मिलिंद जोशी -

थंडी संपून नुकताच उकाडा जाणवायला सुरुवात झाली होती. दुपारी चारचा सुमार. हरबा गोठ्यात जनावरांना वैरण घालायला गेला होता तर काशीबाई सरपणाच्या गंजीवर गोवर्या लावत बसत होती.
गरीब शेतकरी कुटुंब. हरबा, त्याची बायको काशीबाई, तीन मुली लीला, सुनंदा, रत्ना आणि त्यांच्या पाठीवर नवसानं झालेला गोविंदा.
लीला १६-१७ वर्षांची जराशी अर्धवट होती. शिक्षणही मधेच सुटलेलं. नुसती बसून असायची, तर सुनंदा चलाख, तरतरीत अन् शाळेत अभ्यासातही हुशार. वय १३-१४, आठवीत शिकत होती. धाकटी रत्ना सहावीत तर गोविंदा अगदीच छोटा म्हणजे दुसरीत शिकत होता. त्याशिवाय हरबाची अंथरुणाला खिळलेली म्हातारी आईसुद्धा होती. असा कुटुंबाचा पसारा. परिस्थिती बेतास बात.
काशीबाईचं काम उरकतंच आलं होतं तेवढ्यात सुनंदाची जोरदार हाक ऐकू आली. “आयेऽऽ हिकडं कापडं पेटली बग!”
हातातलं टाकून काशीबाई धावली. हरबाही लगेचच आला. सुनंदा दोरीवर वाळत घातलेला परकर विझवत होती. आजूबाजूच्या कपड्यांवरही ठिणग्यांनी भोकं पडली होती.
“काय गं बाई, काय झालं?” काशीबाईनं विचारलं. “मी आत्ता भायेर आले. तर दोरीवरच्या कपड्यातून धूर येताना दिसला. जवळ जाईपर्यंत पेटलं की! तरी बरं मी लगीच विझवलं. तरी केवढं जळलंय बग!”
“ही आजकालची कापडं आसलीच. जरा ठिणगी उडंपावतूर भुरू भुरू जळायला लागत्यात” हरबा म्हणाला. “चला लागा कामाला” असं म्हणताच सारे पुन्हा कामाला लागले.
दुसरा दिवस उजाडला. रविवार असल्यानं शाळेला सुट्टी होती. सुनंदानं धुणं धुतलं अन् वाळत घालायला रत्नीकडं दिलं. रत्नी खेळत होती. तिनं म्हटलं “ठेव घालते.” गोविंदापण तिथंच बागडत होता. अन् लीला विहिरीतल्या पाण्यात खडे टाकत बसली होती.
जरावेळानं रत्नीनं धुणं वाळत घालायला सुरुवात केली. अन् मध्ये किंचाळली. “आये, हे काय झालंय बग!”
“काय झालं आता!” असं म्हणत काशीबाई बाहेर आली. आणि बघते तर काही कपड्यांवर काळ्या फुल्या उमटलेल्या होत्या तर काही कपड्यांवर उभे चिरल्यासारखे काप केले होते.
‘अरे देवा! हे काय घडायला लागलं?” काशीबाईनं कपाळाला हात लावला. तोवर आजूबाजूच्या चार बाया बापड्याही जमून कुजबुजायला लागल्या.
दुपारी सुनंदाला नवी घेतलेली साडी पेटली. तर रात्री जेवताना तिच्या ताटात एकदम मातीच आली. सगळे घाबरले. कसा बसा रात्री डोळ्यास डोळा लागला. सकाळी सुनंदा उठली तीच किंचाळत. तिच्या अंगावर सगळीकडे काळ्या फुल्या आल्या होत्या.
“काय बाई लेकीच्या नशिबात वाढून ठेवलंय!” असं म्हणत काशीबाई मटकन् खाली बसली.
“मला ह्यो समदा भानामतीचा परकार वाटतोय” हरबाची आई म्हणाली.
दोन-चार दिवस असेच गेले. कधी भांडी घराबाहेर गेली. कधी ताटात माती, कधी कपड्यांवर फुल्या, कधी काय अन् कधी काय.
