेक जण लोकांच्या विवंचनेवर व्यवसाय उभा करतात.

बडूरमधील कारवाईने एक स्पष्ट संदेश दिला श्रद्धेला विरोध नाही; पण श्रद्धेच्या नावाने फसवणूक, भीती आणि शोषण याला कायद्याने थारा नाही. गावकर्‍यांच्या जागरूकतेने, समितीच्या सातत्याने आणि पोलिसांच्या ठोस भूमिकेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

आज गरज आहे ती अशा प्रत्येक गावात विचारांची मशाल पेटवण्याची. देव मानावा की न मानावा हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो; पण माणसाला फसवणारा बाबा ओळखणे ही सामाजिक जबाबदारी आहे. श्रद्धा डोळस असली पाहिजे, आंधळी नव्हे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ]