श्रीपाल ललवाणी -
‘वारकरी संतांची अंधश्रद्धा निर्मूलनावरील विवेकी ग्रंथमाला‘चे प्रकाशन
“धर्म मूलतः चांगलाच असतो, पण त्यात अनेक अनिष्ट गोष्टी प्रवेश करतात, त्यामुळे धर्माचे स्वरूप विकृत व शोषण करणारे होते. अंधश्रद्धा निर्मूलनामुळे धर्माचे शुद्धीकरण होते, या दृष्टीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम महत्त्वाचे आहे. संतांनीही अनिष्ट रूढींविरोधात प्रबोधन केले आणि त्यामुळेच महाराष्ट्रात समाजसुधारकांची मोठी फळी निर्माण झाली. कट्टर नासिकतेचा आपण पुरस्कार केल्यास लोक आपल्याकडे येणार नाहीत, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे वारकरी संतांची ‘अंधश्रद्धा निर्मूलनावरील विवेकी ग्रंथमाला’ या अंतर्गत दहा पुस्तिकांचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते.
आपल्या प्रास्ताविकात मुक्ता दाभोलकर यांनी या पुस्तिका प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “डॉ. दाभोलकर हे नेहमी सांगत की, आम्ही संतांचेच काम करत आहोत. संतांनी अंधश्रद्धेवर प्रखर कोरडे ओढलेले आहेत. लेखक परुळेकर यांना या पुस्तिका लिहिण्याविषयी सांगितल्यानंतर पहिली पुस्तिका त्यांनी एका दिवसात लिहून पूर्ण केली हे विशेष. नास्तिकतेचा प्रचार व प्रसार करणे हे अंनिसचे ध्येय नसून विवेकी व विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करणे, हे समितीचे उद्दिष्ट आहे. या दृष्टीने या पुस्तिकांचे महत्त्व आहे.”
या पुस्तिकांचे लेखक ह. भ. प. देवदत्त परुळेकर या प्रसंगी म्हणाले, “या पुस्तिकाचे लेखन करण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी मोठी संधी आहे, असे मी मानतो. या मालिकेत आणखी दहा संतांचे विचार मी लिहिणार असून त्यात पाच महिला संत आहेत. अंनिसने मला ही संधी दिली याबद्दल मी समितीचा आभारी आहे.”
‘रिंगण’ या नियतकालिकाचे संपादक सचिन परब प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना या वेळी म्हणाले, “अंनिसचे कार्य हे संतांच्या कार्याला पूरक असेच कार्य आहे. वारकरी संप्रदाय हा एक खुला विचार असून त्यात सर्व समाजाचा विचार करण्याची भावना आहे.”
राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले. अनिल वेल्हाळ यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी गणेश चिंचोले, दीपक गिरमे, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, म. भा. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
-श्रीपाल ललवाणी
