नीता नागेश सामंत -
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणं म्हणजे खरंतर प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखं असतं, कारण लोकांचा बाबा-बुवांवर प्रचंड विश्वास असतो. खेड्यापाड्यांमध्ये जादूटोणा, भानामती, करणी, डाकीण प्रथा या सगळ्या गोष्टींचा त्या लोकांवर एवढा पगडा असतो की, त्या विरुद्ध काही बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं असतं. अशावेळी हे काम करणार्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची साथ मिळणं, त्यांचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं. कुटुंबातूनच प्रत्येक वेळी विरोध झाला तर कार्यकर्त्यांचा धीर खचण्याची आणि मग तो काम सोडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा चळवळीच्या उपक्रमांची माहिती करून देणे, त्यासाठी कराव्या लागणार्या संघर्षाची जाणीव करून देणे खूप गरजेचं आहे. अंनिसचे चळवळीतले कार्यकर्तेसुद्धा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणाने चळवळीकडे आकर्षित होत गेले आणि चळवळीचा सच्चेपणा, साधेपणा, जसं बोलतो तसं वागण्याचा डॉ. दाभोलकरांनी घालून दिलेला परिपाठ यामुळे चळवळीचा एक भाग होऊन बसले. म्हणूनच कुठलाही आर्थिक किंवा राजकीय लाभ नसताना चळवळीचा विस्तार होत गेला.
मी चळवळीत का आणि कशी जोडली गेले हा विचार केला तर, खरं म्हणजे अंनिसचा संबंध येईपर्यंत मी अगदी डोळ्याला झापड लावून चालणार्या, कसलीही चिकित्सा न करणार्या, असं का? असा प्रश्न न पडलेल्या समाजाचीच एक घटक होते. देवाधर्माबद्दल, कर्मकांडांबद्दल, बुवा, बाबा, चमत्कार, ज्योतिष या कशाबद्दलच फारसा कधी विचार केला नव्हता. आमच्या घरात ज्या रूढी-परंपरा चालत आल्या होत्या, त्याबद्दल कुठलाही प्रश्न न विचारता त्या मनोभावे पाळायच्या एवढे मात्र जरूर करायचे. त्याबद्दल कुठलीही खंत नव्हती. स्वतःची चूकही वाटत नव्हती की, निष्क्रिय जीवन जगण्याची लाजही वाटत नव्हती. त्या मानाने माझ्या माहेरचं घराणं म्हणजे माझे वडील बर्यापैकी बुद्धिप्रामाण्यवादी होते. ते कुठल्याही कर्मकांडांवर, जात-पातीवर विश्वास ठेवणारे नव्हते. अगदी आईसोबत देवळात गेले, तरीसुद्धा ते बाहेरच चपला सांभाळायचं काम करायचे. आई मात्र नियमित शनीमहात्म्य, गजानन महाराजांची पोथी वाचत असे. वडील नेहमी बाबांची तुझी पोथी संपली की नाही म्हणून तिला चिडवायचे. त्यावेळी मला मात्र त्यांच्या या वागण्याची फार भीती वाटायची. न जाणो शनिमहाराजांची साडेसाती लागली तर? त्यापेक्षा आई वाचतेय तर तिला वाचू द्यावं असं वाटायचं. उपास तापास या गोष्टींशी माझा अजिबात संबंध नव्हता; पण लग्न झाल्यानंतर नागेश सामंत मात्र दर गुरुवारी उपास करायचे. सोवळे नेसून दत्ताची पूजा करायचे. आमच्या गावच्या (श्रीपादवाडी ता. चंदगड) देवाला चार पायांच्या प्राण्यांचं मटण चालायचं; पण दोन पायांच्या म्हणजे कोंबडीचं मटण अंडी काहीच चालत नव्हतं. त्यामुळे माझ्या मनाविरुद्ध का होईना मला या गोष्टी पाळाव्या लागत होत्या. लग्न होऊन मुंबईहून चाळीसगावला आल्यावर सहजच आम्ही दोघं रोटरी क्लबचे सभासद झालो. रोटरीच्या उपक्रमात खेड्यापाड्यात आदिवासी वस्तीत जाण्याचा योग आला. तेव्हा त्यांची गरिबी बघून पहिल्यांदा असं जाणवलं की, किती ही तफावत श्रीमंतीतली आणि गरिबीतली. कुठली अशी व्यवस्था आहे जी पिढ्यान् पिढ्या या लोकांना गरीबच ठेवते आहे. कधी यांची परिस्थिती सुधारणार? याचवेळी आमच्या रोटरी क्लबमध्ये श्याम मानवांचं तीन दिवसांचं शिबिर आयोजित केलं होतं. पहिल्यांदाच अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय मनाला इतका भावला की, प्रत्येक गोष्टीची अरे आपण या दृष्टीने कधी विचारच केला नाही ही चुटपूट मनाला लागली. आमच्या श्रीपादवाडीलासुद्धा मोठे मोठे गोल दगड पडायचे आणि माझ्या सासूबाईंच्या तोंडून त्याच्या सुरस कथा आम्ही कुठलाही प्रश्न न पडता ऐकायचो. जेव्हा हे कळलं की हा भानामतीचा प्रकार आहे, दगड टाकून लोकांना कोणीतरी तिथलीच व्यक्ती घाबरवते आहे आणि आपली अतृप्त इच्छा पूर्ण करून घेते आहे आणि तिथल्या देवाचं गावाचं महत्त्व वाढवून घेते आहे तेव्हा आमचीच आम्हाला लाज वाटली. असल्या भाकड कथांवर आमच्यासारखे सुशिक्षित एवढा विश्वास ठेवतात तर बिचार्या अशिक्षितांनी तसं वागलं तर त्यांचं काय चुकलं?
