शंकर कणसे -
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागामधून झालेल्या हल्ल्यात जखमी अमित साळुंखे या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यात संभाजीनगर येथे घडली. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तातडीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी ‘सेफ हाउस’ कार्यान्वित करावीत अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत करण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र अंनिस गेली तीस वर्षे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना पाठबळ देण्याचे काम करते. अशा जोडप्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र अंनिस मार्फत सातारा येथे पोलीस दलाच्या सहकार्याने ‘स्नेहआधार’ हे सुरक्षा निवारा केंद्र देखील चालू केले आहे. आंतरजातीय/धर्मीय विवाह केलेली जोडपी या सुविधेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र राज्य गृहविभागाच्या आदेशानुसार अशा स्वरूपाची सुरक्षा निवारा केंद्रे प्रत्येक जिल्ह्यात उभी करणे आवश्यक आहे. औरंगाबादमध्ये असे सुरक्षा निवारा केंद्र असते तर अमित साळुंखे याचा खून टाळता येऊ शकला असता. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात विनाविलंब सेफ हाउस कार्यान्वित करावीत अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त केली आहे.
याविषयी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या घटनेमधील आंतरजातीय विवाह केलेले जोडपे अमित साळुंखे आणि विद्या कीर्तीशाही दोघेही संभाजीनगर पोलिसांकडे सुरक्षा मागणीसाठी गेले असता त्यांना कोणतीही मदत न करता परत पाठवण्यात आले. विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तीशाही आणि चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते याकडे देखील अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. या स्वरूपाचे दुर्लक्ष करणार्या पोलीस कर्मचार्यांवर कठोर कार्यवाही केली जावी, अशी देखील मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या घटनेतून खून झालेल्या अमित साळुंखेची पत्नी विद्या व कुटुंबीयांची इंदिरानगर परिसरात असणार्या त्यांच्या घरी भेट घेतली. अंनिसच्या शिष्टमंडळात अंनिस सेफ हाऊसचे संचालक शंकर कणसे, राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, डॉ. दीपक माने, मोहसीन शेख, मधुकर गायकवाड, शंकर बोर्डे, पी. यू. आरसूड, जालना त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष व्यंकट भोसले, जिल्हा प्रधान सचिव लक्ष्मण जांभळीकर यांचा समावेश होता.
– शंकर कणसे, सम्राट हाटकर