मधुकर अनाप - 9850144709
कावीळबाधित महिलेवर मंतरलेल्या तेलाचा उपचार!
काविळीचे निदान झाल्यानंतर अंधश्रद्धेतून एका फादरकडून उपचार घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी येथील वनिता विश्वनाथ हारकळ (वय ४२) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. यासंबंधी तिच्या भावाने फिर्याद दिल्याने मांत्रिक फादर चंद्रशेखर गौडा याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
१ जुलैला वनिता आजारी पडल्या. त्यांना भाऊ संजय पंढरे यांचा पुतण्या विवेक पंढरे हा दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्यानंतर वनिता यांना कावीळ झाल्याचे समजले. सायंकाळी त्या भावासोबत समतानगर चर्चमधील फादर चंद्रशेखर गौडा यांच्याकडे घेऊन गेले. यावर फादर म्हणाले, यांना कुठलाही आजार नाही, औषधं नका घेऊ, बाहेरची बाधा झाली आहे. त्यानंतरही फादर गौडा याने तिला मंतरलेल्या तेलाने बरे करतो, असे सांगितले. खोबरेल तेलाच्या बाटलीवर हात ठेवून मंत्र म्हणत ती बाटली हारकळ यांना दिली. ते तेल कपाळाला लावण्यास आणि पिण्यास सांगितले. त्यानुसार हारकळ यांनी ते तेल सेवन केले. दोन-तीन दिवसांत त्यांचा त्रास आणखी वाढला.
४ जुलै रोजी वनिता यांना प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी प्रवरानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ९ जुलैला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा भाऊ संजय जीवन पंढरे यांनी कोपरगाव शहर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी मांत्रिक फादर चंद्रशेखर गौडा याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) सह महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होऊनही फादर चंद्रशेखर गौडा यास अटक करण्यात आली नाही. म्हणून मी स्वतः मंगळवार दि. १५ जुलै रोजी कोपरगाव येथे जाऊन वस्तुस्थिती समजावून घेतली.
सर्वांत प्रथम वनिता हारकळ या डॉ. फुलसौंदर यांच्याकडे उपचारासाठी गेल्या होत्या. त्यांची भेट घेतली. न्यूमोनिया आणि कावीळची लक्षणे असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यासाठीचे औषधे हारकळ यांना दिली होती. पेशंट पुन्हा उपचारासाठी आले नाही त्यांचा मृत्यू झाल्याचे पेपरमध्ये वाचले, असे डॉक्टरांनी सांगितले. कोणत्याही आजारासाठी भोंदू बुवा बाबांच्या नादी न लागता वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे त्यांनी आवाहन केले.
त्यानंतर वनिता हारकळ यांच्या कोपरगाव शहरातील खडकी येथे असलेल्या घरी भेट दिली. अतिशय गरीबी असलेल्या या कुटुंबातील त्यांचे बंधू संजय पंढरे, मयत महिलेची मुलगी शिवानी यांची भेट झाली. चर्चमध्ये बहिणीने फादरकडे घेतलेल्या उपचाराबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. कुणीही कोणत्याही आजारासाठी भोंदू बाबा बुवाकडे जाऊ नये व आपले आयुष्य धोक्यात घालू नये, अशी भावना व्यक्त केली.
कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची भेट घेऊन या प्रकाराबद्दलची माहिती घेतली. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास चालू आहे आणि योग्य पुरावे हाती लागल्यानंतर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार व किशोर पवार यांच्याकडे तपासाची सूत्रे असून त्यांच्याकडून आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली.
महिलेच्या मृत्यूनंतर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करणे आवश्यक होते. पुढील तपास व कारवाईसाठी ते अधिक उपयुक्त ठरले असते, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. फादर चंद्रशेखर गौडा यांचा फोन नंबर घेऊन मी स्वतः व पोलीस स्टेशनमधून फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत फादरला अटक करणेविषयी मी आग्रह धरला. त्यानुसार फादरसंबंधी अधिक तपास चालू असून प्रबळ पुरावे हाती आल्यानंतर कठोर कारवाई करण्याचे शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात लक्ष घातल्याबद्दल पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, डॉ. फुलसौंदर व मयत महिलेच्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त करून धन्यवाद दिले. अंधश्रद्धा व जादूटोणा संबंधीच्या प्रकारांविषयी वेळोवेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहकार्य घेऊ व पोलीस प्रशासनाकडून आपणास योग्य ते सहकार्य करण्याची हमी कोपरगाव शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी यावेळी दिली.
-मधुकर अनाप
लेखक संपर्क : ९८५०१ ४४७०९