लोकविज्ञान चळवळीतर्फे चाळीसगावात एक वैज्ञानिक परिषद झाली त्यावेळी डॉ. दाभोलकरांची पहिल्यांदा ओळख झाली. त्यांच्या सरळ साध्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने आम्ही इतके भारावून गेलो की, १९८९ मध्ये जेव्हा म. अंनिस स्थापन झाली त्यावेळीच आम्ही कार्यकर्ते झालो.
लहानपणापासून खूपच सुखवस्तू वातावरणात वाढल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कमतरतेची जाणीवच नव्हती; पण अंनिसत आल्यावर मात्र आजूबाजूच्या एकंदर परिस्थितीचं भान आलं. जाणीव झाली. पैशांची उधळपट्टी, डामडौल, मोठेपणातच आनंद मानण्याऐवजी साधेपणाने जगण्याचं, दुसर्याच्या दुःखात त्याला मदत करण्याचं समाधान जाणवलं. नागेश सामंतांनी तर कुठलेही समारंभ जिथे पैशाची उधळपट्टी आहे तिथे जाणच बंद केलं. सुरुवातीला त्यांच्या या वागण्याचा मला खूप त्रास व्हायचा कारण मला कुटुंबासोबत समाजाशी संबंध ठेवायचे होते. कुटुंबातील लोक म्हणायचे तो एक चक्रम सारखा वागतो तू का त्याचं ऐकतेस? तुम्हाला तीन मुली आहेत तुम्ही असं वागलात तर कशी होणार त्यांची लग्न? कोण तुमच्याशी संबंध ठेवणार? असं सारखं ऐकून घ्यावं लागल्यामुळे माझी खूप चिडचिड व्हायची. मला खरंतर अंनिसचे विचार पूर्ण पटलेले होते; पण तसं आचरण करण्याची भीती वाटत होती. तेवढं धैर्य नव्हतं. आपण समाजापासून, कुटुंबापासून एकटे पडू ही भीती वाटत होती. जसं वाचन वाढत गेलं तसतसं माझ्या व्यक्तिमत्त्वातसुद्धा फरक पडत गेला. विचारांना दिशा मिळाली. त्यामुळे तसा आचार करण्याची भीती कमी होत गेली. विचारांचा ठामपणा आणि तो कृतीत आणण्याचे धैर्य डॉ. दाभोलकरांकडून शिकायला मिळालं.
त्या काळात आमच्या धंद्याचा व्याप खूप मोठा असल्यामुळे आणि मुलींना वाढविण्याची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे चळवळीत सक्रिय सहभाग घेणं मला जमत नव्हतं. तरीसुद्धा संघटनेच्या सगळ्याच उपक्रमात म्हणजे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पांतर्गत शिक्षकांची शिबिरं असोत, सर्प आणि अंधश्रद्धा या मोहिमा असोत, पशुहत्या बंदीची चळवळ असो सगळ्यातच माझा खारीचा वाटा असायचा.
अचानक आमच्या सहजीवनात खंड पडला. २००६ मध्ये नागेश सामंतांचं अचानक हार्ट अटॅक येऊन निधन झालं. खूप मोठा मानसिक धक्का बसला. केवळ अंनिसच्या विचारांमुळे, डॉ. दाभोलकरांच्या विवेकवादी आचरणाच्या शिकवणीमुळे मी दुःखातून लवकर सावरू शकले.
समाजात अंनिसचं काम करत असताना बरेच भले बुरे अनुभव येत असतात. अंनिस कार्यकर्ते म्हणून बर्याच ठिकाणी आदराने वागवले जाते. शाळांमध्ये किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने, विज्ञान दिनाच्या निमित्ताने किंवा वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमास बोलविले जाते. आपल्या कुठल्याही कार्यक्रमांची बातमी पत्रकार अगदी आनंदाने पेपरमध्ये छापण्यास तयार असतात. मात्र आपले विचार न जुळणार्या एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये कितीतरी वेळा आग्रह धरूनसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित कार्यक्रम करण्याचा उत्साह दाखवला जात नाही तेव्हा मन थोडं निराश, होतं खट्टू होतं.
