डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळा

-

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी स्मारक, पुणे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संदर्भातील पाच पुस्तकांच्या संचाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या माजी पोलिस महानिरीक्षक मीरां चड्डा-बोरवणकर यांच्या हस्ते सदर पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ‘जेएनयू’मधील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. शरद बाविसकर उपस्थित होते. तसेच सदर पुस्तकांचे संपादक व ‘डीआरडीओ’ मधील ज्येष्ठ निवृत्त शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी, अंनिस ट्रस्टचे विश्वस्त अरविंद पाखले हे देखील या प्रसंगी विचारमंचावर उपस्थित होते. या प्रसंगी मीरां चड्डा-बोरवणकर म्हणाल्या की, पोलीस दलासह सर्व सरकारी विभागांची निष्ठा ही संविधानावरच असली पाहिजे. खाकीने भगवे, हिरवे, पांढरे होणे हे अतिशय घातक आहे.

मीरां बोरवणकर पुढे म्हणाल्या की, मुंबईतील ७/११ चे रेल्वेमधील बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट यातील पीडितांना आपण न्याय मिळवून देऊ शकलो नाही. तसेच नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या कटाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही. यासाठी तपासयंत्रणेमधील राजकीय हस्तक्षेप कारणीभूत आहे. या प्रकारच्या केसेस वर्षानुवर्षे चालतात आणि यामुळे देखील न्याय होत नाही. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या केसेसमध्ये तर अजून खटल्याची सुनावणी पूर्ण झालेली नाही, ही वेदनादायी गोष्ट आहे. राजकीय हस्तक्षेपाबद्दल दुःख व्यक्त करून न थांबता यंत्रणेला उत्तरदायी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. मूलभूत हकांबरोबरच मूलभूत कर्तव्यांचे विस्मरण होऊ देता कामा नये.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. शरद बाविसकर म्हणाले की, डॉ. दाभोलकर यांचा समाजातील हस्तक्षेप हा केवळ खटाटोप नव्हता, तर त्याला एक सैद्धांतिक बैठक होती. आपला आजचा समाज खरंच चिकित्सक बनला आहे का ? जे महत्त्वाचे न्यायाचे मुद्दे आहेत त्या मुद्यांवर समाजात निराशा का असते? असे प्रश्न त्यांनी समोर ठेवले. ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा फक्त आस्था, धार्मिकता यांपोटी येत नाही तर त्यात अर्थकारण, हितसंबंध हे सुद्धा असतात. पुरोगामी चळवळीची राजकीय संवादशक्ती कमी पडते. डॉ. दाभोलकर हे ही आशा आणि ऊर्जा निर्माण करू शकायचे. त्यामुळे त्यांचे वेगळेपण जाणवते. DRDO चे माजी शास्त्रज्ञ आणि या कार्यक्रमात प्रकाशित झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांवरील पुस्तकांचे संपादक प्रभाकर नानावटी म्हणाले की, डॉक्टरांनी आपल्या लेखनातून सर्वसामान्य वाचक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी अंनिसच्या विविध उपक्रमांबद्दल वेळोवेळी मांडलेली भूमिका या पुस्तकांत आलेली आहे. डॉक्टर गेल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सारे दाभोलकर’ असे म्हणून काम पुढे चालू ठेवले आहे.

या कार्यक्रमात अंनिसच्या दोन नवीन उपक्रमांची माहिती देण्यात आली. डॉ. हमीद दाभोलकर यांनी अंनिसने नुकत्याच सुरू केलेल्या आंतरजातीय व आंतरधर्मीय वधू-वर सूचक केंद्राबद्दल माहिती दिली. या वेळी या वधू-वर सूचक केंद्राच्या वेबसाइटचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राचे समन्वयक शंकर कणसे आणि वेबसाईट विकसित करणारे प्रफुल्ल यांचा सत्कार करण्यात आला. Vivekivivah.com ही ती वेबसाईट आहे.

मुक्ता दाभोलकर यांनी मेळघाट विभागातील आदिवासी समाजात आढळणार्‍या डंबा प्रथा विरोधी जनजागृती मोहिमेची माहिती दिली. या मोहिमेच्या समन्वयक नंदिनी जाधव तसेच सहभागी कार्यकर्ता भगवान रणदिवे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

डॉ. दाभोलकर यांनी मानसिक आरोग्यावर काम करण्यासाठी सुरू केलेल्या परिवर्तन संस्थेतील मानसमित्रांनी चळवळीतील गाणी सादर केली.

अंनिस वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुणे शाखेचे श्रीपाल ललवाणी यांनी मुख्य पाहुण्यांचा परिचय करून दिला. मिलिंद देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रकाशित झालेल्या पुस्तकांबद्दल : ‘अपराजित योद्धा’ या पुस्तकातील पानोपानी डॉक्टरांच्या आठवणी उजाळणार्‍या अनेक मान्यवरांचे लेख- प्रतिक्रिया आहेत.

‘निर्मळ व निर्भीड’ या पुस्तकात पत्रकार आणि कलाकारांचे लेख आहेत तसेच ज्येष्ठ राजकीय नेते आणि विविध राज्यांतील तर्कशील विचारवादी समाजसेवकांचे लेख आहेत.

‘नरेंद्र दाभोलकर स्मृतिव्याख्याने’ या पुस्तकात २० ऑगस्ट या दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या स्मृती व्याख्यानांचे आणि चर्चासत्राचे शब्दांकन आहे.

‘आम्ही सारे दाभोलकर’ या पुस्तकात डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण हत्येनंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांची व्यत केलेली मनोगते आहेत.

‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून खटला आणि निकाल’ हे पुस्तक डॉक्टरांच्या खुनाच्या तपासाच्या अकरा वर्षांचा मागोवा आणि न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ यावर बेतलेले आहे.

(मा. मीरा चढ्ढा-बोरवणकर व डॉ. शरद बाविसकर यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणांचे शब्दांकन वार्तापत्राच्या पुढील अंकात देण्यात येईल. – संपादक)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]