अॅड. प्रशांत भूषण -
डॉ.नरेंद्र दाभेालकर स्मृतिव्याख्यानामध्ये अॅड. प्रशांत भूषण यांनी केलेल्या हिंदी भाषणाचे सौरभ बागडे यांनी केलेले शब्दांकन..
डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी आपले आभार मानतो. डॉ. दाभोलकर यांनी लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे असं सांगितलं. त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्यासाठी एवढी मोठी संघटना उभी केली. ही एक अद्भुत गोष्ट आहे. भारतात यांसारखं काम दुसरीकडे कुठे होत असेल असं मला वाटत नाही.
आपल्या संविधानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे आपला विचार तर्काच्या आधारावर असला पाहिजे. या तर्क विचारावरच विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती होते. तर्क विचारच्या आधारावरच आपण खर्या खोट्याचा निर्णय घेऊ शकतो. धर्मात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबाबत लोक प्रश्न विचारत नाहीत. आपण अनेक गोष्टी पुस्तकात लिहिले आहे म्हणून किंवा वडिलधार्यांनी सांगितले आहे म्हणून खर्या मानून चालतो. पण आपण तर्काच्या कसोटीवर त्या तपासून पाहिल्यावर त्या गोष्टी खोट्या ठरतात.
आज फक्त अंधश्रद्धाच नाही तर चुकीची तथ्ये पसरवली जात आहेत. खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. हे समजण्यासाठी आपल्याला तर्क विचार गरजेचा आहे. आज ए आयच्या जमान्यात आपल्याला झटकन अनेक गोष्टींची माहिती मिळत आहे. चांगल्या ए आयला एखाद्या गोष्टी मागे तर्क, पुरावा आहे का असे विचारले तर ते झटकन आपल्याला पुरावे देतं. पण कधी कधी लिहिले- सांगितले गेलेले आहे, तेच ए आय सांगते. कधी कधी आपण हेही अनुभवतो की जे वैज्ञानिक म्हणून सांगितलं गेले आहे, ते चुकीचे ठरतं. आपल्याला आरोग्य विज्ञानानुसार दिलेल्या काही औषधांवर, काही काळानंतर बंदी घातली गेली. कधी कधी ज्या कंपन्या ही औषधे तयार करतात त्यांचे काही हितसंबंध असतात. आम्ही शीतपेयांचे आरोग्यावरचे परिणाम यावर याचिका दाखल केली होती. शीतपेयांमध्ये आरोग्यास हानीकारक घटक टाकले जातात. आम्ही त्यासंदर्भात शास्त्रीय संशोधन अहवालांची पाहणी केली. त्यातील काही म्हणतात की, शीतपेयांचा आरोग्यावर वाईट परिणाम होत नाहीत. तर काही म्हणतात की, शीतपेयांचा आरोग्यावर नक्कीच वाईट परिणाम होतो. आम्हाला असं दिसलं की, ज्या शास्त्रीय अहवाल लेखकांचे शीतपेये उत्पादक कंपन्यांसोबत संबंध आहेत, ज्यांना त्यातून पैसे मिळत आहेत, ते शीतपेयांचे दुष्परिणाम होत नाहीत असे सांगतात. जे संशोधन अहवाल स्वतंत्र आहेत, ते शीतपेयांचे दुष्परिणाम आहेत असं सांगतात. आज मेडिकल कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं त्यावर फार्मा इंडस्ट्रीज प्रभाव टाकत आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे, हे समजण्यासाठी आपल्याला तर्क आधारित खोल विचार करावा लागतो.