एक अनुभव इथे सांगावासा वाटतोय. आम्ही चाळीसगावहून दिल्ली, तिथून डेहराडून मसूरी अशी ट्रीप ठरवलेली होती. नागेश सामंत आणि मी आम्ही दोघं आणि आमच्याबरोबर आमचे मित्र श्री. बुवा आणि श्रीमती बुवा. दिल्लीच्या पुढे टॅक्सीमध्ये श्रीमती बुवांच्या पोटात दुखायला लागलं. पहिल्यांदा अपचन असेल म्हणून बरोबर घेतलेल्या औषधांचा वापर केला. अजिबातच जेव्हा थांबेना तेव्हा कसेबसे डेराडूनला पोचलो. एका हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती कराव लागलं आणि त्यांचं अपेंडिक्स बर्स्ट झाल्यामुळे तातडीने ऑपरेशन केलं पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं. ऑपरेशन झाल्यावर दुसर्या दिवशी रक्ताची रिऍक्शन होऊन संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला एवढा मोठा धक्का बसला होता की, काय करावं सुचत नव्हतं. बुवा तर पूर्ण कोलमडून गेले होते. तीन राज्य बदलून मिसेस बुवांची बॉडी चाळीसगावला घेऊन जाणं हे खूप मोठं कठीण काम होतं. माझ्या तीनही मुलांना मी आता कुठली आई दाखवू हा श्री. बुवांचा आक्रोश ऐकवत नव्हता. श्री. बुवा आमच्या बरोबर राहून बरेचसे अंनिसच्या विचारांचे झाले होते. मुलांकडे आईला अशा स्थितीत नेण्यापेक्षा आपण डेराडूनलाच तिचे अंत्यविधी करू या का या सूचनेचा त्यांनी लगेच स्वीकार केला. ती रात्र हॉस्पिटलमध्येच काढायची होती. एका खोलीत श्रीमती बुवांचा मृतदेह ठेवला होता. दुसर्या खोलीत आम्ही दोघं श्री. बुवांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होतो. रात्र संपता संपत नव्हती. त्याच हॉटेलमध्ये एक मराठी माणूस ज्याच्या बायकोचं ऑपरेशन तिथेच झालं होतं तो आम्हाला सकाळीच भेटला होता. तो तिथे ओ.एन.जी.सी. या कंपनीत बदली होऊन आला होता. त्याचं गाव सांगली जवळचं होतं. तो डॉ. दाभोलकरांना ओळखत होता. अंनिसबद्दल त्याला चांगलीच माहिती होती. आणि खूप जवळीकही होती. परक्या राज्यात एक समान धागा सापडला होता. ऑपरेशनच्या आधीच त्याची आणि आमची ओळख झाली होती. ही घटना घडल्यावर त्याने आम्हाला इतकी मदत केली की, त्याच्याशिवाय आम्ही श्री. बुवांना सावरूच शकलो नसतो. आम्ही तिथेच अंत्यविधी करणार हे ठरल्यानंतर स्मशानात सगळी सोय लावण्यापासून जे जे काही करावं लागतं ते सगळं त्याने केलं. स्वतःच्या बायकोचं ऑपरेशन झालं आहे हे तो विसरूनच गेला. पुढे आमचं सगळं सामान गोळा करणे आम्हाला दिल्लीपर्यंत टॅक्सी ठरवून देणं, बुवांच्या नातेवाईकांना फोन करणं सगळी कामं त्याने स्वतःचंच कोणीतरी गमावलंय असं समजून केली. त्या दुःखाच्या प्रसंगात त्याचे आभार मानण्याचं सौजन्य पण आमच्याकडे उरलं नव्हतं. चाळीसगावला पोहोचल्यावर एकेक गोष्टीचा जेव्हा विचार केला, तेव्हा जाणवलं की अंनिस हा एकच धागा इतकी मोठी मदत मिळण्यास कारणीभूत ठरला. त्याची मदत, त्याचे उपकार आम्ही कधीही विसरू शकत नाही.
डॉक्टर दाभोलकरांनी आखून दिलेला हा मार्ग कितीही कठीण असला, तरीसुद्धा विवेकवाद आणि मानवतावाद अंगीकारून अतिशय सच्चेपणाने संयमाने सर्वांशी संवाद साधून आणि चळवळ पुढे नेणं हेच त्यांच्या स्मृतीस अभिवादन आहे.
-नीता नागेश सामंत (चाळीसगाव)
संपर्क : ९७६६६ १४९९४