हरबा अगदी हैराण होऊन गेला होता. सकाळी शेजारचे धोंडीकाका भेटायला आले. ‘का रं मर्दा! नुस्ता त्वांड पाडून बसून का र्हायलाईस?’
“म्हातारी कधीची मागं लागली हाय की माझ्या डोळ्यादेखत पोरीचे हात पिवळे करा. म्हणून लगीन जमवीत आणलं होतं तेवढ्यात ही भानामतीची काय बला पाठीशी लागली ना!”
“असत्यात नशिबाचे भोग दुसरं काय! पण तू असा घाबरून नको जाऊ. आपला दिन्या गुरव हाय ना! त्यो उतरवतो आसली सगळी प्रकरणं.”
वस्तीवर एव्हाना हरबाच्या घरच्या भानामतीचा विषय चर्चेचा झाला होता. संध्याकाळी दिन्या गुरव भानामती काढायला आला तेव्हा वस्तीवरची माणसं जमली. लिंबू, मिरच्या अन् कोळसा चौकटीत टांगून त्यानं अगोदर घराचं बंधन केलं. घरात धुनी पेटवली. त्यात काही बाही टाकत तो गडबडू लागला.” ऊँ र्ही क्लीम र्हाम, चामुंडी यंकिनी… डंकिनी…”
सगळी खोली धुरानं भरून गेली. तीन अंडी, दहीभात आन् एका उलट्या पिसाच्या कोंबडीचा उतारा आणायचं त्यानं फर्मान सोडलं आणि सुनंदेला समोर बसवलं. तिच्यामोर ओवाळून तो उतारा त्यानं उजवीकडं ठेवला आणि डोळे मिटले. तेवढ्यात त्याला चटका बसला. बघतो तर काय? त्याच्याच धोतरानं पेट घेतला होता. जोरात ओरडत तो बाहेर पळाला आणि धोतर विझवता विझवता घामाघूम झाला. “ह्ये जबरी प्रकरण आपल्याला नाय झेपायचं” म्हणून मुकाट्यानं चालता झाला. आता मात्र काशीबाईचा धीर पुरता खचला. तिनं रडायला सुरुवात केली. हरबाही चिंतेत पडला. त्या दिवशी आणखी काही झालं नाही. मात्र दिन्या गुरवाचं धोतर भानामतीनं पेटवल्याची बातमी गावभर झाली.
दुसर्या दिवशी सकाळी सुनंदाचे वर्गशिक्षक मुळे सर ती दोनचार दिवस शाळेत का आली नाही म्हणून पाहायला आले. सुनंदा नंबरात येणारी असल्यामुळे शिक्षकांचे विशेष लक्ष असे. हरबानं सगळा झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी हरबाला धीर दिला. “हे बघा, आपल्या शाळेतल्या मुल्ला बाई आहेत ना, मराठी शिकवणार्या, आपण त्यांना भेटू. त्या अंधश्रद्धा निर्मूलनाचंही काम करतात. त्यांच्या संघटनेनं आजवर अशी शेकडो प्रकरणं यशस्वीपणे बंद केली आहेत म्हणे.”
शाळेत मराठी शिकवणारी रुकसाना ही गेल्यावर्षीच दाखल झालेली तरुण शिक्षिका, कॉलेजात असल्यापासून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात सक्रिय सहभाग घेतलेली. सध्याची जमेल तेवढं काम करत असे. हे प्रकरण तिच्याकडे आल्यावर तिने ओळखलं की, ही प्रबोधनाची चांगली संधी आहे आणि या निमित्ताने गावकर्यांच्या इतर अंधश्रद्धांवरही पुढे काम करता येईल.
तिनं प्रथम हरबाच्या घरी भेट दिली आणि सर्व विचारपूस केली. प्रकार तिच्या थोडा थोडा ध्यानात येऊ लागला होता. तरीपण तिनं तालुक्याहून आपल्या सहकार्यांना बोलावून घेतलं.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा गट भानामतीचा शोध घ्यायला आला आहे ही बातमी एव्हाना गावभर पसरली होती. त्यामुळे बघ्यांची गर्दी लोटली. मुळे सरांना ती पांगवावी लागली.