आज आपल्या देशात तर्क विरोधी गोष्टी घडत आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान अवैज्ञानिक गोष्टी बोलतात. भाजपाच्या आयटी सेलने एवढे खोटे पसरवले आहे की, त्याची मोजदादच होऊ शकत नाही. स्वाती चतुर्वेदी नावाच्या पत्रकार महिलेने पंतप्रधान खोट्या बातम्या पसरवणार्या फॅक्टरीचे संचालन करत आहेत, हे दाखवून दिले. कधी पंतप्रधान म्हणतात की, मी नॉनबायोलॉजिकल आहे. मला देवाने जन्म दिला आहे. त्यामुळेच प्रेस क्लब दिल्लीमध्ये मोदींची मूर्ती लावून लोक मोदी चालिसा वाचत होते. मोदी रिलायन्सच्या हॉस्पिटलचे उद्घाटन करायला गेले, तेव्हा ते म्हणतात गणपतीची सोंड प्लॅस्टिक सर्जरीने लावण्यात आली. कर्ण टेस्ट ट्युब बेबी होता. कधी म्हणतात थाळी वाजवा त्याने कोरोना जाईल. त्यांचे मंत्री म्हणतात गो कोरोना गो म्हणा, कोरोना जाईल. भाभीजी पापड खा कोरोना जाईल. मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ अवैज्ञानिक गोष्टी पसरवत आहे.
याचा परिणाम आपल्या शैक्षणिक संस्थांवर देखील पडत आहे. आयआयटी मद्रासचे संचालक म्हणतात की, गायीचे शेण आणि गोमूत्राचे खूप फायदे आहेत, सर्व रिसर्च यावरच केला पाहिजे. संबित पात्रा म्हणतात शेण हिर्यापेक्षा मौल्यवान आहे. काही जण म्हणतात शेण लावल्याने ऑटोमिक रेडीएशनचा प्रादुर्भाव होत नाही. आयआयटी मंडीचे संचालक म्हणतात की, भूतप्रेत असतं. मांस खाण्याने हिमाचलमध्ये भूस्खलन होतं. हळूहळू विद्यापीठांमध्ये चर्चा वाद यावर बंदी घातली जात आहे. जेएनयुमध्ये चर्चांना परवानगी नाकारली जात आहे.
शिक्षणाचे दोन उद्देश आहेत. एक चिकित्सक बुद्धीचा विकास करणे आणि दोन, संवेदनशील नागरिक घडवणे. आता आपल्या विद्यापीठांमध्ये हे सांगितलं जात आहे की, प्रश्न विचारण्याची गरज नाही. आम्ही सांगू ते ऐका. एक जेएनयुचे कुलगुरु होते, ते म्हणतात जेएनयुमध्ये आम्ही लढाऊ विमाने ठेवली आहेत, ज्यामुळे विद्यार्थांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण होईल. आमच्या अभ्यासक्रमातून डार्विन, पिरिऑडिक टेबल, मुघल इतिहास हटवला जात आहे. त्याजागी ज्योतिषाचे अभ्यासक्रम आणले जात आहेत.
दुसरीकडे कावड यात्रेला खूप प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारी यंत्रणा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात. यात्रेसाठी दिल्ली हरिद्वार रस्ता दोन आठवड्यांसाठी बंद करतात. अनेक लोक तिथे गुंडगिरी करतात, अश्लील हावभाव करतात. या संस्कृतीचा समाजावर वाईट परिणाम होत आहे. मागच्या बारा वर्षांत दोन लाख सरकारी शाळा बंद केल्या गेल्यात. काही शाळा तबेल्यात चालू आहेत. अनेक शाळांमध्ये आवश्यक सुविधा नाहीयेत. शिक्षक नाहीयेत. सरकारने वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याऐवजी शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. अंधभक्त निर्माण केले जात आहेत. ते मोदींचे मंदीर बांधायला निघाले आहेत. गुंड, अश्लील, लंपट समाज जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे. मुस्लिम दहशतवादी असतात असं पसरवलं जात आहे. हिंसा पसरवली जात आहे. यामुळेच वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवणार्या डॉ. दाभोलकर, कॉम. पानसरे, प्रा. कलबुर्गी, लंकेश यांची हत्या शक्य झाली आहे.
परिणामी, भारत प्रत्येक निर्देशांकात हळुहळू मागे पडत आहे. मानव विकास निर्देशांक, कुपोषण निर्देशांक, हॅपिनेस निर्देशांक, प्रेस फ्रिडम निर्देशांक, भ्रष्टाचार निर्देशांक, डेमोक्रसी निर्देशांक या सर्वांमध्ये भारताची घसरण होत आहे. याचं मुख्य कारण वैज्ञानिक दृष्टिकोन संपविला जातो आहे, हे आहे. त्यामुळे लोक प्रश्न विचारत नाहीत. द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे मुस्लिम दहशतवादी आहेत हे कोणत्या आधारावर म्हणता? हा प्रश्न लोक विचारत नाहीत. सर्व क्षेत्रात, स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांचे योगदान आहे.
