मिलिंद देशमुख -
कालचा दिवस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाच्या दृष्टीने खूपच व्यस्त आणि समाधान देणारा होता.
आदिवासी आश्रमशाळांमधील मुला-मुलींना सापांविषयी संपूर्ण शास्त्रीय माहिती मिळावी या उद्देशाने शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने ‘सर्प आणि अंधश्रद्धा’ या विषयावर माझी मुलाखत घेण्यासाठी अमृता भालेराव यांनी संपर्क साधला होता. वेगवेगळ्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना भविष्यात देखील ही मुलाखत दाखवता यावी या हेतूने बाणेर येथील स्टुडिओमध्ये दुपारी दोन वाजता या मुलाखतीचे शूटिंग ठरले होते. मी व अमृता भालेराव यांनी मुलाखतीतील संभाव्य प्रश्नांवर बरीच चर्चा करून प्रश्न निश्चित केले होते.
दुपारी बाणेरला निघताना मोठा पाऊस सुरू झाला. मी दुचाकीने निघालो होतो. त्यामुळे बाणेर येथील कार्यकर्ते प्रा. रवी वरखेडकर सरांना फोन करून तिथे पाऊस आहे का, याची चौकशी केली. त्यांनी तिकडे पाऊस नसल्याचे सांगितले. रेनकोट घालून पुढे निघालो. रावेतच्या पुढे पाऊस नव्हता.
गुगल मॅपच्या मदतीने स्टुडिओचा पत्ता शोधत योग्य ठिकाणी पोहोचलो. अमृता भालेराव आणि त्यांची चार-पाच जणांची टीम तयार होती. सर्वांशी परिचय झाल्यानंतर शूटिंगची तयारी करण्यासाठी पंधरा-वीस मिनिटे लागली. तोपर्यंत चहापाणी झाले आणि त्यानंतर प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात मुलाखत सुरू झाली.
सापांची शास्त्रीय माहिती, सापांविषयीचे गैरसमज आणि अंधश्रद्धा यांसारख्या विषयांवर मुलाखत झाली. सुमारे चार-सव्वाचार वाजता सर्व काम पूर्ण झाले.
त्यानंतर वरखेडकर सरांच्या घरी गेलो. गप्पा मारल्यानंतर बालेवाडी येथील म. अंनिसचे हितचिंतक प्रकाश सावंत यांची भेट घेण्याचे ठरवले. हमीद दाभोलकर यांनी त्यांचा फोन नंबर पाठवला होता आणि त्यांच्याशी आधीच संपर्कही झाला होता.
मी ज्या भागात जातो, त्या परिसरातील अंनिसचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि सहकार्यांची भेट घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. त्याच उद्देशाने वरखेडकर सरांना अलका जाधव कुठे राहतात, असे विचारले. त्यांनी बालेवाडीला जाताना रस्त्यात त्यांची भेट घेता येईल, असे सांगितले. अलका जाधव यांना फोन केला असता नुकतीच त्यांच्या डोळ्याची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्याचे समजले. तरीही त्यांची भेट घेतली. त्यांनीही वरखेडकर सरांप्रमाणेच आपुलकीने पाहुणचार केला. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांचा निरोप घेतला.
त्यानंतर प्रकाश सावंत यांचा पत्ता शोधत त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांना म. अंनिसच्या कामाविषयी आस्था असल्याचे जाणवले. त्यांनी समितीच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून पाच हजार रुपयांचा धनादेश दिला.
त्यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांना अंनिसचे पुस्तक सप्रेम भेट दिले आणि त्यांचा निरोप घेतला. घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते.
दिवसभराचा प्रवास, मुलाखतीचे शूटिंग, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि अंनिसच्या कामासाठी मिळालेले सहकार्य यामुळे दिवस खूपच व्यस्त गेला, पण मनाला समाधान देणारा अनुभव मिळाला.
अंनिसचे काम करताना मिळणारी ही माणसांची साथ, आपुलकी आणि विचारांशी असलेली बांधिलकी हीच आमची खरी ऊर्जा आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि विवेकवादी समाजनिर्मितीचा हा प्रवास असाच सुरू राहो!