रुकसानानं हरबा आणि काशीबाईला तपासाची कल्पना दिली, “आम्ही घरातल्या सर्वांच्या प्रथम मुलाखती घेऊ. तेही स्वतंत्रपणे. त्यानंतर भानामती थांबेल कदाचित लगेच नाही, तर हळूहळू थांबेल; पण त्यासाठी तुम्हाला आम्ही सांगू तसं ऐकावं लागेल. उपाय करावे लागतील. तुमच्या संपूर्ण सहकार्याशिवाय ही भानामती थांबणार नाही.”
काकुळतीला आलेल्या हरबानं तशी कबूली दिली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पथकानं एकेकाच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा काय घडलं? किती वाजता घडलं? पहिल्यांदा कोणी पाहिलं? त्यावेळी घरात कोणकोण होतं? नंतरचे प्रकार कसे कसे घडले? त्याचे सगळे तपशील त्यांनी विचारून घेतले. त्याचबरोबर घरात कोण-कोण आहे? परिस्थिती कशी आहे? एकमेकांशी वागणं कसं आहे? हे सगळं समजावून घेतलं. पहिली फेरी झाल्यावर त्यांच्या संशयाचा काटा खुद्द सुनंदाकडं वळू लागला. म्हणून सुनंदाला त्यांनी पुन्हा बोलावून घेतलं.
“सुनंदा, तुला काय वाटतंय? जळणारे कपडे काडीपेटीतल्या काडीनं जळत असतील की चुलीतल्या काटकीनं?”
“काडीपेटीतल्या काडीनं” असं पटकन उत्तर आलं. “न्हाई न्हाई, भानामतीनं पेटलेले कपडे, तसं कसं सांगनार?” सर्वांच्या रोखलेल्या नजरांमुळे सुनंदाचा चेहरा गोरामोरा झाला होता.
“हे बघ सुनंदा, आम्ही ओळखलंय. हे सगळे प्रकार तूच करतेस. बर्याबोलानं कबूल कर, नाहीतर सर्वांना सांगावं लागेल.” रुकसानानं थोडं दमात घेतलं.
तसाच सुनंदाचा चेहरा खाडकन उतरला. तिनं रडायला सुरुवात केली.
“पण तू असं केलसंच का?”
मग खरी हकीकत बाहेर आली. ती अशी अर्धवट असल्यामुळं लीलाचं लग्न होत नव्हतं. तिच्या पाठीवर या आणखी दोन मुली. त्यांच्या काळजीनं हरबानं सुनंदासाठी लवकर स्थळ बघायला सुरुवात केली. सुनंदा हुशार, वर्गात नंबरानं पास होणारी, अभ्यासाची गोडी, तिला पुढे शिकायची इच्छा होती; पण हरबानं तिचं लग्न ठरवून टाकलं. तिनं विरोध करून पाहिला पण, “आणखी शिकल्यावर तुला नवरा कुठला शोधायचा? आधी आहे हे ओझं काय कमी आहे का?” म्हणून त्यांनी तिला गप्प बसवलं. ज्या मुलाशी तिचं लग्न ठरत होतं तो नात्यातलाच होता, वयानं मोठा आणि व्यसनी होता. तो तिला अजिबात आवडत नसे. त्यामुळे हे लग्न तिला अरिष्ट वाटू लागलं. वय लहान, काही बोलता येईना. तिच्या मनाची प्रचंड कोंडी झाली. लहानपणापासून तिनं भूत-खेत, भानामतीच्या गोष्टी ऐकल्या होत्या. मग तिच्या असाहाय्य मनानं भानामतीला मदतीला बोलावलं. कापडं पेटल्यावर खळबळ माजली; पण तिच्याकडं कोणाचं लक्ष गेलं नाही. कपड्यांना कात्री, तिच्या ताटात माती, अंगावर फुल्या, कपड्यांवर फुल्या, यामुळं तिला सहानुभूती मिळू लागली. लग्नाची ठरलेली बैठकही पुढं ढकलली गेली. गुरव येईपर्यंत हे प्रकार करायला ती सरावली होती. अंधार आणि धुराचा फायदा घेऊन तिनंच धुनीतली एक काटकी दिन्या गुरवाच्या धोतरावर टाकली होती.