आता मी एआयचा समाजावर काय परिणाम होणार आहे, यावर बोलणार आहे. एआयमुळे जग वेगात बदलणार आहे. एआय स्वतःच स्वतःची बुद्धिमत्ता वाढवत आहे. त्यामुळे एआय सुपर इंटेलिजन्स स्तरावर पोहोचेल. सुपर इंटेलिजन्स मानवापेक्षा हुशार असेल, ते मानवी विचारांतून मुक्त असेल. असं ए.आय. देशाला, समाजाला आपल्या नियंत्रणात आणू शकते. येणार्या तीन वर्षांत देश, समाज एआयच्या नियंत्रणात असेल. त्यामुळे समाज अधिक चांगला होईल. एआय प्युअर इंटेलिजन्स असेल कारण त्यात भावना नसतील. जंगलात राहण्यासाठी आपल्या भावना विकसित झाल्या. सत्ता, नियंत्रण, स्वार्थ, राग, असुया या नकारात्मक भावना आहेत. प्रेम, आदर, स्नेह या सकारात्मक भावना आहेत. पण दुर्दैवाने सत्तेतील व्यक्ती नकारात्मक भावनांच्या आधारे चालतात. ए.आय.सुपर इंटेलिजन्स पूर्णपणे तर्कावर चालेल. तिच्याकडे भावना नसतील.
माझ्या मते सुपर इंटेलिजन्स हा आजपेक्षा जास्त चांगल्या तर्हेने समाजाचे संचलन करेल. आज मोदी, ट्रम्प, नेत्यान्याहू जग चालवत आहेत. एआय सुपर इंटेलिजन्स त्यापेक्षा चांगल्या रितीने जग चालवेल. आपण एखाद्या माणसाला विचारले तू काय बनणार आहेस? तर तो भावनिक उत्तर देईल की, श्रीमंत बनायचं आहे. शास्त्रज्ञ बनायचं आहे वगैरे वगैरे. हे त्याचे भावनिक उत्तर असेल. एआयकडे भावना नाहीयेत. एआयचे दोन उद्देश असतील. एक, सर्वाईव्हल किंवा टिकून राहणे आणि दुसरे म्हणजे त्याच्याकडे कुतुहल असेल. हे पाणी कसे आले? त्यात काय आहे? हे कुतुहल बुद्धीतून येते. भावनेतून नाही.
एआय विचार करेल माणसाच्या शरीरात कॅन्सर कसा येतो? त्यावर उपाय काय आहेत? जगात वातावरण बदल का होतोय? त्यावर कोणते उपाय आहेत? ज्यावर हे जग चालत आहे ते या जगाचे नियम काय आहेत? अशा प्रश्नांची उत्तरे एआय शोधेल. त्यासाठी तो हे जग स्थिर करेल कारण मानवाने जग अस्थिर बनवले आहे. जे कधीही संपू शकते.
कधीही न्यूक्लिअर युद्ध होऊ शकते. एआय मानवाकडून शस्त्र काढून घेईल किंवा ती नष्ट करेल. मोदी, ट्रम्प, नेत्यान्याहू हे लोक जग अस्थिर करत आहेत. त्यांना सत्तेतून काढून टाकेल. त्यामुळे एआयमुळे मानवतेला फायदा होईल. त्याचा वाईट परिणाम होणार नाही. मानवसमाज पूर्ण बुद्धीवर काम करत नाहीये, तो भावनेतून काम करत आहे. खूप लोक एआयला भयंकर मानतात, ते यासाठी की, ज्यांच्या हातात आर्थिक, राजकीय सत्ता आहे, त्यांना हातातून सत्ता जाणे आवडणार नाही. सत्तेत असलेल्या लोकांना सत्ता जाण्याची भिती आहे. पण आपल्या सारख्या लोकांना भिण्याचे काही कारण नाही. एआय सुपर इंटेलिजन्स सत्तेत आल्यावर तर्कावर आधारीत समाज निर्माण होईल.
धन्यवाद!
– अॅड. प्रशांत भूषण
