राहुल थोरात -
आम्ही राजस्थान दौर्यावर असतानाच दैनिक भास्करमध्ये एक मोठी बातमी आली होती. लहान बालकांना मांत्रिकाने (भोपे) डागल्यामुळे वर्षभरात शंभर मुलांचा मृत्यू झाला आहे. आपल्याकडे विदर्भ मेळघाटात ‘दाग प्रथा’ ही अशीच आहे. या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठी प्रबोधन मोहीम राबवली होती. राजस्थानमध्ये आजारी बालकांना गरम वस्तूने डागण्याची अत्यंत जुनी आणि अंधश्रद्धेवर आधारित क्रूर प्रथा अजूनही काही ग्रामीण भागात अस्तित्वात आहे. या प्रथेमुळे अनेक बालकांना जीव गमवावा लागला आहे किंवा ते गंभीररित्या जखमी झाले आहेत.
आजारी, विशेषतः न्यूमोनिया, अतिसार किंवा इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या लहान बालकांना किंवा नवजात शिशूंना बरे करण्याच्या गैरसमजातून त्यांच्या पोटावर, छातीवर किंवा शरीराच्या इतर भागांवर गरम सळई, लोखंडी तुकडा किंवा गरम करण्यात आलेली कोणतीही वस्तू (उदा. बांगडी) लावली जाते. याला स्थानिक भाषेत ‘डाग देणे’ म्हणतात. ‘डाग’ दिल्याने बालकांच्या शरीरातील ‘वाईट’ गोष्टी किंवा ‘रोग’ बाहेर पडतील आणि ते बरे होतील, असा गैरसमज लोकांमध्ये आहे. या क्रूर प्रथेमुळे बालकांना तीव्र वेदना, गंभीर जखमा आणि संक्रमणे होतात. अनेक प्रकरणांमध्ये, संसर्गामुळे किंवा योग्य वैद्यकीय उपचारांअभावी बालकांचा मृत्यू होतो.

राजस्थानच्या जोधपूर, जालोर, बाडमेर, भिलवडा, उदयपूर, डुंगरपूर, राजसमंद, बांसवाड़ा, प्रतापगढ़, सिरोही, बाडमेर, जैसलमेर आणि आसपासच्या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये अशा घटना वारंवार घडल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये, उपचारासाठी रुग्णालयात आणलेल्या बालकांवर डागल्याचे व्रण आढळले आहेत आणि काही बालके या कारणामुळे दगावली आहेत. काही वर्षांपूर्वी, जोधपूरजवळील एका गावात एकाच आठवड्यात अनेक बालकांचा मृत्यू अशाच पद्धतीने ‘डाग’ दिल्यानंतर झाला होता, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर याची दखल घेण्यात आली होती.
राजस्थान सरकार आणि आरोग्य विभाग या प्रथेविरुद्ध सातत्याने जनजागृती करत आहेत. आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागांत पालकांना या प्रथेचे दुष्परिणाम समजावून सांगितले जातात आणि त्यांना मुलांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला जातो.
डाग देणार्या मांत्रिकांवर आणि ही प्रथा पाळणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ही ‘प्रथा’ राजस्थानच्या काही ग्रामीण भागांतील आरोग्यविषयक अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे घडते. ही एक गंभीर सामाजिक समस्या असून, प्रशासनाच्या कठोर प्रयत्नानंतरही अजूनही काही ठिकाणी ती सुरू आहे, ज्यामुळे बालकांचा जीव धोक्यात येत आहे.
– राहुल थोरात, रमेश माने