“बाई, काहीपण करा, पण मला शिकून तुमच्यासारखं व्हायचंय. आत्ताच लग्न करून आयुष्याची माती नाही करून घ्यायची.” सुनंदानं विनवलं.
रुकसानानं सुनंदाला थोपटलं. “शांत राहा. काळजी करू नकोस. मी सांगीन तुझ्या घरच्यांना समजावून, पण पुन्हा असे प्रकार अजिबात करू नकोस. त्यानं जिवाशी खेळ होऊ शकतो. मी तुला तालुक्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जाते. ते तुला मन शांत होणार्या गोळ्या देतील. त्या नियमितपणे घे.”
नंतर रुकसानानं हरबा आणि काशीबाईला बोलावून घेतलं आणि भानामती थांबवल्याचं सांगितलं.
“पन हे काय अन् कसं झालं वो?”
“भानामतीचे प्रकार आपोआप घडत नाही. कोणीतरी व्यक्तीच हे घडवत असते.”
“पन कोन असं करतंय? आता त्याला फोडून काढतो” हरबाच्या रागाला पारावर नव्हता.
“थांबा थांबा. हे कोणीही घडवत असलं तरी, ते घडायला कारण तुम्ही स्वत: आहात. तुम्हाला कोणी फोडून काढायचं?” असं रुकसानानं विचारताच हरबा वरमला.
“नीट समजावून घ्या आणि त्या व्यक्तीला तुम्ही छळणार नसाल, रागावणार नसाल, मारणार नसाल, तिला समजावून घेऊन प्रेमानं वागणार असाल आणि आम्ही सांगू ते उपचार करणार असाल तरच मी ते सांगेन व भानामती थांबेल. नाहीतर आणखी गंभीर परिणाम होतील.” रुकसानानं इशारा दिला. तशी हरबानं सार्या गोष्टींना तात्काळ मान्यता दिली. मग रुकसानानं त्यांना सारा प्रकार समजावून सांगितला. हरबाही समजूतदार निघाला. त्यानं पाव्हण्याला मुलगी अल्पवयीन आहे म्हणून लग्न करणार नसल्याचं कळवायचं ठरवलं. तसंच तिला जमेल तेवढं शिकू द्यायचं मान्य केलं.
सर्वजण चहा पिऊन बाहेर आले. तर सगळा जमाव त्यांची वाट पाहत थांबला होता. रुकसानानं त्यांना भानामती शोधून थांबवल्याचं सांगितलं.
“कशी काय?” एकानं ओरडून विचारलं.
“तुम्ही पहिल्यांदा खाली बसून घ्या. मी व्यवस्थित सांगते.” असं सांगितल्यावर जमावाने शांतपणे बसून घेतलं. रुकसानानं सांगायला सुरुवात केली.
“कपडे पेटणे, घरावर दगड येणे, इकडची भांडी तिकडे जाणे, रोकड गायब होणे असले प्रकार घडले की, ते सैतानी शक्तीनं घडवलं असं आपण मानतो. त्यालाच भानामती असं म्हणतात. पण प्रत्यक्षात या जगात आपोआप काहीच घडत नाही. हे सर्व प्रकार कोणीतरी मानसिक आजार झालेली व्यक्ती घडवत असते…”
“कोणी हे प्रकार केले हे पहिल्यांदा सांगा!” दोनचार जण ओरडले.
“ते समजावून तुम्हाला काही उपयोग नाही. पण हे प्रकार मानसिकदृष्ट्या कोंडी झालेली व्यक्ती घडवत होती. तिला उपचारांची गरज आहे. ती कोण आहे, उपचार काय करायचे हे घरातल्या जबाबदार व्यक्तींना मी समजावून सांगितलं आहे. अशावेळी या व्यक्तींना गरज असते ती त्यांच्या प्रेमाची आणि सहानुभूतीची. म्हणून तुम्ही एवढंच लक्षात ठेवा-
भानामतीच्या अजब करामती
घडविते मनोरुग्ण व्यक्ती
नको बुवा नको मांत्रिक
हवे प्रेम आणि सहानुभूती.
मिलिंद जोशी
लेखक संपर्क : ९४२३० ०२२५५